ही वाट दूर जाते

सुचेता's picture
सुचेता in विशेष
8 Mar 2015 - 2:00 am
महिला दिन

“ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा”
खरेतर खूपदा कानावर येणारं, ऐकून- ऐकून सवयीनं लक्षात राहिलेलं हे गाणं, पण आज का कोण जाणे त्यातील आर्तता माझ्या अगदी-अगदी अंगावर येत गेली. केव्हा न कळे माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये पाण्याचा सागर भरून गेला नकळत माझ्या, माझीच मी अशी उरली नाही, गालावरून सरीवरून सरी ओघळत राहिल्या, त्या लडिवाळ स्वरांच्या मागून माझं मन कुठल्या कुठे-कुठेतरी प्रवासाला जात राहिले. एक-एक पाऊल मागे-मागे जात असताना मनातील कितीतरी अलवार क्षणांना जागवत गेले. किती हळुवार कप्प्यांना, जागांना जागवून मला पुरतं घायाळ करून सोडलं त्यानं.

आज इतकी यशस्वी, कार्यक्षम, कर्तव्यकठोर, करारी अधिकारी म्हणुन प्रसिद्ध असणारी मी कधी-काळी मनानं इतकी हळवी होते ? मनात हे एव्हढं कोवळं-कोवळं अजूनही शिल्लक उरलय का खरंच माझ्या? मनात प्रश्नाचं मोहोळ उठलं. या कडेवरून त्या कडेवर, या लाटेवरून या लाटेवर असह्यपणे डोलणाऱ्या, शिडीशिवायच्या त्या छोटुल्या होडकुली सारखं ते पाण्याच्या थपडा खावू लागले. उगाचच मोठ्यांच्या पोहण्याची हौस घेऊन एखाद्या छोट्यानही पाण्यात सूर मारावा नि पोहता न आल्यानं नाकातोंडात पाणी जावून जीव अगदीच घाबराघुबरा व्हावा, तस काही झालं अचानक. अचानकच किती ते आठवांच पाणी उचंबळल, पार श्वास घेण मुश्कील व्हावं इतकं.

‘स्वप्न’!! स्वप्नातील गाव, नकळत्या वयात मनाला जाणवलेलं वेगळ्या व्यक्तिमत्वाचं अस्तित्व आणि ते कोवळे ऋणानुबंध!! काय नि काय एकेका शब्दाबरोबर मनाच्या आसमंतात उधळतच राहिले, त्या काळात-नववी-दहावीच्या वयात खरतंर कुणाच्यातरी प्रेमातच पडण्याच्याच त्या वयात कसं कोण जाणे जाणवलेलं त्याचं आकर्षण ! प्रेम म्हणायचं का त्याला ? हा प्रश्न आता पडतो. पण तेव्हा तर ठाम आग्रहच होता की हेच आपले प्रेम आणि स्वप्न होतं. त्याच्या योग्यतेचं, बनण्याचं. जाऊन समोर बोलण्याचं धाडस तर नव्हतंच-नव्हत. पण मला खुळीला मात्र वाटायचं मी ही आवडतेच त्याला, नव्हे-नव्हे त्याचं ही तितकंच प्रेम आहे माझ्यावर. नाही तर मान वळवून वळवून नजर का गुंतते माझ्या नजरेत नि मग प्रत्येकच गोष्ट करताना हे त्याला आवडेल की नाही हाच विचार पहिला. त्याच्या आवडी-निवडी काय आहेत? हे समजून घेण्यासाठी किती धडपड नि ते सगळं सगळं जपण्यासाठी जिवाचा कोण आटापिटा, त्रेधातिरपिट खरी ह्यासाठी की हे सगळं दुसऱ्या कुणाच्या, अगदी आई-बाबा-मैत्रिणींना ही समजू नये यासाठी.

हं!!! स्वप्न तर स्वप्नच उरलं की काय ? कधीतरी मला न कळताच तो बदलीच्या गावी गेला नि इतकं अगदी इतकं मनापासून हवं असणारं माझं स्वप्न मात्र भंगलं. आता हे इतकं तटस्थपणे म्हणतेय खरं पण त्यावेळी, त्यावेळी ते इतकं का सहज होतं ? काय-काय नि किती-किती अस्सल माझं मी पण बरोबर घेवून गेलं ते कोण जाणे? पाण्यातून बाहेर काढलेल्या मासळीसारखं तडफडत राहिलं माझं मन त्या एका गोष्टीनं.

त्या वयात सिनेमा, कथांसारखंच वाटत होत आयुष्य आणि रोजच्या कित्येक साध्या साध्या गोष्टीत त्याची साथ मी अपेक्षिली होती. अगदी प्रत्येक श्वासागणीक मला उणीव जाणवत होती नि मी क्षणाक्षणांनी खचत होते, निराश होत गेले. स्वप्न बघताना हे कधी जाणवलच नव्हत की मी इतकी गुंतत चाललीये ज्यात, कधीतरी त्यातून कदाचित बाहेर ही पडावं लागलं तर? कोवळ्या नकळत्या वयात फक्त त्याची होणं हे एकच स्वप्न घेऊन जगत असलेली मी अचानक तो दुरावताच सगळ्यात जास्त दुरावत गेले. ते मी चुकीचंच स्वप्न बघत असल्याचा साक्षात्कार झाल्यानं. न्यूनगंडाने पछाडलेली मी एकेकटी राहू लागले. तरी बरं की हे सगळे माझ्याच मनाचे खेळ माझ्याच पुरते मर्यादित होते.

‘रूला के गया सपना मेरा, बैठी हू कब हो सवेरा’ , अशी अवस्था घेवून कितीतरी लोक सतत आजूबाजूला वावरत असतात. आपल्या तुटल्या स्वप्नांच्या काचांची फुले करून मिरवणारी लोक विरळाच. बहुदा त्यानं जखमी, गलीतगात्र होणाऱ्यांची संख्या जास्त.

काहीतरी तर करायलाच हवं यातून बाहेर यायला. त्या वयात करण्यासारखं तरी दुसरं काय असणार मग अभ्यासाशिवाय. मन प्रयत्नपूर्वक अभ्यासावर घातले. खूपदा प्रत्येक पानापानावर नि शाईनं उमटलेल्या रेघांवर त्याचं अस्तित्व जाणवायचं. खूप असह्य व्हायचं. पण मन म्हणजे अजब चीज. हे सारं दुखावून घेणंच आवडायला लागलं कधीतरी. त्याच त्या काळात कुणातरी प्रशासकीय अधिकाऱ्याचं भाषण ऐकलं नि ठरवून ही टाकलं असच काहीतरी आपल्याला व्हायचयं. दाखवूनच द्यायचय त्याला कोणय मी?

लक्ष्य, ध्येय, गोल, सगळं काही म्हणलं तर वेगवेगळं, म्हणलं तर एकच. कुठलीही गोष्ट घ्या. अगदी माणसानं आकाशात विहार करण असो कि टेलीफोनवरचं बोलणं, या सगळ्या गोष्टी घडण्याआधी ते साकार होण्याआधी ते तसं व्हावं असं कुणाच्यातरी मनात आलं असणार पहिल्यांदा आणि त्यानं ते प्रत्यक्षात आणण्याचं स्वप्न बघितलं असणार नक्की. नंतरच ते साकार झालं असणार. जस आत्ता आत्ता पार पडलेला आफ्रिकेतला फूटबॉल विश्वचषक सोहळा. तो झाल्यावर प्रत्येक देशातल्या वर्तमानपत्रातून स्तुतींचे रकानेच्या रकाने भरून येत होते. कारण जगाचा तिसरा भाग म्हणुन प्रसिद्ध असणाऱ्या या देशांनी की जिथे प्रत्येकच गोष्ट म्हणजे रोजच्या जीवनावश्यक गरजा अन्न, औषधं यासर्वांसाठी दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्या देशांकडून इतक्या भव्य, नीटनेटक्या संयोजनाची कुणी अपेक्षा धरली नसतांना हे आश्चर्य कसे घडतेच घडते. शाहजहानच्या स्वप्नातल्या गोष्टीला आजं सातवं आश्चर्य म्हणुन ताजमहाल कडे बघतोच की आपण.

ती एका मुंगळ्याची गोष्ट आहे ना? झाडाखाली असलेला एक मुंगळा मधासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होता पण कस काय कोण जाणे थोडा चढला की खाली घसरत होता. परत परत पडत होता, धडपडत होता. इवलासा तो जीव पण अगदी आपल्या जीवाचा आटापिटा करत होता, परत परत न थकता अविश्रांतपणे प्रयत्न करत होता. कित्येक वेळाच्या प्रयत्नानंतर थपडा खात खात का होईना वर चढत चढत आज एक कुशल प्रशासकीय अधिकारी बनलेच.

करड्या शिस्तीच्या कार्यकाळात अनेकदा गाडीतून खूप दूरवर प्रवास करतांना फायलीतच डोकं खुपसलेलं असतं बहुधा. पण या गाण्यानं अक्षरशः खेचून काढलं मला त्या दुनियेतून. आज हातातली काम सोडून मी डोळे बाहेर सोडून दिले नि खरचं गाडी माझी माझ्या स्वप्नातल्या गावातून तर जात नाही ना? असा संभ्रम पडला मनाला. माझ्या स्वप्नातला गावं अगदी हिरवीगार वेलबुट्टी पांघरलेला, निसर्गसंपन्न, कोसळत्या पावसात धुवून लख्ख झालेला. बहुधा आज डोळ्यात पाणी भरण्याचाच दिवस असावा. डोळे मिटून मी मागे थोडी रेलले, मनातले विचार मात्र कुठच्या कुठे भरकटत चाललेले.
खुपदा असं होत नाही? आपण काहीतरी दिवास्वप्न बघतो, मला हे करायचय, मला ते व्हायचय, मला हे हवं आणि ते हवं आहे. पण आपल्याकडे फक्त दिवसांचीच स्वप्न बघायची सवय. अशावेळी आपण फक्त स्वप्नच बघत राहिलो, ती पूर्णत्वाला नेण्यासाठी काहीही विचार, नियोजन न करता तर काय आपली गत ‘शेखचिल्ली’ सारखीच की. मग स्वप्न पुरी होत नाहीत म्हणून निराशेची गर्ता आहेच. किती कोवळी मुलं आज हे सुंदर जीवन संपवतात फक्त चुकीची स्वप्नं, अपेक्षा बघून.

आयुष्य काय एक स्वप्नांची मालिकाच, एक नाही पुरे झाले तर पुढचे. सतत स्वप्न पाहण्याची ही ताकतच तर माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे करते नाही का ? काय असते खरं म्हणजे हे स्वप्न, अंधाऱ्या रात्री कधी मनाला लख्ख प्रकाश देणारे, तर कधी कुणाला त्याचीच भीती घालणारे. दिवसाउजेडी मनात असणारे हे अमूर्त विचार असे रात्री स्वप्नातून अनुभवणारे कितीएक जण पदोपदी भेटतात.

खूप उंच माळ्याच्या एका बिल्डिंगमधून काही काम आटोपून मी घाई-घाईने परतत होते. ही घाई माझी सदाचीच. असेच कुठेतरी जायचे होते म्हणून मी लिफ्टच्या बटनावर हात दाबूनच उभी होते. लिफ्ट आली, दरवाजा उघडला आणि मी आत पाय टाकला, तर काय खाली जमीनच नाही. हातात कामाचे कागद असल्यानं धरलं नाही काही आधाराला नि खोल-खोल जायला लागले. गर्द अंधार आजूबाजूला, हातातले कागद निसटून माझ्या इतक्याच वेगाने खाली येतायेत, कुठे चाललेय, कुठे पडणार काहीच समजेना आणि टक्क जागी होते. पूर्ण घामाने भिजलेली, घाबरून छातीची धडधड एवढी की मलाच ऐकू येतेय. कसला घाबरवणारा अनुभव.

काही वेळातच कळतं या स्वप्नसृष्टीचं लक्षण आपल्याला की हे सत्य नाही स्वप्न होतं, नि आपण नि:श्वास टाकतो. पण कुणा लग्नाळू मुलीला स्वत:च्या संसाराची स्वप्न पडत असतात. नि ती खरीही होत असतात. काही अधिक उणे तर असतेच पण काही जणांची अशी स्वप्ने ही विरतात या गाण्यासारखी
“सोनियाचे स्वप्न माझे विरायचे विरायचे
हळू-हळू बाबा संगे चालायचे चालायचे
येती ऋतू जाती ऋतू शेतातून राखायचे”

लहान मुलांची स्वप्न बघा किती निरागस. रोज त्यांचं स्वप्न बदलत असतं, त्यांच्या अनुभवाच्या कक्षेत येणारी प्रत्येक व्यक्ती बनण्याचं त्यांचं स्वप्न असतं रोजच्या रोज. आज सांगतील मला डॉक्टर व्हायचयं तर उद्या सांगतील मला कंडक्टर व्हायंचयं आणि ते ही ठामपणे. लहानपणाचा हा निरागस विश्वास वाढत्या वयाबरोबर कमी होत असला तरी स्वप्नांच्या-ध्येयांच्या कल्पना सुस्पष्ट होत असतात. आणि अशा वेळी जे ध्येय ठरते आपले ते पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्नांची पराकाष्ठा करतात ते त्यात यशस्वी होतातच आणि काहीजण ही आयुष्यभर लहान मुलांसारखीच राहतात की रोज त्यांची स्वप्नं, ध्येयं बदलत राहतात.

आयुष्यात नक्की काय करायचंय आपल्याला हेच जर आपलं निश्चित नसेल तर आयुष्याचं वारू भरकटलंच म्हणून समजा. फुलपाखराला या फुलांवरून त्या फुलांवर फिरतांना मध तरी मिळतो पण असं या ध्येयावरून दुसऱ्या ध्येयावर जाणाऱ्या लोकांना ते ही मिळत नाही.

गाडी कधीतरी ऑफिसच्या आवारात थांबली. मी डोळे उघडून माने बरोबर डोक्यातील विचारांना झटकून देण्याचा प्रयत्न केला आणि ऑफिसमध्ये शिरले. माझ्या नेहमीच्या खुर्चीत बसतांना मला शिरस्त्याप्रमाणे सरकारी दफ्तरात असणारा गांधीजींचा फोटो दिसला अन मनाने पुन्हा उसळी मारली.

काळ्या लोकांना रेल्वेच्या फर्स्टक्लास मधून प्रवास करण्याची परवानगी नाही म्हणून गाडीतून बाहेर काढलेल्या एका तरूणाने मनात एक आग लावून घेतली कि मला गाडीतून बाहेर काढले काय, तुम्हाला माझ्या देशातून बाहेर काढतो. ती व्यक्ती केवढी-ध्येय केवढे. पुढे जे घडले तो इतिहास. तपशीलात न जाताही इतकचं की जर ठरवलं तर काहीही साध्य होईल, कुठूनही साधन-सहाय्यता येईल, मार्ग निघेल आणि तुम्ही यशस्वी व्हालच व्हाल. जरूरी काय आपला आपल्या स्वत:वरचा विश्वास, आपल्या स्वप्नांवरचा विश्वास. कुणीही ऐऱ्यागैऱ्याच्या शेऱ्यांनी बुजून न जाता ध्येयानं प्रेरित वाट चालली की यश येणारच.

का कोण जाणे मन भरून आले, कोण कुठच्या छोट्याश्या गावात शिकणारी आज कुठल्या कुठे पोचून गेली. स्वप्नं पुरं झालचं पण ह्या सगळ्यानं जे मिळालं ते हवचं होतं, पण गमावलयं काय? वैयक्तिक पातळीवर बघितलं तर खुप एकाकीच असल्याच जाणवतयं. स्वनाच्या मागे धावताना स्वत:च्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नाही दिलं, आजपर्यंत तरी कधी हे जाणवलचं नाही, मग ही जाणीव आजच व्हायचं कारण काय?

स्वप्नाचं लखलखतं झुंबर पदरात पाडून घेताना मी जीवन उजळण्याचं सार्थक झाल्याचं मनात होते. आज जाणवतयं मन छोट्या छोट्या गोष्टीसाठी तृषार्त आहे. या कोसळत्या पावसात आईच्या हातचा गरम गरम चहा, भाचरांशी मस्ती घालत खायची गरमागरम भजी, अधिकाराची झूल थोडीशी बाजूला सारून स्वत:ला स्वत:ची करून द्यायची ओळख काय नि किती. आज प्रथमच मी फायलीला हात न लावता खिडकीशी जाऊन उभी राहिले. कोसळत्या धारात जणू माझं ही मन साफ होतंय.
मोठ्या स्वप्नपूर्तीत बाजूला पडलेल्या या छोट्या स्वप्नांना, आनंदाना जवळ घ्यायला आसुसलेलेच . नकळत माझ्याच मी खिडकीतून तळहात बाहेर पसरला. टपटप थंडगार स्पर्शानं मनात खूप मोहरून आले, ते तुषार गालांवर पडतानाच माझ्या मनातल्या अल्लड पोरीला अलगद वर आणलं.
चला सुरुवात तर छान झाली !

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

8 Mar 2015 - 4:31 pm | आयुर्हित

आपले स्वानुभव छान शब्दात मांडले आहेत.
अजून जरा वेळ दिल्यास एक छान आत्मकथा तयार होईल व हे आपण ठरविल्यास सहज शक्य आहे.
आत्तापासूनच आगाऊ अभिनंदन!

हि कथा आहे, एक छान आत्मकथा तयार होईल, माझे स्वानुभव नाही, आगाऊ अभिनंदनाचे बाबत धन्यवाद.

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2015 - 10:27 pm | प्रीत-मोहर

छानच लिहिलय्स सुचेताताई. लिहिते रहो

असेच म्हणते ...खरेच मस्त जालय लेख ..लिहित राहा !!

मधुरा देशपांडे's picture

8 Mar 2015 - 10:57 pm | मधुरा देशपांडे

खूप छान लिहिलंय. आवडलं.

छान लिहिलं आहेस,सुचेता.लिहीत रहा.

सविता००१'s picture

9 Mar 2015 - 1:49 pm | सविता००१

छान लिहिलंयस गं. आवडलं.

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 3:52 pm | स्पंदना

अतिशय तरल, एकाच वेळी वेगवेगळ्या भाव पातळींवर नेतो हा लेख!!

जुइ's picture

10 Mar 2015 - 6:11 am | जुइ

सुंदर लिहिले आहे!!

सस्नेह's picture

10 Mar 2015 - 5:15 pm | सस्नेह

ओढाळ मनाचा मागोवा घेणारे लेखन.

स्वाती दिनेश's picture

10 Mar 2015 - 8:44 pm | स्वाती दिनेश

छान लिहिलं आहे, आवडलं,
स्वाती

इशा१२३'s picture

11 Mar 2015 - 2:23 pm | इशा१२३

आवडल!अगदि मनातुन उतरलय.

अशी स्वतःत मारलेली डुबकी क्वचितच 'जमते' !
आवडलं. :)

सुचेता's picture

13 Mar 2015 - 8:04 pm | सुचेता

_/\_

मस्त झालाय लेख.. आवडेश. :)

Jyoti Deshpande's picture

17 Mar 2015 - 2:23 pm | Jyoti Deshpande

IF NOT FULFILLED....... ,
THEY GIVE NAME OF "INFATUATION" TO THIS HONEST FIRST CRUSH ..........
WHICH MAY BE IMMATURE BUT PURE.....
&
IF U R LUCKY ENOUGH TO GET THE PERSON........
"प्रेमाची गोश्ट" पुरन होते....
मनच्या कुपीचे झाकन उघडा.......स्वता:पुर ता तरी ......

(not good in typing marathi...... haluhalu shikate aahe)

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 2:06 pm | कविता१९७८

खूप छान लिहिलंय. आवडलं.

विभावरी's picture

20 Mar 2015 - 4:13 pm | विभावरी

चांगल लिहील आहेस सुचेता !

पैसा's picture

23 Mar 2015 - 1:07 pm | पैसा

तुझ्या कविता वाचल्या होत्या. ही गद्यकविताच आहे!