सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


अर्थ्स चिल्ड्रेन

Primary tabs

पैसा's picture
पैसा in विशेष
8 Mar 2015 - 1:42 am
महिला दिन

नमस्कार मंडळी! आज आपण Jean Marie Auel यांनी लिहिलेल्या Earth’s Children या कादंबरी मालिकेची ओळख करून घेऊया. १९८० साली या मालिकेतील पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले, The Clan of the Cave Bear. यानंतर २०११ पर्यंत या मालिकेत एकूण ६ भाग क्रमाक्रमाने प्रकाशित झाले.

The Clan of the Cave Bear,
The Valley of Horses,
The Mammoth Hunters,
The Plains of Passage,
The Shelters of Stone,
The Land of Painted Caves

एकूण सुमारे ४५०० छापील पाने मजकूर ६ खंडात विभागून लिहिण्याची प्रचंड कामगिरी श्रीमती ऑएल यांनी केली. २०१० पर्यंतच या पुस्तकांच्या एकूण साडेचार कोटी प्रती विकल्या गेल्या होत्या. बरीच वाट पाहून प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक आल्यानंतरचे आकडे मला माहित नाहीत. पुस्तकाची ओळख करून घेण्यापूर्वी लेखिकेची ओळख करून घेऊ. जीन मारी ऑएल यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३६ ला झाला. त्यांचे मूळ फिनलंडमधले, पण यु.एस्.ए. मधे स्थायिक. त्या एम्.बी.ए. झालेल्या आहेत. आणि ५६ वर्षांचे प्रदीर्घ सुखी वैवाहिक जीवन जगताना त्यांनी ५ मुलांना वाढवले आहे. Earth’s Children मालिकेतील कादंबर्याूत वर्णन केलेले कुटुंब केंद्रित वातावरण लिहिताना त्यांची स्वतःची सुखी कौटुंबिक पार्श्वभूमीही सहायभूत झाली असेल असे वाटते.

१९७७ साली २ नोकर्यां च्या मधल्या काळात एक लघुकथा लिहावी असे जीन यांना वाटले. कथेचा विषय असणार होती ३०००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर वावरून गेलेली आणि स्वतःपेक्षा खूप वेगळ्या लोकांमधे वाढलेली एक बुद्धिमान स्त्री, अयला! लिहायला सुरुवात केली तर खरी, पण त्यांच्या लक्षात आलं की त्या काळचे लोक कसे होते, त्यांचे आयुष्य, त्यांची आपसातली नाती आणि या सगळ्याला वेगळ्या असणार्‍या एका स्त्रीने कसे हाताळले असेल याबद्दल त्यांना काहीच माहित नव्हते! मग त्या काळाचा अभ्यास करण्यासाठी जीन यांनी लायब्ररीतून असंख्य पुस्तके आणली. कोणतेही काम अतिशय नीटनेटके आणि शक्य तेवढे परिपूर्ण करण्याचा स्वभाव असल्याने जीन यांनी वाचन सुरू केले, भूगर्भशास्त्र, मानववंशशास्त्र, मानवी संस्कृतीचा उपलब्ध इतिहास याचा अभ्यास केला. कोणतीही साधन सामुग्री जवळ नसताना रानात कसे तगून रहाता येईल याचा कोर्सही केला! त्यात बर्फाची गुहा तयार करणे, कातडे कमावणे, लाकडे एकमेकांवर घासून अग्नि उत्पन्न करणे, गारेचे दगड छिलून हातकुर्हा्डीसारखी शस्त्रे तयार करणे इ. चा समावेश होता. आणि मग जन्माला आली Earth’s Children मालिकेतील पहिली कादंबरी The Clan of the Cave Bear!

The Clan of the Cave Bear (१९८०),
The Valley of Horses (१९८२)
The Mammoth Hunters (१९८५) या पुस्तकाची पहिली आवृत्ती रेकॉर्ड ब्रेक १० लाखांवर प्रतींची होती.
The Plains of Passage (१९९०)
The Shelters of Stone, (२००२) प्रकाशित होताना १६ देशांत एक नंबरचे सर्वात जास्त विकले गेलेले (Bestseller) पुस्तक ठरले.
The Land of Painted Caves (२०११)

या मालिकेतील पहिली ४ पुस्तके साधारण १० वर्षात लिहून झाली. मात्र नंतरच्या २ पुस्तकांसाठी जास्त वाट बघावी लागली. याला एक कारण तर जीन यांचे वाढत जाणारे वय होते, तर दुसरे कारण मालिकेचा शेवट कसा करावा याबद्दल काहीशी दुविधा होती.

काही मुलाखतींमधे या मालिकेत एकूण ७ पुस्तके असतील असे जीन यांनी सांगितले होते, पण प्रत्यक्षात सहाव्या पुस्तकाची जाहिरात करताना हे या मालिकेतील शेवटचे पुस्तक आहे अशीच करण्यात आली. या पुस्तकांत उल्लेख केलेल्या काही महत्त्वाच्या पात्रांचे पुढे काय झाले असेल (उदा. अयलाचा मुलगा डर्क) याची वाचकांना अजूनही खूप उत्सुकता आहे. त्यामुळे जीन कदाचित त्याबद्दल लिहितीलही!

..

jean

Earth's Children ही उत्तर अश्मयुगातल्या मानवाची कथा. २५००० ते ३०००० वर्षापूर्वीची, धरतीमातेच्या लेकरांची कथा. तेव्हा माणूस जंगलात शिकार करून अन कंदमुळं फळं गोळा करून निसर्गाचा एक भाग म्हणून रहात होता. त्याच्याकडे शस्त्र होते ते फक्त त्याच्या बुद्धिमत्तेचे. आणि त्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून मिळवलेल्या काही प्राथमिक दगडी शस्त्रांचे. कपडे होते मारलेल्या किंवा नैसर्गिकरीत्या मेलेल्या जनावरांच्या कातड्याचे. मात्र निसर्गात सहज सापडणार्‍या वनस्पतींचा उपयोग करून आपले आजार काही प्रमाणात बरे करता येत होते. घरे म्हणजे नैसर्गिक गुहा. मानवी संस्कृतीची पहाट होती ही. साहजिकच त्यांची दैवते म्हणजे धरतीमाता, निसर्गातल्या इतर शक्ती. आणि या शक्तींच्या जवळपास रहाणारे, त्यांचा अभ्यास करणारे शामान (जादूगार) या माणसांच्या टोळ्यांमधे खूप महत्त्वाचे आणि आदर मिळवणारे असत. औषधोपचार करू शकणारे सुद्धा खूप महत्त्वाचे सदस्य मानले जात.

तेव्हा क्रोमॅग्नन आणि निअँडर्थल्स दोन्ही प्रकारचे मानव आजच्या युरोपमधे एकमेकांना घाबरत, दूर रहायचा प्रयत्न करत पण एकाच वेळी अस्तित्त्वात होते. या मालिकेत अशी कल्पना केली आहे की क्रोमॅग्नन मानव निअँडर्थल्सना फ्लॅटहेड्स म्हणत, तर ते क्रोमॅग्नन मानवांना 'दुसरे' म्हणत. निअँडर्थलस कमी उंचीचे, बळकट बांध्याचे, पिंगट डोळ्यांचे आणि बुजरे असे वर्णन केले आहेत तर क्रोमॅग्नन मानव गोरे, उंच, बहुधा निळसर डोळ्यांचे वर्णन केले आहेत. दोघांत मुख्य फरक म्हणजे निअँडर्थल्स बोलू शकत नव्हते. मात्र त्यांची स्वतःची अशी खुणांची भाषा विकसित केली होती. तसेच त्यांच्या डोळ्यात अश्रूही येत नव्हते. फ्लॆटहेड्स फक्त आठवणींच्या मदतीने जगतात. भविष्याचा विचार करू शकत नाहीत आणि बदल स्वीकारू शकत नाहीत. त्यांचा विनाश अनिवार्य आहे.

कथानायिका अयला बेरन समुद्राच्या जवळपास कुठेतरी तिच्या आईवडिलांबरोबर रहात होती. कथेची सुरुवात होते ती एका मोठ्या भूकंपाने. त्यात अयलाचे आईवडिल बळी पडतात किंवा तिला दुरावतात. ती भुकेलेली, घाबरलेली ४-५ वर्षांची मुलगी नदीच्या काठाने कित्येक दिवस चालत रहाते. एक डोंगरी सिंह तिच्यावर हल्ला करतो आणि जखमी अवस्थेतली अयला मृत्यूच्या जवळ पोचलेली असताना केवळ नशिबाने फ्लॅटहेड्सच्या एका टोळीच्या दृष्टीला पडते. ते टोळीला क्लॆन म्हणतात. ही 'दुसर्‍यांची मुलगी' म्हणून टोळीवाले तिला सोडून पुढे जाणार असतात, पण त्या क्लॆनची वैदू 'इझा' हिच्या मनात करुणा जागी होते. तिचा भाऊ 'क्रेब' जो टोळीचा 'मोग-उर' अर्थात जादूगार/अध्यात्मिक गुरू आहे, त्याच्या मदतीने इझा 'दुसर्यां च्या' मुलीवर उपचार करायची परवानगी मिळवते आणि तिला उचलून आपल्या घरी आणते. तिच्यावर उपचार करून तिला बरीही करते.

हळूहळू अयला त्या क्लॆनमधे रुळते आणि इझाला आपली आई मानते. इतर टोळीवाले या उंच पांढुरक्या दिसणार्‍या मुलीला कुरूप समजतात आणि तिच्या डोळ्यातून येणार्‍या अश्रूंमुळे तिचे डोळे खराब आहेत असेही समजतात. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली अयला स्वभावतःच बंडखोर असते. स्त्रियांनी शिकार करायला बंदी असतानाही ती इतरांचे पाहून गोफणीने शिकार करण्यात प्रवीण होते. या गुन्ह्याबद्दल तिला शिक्षाही दिली जाते. तरी तिच्या रक्तातला बंडखोरपणा काही जात नाही. ती आतापर्यंत पूर्णपणे टोळीच्या रुढींमधे मुरली आहे. तिला बोलता येते हे ती विसरली आहे. भाषा विसरली आहे. दुसर्‍यांच्या खाणाखुणा आणि शारीरभाषेवरून ती सगळे समजून घेते. आई इझाकडून तिने औषधोपचार शिकून घेतले आहेत. फ्लॅटहेड्संना भाषा अवगत नसल्याने ते सर्व बाबतीत आठवणींवर अवलंबून असतात. त्यांचे जे काही पारंपरिक ज्ञान आहे ते सामुदायिक आठवणींत आहे असे ते समजतात. अयलाकडे या क्लॆनच्या आठवणी नसल्याने तिला तिची बुद्धि आणि निरीक्षणशक्तीही वापरावी लागते आणि त्यामुळे तिच्या बुद्धीला अधिकच धार चढते.

टोळीप्रमुखाचा मुलगा ब्रुड तिला मिळणारे प्रेम आणि महत्त्व पाहून तिचा द्वेष करतो आणि तिच्यावर बलात्कार करतो. मात्र फ्लॅटहेड्समधे कोणत्याही पुरुषाने वयात आलेल्या कोणत्याही स्त्रीला खूण करावी आणि तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन करावे अशी पद्धत लेखिका जीन यांनी कल्पिली आहे. त्याप्रमाणे अयलाला तो बलात्कार असला तरी तसे वाटत नाही. या बलात्काराचे फळ म्हणून तिला एक मुलगा होतो. त्याचे नाव ती डर्क ठेवते. या टोळीवाल्यांमधे स्त्रिया या फक्त फळेमुळे गोळा करणार्‍या आणि पुरुषांच्या शारीरिक गरजा पुर्यारत करणार्‍या मानल्या गेल्या आहेत. मात्र अयला हे सगळे शिकली असली तरी आपला बंडखोरपणा पूर्ण विसरू शकत नाही.

डर्क लहान बाळ असताना तिच्याशी काहीबाही बोलू शकतो, त्याला रडू येते आणि हसूही येते. मात्र दिसायला तो काहीसा बापासारखा आहे. अर्थात या काळातील मानवांना बाळाचा बाप कोण हे समजत नसते. प्राण्यांचे आत्मे बाळांचा जन्म घडवतात आणि पुढे त्यांना आयुष्यभर मार्गदर्शन करतात अशी काहीशी त्यांची समजूत आहे. गुहेत रहाणारे अस्वल या टोळीचे दैवत आहे आणि अयलावर हल्ला करणारा सिंह हा तिचा 'टोटेम'. अशक्त मुलाला जंगलात सोडून द्यायचे आणि काही दिवसांनी ते जिवंत सापडले तर त्याचा स्वीकार करायचा अशा काही काही आता रानटी वाटणार्‍या पण जंगलचा कायदा असलेल्या प्रथा या कादंबर्‍यांमधून ठिकठिकाणी दिसतात.

एकीकडे अयला तिचे गोफणीने शिकार करायचे कौशल्य वाढवीत असतेच. हळूहळू ती कोल्हे, लांडगे, तरस, लिंक्स असे जरा मोठे प्राणीही मारू लागते. मात्र केवळ दुसर्याक प्राण्यांना मारणार्या त मांसभक्षक प्राण्यांना मारायचे असे ती ठरवते. ब्रुड क्लॆनचा नायक झाल्यावर सूड म्हणून तिला मृत्यूची शिक्षा देतो. मात्र फ्लॅटहेड्स तिला मारून टाकत नाहीत, तर कोणतेही साधन बरोबर न घेता, मुलाला टोळीमधे सोडून तिने एकटीने दूर निघून जायचे असते. नुकताच इझा आणि क्रेबचा मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्यापूर्वी इझा तिले सांगते की इथून बाहेर पड आणि तुझ्या लोकांचा शोध घे. पहिल्या कादंबरीच्या शेवट हताश, दु:खी अयला टोळी आणि डर्कला सोडून निघून जाताना दाखवली आहे.

कादंबरीच्या दुसर्‍या खंडात आपल्या मुलापासून दूर जावे का एकटीने रहावे या द्वंद्वात सापडलेली अयला शेवट स्वतः जगायचा निश्चय करते, आणि उत्तरेच्या दिशेने तिच्या खर्‍या लोकांचा "दुसर्‍यांचा" शोध घेण्यासाठी चालू लागते. काही काळ चालत राहिल्यानंतर ती आजच्या युक्रेनमधील एका नदीच्या सुंदर खोर्‍यात रहाण्यायोग्य पाणी, वनस्पती, गुहा पाहून रहायचे ठरवते. जगण्यासाठी कंदमुळे फळे गोळा करण्याबरोबर शिकार करणे आवश्यक असते आणि हिवाळ्यासाठी एखादी मोठी शिकार करून मांस साठवून ठेवणेही. त्यासाठी खड्डा तयार करून ती एक घोडी मारते. पण तिचे शिंगरू तिथेच घोटाळताना पाहून तिच्यातली आई जागी होते आणि ती त्या शिंगराला गुहेत घेऊन येते. तिचे नाव व्हिनी ठेवते. अशातच तिला एक सिंहाचा जखमी अनाथ छावा सापडतो, आणि ती त्याला वाचवून आपल्याबरोबर ठेवते. त्यालाही बेबी हे नाव देते. मग सिंह आणि घोडी हे मूळचे शत्रू तिच्याबरोबर एका 'घरात' सुखाने राहू लागतात. या दोघांमुळे तिचा पुढे जाण्याचा निश्चय काही काळ मागे पडतो. मोठा झाल्यावर हा सिंह अयलाला सोडून आपला कळप तयार करतो आणि बाहेर राहू लागतो मात्र ती कुठे भेटली की आपले प्रेम दाखवतोच!

व्हिनी घोडी जरा मोठी झाल्यावर अयला तिच्या पाठीवर बसून घोडेस्वारी करू लागते आणि व्हिनीला फळ्यांची घसरगाडी ओढायलाही शिकवते. अशा प्रकारे अयलाने प्राण्यांना माणसाळायची सुरुवात केली आहे. काही काळाने एक शस्त्र तयार करण्यासाठी दगड छिलत असताना तिला वेगळेच दगड सापडतात आणि अपघाताने ते एकमेकांवर आपटून ठिणगी पडते. आतापर्यंत सुकी लाकडे एकमेकांवर घासून अग्नि तयार करणे आणि मग तो सतत काहीतरी टाकून सतत पेटत ठेवणे एवढेच मानवाला माहीत होते. आता अयलाच्या रूपात मानवाने पाहिजे तेव्हा अग्नि तयार करायचे तंत्र शोधून काढले आहे.

या कथेला समांतर आजच्या दक्षिण फ्रान्समधे जोंडालारची कथा चालू असते. तो क्रोमॅग्नन लोकांच्या एका टोळीमधला. हे लोक मोठाल्या नैसर्गिक गुहांमधे लहान घरकुलं तयार करून रहात असतात. त्यामुळे आपापल्या टोळ्यांना गुहांची नावे देतात. जोंडालार हा झेलांडोनी गुहेच्या प्रमुखाच्या साथीदारणीचा मुलगा. हे थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल. म्हणजे यांनाही स्त्री-पुरुष मीलनातून मुले जन्मतात हे माहीत नसतं. कायमचा साथीदार्/सखी ही कल्पना असते आणि लग्नासारखा काही विधीही असतो. मात्र जवळच्या नात्यातल्या व्यक्ती सोडून इतरांमधे मुक्त शरीरसंबंध असल्याने एखाद्या स्त्रीची सगळी मुले ही तिच्या 'चुलीची' किंवा तिच्या साथीदाराच्या नावाने ओळखली जातात. मुले वयात येताच त्यांना शरीरसंबंधांबद्दल शिकवायची जबाबदारी जमातीच्या 'दोनीं'ची असते. तर मुली वयात येताना त्याना शरीरसंबंधांबद्दल शिकवण्याची जबाबदारी काही जाणत्या पुरुषांवर असते. हे शिकवणार्‍या व्यक्तीच्या प्रेमात पडायला मात्र बंदी आहे. दोनी म्हणजे साक्षात धरतीमाता. मातृदेवतेला सगळीकडे मान आहे. एखाद्या जमातीची दोनी ही औषधोपचार, जादूटोणा, आणि धर्मगुरूसारखे महत्त्वाचे काम आपल्या शिष्यांच्या मदतीने करते. भांडणांमधे निवाडाही देते.

हे लोक फ्लॅटहेड्सपेक्षा जरा सुधारलेले आहेत. क्रोमॅग्नन हे परिसराशी जुळवून पुढे जाणारे आहेत. सुसंस्कृत आणि स्त्रियांना बरोबरीचे स्थान देणारे आहेत. त्यांच्यातील जे लोक निअँडर्थल स्त्रियांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर बलात्कार करतात त्या मंडळींना योग्य ती शिक्षा दिली जाते. ते क्वचित प्रवासाला निघतात. एखादा अशा प्रवासावरून चुकून माकून परतही येतो.

जोंडालारला झोलेनाचे मनस्वी आकर्षण वाटते. त्याने त्याला शरीरसंबंध शिकवणार्‍या 'झोलेना' या दोनी च्या प्रेमात पडल्याचे पाप केले आहे. हे प्रेम समाजमान्य नाही हे माहीत असल्याने तो दु:खी होऊन श्रेयाच्या शोधात प्रवासाला निघतो आहे. कारण आहे ते नदीमातेचा उगम शोधायचे. त्याची मनस्थिती अचूक ओळखणारा त्याचा धाकटा भाऊ थोनालान त्याच्याबरोबर प्रवासाला निघतो, कारण जोंडालारला परत आणणारा दुवा नसेल तर तो भरकटत जाईल हे त्याला पक्के माहित आहे. दोघे भाऊ आई वडील, भाऊ आणि बहीण यांना मागे सोडून चालत डॅन्युबच्या उगमाकडे निघाले आहेत. वाटेत त्यांना असेच अनेक क्रोमॅग्नन लोक भेटतात, क्वचित फ्लॅटहेड्स निसटते भेटतात, एका जागी थोनालान एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिथे रहायचा निर्णय घेतो. त्याच्याबरोबर जोंडालारही रहातो.

एक दिवस शिकारीला गेले असताना एक सिंह त्यांच्यावर हल्ला करतो. त्यात थोनालानचा मृत्यू होतो आणि जोंडालार जबर जखमी होतो. त्याच परिसरात अयला रहात असते. आणि जोंडालारवर हल्ला करणारा सिंह नेमका अयलाचा 'बेबी' निघतो. व्हिनीच्या मदतीने अयला जोंडालारला आपल्या गुहेत घेऊन जाते आणि त्याची शुश्रुषा करते. तो बरा होतो. आणि दोघांमधे आकर्षण वाढीला लागते. क्लॅनमधे वाढल्यामुळे अयला संकोचाने जोंडालारला काही सांगू शकत नाही, भाषाही येत नसतेच. तर जोंडालार त्याच्या दु:खात चूर असतो आणि अयलाने संमती दिल्याशिवाय तिच्या जवळ जाणे त्याच्या नियमात बसत नसते.

मात्र उपजत बुद्धिमत्ता आणि निरीक्षण याच्या जोरावर अयला जोंडालारची भाषा हळूहळू बोलू लागते. दोघांनाही एकमेकांची हृदयाची भाषाही समजते. आणि मग ते जोंडालारच्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतात. अयला सतत दुसर्‍यांना मदत करायला तयार आहे. तिचे औषधोपचाराचे ज्ञान सर्व लोकांसाठी मुक्तहस्ते वापरते आणि सर्वांशीच आर्जवाने, करुणेने वागते.

इथून पुढे अयला आणि जोंडालार यांचा प्रत्यक्ष प्रवास आणि प्रेमाचा, स्वतःच्या शोधाचा प्रवास सुरू होतो. वेळोवेळी त्यांना अनेक लोक भेटतात. त्यातील काही तर मिश्र वंशाचे आहेत. एका काळसर वर्णाच्या रानेक चा उल्लेख आहे, तर एका साधारण चिनी वर्णनाच्या जेरिकाचा उल्लेख आहे. निअँडर्थल्स आणि क्रोमॅग्ननच्या मिश्र संततीचीही काही उदाहरणे आहेत. अयलाला भेटणार्‍या अशा सार्‍याच मिश्र वंशाच्या लोकांशी ती अत्यंत सहानुभूतीने वागते. इतरांच्या समजाप्रमाणे फ्लॅटहेड्स हे प्राणी नाहीत तर सुसंस्कृत माणसे आहेत ही ती दर वेळी न भिता सांगते. निअँडर्थल्स हे निव्वळ आठवणींवर भर देऊन जगणारे असल्याने त्यांना परिसरानुरूप वागणे बदलून टिकून रहाणे कठीण आहे हे अयलाला जाणवते. तिला तशी गूढ स्वप्ने पडतात. एकदा तिला विश्वरूपदर्शन झाल्यासारखी धरतीमाता विक्राल स्वरूपात स्वप्नात दिसते. मात्र क्लॅन नष्ट झाला तरी मिश्र वंशाचा तिचा पहिला मुलगा डर्क टिकून राहील असे तिला जाणवते.

अयलाच्या सहवासात जोंडालार घोड्यावर बसायला शिकतो, धनुष्यासारखे आयुध शोधून काढतो. अयलाने आता अनाथ झालेले एक लांडग्याचे पिलूही पाळले आहे. मोठा झाल्यावर हा लांडगा अयलाला जिवावरच्या संकटातूनही वाचवतो. इतर क्रोमॅग्नन 'गुहा' घोड्यावर बसणार्‍या आणि प्राण्यांवर हुकुमत गाजवणार्‍या अयलाकडे आश्चर्याने आणि आदराने बघतात. व्हिनीचा वंश वाढत आहे आणि मानवाकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची संख्याही. इतर लोकही आता घोड्याची मदत घ्यायला घाबरत नाहीत. तसेच चकमकीच्या मदतीने आता त्यांना केव्हाही अग्नि तयार करणे शक्य झाले आहे.

कथा आणखी ४ भागातून पुढे सरकत रहाते. अयला आणि जोंडालार यांचे प्रवास सुरू रहातात. मामुतोई जमातीचा प्रमुख मामुट अयलाला आपली मुलगी म्हणून स्वीकारतो आणि अयला आणि जोंडालार यांना एकमेकांशिवाय भविष्य नाही असे स्पष्ट सांगतो. प्रवास करून ते जोंडालारच्या गुहेत परत येतात. तिथे सुरुवातीला अयलाला स्वीकारणे जोंडालारच्या लोकांना जड जाते. पण झोलेना आणि जोंडालारचे इतर नातेवाईक मात्र अयलाला सहजपणे स्वीकारतात. जोंडालारला आयुष्यात प्रथमच खरे प्रेम मिळाले आहे हे झोलेनाला सर्वात प्रथम लक्षात येते.

कालांतराने अयला आणि जोंडालार यांना जोनालाया नावाची मुलगी होते. त्यांच्या जमातीत शरीरसंबंध हे धरतीमातेचे वरदान समजून उत्सव साजरे केले जातात. अशा उत्सवात कोणीही कोणाबरोबरही जाऊ शकतो पण या दोघांनाही इतर कोणाचेही आकर्षण असे वाटत नाही. दुसर्‍या कोणाशी अयलाचा किंवा जोंडालारचा कारणपरत्वे संबंध आला तरी दोघांनाही अत्यंत राग येतो आणि प्रचंड फसवल्याची, दुखावल्याची भावना येते. प्रत्येक परीक्षेच्या प्रसंगातून अयला आणि जोंडालारचे प्रेम अधिक बळकट होत जाते. हे पाहून झोलेना 'दोनी' तिच्या जमातीच्या लोकांनी इथून पुढे ज्याचा साथीदार म्हणून स्वीकार केला असेल त्याच्याव्यतिरिक्त कोणाशी संबंध ठेवायचा नाही असा निर्णय घेते.

सहाव्या भागात आतापर्यंत स्त्री-पुरुष एकत्र आल्यावर मुले तयार होतात याची साधारण कल्पना झोलेनाला आली आहे आणि आईचं मूल हे तेवढंच बापाचंही आहे हे लोकांना पटवून देण्यात ती यशस्वी झाली आहे. मात्र ती अयलाच्या अलौकिक बुद्धीचा आणि औषधोपचार करण्याच्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करून घ्यायचे ठरवते आणि अयलाला आपली शिष्या बनवते. अयलाचा खूप लहानपणी सुरू झालेला आध्यात्मिक प्रवासही पुन्हा सुरू होतो. या प्रवासात लवणस्तंभ असलेल्या आणि रंगीत चित्रांनी सजवलेल्या गुहा मोठी भूमिका निभावतात. आता अयलाने घर संसार सोडून 'दोनी' बनायचे का? की तिच्या आयुष्यातील एकमेव खर्‍या प्रेमासोबत रहायचे? या द्वंद्वात सापडलेली अयला शेवट दोन्हीचा समतोल साधण्यात यशस्वी होते आणि मालिकेचा सुखी शेवट होतो.

***************************

अतिशय वाचनीय आणि रंजक पद्धतीने जीन यांनी अयला आणि जोंडालार यांची कहाणी सांगितली आहे. मानवी संस्कृतीच्या बाल्यावस्थेतील एका समाजाचे सर्व ताण्याबाण्यांसहित वर्णन करणे, किंबहुना २ मानवी वंश संपूर्णपणे कल्पनेने उभे करणे हे महाकठीण काम जीन मारी ऑएल यांनी अतिशय समर्थपणे पार पाडले आहे. वाचताना हे सगळे खरेच घडले असेल असे वाटते!

प्रत्यक्षात ही मालिका सुमारे ३० वर्षांच्या कालावधीत लिहिली गेली त्यामुळे त्यात आधारभूत धरलेली काही गृहीतके नंतर चुकीची ठरली साहजिकच या मालिकेवर आक्षेपही भरपूर घेतले गेले. तर सुरुवातीला कल्पनाशक्ती समजल्या गोष्टींना प्रत्यक्षातले आधार असल्याचे काही काळाने पुरावे मिळाले. मात्र अशा स्वरूपाच्या कादंबर्‍या आणखी फारशा असल्याचे कधी वाचनात आले नाहीये आणि एवढी प्रचंड लोकप्रियता मालिकेचे यश अधोरेखित करते.

मालिकेमधे स्त्री-पुरुष संबंधांची मुक्त वर्णने काही ठिकाणी आहेत. मात्र ती त्या काळानुरूप आणि कथनाच्या ओघात आल्याने बीभत्स वाटत नाहीत. (मराठीत असती तर कदाचित वाटली असती! माहित नाही!!) तसेच शिकारीची वर्णने, वनस्पती, औषधे, काढे, गरम दगड टाकून पदार्थ शिजवण्याची वर्णने, रीतीरिवाजांची वर्णने यात काही वेळा पुनरुक्ती वाटते. मात्र याला आणखी एक कारण असे वाटले की लोक ही मालिका ३० वर्षात विभागून वाचत होते, तर मी मालिकेतील सगळी पुस्तके सलग एकापाठोपाठ वाचली.

त्या काळची वेगवेगळी घरे, मॅम्मथ प्राण्यांच्या शिकारी, वितळणारी ग्लेशियर्स, प्रतिकूल परिस्थितीतून आणि पुढच्या वळणावर काय असेल हे माहीत नसताना केलेले प्रवास हे सारे वाचणे हा माझ्यासाठी तरी अतिशय आनंददायी अनुभव होता. या मालिकेत वर्णन केलेले प्राणी पाळणे आणि चकमकीच्या दगडाने अग्नी पेटवण्याचा शोध हे इतक्या थोडक्या कालखंडात आणि असेच घडले असे नव्हे, पण लेखिकेने अयलाला अप्रतिहत बुद्धी आणि सर्वांभूती करूणा हे दोन गुणविशेष दिले आहेत आणि प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढायची शक्तीसुद्धा. तिच्यासारख्या महामानवाला हे दोन्ही शोधणे शक्य होईल हे ते लेखिकेचे स्वातंत्र्य म्हणून आपण मान्य केले पाहिजे. या मालिकेच्या निमित्ताने 'अयला' ही अतिशय बुद्धिमान आणि बंडखोर नायिका, मानवी संस्कृतीच्या बाल्यावस्थेतील जणू साक्षात मातृदेवतेचे रूप, जीन मारी ऑएल यांनी आपल्याला दिली त्याबद्दल त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच!

इला हे पृथ्वीचे एक नाव आहे. मालिकेतली नायिका तेच अयलाचे मूळ नाव असावे. परंतु तिला सांभाळणार्‍या निअँडर्थल्संना त्याचा उच्चार करता येत नसल्याने त्यांनी त्याचा अपभ्रंश 'अयला' असा केला असावा असे वाटते. जीन यांनी असे कुठे लिहिलेले सापडले नाही, पण हा एक अंदाज!

सुरुवातीला निअँडर्थल्सचा विनाश क्रोमॅग्नन मानवाने घडवला असा समज होता, मात्र नंतर निअॅवडर्थल्सचा संपूर्ण नाश झाला नाही तर बराच काळ क्रोमॅग्नन व निअॅनडर्थल्स एकमेकांसोबत या पृथ्वीच्या पाठीवर रहात होते असे पुरावे मिळाले तसेच काही प्रमाणात मिश्र वंश टिकून राहिल्याचे पुरावेही समोर आले. अयलाच्या कथेचा सुखान्त लोकांना आवडला, तसाच निअँडर्थल्सच्या क्लॅनमधे तिला ठेवावा लागला त्या तिच्या मिश्र वंशाच्या मुलाचे म्हणजे डर्कचे काय झाले याची जवळपास सगळ्या वाचकांना उत्सुकता लागून राहिली आहे. निदान त्यासाठी तरी आता ७८ वर्षांच्या जीन मारी यांनी पुन्हा लेखणी हाती घ्यावी हीच त्या आदिम मातृदेवतेकडे प्रार्थना!

प्रतिक्रिया

आनंदी गोपाळ's picture

8 Mar 2015 - 4:02 pm | आनंदी गोपाळ

खूप दिवसांपूर्वी ही सेरिज सापडली होती, अन झपाटल्यासारखी अखंड वाचून काढली होती. शेवटला खंड नंतर मिळाला, पण तो वाचायला वेळ काही मिळेना.

मजकडे इ बुक्स आहेत रच्याकने.

इ बुकस विकत घ्यावी लागतील का?
मला लिंक मिळेल का?

पैसा's picture

19 Mar 2015 - 6:16 pm | पैसा

अमेझॉनवर असतील बहुधा, मी अमेझॉन.इन वरून घेतली होती.

आयुर्हित's picture

8 Mar 2015 - 8:07 pm | आयुर्हित

सर्वांनी वाचलेली असेल अशीच एक गोष्ट .......ती म्हणजे टारझन!

आनंदी गोपाळ's picture

10 Mar 2015 - 12:04 am | आनंदी गोपाळ

हसू का?

बालवाङ्मय सोडून इतरही काही वाचलेत तर बरे होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2015 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

फार रंजक दिसतेय की कथामाला... चला आता काही दिवस राखीव झाले :)

जुइ's picture

9 Mar 2015 - 3:18 am | जुइ

एका चांगल्या मालिकेचा उत्त्म परीचय. अवश्य वाचण्यात येइल!

रसाळ ओळख या सेरीजची, अन ती ही पैसाताईच्या लेखणीतून!
मस्तच!! या सुट्टेत मुलांसाठी आणणार ही सेरीज.
धन्यवाद पैसाताई!

सविता००१'s picture

9 Mar 2015 - 10:30 am | सविता००१

लिहिलं आहेस गं. साठवून ठेवते हा लेख. परत परत वाचायला :)

विभावरी's picture

9 Mar 2015 - 11:01 am | विभावरी

खूप छान लिहिलं आहे . वाचायलाच पाहिजे .

सस्नेह's picture

9 Mar 2015 - 3:59 pm | सस्नेह

वेगळ्याच विषयावरची कथा-मालिका.

मधुरा देशपांडे's picture

10 Mar 2015 - 2:28 am | मधुरा देशपांडे

लेख आवडलाच.

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2015 - 6:17 pm | पिलीयन रायडर

+१

आवडला लेख!!

नक्कीच वाचणार.छान ओळख.

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2015 - 10:09 pm | स्वाती दिनेश

कथा मालिकेची छान ओळख!
मिळवून वाचेन.
स्वाती

अप्रतिम परिचय आणि तितकाच छान विषय :) एवढया चांगल्या मालिकेची ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप आभार तुला.

आरोही's picture

15 Mar 2015 - 3:08 pm | आरोही

+१ असेच म्हणते ...खरेच एका वेगळ्या आणि चांगल्या मालिकेची तितकीच चांगली ओळख आवडली ..

प्राची अश्विनी's picture

11 Mar 2015 - 10:48 am | प्राची अश्विनी

आता नक्की मिळ्वून वाचेन

मितान's picture

11 Mar 2015 - 1:21 pm | मितान

तुझा लेख वाचून ही सेरीज वाचण्याची भूक लागली आता !

एका सुंदर कादंबरीमालिकेची छान ओळख. महिलादिन विशेषांकात या लेखाचे असणे अगदी खास !! ह्या खजिन्याचा शोध आता घ्यायला हवा. धन्यवाद!!!!

इशा१२३'s picture

12 Mar 2015 - 1:15 pm | इशा१२३

खूप खूप आभार पैसाताई.सुरेख ओळख करून दिली मालिकेची.नक्की वाचेन.

विशाखा पाटील's picture

14 Mar 2015 - 10:10 am | विशाखा पाटील

वा! मानवी संस्कृतीचा इतिहासच आहे म्हणजे. मस्त ओळख! मालिकेचं नाव वाचायलाच हवं, या यादीत टाकले आहे.

अंतरा आनंद's picture

14 Mar 2015 - 3:56 pm | अंतरा आनंद

मस्त् ओळ्ख. वाचायला हवीच असं वाटतय . (एथे बुक्मार्क का करता येत नाही धागा?)

छान ओळख. नक्की वाचण्यात येईल.

पैसा's picture

18 Mar 2015 - 11:29 am | पैसा

सर्व वाचक आणि प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद!

मीता's picture

18 Mar 2015 - 5:18 pm | मीता

नक्कीच वाचणार.छान ओळख.

वा, मस्त लेख. पुस्तके नक्कीच वाचली जातील.

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:51 pm | कविता१९७८

नक्कीच वाचणार.छान ओळख

सानिकास्वप्निल's picture

19 Mar 2015 - 5:57 pm | सानिकास्वप्निल

काय मस्तं ओळख करुन दिलियेस मालिकेची, नक्की नक्की मिळवून वाचण्याचा प्रयत्न करेन .

प्रचेतस's picture

21 Mar 2015 - 12:32 pm | प्रचेतस

सुरेख परिचय.

स्वाती२'s picture

26 Mar 2015 - 8:10 pm | स्वाती२

छान ओळख!

श्रीरंग_जोशी's picture

26 Apr 2015 - 9:44 am | श्रीरंग_जोशी

या कादंबरी मालिकेची तपशीलवार ओळख आवडली.

यावरून आठवले -
मला लहानपणी माणूस महाबलाढ्य कसा बनला हे रशियनमधून भाषांतरीत पुस्तक भेट दिले होते. त्यात मानवाच्या उत्क्रांतीबाबत वाचायला मिळाले होते.