व्हर्जिनिया वुल्फचे ‘अ रूम ऑफ वन्स ओन’

Primary tabs

विशाखा पाटील's picture
विशाखा पाटील in विशेष
8 Mar 2015 - 1:32 am
महिला दिन

व्हर्जिनिया वुल्फची ओळख विसाव्या शतकातली प्रसिद्ध कादंबरीलेखक आणि समीक्षक म्हणून आहे.

स्त्रीवादी समीक्षेचा पाया रचणार्यांमधलं हे एक महत्त्वपूर्ण नाव. सर्वसाधारणतः समीक्षा म्हटलं की, किचकट विषय, बोजड भाषा असा समज असतो आणि त्यामुळे त्या वाटेला जाणं टाळलं जातं. वुल्फचं ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ हे समीक्षेच्या प्रांतातलं गाजलेलं पुस्तक. साध्या परंतु उपहासात्मक शैलीत लिहिलेलं. वुल्फने याद्वारे स्त्रियांना लेखन करण्यासाठी लागणारा वेळ, जागा आणि पैसा या तीन आवश्यक घटकांकडे लक्ष वेधलं आहे.

त्याशिवाय स्त्रियांच्या लेखनाबद्दल मूलभूत असे विचार मांडले आहेत. हे विचार 1929 मधले. सिमॉन दि बुव्हाआचं स्त्रीवादावरचं बायबल मानलं जाणारं ‘सेकंड सेक्स’ हा ग्रंथ येण्याआधीचं हे पुस्तक. ब्रिटनमध्ये स्त्रियांच्या हक्कांच्या चळवळीला नुकतीच कुठे सुरुवात होत होती, त्यावेळची ही मांडणी. त्यामुळे त्या काळातल्या परिस्थितीला धरून यातले मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. आज काळ बराच बदलला आहे, बऱ्याच देशांमधली परिस्थिती बदलली आहे, हे मान्य असलं, तरी यातले काही मुद्दे आजही समाजातल्या अनेक घटकांच्या दृष्टीने लक्षात घेण्यासारखे आहेत. प्रत्येक समाजाची जडणघडण थोड्याफार प्रमाणात वेगवेगळी असली, तरी त्यांच्यात वरिष्ठ, कनिष्ठ अशा भेदभावाचा समान धागा सापडतो. वुल्फचं हे लेखन जरी स्त्रियांसंबंधी असलं, तरी गौण मानल्या गेलेल्या प्रत्येक घटकाला ते लागू पडतं. ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ हे पुस्तक म्हणजे मुळात दोन व्याख्यांचं संकलन आहे. व्हर्जिनिया वुल्फ हिने दोन महिला महाविद्यालयांमध्ये दिलेली ही व्याख्यानं. या व्याख्यानांसाठी तिला विषय देण्यात आला होता, ‘स्त्रिया आणि कादंबऱ्या’. त्या काळात ब्रिटनमध्ये स्त्रिया कादंबऱ्याच तेवढ्या लिहू शकतात, असा कुत्सित सूर निघत असे. तिने या भाषणांमधून या विषयावर प्रथमच सखोल चर्चा केली. तिच्या मांडणीचा गाभा होता - स्त्रियांना लेखन करण्यासाठी स्वतःची जागा असणं आवश्यक आहे. त्यासाठी त्या स्वतःच्या पायावर आधी उभ्या राहिल्या हव्यात, हे तिने यात ठासून सांगितलं.

मुळात साहित्यिक असल्यामुळे वुल्फने या समीक्षात्मक चर्चेतही एका काल्पनिक स्त्रीपात्राची निवड केली. या पात्राद्वारे आपले विचार थेटपणे वाचकांपर्यंत पोचवण्यात ती यशस्वी झाली. यातली निवेदक ‘ऑक्सब्रिज’ विद्यापीठात गेली; शिकण्यासाठी नव्हे, तर हे विद्यापीठ बघण्यासाठी. तिला या विद्यापीठात शिक्षण घेण्यास परवानगीच नव्हती. हे ऑक्सब्रिज म्हणजे ऑक्सफर्ड आणि केंब्रिज या नावांची संधी! पायाखाली मऊ, लुसलुशीत गवताची गादी. ती विचार करत आपल्याच तंद्रीत निघाली. तेवढ्यात एक सुरक्षारक्षक धावत आला; तिला गवतावरून चालायला परवानगी नाही, याची त्याने तिला समज दिली. त्याच्यामुळे तिच्या विचारांची साखळी तुटली. सुरुवातीलाच रंगवलेल्या या प्रसंगातून वुल्फ स्त्रियांना विचार करण्यासाठी लागणाऱ्या अवकाशाचा अभाव, पुरुषसत्ताक व्यवस्थेने तिच्या विचारप्रक्रियेत आणलेले अडथळे, या बाबी अलगदपणे लक्षात आणून नंतर ही निवेदक याच विद्यापीठातल्या एका भव्य दालनाबाहेर उभी राहिली. आत विद्यापीठातल्या विद्वान विद्यार्थ्यांची मेजवानी सुरू होती. त्यांच्यातली चर्चा ती भिंतीला कान देऊन ऐकू लागली. ही विद्वान मंडळी उंची मद्य, कस्टर्ड यांचा आस्वाद घेतघेत बौद्धिक चर्चा करण्यात गुंतलेली होती. त्यांना जीवन सुंदर भासत होतं, कारण त्यांना लाभलेलं जीवन हे सुंदर अनुभवांनी समृद्ध झालेलं होतं. तृप्तीचा ढेकर देऊन त्यांनी केलेला विचार त्यांच्या साहित्यातही तश्याच रसरशीतपणे उमटणं, साहजिक होतं. वुल्फने मांडलेला मुद्दा म्हणजे, स्त्री आणि पुरुष यांना येणाऱ्या अनुभवांमधला फरक. त्यामुळे त्यांचा जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातही फरक पडतो. त्यानंतर ही निवेदक ऑक्सब्रिज विद्यापीठातून निघून तडक आपल्या मैत्रिणीच्या महाविद्यालयात गेली. इथलं जेवण म्हणजे भरपूर पाणी ओतलेलं सूप आणि कडक ब्रेड. मुळात या महिला महाविद्यालयाची स्थापनाच भरपूर वेळ दवडून, समिती नेमून, पैसे उभारण्यासाठी खटपटी करून झालेली असते. शरीर, मन आणि मेंदू यांच्या समन्वयातून उभं राहणारं मानवी अस्तित्व यांना व्यवस्थित खतपाणी मिळालं नाही, तर नवे विचार तरी कसे निर्माण होणार? असा प्रश्न ती इथे उपस्थित करते. ती आणि तिची मैत्रीण विचार करू लागल्या - राजेराण्या, सरदार, उमराव यांनी सढळ हस्ते देणग्या देऊन ते ऑक्सब्रिज विद्यापीठ उभारलं, त्यावेळी आपली आई काय बरं करत होती? तिच्या मैत्रिणीच्या आईला संसाराच्या धबडग्यातून बाहेर पडणं अशक्यच होतं. त्यामुळे एकांतात बसून ज्ञान मिळवणं तिला शक्यच नव्हतं. आज या आर्थिक स्वावलंबनाच्या मुद्यात विशेष वाटत नसलं, तरी त्या काळाचा संदर्भ लक्षात घेता संधीच्या असमानतेवरची वुल्फची टीका स्त्रियांच्या हक्कांच्या चळवळीला चालना देणारी ठरली. नंतर ही निवेदक स्त्रियांसंबंधी पुरुषांनी कायकाय लिहून ठेवलं आहे याचा शोध घेण्यासाठी निघाली. ग्रंथालयात जाऊन स्त्रियांसंबंधी लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचा विभाग धुंडाळू लागली. इथली कपाटं पुस्तकांनी खच्चून भरलेली होती. ती ढीग उपसत म्हणाली, "अरेच्च्या! या पृथ्वीतलावर बहुचर्चित प्राणी कोण असेल, तर त्या स्त्रियाच!" तिने या पुस्तकांमधून काढलेल्या नोंदी अशा ‘स्त्रियांच्या मेंदूचा आकार लहान’, ‘स्त्रियांजवळ नैतिकतेचा अभाव’, ‘स्त्रियांचे मानसिक, शारीरिक आणि नैतिक ̧दुयमत्व’, इत्यादी खूप शोधूनही या पुस्तकांमधून तिला स्त्रीचं खरं रूप गवसलं नाही. मग तिने साहित्यात रंगवलेल्या स्त्रियांचा शोध घेण्याचं ठरवलं. ग्रीक, ब्रिटिश, फ्रेंच आणि रशियन भाषेतल्या उत्तम साहित्याचा तिने आढावा घेतला. या भाषेतल्या महान लेखकांनी रंगवलेल्या स्त्री पात्रांचा विचार करताना विरोधाभास तिच्या लक्षात आला. अनेक साहित्यकृतींमध्ये स्त्रियांना मानाचं स्थान लाभलंय, पण प्रत्यक्षातलं तिचं जीवन तसं होतं का? साहित्यात तिचं उदात्तीकरण चालत होतं आणि इतिहासात तिचा साधा उल्लेखही नाही! साहित्यात विचारप्रवर्तक उद्गार तिच्या तोंडी, वास्तवात तिला बोलायला, लिहायला बंदी! वुल्फचं हे निरीक्षण सर्व देशांमधल्या साहित्याला कमीअधिक फरकाने लागू पडतं.

पुरुषसत्ताक व्यवस्थेत सर्वसामान्य स्त्रियांना संधी नाकारल्या गेल्या, पण तीच व्यवस्था मुलामा चढवलेलं तिचं दिखाऊ रूप मात्र सतत दाखवत राहिली, हे वास्तव. शतकानुशतकं स्त्रियांना स्वतःला प्रकट करण्याची संधी मिळाली नाही, हे सर्वच समाजांमधलं वास्तव. ते दाखवण्यासाठी वुल्फने जुडीथ शेक्सपिअर या काल्पनिक पात्राची निवड केली. ही विल्यम शेक्सपिअरची बहीण. भावाप्रमाणेच उत्तुंग प्रतिभा असलेली ही मुलगी. पण तिला शिक्षण घेता आलं नाही, त्यामुळे लॅटिन भाषेतलं उत्तम साहित्य तिने वाचलं नाही. तरीही तिने संधीच्या शोधात लंडन गाठलं. पुरुषसत्ताक व्यवस्थेत धाडसी पाऊल टाकलं. पण त्यामुळे तिच्यावर संकटं कोसळली, तिच्यावर बलात्कार झाला. शेवटी स्वतःवर झालेल्या अन्यायाने व्यथित होऊन तिने अकाली आयुष्य संपवलं. हाच मुद्दा लक्षात घेऊन मराठी साहित्याच्या बाबतीत बोलायचं तर, विसाव्या शतकाच्या आधीपासून अनेक स्त्रिया स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु ते फारसं उजेडात आलं नाही. एक उदाहरण, बहिणाबाई चौधरींच्या कविता त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी यांनी कागदावर उतरवल्या, जपून ठेवल्या. त्या प्र. के. अत्रे यांच्या हातात पडल्यामुळे हे साहित्य उजेडात आलं. पण अशा कित्येक बहिणाबाईंचं साहित्य काळाच्या ओघात लुप्त झालं. स्त्रिया लोकगीतं, ओव्या, अभंग यांच्याद्वारे स्वतःला व्यक्त करत होत्या, पण त्यांच्या साहित्याला फार महत्त्व लाभलं नाही. अलीकडे सुसी थारू आणि के. ललिता यांनी ‘विमेन राईटिंग इन इंडिया’चे दोन खंड संपादित केले. त्याद्वारे इ. स. पूर्व 600 पासूनचं विविध भारतीय भाषांमधलं थोडंफार स्त्रीसाहित्य उजेडात ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ मधला दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे स्त्रियांनी लिहिलेल्या साहित्याची समीक्षा. वुल्फचे याबाबतीतले विचार अतिशय समतोल आहेत. भविष्यात स्त्रियांच्या लेखनात एक मोठा दोष येण्याची शक्यता आहे, हे तिने जाणलं होतं. त्यासाठी तिने आधीच त्यांना सावध करण्याचं काम केलं. स्त्रियांनी लिहिलेलं ते सर्व उत्तमच, असं मानू नये , असा तिचा आग्रह आहे. स्त्रियांच्या लेखनात पुरुषद्वेष्टेपणा आणि तक्रारीचा सूर वारंवार येऊ लागला, तर ते लेखन उंची गाठू शकणार नाही, हा तिचा परखड विचार. स्त्रियांनी पुरुषांसारखीच श्रेष्ठत्व जपण्याची धडपड केली, सूडाची भावना ठेवत लेखन केलं, तर त्यातून उत्तम साहित्याची निर्मिती होणार नाही, हा तिने दिलेला इशारा. स्त्रियांनी स्त्री म्हणून लेखन न करता माणूस म्हणून लेखन करावं, हा विचार स्त्रियांच्या लेखनाला दिशा देणारा ठरला. अर्थात, विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच वुल्फने सावध करूनही हा दोष पुढे काही प्रमाणात स्त्रियांच्या लेखनात आला. अनेक भाषांमधल्या साहित्यात काही लेखिका पुरुष लेखकांनी तयार केलेल्या रॉमँटिक कल्पनांमध्ये अडकल्या, तर दुसरीकडे काहींनी टोकाची भूमिकाही गाठली. त्यांनी घेतलेल्या आक्रस्ताळ्या भूमिकेने लेखन एका चौकटीतच अडकलं. ज्या कुठल्याही चौकटीत न शिरता माणूस म्हणून लेखन करतील, त्यांचं साहित्य काळाच्या ओघात टिकून राहिलं.

याशिवाय स्त्रियांचं लेखन समजून घेताना वुल्फचा एक मुद्दा आवर्जून लक्षात घेण्यासारखा आहे. शतकानुशतकं स्त्रियांना संधी न मिळाल्यामुळे स्त्री आणि पुरुषांच्या लेखनात काही फरक दिसतील याची जाणीव ठेवायला हवी, असंही ती सांगते. दोघांच्या लेखनात काही प्रमाणात फरक दिसणं साहजिक आहे आणि त्या तफावतीला नाकारलं जाऊ नये, असं सांगून ती वाचकांना सजग करते. स्त्रियांच्या साहित्यातून त्यांचे म्हणून असणारे काही खास अनुभव उमटतील, त्यांचं जीवन, त्यांचे विचार प्रतिबिंबित होतील. परंतु त्यांकडे तुच्छतेने न बघता, ते व्यक्ती म्हणून समजून घ्यायला हवेत, हा स्त्रियांच्या मूल्यांवर पुरुषप्रधान मूल्यांचा प्रभाव असतो आणि त्याच चश्म्यातून त्या स्वतःकडे बघतात, हे तिचं परखड असं निरीक्षण आहे. दुर्दैवाने आठ दशकांनंतरही हा दुर्लक्षित राहिलेला मुद्दा. पुरुषांच्या दृष्टीने जे विषय महत्त्वाचे आहेत, तेच बहुतेकवेळा मान्य केले जातात. उदाहरणार्थ, क्रिकेट, फुटबॉल यांची चर्चा श्रेष्ठ ठरते, पण विणकाम, कपडे, स्वयंपाक यांची चर्चा क्षुल्लक मानलं जातं. हीच मूल्ये साहित्यात उमटतात. मग युद्धावरचे पुस्तक श्रेष्ठ आणि स्त्रियांच्या भावनांवरचे क्षुल्लक, असं मानलं जातं. स्त्रियांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांना दुय्यम समजणं, हे घडतं. स्त्री जीवनाशी निगडित वेगवेगळ्या पातळ्यांवरचे अनुभव, स्त्रियांचे वेगवेगळ्या क्षेत्रातले बरेवाईट अनुभव हे फक्त स्त्रियांचे राहत नाहीत, तर ते संपूर्ण समाजाचे असतात, हा अलीकडे रुजू लागलेला विचार. त्या विचाराची मुळं वुल्फच्या या समतोल विचारांमध्ये दडलेली आहेत. वुल्फच्या या निबंधाने लेखन करण्यासाठी स्त्रीकडे स्वतःची जागा, वेळ आणि पैसा असणं आवश्यक आहे, याकडे लक्ष वेधलं. त्या काळी नुकत्याच रुजू लागलेल्या स्त्रीवादी चळवळीलाही त्यामुळे योगदान मिळालं. स्त्रियांचं लेखन कसं असावं आणि त्याकडे कसं बघितलं जावं, यासंदर्भातही तिने मार्गदर्शन केलं. त्यातूनच पुढे स्त्रीवादी समीक्षेचा पाया रचला गेला. व्हर्जिनिया वुल्फची ही कामगिरी बघून जेन माकूस ही समीक्षक उद्गारली, ‘ही तर व्हिक्टोरिअन स्कर्टमधली गनिमी योद्धाच आहे!

प्रतिक्रिया

पिशी अबोली's picture

8 Mar 2015 - 2:18 pm | पिशी अबोली

उत्तम लेख. आजच्या काळाच्या संदर्भात या विचारांचे औचित्य तसेच आहे.
हे मिळवून वाचेन नक्की.

बोका-ए-आझम's picture

8 Mar 2015 - 6:03 pm | बोका-ए-आझम

रहस्यकथा आणि गुन्हेगारी कथा या पुरुषांच्या समजल्या गेलेल्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग स्थान मिळवणा-या आगाथा ख्रिस्तीसारख्या लेखिकेने काही अंशी व्हर्जिनिया वुल्फचं हे स्वप्न सत्यात उतरवलं असं म्हणता येईल.आजही बेस्टसेलर असलेली तिची पुस्तकं जरी विदग्ध वाङ्मयात मोडत नसली तरी त्यांनी ग्लास सीलिंग तोडलं यात काही संशय नाही.

जुइ's picture

8 Mar 2015 - 7:41 pm | जुइ

आजच्या काळातही कमी अधीक प्रमाणात ही निरीक्षणे लागु आहेत.

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 8:03 pm | सविता००१

आणि वर जुईने म्हटल्याप्रमाणे आजच्या काळातही कमी अधीक प्रमाणात ही निरीक्षणे लागु आहेत हे ही तितकंच खरं.

व्हर्जिनिया वुल्फ व तिच्या पुस्तकाची ओळख आवडली. कधीकधी असं वाटतं की आपण एक समाज म्हणून जुन्या काळातच आहोत.

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2015 - 7:33 am | प्राची अश्विनी

सहमत!

सस्नेह's picture

10 Mar 2015 - 5:06 pm | सस्नेह

स्त्रियांच्या लेखनाबाबत आजही समाजाचा दृष्टीकोन फार सुधारला आहे असे म्हणवत नाही, दुर्दैवाने.

त्रिवेणी's picture

14 Mar 2015 - 3:46 pm | त्रिवेणी

खुप छान झालाय लेख.
आणि स्नेहा ताईंशी सहमत.

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2015 - 8:23 am | श्रीरंग_जोशी

व्हर्जिनिया वुल्फ व तिच्या पुस्तकाची ओळख खूप भावली. लेखनाच्या आशयाशी सहमत.

मितान's picture

9 Mar 2015 - 10:34 am | मितान

रेवतीताई म्हणते तसं आपण अजूनही त्या काळात आहोत असा अनेकदा भास होतो.
चांगला लेख !

छान लेख ...वर्जिनिया वूल्फ ची मस्त ओळख करून दिलीस ...

छान लेख. एखादे पुस्तक मिळवुन वाचले पाहिजे.

अजया's picture

9 Mar 2015 - 4:53 pm | अजया

बर्याचशा गोष्टी बदललेल्या नाहीतच!अनाहिता अंकावर प्रतिसाद फक्त अनाहिताच देत आहेत,त्यावरुनही कळावे!!

सामान्य वाचक's picture

9 Mar 2015 - 4:55 pm | सामान्य वाचक

कुठला हि चष्मा न लावता वाचून प्रतिसाद द्यायला काय हरकत आहे?

पलाश's picture

10 Mar 2015 - 1:29 pm | पलाश

+ १००.
ह्या अशा गोष्टींकडे फार लक्ष देऊ नये. आपण सर्वांनी चांगले काम केले आहे. असेच आधिकाधिक चांगले लेखन होवो.

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2015 - 6:16 pm | मधुरा देशपांडे

लेख आवडला. वरील प्रतिसादांशी सहमत.

भावना कल्लोळ's picture

9 Mar 2015 - 6:28 pm | भावना कल्लोळ

व्हर्जिनिया वुल्फ व तिच्या पुस्तकाची ओळख आवडली.

सुचेता's picture

9 Mar 2015 - 7:26 pm | सुचेता

आवड्ली ग ओळख, रेवती अन मितान शी बाडिस,

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2015 - 9:45 pm | स्वाती दिनेश

पुस्तकाची ओळख आवडली.
स्वाती

सानिकास्वप्निल's picture

10 Mar 2015 - 1:58 am | सानिकास्वप्निल

पुस्तकाची ओळख आवडली.
वर रेवती आणि अजया ताईशी सहमत.

नेहेमीप्रमाणे एक अप्रतिम इन्ट्रिगिंग पुस्तक तुझ्यामुळे कळलं. आजच्या काळात ही सुसंगत असलेले तिचे विचार म्हणून तिच्या द्रष्टेपणाचा अभिमान जास्त की अजून ही समाज तितका बदलला नाही याचा विशाद जास्त हे मलाच कळत नाहीये. पण तुझा हा लेख विचार प्रवर्तक आहे हे मात्र खरं.

प्रीत-मोहर's picture

10 Mar 2015 - 9:05 am | प्रीत-मोहर

पुस्तकपरिचय आवडला. मिळवु वाचण्याचा प्रयत्न नक्की करेन

ह्या व्यक्तिमत्वाची छान ओळख करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. व्हर्जिनिया वुल्फचे अतिशय समतोल मांडणी असलेले विचार फार आवडले. आता हे पुस्तक मिळवून नक्की वाचेन.

स्पंदना's picture

10 Mar 2015 - 3:21 pm | स्पंदना

देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही.
लेख वाचायला वेळ लागला. प्रत्येक वाक्यागणीत एक विंडो आपल्या आपण ओपन होत होती अन बरीच दॄष्ये सामोरी येत राहीली.
या निमित्ताने अनाहिताच्या जन्मवेळचा वाद आठवला. आरोप प्रत्यारोप, खोचक प्रतिसाद आठवले. तसेच आठवले दिलदार, खंबीर प्रतिसाद सुद्धा.
हे सगळ या व्हर्जीनिया वुल्फने आधीच लिहुन ठेवलयं माहीत असत तर बरच बर झालं असत असं वाटतयं.

अतिशय सुंदर आणि उद्बोधक लेख. चार चाँद लग गये इस लेख के कारण!!

प्रीत-मोहर's picture

10 Mar 2015 - 3:43 pm | प्रीत-मोहर

सुंदर लिहिलय्स ग.

हे पुस्तक मिळवून नक्की वाचेन

उत्तम लेख, पुस्तक परिचय आवडला
धन्यवाद

व्हर्जिनिया वुल्फ व तिच्या पुस्तकाची ओळख आवडली.उत्तम परिचय करून दिलास.पुस्तक मिळवुन नक्की वाचेन.

मोनू's picture

13 Mar 2015 - 3:29 pm | मोनू

विशाखा,

व्हर्जिनीया वुल्फ आणि तिचे विचार अत्यंत प्रभावी आहेत. खूप बारकाईने तिने स्त्रियांच्या आणि पुरूषांच्या लेखनातील तफावत अभ्यासलेली दिसतेय आणि त्यामागची कारणमीमांसा जाणून घेवून ती लोकांसमोर मांडली आहे.

पद्मश्री चित्रे's picture

13 Mar 2015 - 6:07 pm | पद्मश्री चित्रे

फक्त नाव ऐकून होते .छान ओळख झाली लेखिकेची ,या लेखामुळे.

पैसा's picture

13 Mar 2015 - 10:32 pm | पैसा

लेखासाठी धन्यवाद!

निवेदिता-ताई's picture

15 Mar 2015 - 11:06 pm | निवेदिता-ताई

मस्तच

नेहमीप्रमाणे विचार करायला लावणारा पुस्तक परिचय..

हा लेख जितक्यांदा वाचला तेवढ्या स्पंदना म्हणतेय तसं अनेक संदर्भ आठवत राहिलेत. सुक्ष्मपणे, ढोबळपणे, जाणतेपणी, नकळत जाणवून दिलेले स्त्रीपणाच्या पुरुषी व्याख्या आठवत राहिल्या. पुरुष किंवा स्त्री अशी विभागणी न करता माणूस म्हणून जगावं, वागावं, बोलावं, तसा विचार करावा हे समंजस असणा-या व्यक्तींमध्येही बरंच दुर्मीळ आहे.

उदा. रस्त्यावर चालणारी मुलगी ही संधी नसून जबाबदारी आहे, हे वाक्य.

पहिल्या वाचनात हे समंजस वाटतं. पण खोल विचार केला, तर अनेक प्रश्न पडतात. फक्त मुलगी हीच जबाबदारी? ती स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाही, अशा समजामुळे ती जबाबदारी? म्हणजे प्रत्येक मुलगा स्वतःला सांभाळायला सदोदित समर्थ असतोच का?

मग अशा त-हेच्या वाक्यांना कोणता टॅग लावावा? पुरुषी लेखनाचा?

असं बरंच काही हे वाचल्यावर उमटत राहतं. आणि मग व्हर्जिनियाच्या काळापासून अजूनही... "ती" वुमनच आहे, ह्युमन कधी होणार, हा प्रश्न मागे उरतो.

एस's picture

16 Mar 2015 - 8:13 pm | एस

एक समतोलपणे विचार करायचा असे म्हटले तरी ते अगदी काटेकोरपणे कुणालाही शक्य होत नाही. शेवटी प्रत्येक व्यक्ती ही तिच्या चश्म्यातून जगाकडे पाहत असते आणि त्या चश्म्याच्या मर्यादांपलिकडे जाणे आजपर्यंत कुणालाही शक्य झालेले नाही. हे विधान मी सखोल चिंतन करूनच करत आहे. स्त्रीपणाच्या पुरुषी व्याख्यांचा अपुरेपणा, एकांगीपणा दाखवून देऊन त्याविरोधात मांडणी करायला विसाव्या शतकात स्त्रीवाद सरसावला खरा, पण प्रत्युत्तर म्हणून असेल किंवा आणखी काही. ज्या समांतर, स्त्रीवादी व्याख्या मांडल्या गेल्या त्याही तशाच खुरटलेल्या राहिल्या असे मला वाटते. हे दोन्ही प्रवाह एकत्र आणवून समंजस सुसंवाद घडवण्याची जबाबदारी समाजातील त्या-त्या प्रभावशाली घटकांनी जितक्या हिरीरीने घ्यावयास हवी होती तितकी काही अपवाद वगळता घेतली गेली नाही. स्त्रीवादाला, किंवा त्यापुढे जाऊन मानवतावादाच्या प्रत्येक प्रवाहाला जर अधिक व्यापकतेने समाजजीवनाच्या खाचाखोचांना कवेत घ्यायचे असेल तर त्यांना पूर्वग्रहांच्या अढी आधी टाकून द्यायला लागतील. इथे आपण म्हणता तसे "पुरुष किंवा स्त्री अशी विभागणी न करता माणूस म्हणून जगावं, वागावं, बोलावं, तसा विचार करावा हे समंजस असणा-या व्यक्तींमध्येही बरंच दुर्मीळ आहे" ह्या वाक्याचा प्रत्यय पावलोपावली येत राहतो.

दुसरा मुद्दा म्हणजे
"उदा. रस्त्यावर चालणारी मुलगी ही संधी नसून जबाबदारी आहे, हे वाक्य.

पहिल्या वाचनात हे समंजस वाटतं. पण खोल विचार केला, तर अनेक प्रश्न पडतात. फक्त मुलगी हीच जबाबदारी? ती स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाही, अशा समजामुळे ती जबाबदारी? म्हणजे प्रत्येक मुलगा स्वतःला सांभाळायला सदोदित समर्थ असतोच का?"

मुलगीच नव्हे, तर आपल्याला ज्यांच्याबद्दल काळजी वाटते अशा सर्वच घटकांबद्दल हे खरे आहे. अशा परिस्थितीत आपला प्रतिसाद (रिस्पॉन्स) हा शेवटी त्या घटकांवर काही प्रकारे बंधने घालण्याच्या निर्णयापर्यंत येत असतो. इथे दोन दृष्टिकोन परस्परांवर प्रभाव टाकतात. एक म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल वाटणारी भीती आणि दुसरे म्हणजे त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती. यातील कुठलीही एक आपली बाजू असू शकते.

जाताजाता 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' या कादंबरीतील मला भिडलेले एक विधान उद्धृत करतो -
इट इज द फिअर ऑफ द वीक दॅट मेक्स द स्ट्रॉन्ग हेट देम. फिअर दॅट द वीक विल बिकम स्ट्रॉन्ग. दॅट दे विल ओव्हरथ्रो अस.

या वाक्यांत फार मोठा सत्यांश दडलेला आहे. केवळ स्त्रीसमानतावादी प्रवाहालाच नव्हे, तर मानवतावादाच्या प्रत्येक प्रवाहाला लागू पडणारा सत्यांश!...

प्रतिसाद अतिशय आवडला. आणि इथे या धाग्यावर आवर्जून प्रतिसाद दिलास हे अजूनच आवडलं.
It has to be between good humans n bad humans. Instead of in between men n women.
हे जेव्हा घडेल तेव्हा अशा या लेखांची, पुस्तकांची गरज पूर्णपणे संपलेली असेल!

पैसा's picture

16 Mar 2015 - 10:51 pm | पैसा

स्वॅप्सचा उत्तम प्रतिसाद. स्त्रीला देवी म्हणून देव्हार्‍यात ठेवण्यापेक्षा एक माणूस म्हणून जगायला मिळेल तो सुदिन. अनाहिता सुरू करताना जेव्हा बरीच विनाकारण वादावादी झाली होती तेव्हा मी हेच म्हटलं होतं की ज्या दिवशी अनाहिताची गरज संपेल त्यादिवशी मला सर्वात जास्त जास्त आनंद होईल. पण ते नजीकच्या भविष्यात तरी शक्य दिसत नाहीये.

मस्त प्रतिसाद स्वॅप्स. यावर अजून बरंच लिहायचं आहे. लिहिते. आत्ता फक्त पोच पावती.

अप्रतिम प्रतिसाद.अतिशय आवडला.

अतिशय उत्तम प्रतिसाद !!! माझ्या विस्कळित विचारांना काही एक दिशा देऊ शकणार्‍या या प्रतिसादासाठी आभार !!

प्रीत-मोहर's picture

17 Mar 2015 - 10:34 am | प्रीत-मोहर

सुरेख प्रतिसाद स्व्प्स.

स्पंदना's picture

18 Mar 2015 - 11:39 am | स्पंदना

इट इज द फिअर ऑफ द वीक दॅट मेक्स द स्ट्रॉन्ग हेट देम. फिअर दॅट द वीक विल बिकम स्ट्रॉन्ग. दॅट दे विल ओव्हरथ्रो अस.

सो ट्रु! गरीबाने गरीबच रहावे, अपंगाने मेरु लंघू नये, दलिताने ज्ञानार्जन करु नये, या सगळ्या सगळ्या गोष्टी हेच दर्शवतात. कमजोर असणारा शाळकरी मित्र पुढे कधीतरी चांगलाच दणदणीत होउन आपल्यापुढे आला, की काय रे टिंगुल्या म्हणुन का असेना त्याला जरा कमीपणा आणावासा वाटतो.
रुपाने सर्वसाधारण मुलगी चाम्गल्या ठिकाणी पडलीच कशी असा प्रश्न अगदी चार चौघात विचारला जातो. कुणीही आपल्या बरओअबरीला येउ नये म्हणुन ऑफीसात कागदपत्र दडवली जातात, राजकारण खेळली जातात.
या सगळ्या मागे ही "फिअर"च असावी.

सुबोध खरे's picture

18 Mar 2015 - 8:39 pm | सुबोध खरे

प्रथितयश लेखकाचा एक धडा आम्हाला शाळेत असताना होता ( नाव आठवत नाही वि द घाटे असावेत) त्यःचे नाव आतले आणि बाहेरचे. त्यात लेखक एका आगगाडीतून प्रवासाला निघतो तेंव्हा आलेल्या गाडीत भरपूर गर्दी असते आणि आतले लोक बाहेरच्या लोकांना आत येऊ देत नव्हते आणि त्यांचा म्होरक्या एक धिप्पाड भय्या होता. लेखक स्वतःचे मुटकुळे करून खिडकीतून आत शिरतो आणि लोकांच्या ढकलाढकलीत त्या भय्याच्या शेजारी येउन पोहोचतो आता तो हि त्या भय्याच्या खांद्याला खांदा लावून बाहेरच्या लोकांना आत येण्यापासून प्रतीबंध करु लागतो. हे वर्गयुद्धाचे साधे पण अत्यंत चपखल उदाहरण आहे. कोणत्याही वर्गाला आपली स्थिती दुसरा घेऊ नये असेच वाटत असते. आजचा जाट आरक्षणाचा निकाल याचेच एक उदाहरण आहे. कारण हा अर्ज सुद्धा ओ बी सी आरक्षण रक्षा समिती ने केलेला होता. असाच विरोध महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला केलेला आहे. (यात कोणत्या जातीला आरक्षण द्यावे कि न द्यावे हा माझा मुद्दा नाही. मी त्यातील तज्ञ ही नाही) अशी असंख्य आतले आणि बाहेरचे अशी उदाहरणे आहेत आणि प्रत्येक व्याक्ति आपल्या हितसंबंधाला धक्का लागू नये यासाठी प्रयत्न करीत असते.
स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने यायलाही हवे असते परंतु जेंव्हा जमेल तेंव्हा स्त्रीत्वाचा फायदाही उठवता आला तर त्या मागे पुढे पाहत नाहीत. हे दुटप्पी वर्तन जेंव्हा वैचारिक पातळीवर थांबेल तेंव्हाच खरा स्त्रीत्वाचा सन्मान होईल.
स्वाप्स यांचा प्रतिसाद अत्यंत उत्कृष्ट आहे यात शंकाच नाही.
क्रमशः

एस's picture

18 Mar 2015 - 9:11 pm | एस

बहुधा अनंत काणे.

मनिमौ's picture

18 Mar 2015 - 9:53 pm | मनिमौ

धन्यवाद अशा लेखिकेची ओळख करून दिलीस.

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:44 pm | कविता१९७८

मस्त लेख , छान माहीती

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:44 pm | कविता१९७८

मस्त लेख , छान माहीती

अंतरा आनंद's picture

20 Mar 2015 - 2:22 pm | अंतरा आनंद

एका वेगळ्या पुस्तकाची छान ओळख. काही वर्षांपूर्वी "चौथा कमरा" या संकल्पनेबद्द्ल ऐकलेलं ते आठवलं. घरातल्या बाईला लिखाण वाचन तिच्या आवडी जोपासण्यासाठी हक्काचा वेळ आणि जागा हवी अशी ती कल्पना होती असं आठवतय.