ब्रोकोली ग्रातिन

स्रुजा's picture
स्रुजा in पाककृती
17 Feb 2015 - 6:33 am

ग्रातिन हा फ्रेन्च खाद्य संस्कृती मधला एक खास प्रकार. फ्रेन्च पदार्थांचं आपलं असं एक खास स्थान आहे जागतिक खाद्यदालनात. एक मंद सुगंध, त्यात प्रत्येक घटक आपली नजाकत घेऊन हजेरी लावणार आणि या प्रत्येकाची चव वेगवेगळी, हळूच जिभेवर घोळणारी तरी ही एकत्रित एक राजस परिणाम साधणारी. या सगळ्या वैशिष्ट्यांनी ग्रातिन पण नटलं आहे.

कॅनडा मध्ये निदान गेले २ शतकं फ्रेन्च प्रभाव आहे. आणि आमच्या बाजूलाच एक फ्रेन्च राज्य आपल्या सगळ्या पाककौशल्यासकट नांदतंय. किती बाजूला ? म्हणजे इकडच्या घाटावर ब्रिटीशांनी धुतलेली धुणी फ्रेन्च धोबिणी आपलीच समजून चुकून घेऊन जातील इतक्या बाजूला. अशा स्थितीत आमचे हाटेल वाले "गोरमे कुझिन" वर पैसा ना कमावते तरच नवल. इथे आल्यावर आम्ही पण अलगद या सापळ्यात अडकलो आणि फ्रेन्च कुझिन ला अधीन झालो.

आज त्याच कुझिनची एक साईड डिश द्यायचा प्रयत्न आहे.

साहित्यः

१. ब्रोकोली एक मोठे किंवा दोन छोटे गड्डे (?) चांगला शब्द सुचत नाहीये :( निदान अर्धा फ्लॉवर च्या गड्ड्या इतके तुरे जमले पाहिजेत अशा हिशेबाने ब्रोकोली घ्या.
२. २.५ छोटे चमचे कॉर्नफ्लॉवर.
३. दिड कप दुध. माझ्याकडे दुध २% होतं त्यामुळे मी कॉर्नफ्लोवर २ च्या ऐवजी २.५ चमचे घेतलं. तुम्ही वापरत असलेल्या दुधात स्निग्धांश जास्त असेल तर सॉस तसा ही घट्ट होतो , त्या अंदाजाने तुम्ही कॉ.फॉ. चं प्रमाण कमी जास्त करू शकता.
४. चवीनुसार मीठ
५. थोडी जायफळ पूड.
६. एक कप ( बेकिंग कप) आवडेल ते किसलेलं चीझ. मी पार्मेशान आणि चेडर अर्धं अर्धं घेतलं. पारंपारिक पद्धतीत ब्रि किंवा तत्सम फ्रेन्च चीझ वापरतात पण मी थोडं इटालियन आणि थोडं ब्रिटिश चीझ घेऊन , मुळ पद्धतीत बदल करत वर ते इथे छापण्याची खास अमेरिकनगिरी केलेली आहे. तसं ही अक्ख्या फ्रेन्च कुझिन चा डोलारा ज्याने समर्थ पणे पेललेला आहे तो त्यांचा सगळ्या सॉसेस चा बाप मुळ इटालियन आहे. ती ईष्टोरी पुन्हा कधी. त्याला आपण व्हाईट सॉस म्हणतो. आमच्याकडचे महागडे हाटेल वाले बेशमेल सॉस म्हणतात.
७. एक कप ब्रेड क्रम्ब्स /ब्रेड चा चुरा. इकडे हर्ब्स मिश्रित तयार चुरा मिळतो. मी तोच वापरला पण साध्या ब्रेडचा पण चुरा तितकाच छान लागतो.
८. बटर साधारण ४ - ५ टेबलस्पून

कृती:

तर ही आहे एक साईड डिश म्हणजे हे दोघांनी खायला घेतलं तर पोट भरणार नाही. बाकी काही तरी करावंच लागणार. जेवढं पोट भरणार तेवढाच साधारण वेळ घालवायचा असं माझं आपलं आळशीपणातून पक्कं झालेलं मत आहे. तेंव्हा फटाफट २-३ शेगड्या आपण वापरायला घेऊ.

१. सगळ्यात आधी ओव्हन ४५० फॅ ला लावून ठेवा.
२. एका पातेल्यात पाणी (खूप नाही) तापवायला घ्या. पाण्याला पहिली उकळी येईतो ब्रोकोली चिरुन घ्या. तुरे अक्खेच घ्यायचे आहेत. हे सगळे तुरे त्या पाण्यात सोडा आणि झाकण ठेवा.
२. आता दुसरी शेगडी. यावर एक सॉस पॅन ( किंवा आपला साधा नॉनस्टिक खोलगट तवा) घ्या आणि ३ टे. स्पू बटर घाला. बटर वितळत आलं की कॉफॉ घालून गॅस मंद करा. ही पायरी सगळ्यात महत्त्वाची. लाकडी चमच्याने हळूहळू त्या मिश्रणाला हलवत रहा. गुठळ्या झाल्या तरी हो ऊ द्या. हे साधारण ३-४ मिनिटं न कंटाळता हलवायचं आहे. मधून च त्या मिश्रणाचा वास घ्या, एका पॉईंटला कॉ.फॉ.चा कच्चा वास जातो. त्या क्षणी आधी थोडं दुध घाला.गुठळ्या मोडून घेता येतील पटकीनी आणि मग उरलेलं दुध घाला.
३. ब्रोकोली आता हवी तितकी वाफवली आहे आतापर्यंत, त्यामुळे पातेलं गॅस बंद न करता उतरवा. त्याच गॅस वर दुसरं छोटं भांडं ठेवून त्यात दिड चमचा बटर घाला.
४. ते दुसरं बटर वितळवून त्यात ब्रेडचा चूरा घालून गॅस मंद करा.
५. इकडे सॉस हळूहळू घटट व्हायला लागलेला असेल. त्यात मिठ ( जरा बेताने कारण बटर मध्ये आधीच मीठ असतं) आणि जायफळ पावडर घालून गॅस मंद करून ठेवा. अजून एखाद मिनिटानी आपण सगळ्या शेगड्या (एकदाच्या) बंद करणार आहोत.
६. ब्रेडचा चुरा सोनेरी रंगावर परतला गेला की गॅस बंद करा. सॉसचा ही गॅस बंद करा.
७. आता बेकिंग ट्रे ला ते उरलेलं अर्धा टी स्पू. बटर आत सगळीकडून लावून घ्या. त्यात आधी ब्रोकोली, मग निम्मं चीझ, मग सगळा सॉस मग उरलेलं चीझ आणि सगळ्यात वर ब्रेडचा चुरा घाला.
८. हा ट्रे ओव्ह्न मध्ये ठेवून साधारण १५- १८ मिनिटांनी काढा. चीझ वितळून वरती एक सोनेरी ब्राऊन रग खुलायला लागेल त्या वेळेला हे झालं असं समजायला हरकत नाही.

एखाद्या टोमॅटो बेस च्या पास्ता बरोबर छान लागतं आणि साईड असली तरी चांगलीच पोटभरीची होते त्यामुळे त्या बेतानेच उरलेला पदार्थ बनवा. फार भूक नसेल तेंव्हा गार्लिक ब्रेड आणि सूप बरोबर पण भरपूर होतं.

image 1

image 2

प्रतिक्रिया

कौशी's picture

17 Feb 2015 - 6:49 am | कौशी

फोटो खासच आलेत.करून बघेन.

मस्तच करुन बघेन. मिक्स व्हेज ग्रातिन पण करतात ना?

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Feb 2015 - 8:28 am | कैलासवासी सोन्याबापु

मिक्स वेज ग्रातिन ला बहुतेक रैटाटूई (ratatouille) ग्रतिन सुद्धा म्हणतात, ह्यात वांगी,टोमॅटो (प्यूरी फ़ॉर्म मधे), पिवळी झुकिनी इत्यादी वापरतात, ह्या नावाचा एक प्रसिद्ध वॉल्ट डिज्नी चित्रपट पण आहे !! रैटाटूई ग्रातिन मस्त लागते!!

ही नवीन माहिती मिळाली, लक्षात ठेवेन :)

अजया's picture

17 Feb 2015 - 9:09 am | अजया

मस्त पाकृ!

अश्या हटके पाकॄ चाखुन पहायला हव्या !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमी

स्पंदना's picture

17 Feb 2015 - 11:13 am | स्पंदना

मस्ताड आहे ग्रातिन.
परवा नुसत फ्लॉवरच खाल्लं होतं.

फोटोज पाहून आता करायचच अस ठरवलयं.

शैली....ते फ्रेंच धोबीनी...चार चार शेगड्या....पटकीनी (ऑ ? हा रोग आहे ना? :)) ) लय भारी लिहील आहेस. एकदम मस्त!! लिखाणाचेच मार्कस जास्त ग तुला!!

मधुरा देशपांडे's picture

17 Feb 2015 - 2:52 pm | मधुरा देशपांडे

मस्त मस्त. पाकृ आवडली. ब्रोकोलीसोबत अजुनही भाज्या घालुन करण्यात येईल.

लिखाणाचेच मार्कस जास्त ग तुला!!

असेच म्हणते. भारी लिहिलं आहेस.

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2015 - 12:13 pm | पिलीयन रायडर

जमलय..जमलय!!!!

आणि का कोण जाणे.. अचानक मला आठवलय की स्रुजा सोबत कट्टा पेडींग आहे..
मी तुझी आतुरतेने वाट पहात आहे सुजा...

- (ब्रोकोली आणि फ्रेंच रेसेपी प्रेमी) पिरा...!!

स्रुजा's picture

18 Feb 2015 - 12:21 am | स्रुजा

हा हा. करू हो कटटा करू. ब्रोकोली ग्रातिन करून खायला घालते तुला कट्ट्याला. एखादी असती तर म्हणा ली असती ब्रोकोली आणि फ्रेन्च रेसिपी आणि सृजा बददल पण प्रेम .. पण नाही ! तेवढं कुठलं तुला सुचायला.

मितान's picture

17 Feb 2015 - 12:18 pm | मितान

मस्त डिश !
माझी एक डच मैत्रिण कोवळे कांदे आणि गाजर वापरून हे बनवायची. बेस मस्त जमला की त्यात काहीही घातले तरी चव भन्नाट लागते हा अनुभव.
मिक्स वेज ग्रातीन मध्ये थोडासा पास्ता पण छान लागतो.

फोटु बघुन आता चीज शोधणे, जमवणे आणि करणे आणि खाणे आले :) :)

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2015 - 1:06 pm | पिलीयन रायडर

फोटु बघुन आता चीज शोधणे, जमवणे आणि करणे आणि खाणे आले

काय मितान... भेटली नाहीस बर्‍याच दिवसात.. ;)

आनन्दिता's picture

18 Feb 2015 - 12:25 am | आनन्दिता

=)) धन्य ती पिरा..पाक्रु च्या धाग्यावर, करुन पाहण्यात येईल सारख्या प्रतिक्रिया वाचल्या होत्या, पण अशा प्रतिक्रिया देणार्यांना भेटून पाहण्यात येईल असं म्हणणारी तुच एकमेव..

मस्त प्रकार ग !!पण ब्रोकोली आवडत नसल्याने इतर भाज्या टाकून बनवेन !!फोटो मस्त ...

इशा१२३'s picture

17 Feb 2015 - 2:58 pm | इशा१२३

लेखनशैली खासच.मस्त लिहिले आहेस.=) :smile:
वेजग्रातिन आवडिची डिश.आता हे सुरेख फोटो(उपासाच्या दिवशी असले फोटो टाकतीये..दुष्ट्)बघुन करणे आलेच.
ब्रोकोली ऐवजी फ्लोवर वापरला तर चालेल का?एका मैत्रिणीला फ्लॉवर फार आवडतो.ती आली कि करावी म्हणतीये. :wink:

माझाच सूड घे तू! मी पुण्याला आले की माझं फ्लॉवरमय भविष्य दिसतंय मला :D

फ्लॉवर ग्रातिन, फ्लॉवरची कोशिंबीर , फ्लॉवरचे पराठे, देवा देवा .. वाचव मला.

मला फ्लॉवर भात,फ्लॉवर भाजी,फ्लॉवर चटणी,फ्लॉवर भजी सुद्धा येते.येच तू.. :biggrin:

सानिकास्वप्निल's picture

17 Feb 2015 - 6:42 pm | सानिकास्वप्निल

ब्रॉकोली अतिशय आवडते त्यामुले हे मी नक्की करुन बघणार :)
फोटो टेम्पटिंग.

छान दिसतेय. हा प्रकार बेक्ड व्हेजी. च्या जवळ जाणारा आहे.

दिपक.कुवेत's picture

17 Feb 2015 - 7:51 pm | दिपक.कुवेत

हेच म्हणणार होतो. साधारण बेक्ड व्हेज सारखं दिसतयं. पण छान दिसतयं. ओव्हन नसेल तर साध्या फ्राय पॅन मधे होईल का?

मस्त पाकृ. मला पण ब्रोकोली आवडते. मी वेजग्रातिन नेहमी करते. आता नेक्स्ट टाईल त्यात ब्रोकोली टाकुन ट्राय करेल.

जुइ's picture

17 Feb 2015 - 7:56 pm | जुइ

करुण बघन्यात येईल!!

दिपक.कुवेत's picture

17 Feb 2015 - 7:59 pm | दिपक.कुवेत

करुन खाण्यात येईल....असं हवं. हवं तर पिरा/मी यायला एका पायावर तैयार हौत. आम्हि खाताना तुम्हि बघू शकता (कॄ ह घ्या)

स्रुजा's picture

18 Feb 2015 - 12:16 am | स्रुजा

सगळ्यांचे धन्यवाद. पहिलाच प्रयत्न होता पा कृ टाकण्याचा आणि इथल्या रथी महारथींमध्ये हात दाखवून अवलक्षण करण्याचं धाडस बरेच दिवस होत नव्हतं.

ब्रोकोली मला ही आधी आवडायची नाही पण अशी करून खाल्ली आणि हळूहळू चव नुसत्या ब्रोकोलीची पण आवडत गेली.

ओव्हन नसेल तर ग्रील पॅनला हरकत नाही पण त्या वेळी सॉस काळजीपूर्वक करा. तो जरा सुद्धा कच्चा राहू देऊ नका म्हणजे मग पोटाला त्रास होणार नाही. पॅन वापरणार असाल तर ब्रोक्कोली किंवा कोणतीही भाजी वाफवून झाली की आधी कमी ऑलिव ऑईल वर छान परतून घ्या म्हणजे भाज्यांना एक छान क्रिस्प येईल. बाकी कृती तशीच.

वर अनेकांनी सुचवल्या प्रमाणे बर्‍याच भाज्या घालून हे छान लागतं. शक्यतो ज्या करकरीत चावायला लागतात अशा भाज्या यासाठी योग्य निवड ठरेल. म्हणजे गाजर, कांदा, बटाटा ई भाज्या आणी त्या बरोबर हवं असेल तर मग मश्रूम्स वगैरे छान लागतील. क्रंच गेला नाही म्हणजे झालं.

हे बेक्ड वेज सारखंच आहे. फक्त बेक्ड वेज मध्ये आपण ब्रेडचा चुरा वापरत नाही. ग्रातिन मात्र ब्रेड चुर्‍याशिवाय अधुरं आहे.

पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद

आनन्दिता's picture

18 Feb 2015 - 12:37 am | आनन्दिता

पाक्रु तर भारी आहेच पण माझ्याकडुन ही लिखाणालाच जास्त मार्क.. !! वाचतच रहावं असं लिहीतेस. :)

पैसा's picture

18 Feb 2015 - 9:46 am | पैसा

पाकृ बद्दल ऐकलं होतं. डिट्टेल रेशिपी आणि मस्त फोटु! लिखाण तर लैच्च भारी झालंय!

सविता००१'s picture

18 Feb 2015 - 1:46 pm | सविता००१

पाकृ
मितानकडे जायला लागणार लवकरच ;)

खुप मस्त लिहिले आहेस ग...आणी
फोटो तर देखणेच ....

प्राची अश्विनी's picture

3 Mar 2015 - 3:56 pm | प्राची अश्विनी

कालच बनवला ,खूप छान झालेले.

कहर आलेत फोटो,
सॉलिड यम्मी

मागचा प्रतिसाद दिल्यानंतर नव्याने आलेले प्रतिसाद आज च बघते आहे. सगळ्यांना धन्यवाद.

आयुर्हित's picture

12 Mar 2015 - 8:15 am | आयुर्हित

ब्रोकोलीची एवढी सुंदर पाकृ पहिल्यांदाच पाहिली!

पाकृ लिहिण्याची अदा तर फारच छान आहे.
सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे पाकृ करतांना एकही चूक होणार नाही अशा पद्धतीने लिहिली आहे त्यामुळे मनापासून धन्यवाद. (यालाच 6 Sigma मध्ये Operational Excellence efforts म्हणतात)