झाले मोकळे आकाश

Primary tabs

अजया's picture
अजया in विशेष
8 Mar 2015 - 1:40 am
महिला दिन

पीएमएस बद्दल प्रथमच कळलं होतं ते अनिल अवचटांचं कोणतंतरी पुस्तक वाचताना. त्यांनी लिहिलं होतं की महिन्यातल्या काही काळात त्यांची पत्नीशी भांडणं व्हायची. ती विचित्र वागायची, नंतर मात्र नॉर्मलला येऊन माफी मागायची, लाड करायची. त्यानंतर सर्वच स्त्रियांना पिरियड्स आधीच्या दिवसांत असा त्रास होतो का, हे शोधून काढायचं माझं कुतूहल वाढलं. कारण हा नुसता स्त्रीपुरता मर्यादित त्रास नसून याचे अनेक सामाजिक, कौटुंबिक असे बरे वाईट परिणाम होत असणार, असं लक्षात आलं. मग ते का, कसे, काय होतात याचा अभ्यास करण्यासाठी रीतसर एक प्रश्नावली तयार केली. १८ ते ५२ वयोगटातल्या निरनिराळे उद्योग करणाऱ्या उदा. गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्टर्स, आय टी इंजिनिअर, गायिका, अतिशय उच्चपदावर कार्य करणाऱ्या काही अशा जवळपास पन्नास स्त्रियांना, तसंच काहींच्या जोडीदारांना याबद्दल बोलतं केलं. काही स्त्रीरोगतज्ज्ञ तसंच मानसोपचार तज्ज्ञांशी चर्चा करून यावर लिहायला घेतलं.
पीएमएस म्हणजे प्रिमेंस्ट्रुअल सिंड्रोम. पिरियड्स येण्याआधीच्या काळात स्त्रीला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक मानसिक त्रासांना सामोरं जावं लागतं. या सर्व लक्षणांना एकत्रितपणे पीएमएस म्हणता येईल. साधारणपणे पिरियड्सच्या दोन आठवडे आधी यातली लक्षणं दिसायला सुरुवात होते. आणि येण्याच्या दोन तीन दिवस आधी ही लक्षणं तीव्रपणे जाणवतात. का होतात हे त्रास, काय असतात लक्षणं हे आता जाणून घेऊया.
स्त्रीच्या बीजाशयामध्ये तयार होणारे बीज जर फळले तर त्याला गर्भाशयात रुजता यावे, यासाठी स्त्रीचं शरीर दर महिन्याला (होय.. दर महिन्याला!) विशिष्ट बदल घडवतं. या काळात प्रोजेस्टेरॉन या हार्मोनचे प्रमाण वाढलेले तर इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी असते. बीज फळण्याची शक्यता नाहीशी झाल्यावर पुन्हा शरीर ते बदल नाहीसे करून पूर्वस्थितीला यायला लागतं आणि पीरियडसची पूर्वतयारी सुरू होते. या साऱ्या बदलांमुळे तसेच यापायी मेंदूतील सेरिटोनीन या रसायनाच्या बदलत्या पातळीमुळे काही स्त्रियांना हे त्रास उद्भवू लागतात. म्हणूनच स्त्रीच्या शरीर मनावर संप्रेरकांचे (हार्मोन्स) अधिराज्य असते म्हणायला हरकत नाही.
साधारण तिशीनंतर, एखादे मूल झाल्यावर, अतिशय तणावपूर्ण जीवन असणाऱ्या, कौटुंबिक कलहाने त्रासलेल्या स्त्रियांना हे त्रास अधिक जाणवतात असेही एक निरीक्षण आहे.
पीएमएसची निरनिराळी शारीरिक, मानसिक लक्षणं असू शकतात. त्यातली बऱ्याचशा स्त्रियांना जाणवणारी लक्षणं म्हणजे उगाच छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन वाटू लागणे, निराश वाटणे, रडू येणे, झपाट्याने बदलणारे मूड्स्, झोप न येणे, कुठेही जाऊ नये, सर्वांपासून लांब एकटेच राहावेसे वाटणे अशा प्रकारची मानसिक तर डोकेदुखी, अशक्तपणा वाटणे, शरीरात पाणी साठल्याने जड जड वाटणे, छातीत जड वाटून दुखणे अशी काही शारीरिक लक्षणं सर्वसामान्यपणे दिसून येतात. काही जणींसाठी हा त्रास त्यांच्या सामाजिक, व्यावसायिक, वैवाहिक आयुष्यावर पण सावट आणायला लागतो. याची काही उदाहरणं काही जणींनी, त्यांच्या नवऱ्यांनी, मित्रांनी सांगितली आहेत.
- त्याच्या घरच्या लोकांनी फार पूर्वी कधी काही बोललेले तिला या दिवसात नेमके आठवते आणि संताप येतो, तो ती (अर्थातच!) त्याच्यावर काढते.
- तो एरवी कुठे नेत नाही बाहेर म्हणून ही हिणवत असते. आज तो उत्साहाने आला तर ही क्षुल्लक गोष्टीवरून डोक्यात राख घालून घेऊन रडत बसली!
- त्यांना पार्टीला जायचं आहे. पण हिला मी खूप जाड दिसतेय, सुजकट वाटतेय असं वाटत राहून ती खिन्न होते. मग बाहेर जायचंच टाळते.
- तिच्या एकत्रित कुटुंबात तिचं पटत नाही. एकत्र राहण्याशिवाय गत्यंतर नाही अशा कुचंबणेत ती आहे. तिला अशा दिवसात एखाद्या तणावपूर्ण प्रसंगानंतर आत्महत्या करावीशी वाटते.
- ती एका मोट्ठ्या कंपनीत उच्चपदस्थ बॉस आहे. पण एरवी सगळ्यांशी खेळीमेळीने वागणारी ती या काळात तिच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना चिडचिड करून, आरडाओरडा करून वैताग आणायची. तिच्याच हे कधीतरी लक्षात आलं. मग तिने यावर माहिती मिळवून मातही केली.
ही काही प्रातिनिधिक उदाहरणं दिली आहेत. ती इथे लिहायचा उद्देश हा की अशा प्रसंगात बायकांना “या मुडीच असतात, यांचे नखरेच फार.” असं सर्रास म्हटलं जातं. पण दर वेळी ती हे मुद्दाम करत नाहीये, तिच्या मानसिक स्थितीला हाताशी धरून तिचे हार्मोन्स हा खेळ करतात म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. तिला असे लेबल लावून आपण तिच्यावर अन्याय तर करत नाही ना, हा जरूर विचार व्हावा. याने टोकाला जाणारे कौटुंबिक तणावाचे प्रसंग कदाचित टाळता येऊ शकतील.
मग तिला या काळात समजून घेण्यासाठी काय करता येईल?
यासाठी त्याला आणि तिला दोघांनाही काही गोष्टी समजून उमजून वागावे लागेल.
ती काय करू शकते ते आधी पाहू.
- सर्वप्रथम हा एक तात्पुरता शारीरिक मानसिक त्रास आहे, रोग नाही हे लक्षात ठेवायचं आहे.
- तेलकट, अती मीठ घातलेले पदार्थ, वेफर्स, पेस्ट्रीज असं कम्फर्ट फूड खाणे कटाक्षाने टाळावे. जास्त त्रास वाटत असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
- अती चहा, कॉफी पिणेही टाळावे.
- रोजचा व्यायाम करणे, वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. व्यायामामुळे फार फरक पडू शकतो. व्यायामामुळे तयार होणाऱ्या एंडॉर्फिन्स या संप्रेरकामुळे आनंदी, उत्साही वाटू लागते, शरीरातले साचलेले पाणी कमी होऊन जडत्वही कमी होते.
- आपण याच काळात असे हायपर वागतो का हे सहज कळू शकते. त्यानुसार मनावर ताबा ठेवायचा. आपण अतीच करतोय असे वाटायला लागलं की मनाचा लगाम खेचायचा! आपण या काळात असे अस्वस्थ होतो याविषयी जोडीदाराशी जरूर बोलावं. या काळात माझी जास्त चिडचिड होते, मला जरा माझ्यात राहू दे, मी आपोआप सामान्य स्थितीला येईन, हे त्याला समजावून द्यावे. या काळात उगाच अती भावनिक होऊन टोकाचे निर्णय घेऊ नये, मागाहून पश्चात्ताप वाटू शकतो! काही दिवसापूर्वी आपली अशी प्रतिक्रिया होती याचेच नवल वाटू लागते!
- स्मार्ट फोन ऍप्स - हल्ली पीएमएसच्या काळातले शारीरिक, मानसिक बदल नोंदवून त्याच्या सूचना देणारी अनेक अॅन्ड्राॅइड अॅप्स उपलब्ध आहेत. माय कॅलेंडर, क्ल्यू, विमेन डायरी, ट्वेन्टी एट डेज लॅटर काही प्रातिनिधिक नावं. ही अॅप्स पीएमएस कधी येईल, त्या काळातले बदलते मूड्स, सोप्या टिप्स, ऒव्युलेशन सायकलची माहिती अशा अनेक प्रकाराने उपयोगी पडतात. सुरुवातीचे काही महिने या नोंदी केल्या की ऍप स्वतःच तुम्हाला रिमाईंडर देऊ लागतं. याचा उपयोग करून 'सहज बोलण्याचा वाद झाला आणि बघता बघता स्फोट झाला...' ही परिस्थिती नक्कीच टाळता येईल.
आता तिच्या या काळात तो काय करू शकतो हे पण पाहू.
- ती कितीही चिडचिड रडारड करत असली तरी तो शांत नक्कीच राहू शकतो. तुम्ही या काळात एक बोललात की अर्थाचा अनर्थ होऊन भांडण वाढू शकते, म्हणून जरा धीराने घ्या. स्वतःवर ओढवूनही घेऊ नका. तिला तिच्या हार्मोन्सनी घेरलंय समजा हवं तर. तिची तीच काही दिवसात नेहमीसारखी वागायला लागेल. आणि हो, हा तिच्यातला दोष समजू नका किंवा तिला नौटंकी समजू नका लगेच! ती मुद्दाम तसे वागत नसून तिच्या हार्मोन्स पुढे हतबल आहे, मुख्य म्हणजे ती स्वत:ही त्रास सहन करतेय हे लक्षात घ्या.
- तिची या काळातली शारीरिक स्थिती समजून घेऊन तिच्याशी वागा. तिला घरच्या कामात मदत नक्की करा.
- तिला एकटं राहावंसं वाटत असेल तर राहू द्या.
- ती अस्वस्थ होऊन भांडणाच्या बेतात आहे असे वाटलं तर उगाच शब्दाला शब्द वाढवण्यापेक्षा बाहेर फिरून या! तुम्ही येईपर्यंत ती शांत झालेली असेल!
- तिला मनस्ताप देणाऱ्या गोष्टी तिच्यापासून तेवढे दिवस दूर ठेवा.
- आणि हो… एरवी कधी भांडलात तर ‘पीएमएस का…’ असलं काही खोचक बोलून तिच्या स्त्रीत्वाचा अपमान तर करूच नका.
काही काळापुरतं झाकोळून जाणारं तिच्या मनाचं आभाळ आहे हे. दर महिन्याला अनेक वर्ष हा त्रास काढतेय ती. जरा समजून घ्या तिला. एकमेकांशी खुलं बोलून एक समृद्ध समजदार नातं आपण या काळात सामंजस्याने वागून तयार करू शकतो. मग का नाही तिच्या मनाचे आकाश मोकळे होणार!

.

चित्रः सानिका

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 2:49 pm | सविता००१

लेख. अतिशय आवडला. कितीतरी लोकांना (स्त्रिया आणि पुरुष) मदतच होईल या लेखाची.

पियुशा's picture

8 Mar 2015 - 4:51 pm | पियुशा

+ ११११११११११११११११११११११११११११११११११११
अतिशय माहीतीपुर्ण लेख
बहुताशी बर्याच स्त्रीयाना / मुलीना हे स्वतः ला देखील माहीत नसत की त्या ह्या दिवसात चिडचिड्या का वागतात? विनाकारण वैतागतात याच कारण शरीरात घडुन येणारे बदल आहेत ,पुन्हा एकदा धन्स ह्या उपयुक्त माहीतीबद्दल :)

इशा१२३'s picture

8 Mar 2015 - 5:22 pm | इशा१२३

माहितीपुर्ण लेख.स्त्री शरीरातील हे बदल तीला आणी आजुबाजुच्या लोकांना काहिवेळेस त्रासदायक होतात.या लेखामुळे
नेमकी काय काळजी घ्यायची हे छान समजतय.धन्यवाद.
सानिकाच चित्रहि समर्पक.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2015 - 7:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका नैसर्गिक आणि नियतकालीक मानसिक-शारिरीक अवस्थेचे सुरेख विवेचन ! लेख स्त्री आणि पुरुष दोघांनाही उपयोगी आहे.

श्रीरंग_जोशी's picture

23 Mar 2015 - 9:45 am | श्रीरंग_जोशी

एक्कासाहेबांनी मांडलेल्या मताशी सहमत.

स्रुजा's picture

8 Mar 2015 - 8:33 pm | स्रुजा

किती सुंदर समजावलयेस ! सानिका चं चित्र पण छान आणि औचित्यपूर्ण. हे का होतं हेच इतके दिवस वाचण्यात आलं होतं. कसं हाताळायचं हे नीट कळलं आता. पण बर्‍याच जणी तेंव्हा व्यायाम नाही करू शकत, अशा वेळी इतर वेळी नियमितपणे केलेल्या व्यायामाचा उपयोग होत असेल ना?

मितान's picture

8 Mar 2015 - 9:45 pm | मितान

अजया, अतिशय महत्वाच्या विषयावर सोप्या भाषेत लिहिल्याबद्दल धन्यवाद.
समुपदेशनासाठी येणार्‍या अनेकींना हा त्रास असल्याचं लक्षात येतं. या लेखाने त्यांना समजावून सांगण्याचं काम सोपं होईल.

भिंगरी's picture

9 Mar 2015 - 12:38 am | भिंगरी

आवडला! अतिशय उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण लेख.

जुइ's picture

9 Mar 2015 - 12:40 am | जुइ

बर्‍याचदा अशी चिडचिड का होते हे समजत नाही.शिवाय हे कसे नियंत्रणात आणायचे हेही छान समजावले आहेस. सानिकेचे चित्रही छान आहे!!

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 4:53 am | स्पंदना

सानिका!! __/\____!!!! सिंपली ग्रेट अँन्ड लवली!!

अजया, इतका अभ्यास, दोन्ही बाजू समजावुन सांगितल्याबद्दल किती आणी कसे आभार मानू हेच समजत नाही आहे.
अतिशय अभ्यासपूर्ण लेखन, आणि अश्यावेळी घरच्यांचे सहकार्य किती मोलाचे असू शकते याची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

पलाश's picture

14 Mar 2015 - 2:20 pm | पलाश

+१००.

लेखन आवडले, उपयुक्त आहे. हे वाचून अनेक नवर्‍यांना (व बायकांनाही) जोडीदाराला साथ द्यावी (व स्वत:ची समजूत कशी घालावी) ते समजेल अशी आशा आहे. अनेक अविवाहितांना लग्न झाल्यावर नवी जबाबदारी शिकून घेताना या माहितीचा उपयोग होईल. नवविवाहितांनी हुश्श्य! आता समजले! असे मनात म्हटले असेलच. ;)

सानिके, चित्र आवडले. लेखाला साजेसे आहे. या अंकाच्या निमित्ताने अनेकजणी चांगली चित्रे काढतात हे समजले.

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2015 - 7:38 am | प्राची अश्विनी

अभ्यास आनि महितीपुर्ण लेख. आवडला.

आरोही's picture

9 Mar 2015 - 12:52 pm | आरोही

अतिशय महत्वाच्या आणि उपयोगी लेखासाठी खूप आभार .मस्त समजावून सांगितले आहेस ..
सानिकेचे चित्र अगदी परफेक्ट आहे या लेखासाठी ...मस्त सानिका !!

छान आटोपशीर माहिती. मुद्दे दिल्याने लक्षात ठेवायलाही सोपं..

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2015 - 2:26 pm | प्रीत-मोहर

अजया तै इतकी मस्त माहिती योग्य आणि सोप्या शब्दात सांगितलीस ग बयो.
आणि साने अफाट सुंदर आहे चित्र!!!

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2015 - 2:37 pm | मधुरा देशपांडे

कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त लेख आणि तोही सोप्या भाषेत.

स्नेहल महेश's picture

9 Mar 2015 - 3:18 pm | स्नेहल महेश

मोलाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

सस्नेह's picture

9 Mar 2015 - 3:56 pm | सस्नेह

आणि मौलिक माहिती देणारा लेख.
सगळ्यांची आकाशे (?) आता मोकळी व्हावी..!

खूप छान समजावून सांगितलं आहेस अजया तै आणि चित्र पण खूप सुंदर आहे :)

ताई.. खुप छान आणि माहितीपुर्ण लेख. सानिकअ... चित्र तर मस्तच एकदम. ;)

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2015 - 9:58 pm | स्वाती दिनेश

सोप्या भाषेत समजावून सांगणारा माहितीपूर्ण लेख आणि चित्रही समर्पक.
स्वाती

सानिकास्वप्निल's picture

11 Mar 2015 - 12:23 am | सानिकास्वप्निल

अतिशय उपयुक्त माहिती देणारा लेख, खूप छान समजावून सांगितले आहेस.
सगळ्यांनाच उपयोगी पडेल असा लेख आहे.
सर्वांना चित्र आवडले त्याबद्दल धन्यवाद, अजयाताईने हक्काने हे चित्र लेखासाठी घेतले त्याबद्दल तिचे विशेष आभार.

भाग्यश्री's picture

11 Mar 2015 - 5:05 am | भाग्यश्री

उपयुक्त लेख!
सानिका चित्र सुपर्ब आहे!

प्राची अश्विनी's picture

11 Mar 2015 - 9:08 am | प्राची अश्विनी

अजया, तुझ्या पुढच्या स्टडीसाठी एक विषय , प्रेग्नन्सी ब्लुज.
खरेच यावरसुद्धा लिहिण्याची खूप गरज आहे

अजो's picture

12 Mar 2015 - 1:14 am | अजो

उपयुक्त लेखन

चैत्रबन's picture

13 Mar 2015 - 10:38 pm | चैत्रबन

वा... एकदम उपयुक्त माहिती..सानिका चित्र पण बेस्ट..

अतिशय ऊपयुक्त आणि सहज सोप्या भाषेत ... चित्र पण मार्मिक.

उमा @ मिपा's picture

15 Mar 2015 - 2:31 am | उमा @ मिपा

अतिशय उपयुक्त माहिती, छान सोपं करून लिहिलंयस. उपायांसाठी, खास करून शेवटचा मुद्दा... विशेष धन्यवाद!
याबाबतीत अनिल अवचट यांचं उदाहरण अगदी आदर्श, पत्नीचे हे नाजूक दिवस नुसते समजूनच घेतले नाहीत तर त्याकाळात तिला बरं वाटावं यासाठी तिच्या आवडीची फुलं आणणं, तिला आवडेल असं वागणं, बोलणं हे ते करत.

विशाखा पाटील's picture

15 Mar 2015 - 10:11 am | विशाखा पाटील

प्रत्येक व्यक्तीने वाचायलाच हवा, असा लेख. शेवटी दिलेल्या 'तो' साठीच्या सूचना मोठ्या मुलांनीही वाचाव्यात अशा आहेत. CBSE च्या दहावीच्या अभ्यासक्रमात या विषयाची मुलांना ओळख होते, त्यात हा मुद्दाही यायला हवा.
उत्तम लेख आणि समर्पक चित्र!

मनुराणी's picture

15 Mar 2015 - 11:28 pm | मनुराणी

उपयुक्त माहितीपूर्ण लेख.

स्वाती२'s picture

16 Mar 2015 - 5:58 pm | स्वाती२

माहितीपूर्ण आणि सोप्या भाषेतील लेख आवडला. सानिका, फार छान चित्र!

पैसा's picture

16 Mar 2015 - 11:05 pm | पैसा

अतिशय माहितीपूर्ण लेख. या काळात त्रास कमी करण्यासाठी व्हिटॅमिन बी गटाचा फार उपयोग होतो असे वाचले आहे. पाळीच्या आधी पोटात दुखणे वगैरे त्रास बर्‍याच मुलींना होतो त्यांनाही बी गटाच्या व्हिटॅमिन्सचा उपयोग होतो असेही वाचले आहे. म्हणजेच हार्मोन्सचे संतुलन बिघडले तर ते जागेवर आणण्यासाठी शरीराला सर्व घटक असलेला आहार मिळाला पाहिजे. जे कमी पडत असेल त्यासाठी पूरक व्हिटॅमिन्स घेणे उत्तम.

नेटवर शोध घेताना ७५% महिलांना पीएमेस चा त्रास होतो असे वाचले. म्हणजेच लोकसंख्येचा एक महत्त्वाचा घटक जो घरात आणि बाहेरही सतत कार्यरत असतो, महिन्याचे सुमारे १५ दिवस आजारपणाची लक्षणे घेऊन वावरत असतो. हा त्रास कमी होण्यासाठी युद्धपातळीवर उपाय व्हायला हवेत तर एकूणच लोकांच्या जगण्याच्या दर्जात फरक पडेल.

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2015 - 12:02 pm | पिलीयन रायडर

अत्यंत उपयुक्त लेख आणि तितकेच सुंदर सानिकाचे चित्र!

अत्यंत उपयुक्त माहिती.

सुबोध खरे's picture

19 Mar 2015 - 1:17 pm | सुबोध खरे

अतिशय उत्तम लेख.
इ जीवनसत्त्व किंवा इव्हिनिंग प्रीमरोस तेल सारख्या औषधांनी बर्याच स्त्रियांना मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो. यास्तव हा आजार आहे आणि त्यासाठी डॉक्टर कडे जायला हवे हे हि स्त्रियांच्या लक्षात आणून देणेही आवश्यक आहे. बहुसंख्य स्त्रियाना आजार अंगावर काढण्याची सवय झालेली असते. ती मोडणे पण आवश्यक आहे. कारण घरची स्त्री आजारी असेल तर अख्खे घर आजारी असल्यासारखे असते.
परंतु अनाहीतावर टाकल्याने दहा दिवसात फक्त ७०० वाचने. हा लेख मुख्य फळ्यावर टाकावा अशी नम्र सूचना. (फडतूस लेखांची पण २-३ हजार वाचने होतात)
यामुळे तेथील सर्व आबालवृद्ध वाचतील आणि त्यःचा फायदा त्यांच्या नात्यातील स्त्रियांना होईल.

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:48 pm | कविता१९७८

माहीतीपुर्ण उत्तम लेख

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:48 pm | कविता१९७८

माहीतीपुर्ण उत्तम लेख

अंतरा आनंद's picture

26 Mar 2015 - 10:57 am | अंतरा आनंद

महितीपूर्ण लेख. मध्ये लोकसत्ता मध्ये यावर बी व्हीट. चा उअपयोग क्सा होतो यावर तो शोध लावणार्या डॉक्टरांचा (लिली जोशी असावं नाव) सविस्तर लेख होता. डॉ. खरेंनी सुचवल्या प्रमाणे खरच हा लेख मुख्य धागा म्हणून टाका. ह्या गोष्टी पुरुषांनाही माहित हव्याच.

राही's picture

24 Jul 2016 - 11:33 pm | राही

त्या डॉक्टरांचे नाव डॉ. लीला रानडे-गोखले. त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले आहे. त्यात या शोधाची सविस्तर हकीगत आहे.

स्नेहल आचरेकर's picture

24 Jul 2016 - 10:32 pm | स्नेहल आचरेकर

मस्त माहीतीपुर्ण लेख, मलाही अशी लक्षणे जाणवतात पण हे ही कारण असु शकेल हे आता समजले.

अर्जुन's picture

24 Jul 2016 - 11:32 pm | अर्जुन

सुंदरीकल्प औषधही वरील त्रास कमी होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.