सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


राणी पद्मिनीचा चित्तोडगड

Primary tabs

इशा१२३'s picture
इशा१२३ in विशेष
8 Mar 2015 - 1:54 am
महिला दिन

दिवाळी जवळ आली आणि सुट्टीत ट्रीपला जाण्याचे बेत ठरू लागले. मग जाण्यासारख्या ठिकाणांची उजळणी सुरू झाली. मी गोवा आणि नवरा राजस्थानवर अडून बसला आणि शेवटी जिंकला.

मुलांना असणार्या सुट्ट्यांचा हिशोब करून त्यानुसार मुख्य ठिकाण, अंतर इ. माहिती मिळवून एकदाची आखणी झाली. सुंदर शाही राजवाड्यांच्या हॉटेलात राहायचा अनुभव घ्यायचे ठरले.
दिवाळीनंतर ठरल्याप्रमाणे उदयपूरला पहिल्यांदा पोहचलो. उदयपूरचा भव्य सिटी पॅलेस आणि इतर ठिकाणे पाहून चौथ्या दिवशी गाडी पुष्करकडे वळली. जाताना वाटेत पाहायचे होते चित्तोड. मनात फार वर्षांपासून ठाण मांडून बसलेला राणी पद्मिनीचा चित्तोडगड.
भारतातील सगळ्यात मोठा किल्ला म्हणून नावाजलेला, ७ दरवाजे, ११३ मंदिरे, अनेक वास्तू आणि तलाव असलेला गड दोघं मुलं कसा फिरणार असा प्रश्न मनात आलाच. पण गाडी वरपर्यंत जाते आणि पूर्ण गड फिरू शकते आणि हवे तिथेच थांबायचे हे ऐकून हुश्श वाटले.

c
उदयपूरहून साधारण ११७ किमी. अंतरावर असलेले चित्तोडगड २ तासात आलेच. आतापर्यंत न जाणवणारे भर दुपारचे ऊन आता जाणवू लागले. सुट्टी असल्याने गर्दीही बरीच होती. (आणि त्यांच्या हातातल्या वस्तू बघून माकडंही.)
चित्तोड मेवाडची राजधानी. सिसोदिया सूर्यवंशी राजाने ७व्या शतकापासून तिथे राज्य केले. मेवाडचा पाया घालणारा सुप्रसिद्ध राणा बाप्पा रावळला म्हणे हा किल्ला हुंड्यात मिळाला. या किल्ल्याने तीन वेळा जोरदार आक्रमणाला तोंड दिले. १३०३ साली खिलजी, १५३४ साली बहादूरशहाने आणि १५६७ साली अकबराने चित्तोडवर स्वारी केली. चित्तोड तीनही वेळा मोडकळीस येऊनही सावरले. रजपूत राजांनी पुन्हा दिमाखाने उभे केले.
चित्तोडच्या महान शासकांपैकी राणा सांगा, राणा रतनसिंग, राणा कुंभा या राज्यकर्त्यांनी चित्तोड वेळोवेळी वाढवले. अनेक सुधारणा केल्या, वास्तू बांधल्या.
वेगवेगळ्या दिशेला सात भव्य प्रवेशद्वारे असलेल्या या भव्य किल्ल्यात वळणदार रस्त्याने जाताना कडेची तटबंदी नजरेस पडत होती. आत शिरल्यावर प्रथम थांबलो ते मीराबाईसाठी बांधलेले देऊळ आणि शेजारीच असलेल्या कृष्ण-बलरामाचे देऊळ पाहण्यासाठी. गडावरील ११३ देवळांपैकी अनेक आक्रमणांनंतर सुस्थितीत राहिलेली ही देवळे. राणा कुंभाने १४३३ साली कृष्ण-बलरामाचे देऊळ बांधले.
.
बघत राहावी अशी सुबक घडण, अप्रतिम शिल्पकाम अजूनही टिकून आहे हे विशेष.
t

यानंतर काही अंतरावरच गडावरील अजून एक प्रसिद्ध वास्तू पाहायला उतरलो.

विजयस्तंभ.
V

गडावरील सुस्थितीत असलेल्या सुंदर वास्तूंपैकी एक म्हणजे विजयस्तंभ. राणा कुंभाने इ. स. १४४० मध्ये मोहम्मद शहा खालजीला हरवून विजयाचे प्रतीक म्हणून या स्तंभाची उभारणी केली. स्तंभावर आणि आतमध्ये सुंदर कलाकुसर आणि शिल्पकाम केलेले आहे. ३७. २ मीटर उंच अशा नऊ मजली इमारतीत अत्यंत सुंदर कलात्मक शिल्पकाम आतील बाजूस पाहायला मिळते. जाळीकाम केलेल्या खिडक्या, कोरीव भिंती, सुबक खांबावरील नक्षी अजूनही टिकून आहे.
प्रवेशद्वार
Vv

आतील नक्षीकाम
Iv

आत वरपर्यंत जायला १५७ उंच पायऱ्या मात्र जरा गुळगुळीत झाल्या आहेत. चढताना चांगल्याच दमवतात. वरच्या मजल्यावरून मात्र संपूर्ण चित्तोडगडाचे दृश्य पाहायला छान वाटते.

शेवटचा एक मजला राहिल्यावर छोट्या लेकीने असहकार पुकारला. मीही दमले होतेच. लगेच तिला पुढे करून मी खाली उतरून आले. नवरा आणि लेक मात्र वरून किती सुंदर बघायला मिळाले, फार काही अवघड नव्हतंच हे ऐकवत होते. तिकडे साफ दुर्लक्ष करून मी पुढचा रस्ता धरला.

अजून एक देवीचे उंच कळस आणि कोरीवकाम केलेले देऊळ सुस्थितीतील आढळले. गाईड बरोबर होताच पण त्याला यथातथाच माहिती होती. रजपुत राजांच्या कुलदेवतेचे हे देउळ असल्याचे वाचले.तिथे लिहिलेली माहितीच जास्त बरी होती. या आणि अशा भव्य देवळांपैकी आता फार थोडी शिल्लक राहिली आहेत हे ऐकून जीव हळहळला.

फार चालावे लागणार नाही असे वाटत होते तरी एवढ्या परिसरातच २ तास फिरलो होतो. पायऱ्या चढउतार करून बऱ्यापैकी दमलो. अजून तसंच सरळ चालत जाऊन टोकाला असलेल्या तटबंदी आणि नैसर्गिक झऱ्याकडे पायऱ्या उतरून गेलो. खालचे चित्तोडगाव लांबपर्यंत दिसत होते. अजून काही पायऱ्या उतरून साचलेल्या तळ्यात लोक वरून उड्या मारून पोहण्याचे कसब दाखवत होते.

tank

भरपूर दमलो होतो तरी अजून एक मुख्य वास्तू पाहायची होती. गडाच्या उत्तर टोकाला असलेला 'राणी पद्मिनीचा जलमहाल'! तिथपर्यंत गाडीने जायचे होते. इतिहासप्रसिद्ध राणा रतनसिंहाची खुबसुरत राणी पद्मिनीचा हा महाल आता थोडाच उरलाय. खिलजीनेच बराचसा उद्ध्वस्त केलाय.

Pp

पाण्यात मध्यभागी असलेल्या या जलमहालात राणी बसली होती आणि काठावरच्या वास्तूत आरशांची रचना करून तिचे फक्त प्रतिबिंब खिलजीला दाखवले. तिच्या तेवढ्या सौंदर्याच्या दर्शनानेही खिलजी पुरता वेडा झाला आणि तिला मिळवण्यासाठी धडपडला.
असं म्हणतात की खिलजीच्या ताकदीचा विचार करून वैर वाढू नये म्हणून या सुंदर राणीचे प्रतिबिंब दाखवण्याची राणाने तयारी दर्शवली. स्वतः राणाने खिल़जीचे स्वागत करून त्याला महालात उभे केले. राणीचे (की तिच्या मैत्रिणीचे?) आरशातील प्रतिबिंब पाहिल्यावर खिलजीचे विचार बदलले आणि गडाखाली सोडायला आलेल्या राणाला त्याने दग्याने कैद केले. राणी स्वाधीन झाली तरच तिच्या नवऱ्याची आता सुटका शक्य होती.

पेचात सापडलेली पद्मिनी गडबडली नाही तर चतुराईने तिने आपल्या बरोबर ७०० दासी आणायची परवानगी मिळवली. पालखीत ७०० दासींऐवजी सैनिक बसवून आणि पालखी उचलायला भोयांऐवजी सैनिक बरोबर घेऊन पद्मिनी गेली आणि हल्ला करून नवऱ्याला सोडवून आणले.

पण खिलजीला हा अपमान कसा सहन होणार? त्याने परत आक्रमण करून गड ताब्यात घेतला. लढाईदरम्यान राणी पद्मिनीने तयार केलेली स्त्रियांची फौज देखील होती. राणी स्वतः गडावर मोर्चे बांधणीकडे लक्ष देत होती. पण दुर्दैवाने आणि फितुरीने खिलजीने इ. स. १३०३ मध्ये गड जिंकला. आणि अखेरीस स्वाभिमानी राणी पद्मिनीने खिलजीच्या ताब्यात जाण्यापेक्षा जोहार पसंत केला. असं सांगितलं जातं की अपकीर्ती आणि बेअब्रू होण्यापासून वाचण्यासाठी प्रथेप्रमाणे राणीने दासी, राण्या आणि राजघराण्यातील एकूण१६००० स्त्रियांसकट जळत्या चितेत उड्या घेऊन जोहार केला.
हा सगळा माहीत असलेला इतिहास पुन्हा त्या महालात उभे राहून ऐकला. मन सुन्न झाले होते. राणी फक्त सुंदर नव्हती; तर चतुर, शूर, स्वाभिमानी आणि प्रसंगी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभी राहणारी रजपूत स्त्री होती.
विजयस्तंभ पाहिल्यावर बाजूलाच एक मोठे मैदान होते. तेच पूर्वी जोहारस्थळ होते असे गाइडने सांगितले. तशी तिथे पाटीही होती. आता तिथला जोहारचा हौद बुजवून सपाट मैदान बनवलंय. याच ठिकाणी जोहार होत असे. वर्षानुवर्ष अनेक स्वाभिमानी स्त्रियांनी इच्छेने वा अनिच्छेने स्वतःच्या शीलरक्षणासाठी जोहार केले. किती बळी गेले असतील असे! राणी पद्मिनीने १६००० स्त्रियांसह केलेला जोहार, राणी कर्णावतीने गुजरातच्या सुलतानाने गड जिंकल्यावर १३००० स्त्रियांसकट केलेला जोहार ही ठळक उदाहरणे, असे अनेक इतर जोहार या ठिकाणी झाले. क्षणभरही तिथे थांबवेना.
जोहार स्थळ
johar sthal

राणी पद्मिनीचा विचार मनात घोळत असल्याने आता इतर काहीच पाहायचे मन होत नव्हते. परत येताना वाटेत फक्त खिलजीने आक्रमण करून जिथून प्रवेश केला ते भव्य प्रवेशद्वार पाहिले.
आणि अजून एक वास्तू बघण्यासाठी गाइडने आग्रह केला. ती म्हणजे कीर्तीस्तंभ. १२व्या शतकात बांधलेला हा स्तंभ विजयस्तंभापेक्षा जुना. तेवढा भव्य नसला तरी कोरीव. आता त्यावर जाता येत नाही. पायऱ्या गुळगुळीत झाल्यात. त्यामुळे फक्त बाहेरून फोटो काढून निघालो.

कीर्तीस्तंभ
K

भव्य आणि अप्रतिम शिल्पकामाने भरलेल्या वास्तू असलेला चित्तोडगड केवळ अविस्मरणीय.
पण त्यातही लक्षात राहिली ती राणी पद्मिनी. स्त्रियांच्या गौरवशाली इतिहासात या शूर, बाणेदार राणीला मानाचे स्थान मिळाले आहे ते योग्यच.
-इशा

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

8 Mar 2015 - 3:37 pm | आयुर्हित

अत्यंत समयोचित लेख,
अतिशय उत्कंठतावर्धक व माहितीपूर्ण लिखाण!

स्रुजा's picture

8 Mar 2015 - 7:27 pm | स्रुजा

सुंदर . फोटो ही मस्तच. आणि केवढा भव्य तो इतिहास. कथा साधारण माहिती होती पण इतके तपशील तुझ्यामुळेच कळले. महिलादिनाला अगदी साजेसा लेख :)

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 7:38 pm | सविता००१

लेख आणि फोटो तर क्या कहने... लाजवाब.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2015 - 11:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर फोटो आणि वर्णन !

सस्नेह's picture

9 Mar 2015 - 4:04 pm | सस्नेह

उदयपुर पाहिले तेव्हा असेच काहीसे वाटले होते !

जुइ's picture

9 Mar 2015 - 8:08 am | जुइ

सुंदर फोटो!!

मस्त वर्णन.लाजवाब फोटो!

मितान's picture

9 Mar 2015 - 12:53 pm | मितान

राणी पद्मिनीची आठवण दिल्याबद्दल धन्यवाद !
फोटो आणि वर्णनांनी सारा पट डोळ्यापुढे उभा राहिला.

( असे लोक का बरं नियमीत लिहीत नसतील ;) )

खरेच मस्त फोटो आणि लेख हि फार छान झालाय ..आता लवकरच राणी पद्मिनीच्या या ठिकाणाला जाणे
आले !!!

खुप छान माहिती आणी फोटोहि देखणे..

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2015 - 3:49 pm | प्रीत-मोहर

प्रवासवर्णन आवडले हो. अगदे४ए मुद्देसूद आहे. ;)

स्रुजा's picture

10 Mar 2015 - 9:12 am | स्रुजा

:लोलः गाळीव मुद्दे दिल्याबद्दल जाहिर निषेध ;)

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 4:02 pm | स्पंदना

पाह्यल आहे हे ठिकाण. अन मन असच गुदमरुन गेलं होतं त्या ठिकाणी. :(

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2015 - 5:57 pm | मधुरा देशपांडे

मस्त फोटो आणि वर्णन. राणी पद्मिनिबद्दल वाचताना सुन्न झाले.

सही फोटो आणि वर्णन. आता पुढच्या भारतवारीत इथे जायलाच हवे.

त्रिवेणी's picture

10 Mar 2015 - 11:54 am | त्रिवेणी

मस्त फोटो ग.
या दिवाळीत केरळ ला जायचा विचार करत होते आता प्लान बद्लावा का विचार करते आहे हा लेख वाचुन.

स्वाती दिनेश's picture

10 Mar 2015 - 2:55 pm | स्वाती दिनेश

प्रवासवर्णन आवडले.
मितानशी सहमत.इशा लिहिती रहा.
स्वाती

सानिकास्वप्निल's picture

11 Mar 2015 - 9:59 pm | सानिकास्वप्निल

प्रवासवर्णन आवडले गं , फोटो ही सुरेख आहेत.

पद्मश्री चित्रे's picture

13 Mar 2015 - 5:56 pm | पद्मश्री चित्रे

छान वर्णन व इतिहास .जायला हवं एकदा असं वाटु लागलं आहे. फ़ोटो पण मस्त. पण तो शेवटचा फोटो का दिसत नाही ? की मलाच दिसत नाही?

उमा @ मिपा's picture

15 Mar 2015 - 12:13 am | उमा @ मिपा

खूप सुरेख वर्णन केलं आहेस. फोटो मस्त.
सात वर्षांपूर्वी पहिला हा किल्ला पण आजही त्याचा विषय निघाला की डोळ्यासमोर उभा राहतो. आमच्यासोबत गाईड होता त्याने चित्तोडचा इतिहास अतिशय अभिमानाने, भावूकतेने मांडला. याठिकाणी गेल्यावर मनात वेगवेगळ्या भावना निर्माण होतात, काय नाही इथे? मातृभूमिविषयीचे प्रेम, निष्ठा, अचाट शौर्य, कलात्मकता, सौंदर्यदृष्टी, प्रसंगावधान, निर्भयता, भक्ती, प्रेम, प्रजा व राजा यांना एकमेकांविषयी वाटणारे ममत्व, अचंबित करतो हा किल्ला, एकदा जरी पहिला तरी कायमचा मनात स्थान निर्माण करतो.
आता पुन्हा एकदा जुने फोटो काढून बघणार.

प्रचेतस's picture

15 Mar 2015 - 6:43 am | प्रचेतस

लेख आवडला.
पण पद्मिनीच्या प्रतिबिंबाची कथा ही दंतकथा आहे.
त्याचे कसलेही ऐतिहासिक पुरावे नाहीत. बहुधा नंतर अमिर खुसरो का कुणाच्या तरी रचलेल्या कवनांत ही कथा आलेली आहे. अर्थात राण्यांनी जोहार केला हे मात्र खरेच.

सुरेख वर्णन इशा. जोहारबद्दल वाचुन अंगावर काटा अाला.

पियुशा's picture

16 Mar 2015 - 11:54 am | पियुशा

+१११
जोहारबद्दल वाचुन अंगावर काटा अाला.
खुप सुरेख चित्र वर्णन, लिहीत रहा ग :)

पिशी अबोली's picture

16 Mar 2015 - 3:26 pm | पिशी अबोली

१६००० या आकड्याची मला कल्पनाच करवत नाहि! :(
खूप छान लिहिलंय..

रुपी's picture

17 Mar 2015 - 3:19 am | रुपी

मला सगळे फोटो दिसत नाहीयेत.. पण जे दिसतात त्यांवरून गड किती छान असेल याची कल्पना येते..

मीता's picture

18 Mar 2015 - 5:51 pm | मीता

खूप छान लिहिलंय ग .

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 2:00 pm | कविता१९७८

सुंदर फोटो आणि वर्णन !

पैसा's picture

21 Mar 2015 - 8:01 pm | पैसा

सुंदर वर्णन आणि फोटो. राजपूत स्त्रियांच्या जोहाराबद्दल वाचून उदास वाटलं.