आरसा

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:16 pm

अभिजित कुलकर्णी. वय ३४-३५. शिक्षण बी ई (सिव्हिल), एम बी ए (मार्केटिंग). मूळचा सोलापूरचा. नोबल केमिकल्स मध्ये अवघ्या पाच वर्षात बऱ्यापैकी जम बसवलेला, धडाडीचा, आक्रमक आणि घेतली गोष्ट पूर्णत्वाला न्यायचा स्वभाव. सदा हसतमुख. स्टाफशी सलगीने वागणारा पण गरज पडेल तेव्हा डोक्यावर बसून काम करून घेणारा. स्वभाव त्याच्या नाकासारखा सरळ. आतलं बाहेरचं न ठेवणारा. सेल्स मध्ये मल्लू राज्य असताना सुद्धा आपली छाप उमटवणारा अभिजित, प्रस्थापित धेंडांच्या नजरेत सलत असला तरी आपले स्थान बळकट करत होता. एका मध्यमवर्गीय मुलाला, तोही ’घाटी’; आपली कंपनी सेल्स मॅनेजर म्हणुन घेते आणि तो पोरगा पहिल्याच वर्षात जबरदस्त रिझल्ट्स देतो हे एस एन उर्फ नायरला पचण्यासारखे नव्हते.

सजीथ नायर. टिपीकल मल्लु. नोबलमध्ये जवळपास २२-२३ वर्षे नोकरी झालेला आणि सेल्स हेडची जागा भूषविणारा नायर साहजिकच आपले महत्व राखून होता. आपली दवंडी पिटण्यासाठी त्याने लायकी नसलेले चार फालतू चमचे बऱ्यापैकी पदांवर ठेवले होते. आपल्याला बाहेर कुठेही इतकी सुखाची आणि शाश्वत नोकरी मिळणार नाही याची खात्री असलेले हे भाट पूर्ण वेळ नायर महिमा गात टीपी करायचे. वैतागला की नायर कधी कधी त्यातल्या एखाद्याला ’साला तू है ना, एक नंबरका गधा है. तेरेको अकलही नही है’ असं भर ऑफिसात म्हणायचा पण त्यांना त्याचं सोयर सुतक नसायचं. उलट ’क्या सर, आप मेरे को गधा बोला’असं म्हणत तो ओशाळवाण्या चेहऱ्यानं हसायचा. नायर असला तरी लहानपणापासून मुंबईत वाढलेला नायर उर्फ एस एन व्यवस्थित हिंदी आणि थोडं मराठीही बोलायचा. सजीथ हे नांव कुणाला माहित नव्हतं की काय कोण जाणे पण त्याचा उल्लेख एकतर एस एन किंवा नायरसाब असाच व्हायचा. आपण किती कष्ट घेतो हे दाखविण्यासाठी नायर महिन्याकाठी १२-१५ दिवस टूर करायचा. टूर म्हणजे हवापालट. जिथे जाईल तिथे रिजनल मॅनेजर, ब्रॅंच मॅनेजर, अकाऊंटंट, सेल्सवाले असा लवाजमा हार घेऊन विमानतळावर स्वागताला हजर. विमानतळावरुन निघाल्यापासून चर्चा कसली तर रात्री टीम चे डिनर कुठे ठेवायचे? उद्या ब्रेकफास्ट कुठे? कुठल्या डीलरला तंगवायचं, कुणाला झुकतं माप द्यायचं....ब्रॅंच ऑफिसमध्ये पोचल्यावर प्रथम हाय हॅलो, सर्वत्र एक फेरफटका. मग तिथे प्रॉडक्ट डिस्प्ले बघायची टूम. तेव्हढ्यात कुणी डीलर यायचा. हमखास खपणाऱ्या आणि बऱ्यापैकी मार्जिन असणाऱ्या दादा ब्रॅंडच्या कंपनीचा सेल्स हेड आपल्या शहरात येणार तेव्हा त्याचे आगत स्वागत करायला डीलर लोक सरसावणं स्वाभाविकच. मात्र हे मूळात ’निवडक’ डीलरनाच माहित असायचे. लोकल आर एम/ बी एम चे मुख्य काम म्हणजे अशा प्रसंगी दिलदार बकरे शोधुन त्यांचे लंच, डिनर वगैरे वार लावायचे. किरकिऱ्या वा दावे रखडलेल्या डीलरना शिताफीने दूर ठेवायचे. फारस भाव न देणाऱ्या व नको ते प्रश्न विचारणाऱ्या डीलरना परस्पर फ़ुटवायचे.

आपण सगळ्यांशी कसे आपुलकीने वागतो हे दाखविण्यासाठी ’क्या बोलता है’ असं म्हणत चार दोन जणांशी हात मिळवायचा वा बरी मुलगी असली तर पाठीवर सलगीने हात ठेवायचा. त्यांना काय, आणि ’एवढा मोठा बॉस, आपल्याशी इतक्या साधेपणाने वागतो’ याचे कौतुक वाटायचे, वर बॉस जवळीक दाखवतो म्हणजे ब्रॅंचमध्ये वजन वाढते. हे होइपर्यंत दुपारची जेवायची वेळ व्हायची. दुपारी यथेच्छ गिळून झाल्यावर मग सेल्स रिव्ह्यू नामक फार्स व्हायचा. ’बोलायला थोडेच पैसे पडतात?’ आणि ’नाराजी थोडीच परवडणार आहे?’ असा सूज्ञ विचार करत सेल्सटीम सर्व कुशल मंगल असल्याचा निर्वाळा द्यायची. मग नायर ’साला तुम लोक सी बनानेमे उस्ताद है सब’ असे लटक्या रागाने म्हणत गांभीर्याचा आव आणत गेल्या महिन्यात सेल का झाला नाही असे विचारायचा. लोक अदबीने झुकत ठरलेल्या सबबी ठोकायचे आणि या महिन्यात नक्की करु असे भरघोस आश्वासन द्यायचे. मग हळूच खिशातून रुमाल निघायचा आणि टकलावर फिरायचा. जाणते लोक आपापसात नेत्रपल्लवी करायचे - ’आता नेहेमीचा डायलॉग’. आणि नायर आपलं कौतुक सुरू करायचा ’साला तुम लोक मजा मारता है, यू बगर्स आर नॉट सिरिअस. आय हॅव टु ब्लडी ट्रावल लाईक हेल. लास्ट १० डेज आय हॅव बीन ट्रॅवलिंग नॉन स्टॉप, सो टायर्ड’ मग लगबगीने आरेम ’सर आप रेस्ट किजिये, मिटिंग मै सम्हाल लूंगा सर, नॉट टू वरी’. मग नायर ब्रॅंच अकाउंटंट्ला बोलवायचा ’ब्लडी आय वॉण्ट अपडेटेड ओडी स्टेटमेंट बिफोर मॉर्निंग, तुम बैठके सबका ओडी अपडेट करो.’ नायर अलगद बाहेर पडायचा, बाहेर एखादा खास डीलर पाहुणचार करायला हजर असायचा. नायर मग आरेम ला फूटवायचा ’ए तू सबको टाईट कर, डोण्ट लेट दिज बगर्स टेक थिंग्ज इझी’. नायर बाहेर, आरेम आत. ’ए यु बगर्स, रातको बॉस डिनरपे लेके जानेवाला है. फटाफट भागो शार्प ८ बजे हॉटेल ***** पे आ जाना’. मग उरलेली मिटिंग डिजे कोणता, दारु कुठली, मेनु काय, कोण ठो पितो, त्याला कसा सांभाळायचा, गेल्या वेळेला कसा लोचा झाला यात संपायची.

पंधरा वर्षांपूर्वी नोबल केमिकल्स एस्पी ग्रुपने टेक ओव्हर केली तेव्हा नायरची हवा टाईट होती. नायर तेव्हा दक्षिणेत साधा झोनल मॅनेजर होता. गेली ती वर्षे मजेत गेली, पण आता नवी मॅनेजमेंट कशी असेल, जुन्या लोकांना ठेवतील की हाकलतील काही समजत नव्हते. पण नायरला सॉलिड मटका लागला. एस्पी ग्रुप ऍडहेजिव्हज, ऍड्मिक्स्चर्स यात नवीन होता. एस्पी हा व्यावसायिक पद्धतीने काम करणारा उद्योग समूह होता. जर पुढे जायचे असेल तर जुने आणि जाणते यांना आपल्याला या धंद्यात प्रावीण्य मिळेपर्यंत चुचकारण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. एक दिवस नायरला अचानक ज्ञान प्राप्त झाले की एस्पी चा ईडी नेमका नायरच्या लांबच्या नात्यातला आहे आणि नायरचे भाग्य फळफळले. ब्रॅण्ड तगडा होता फक्त दिशा भरकटली होती. धूर्त नायरने अख्खी दक्षिण आपल्या अर्ध्या वचनात असल्याची हवा तयार केली आणि २-३ वर्षात तो बडा झाला, आणि एच ओ ला आला. नायर ’अढळ पदी अंबरात’ बसला. इकडे मार्केट बदलत होते पण नायर मॅनेजमेंट्ला मॅनिप्युलेट करण्यात यशस्वी होत होता. मात्र गेल्या दोन अडीच वर्षात परिस्थिती बदलली होती.

नायरचा रुबाब कमी झाला नसला तरी ’आपल्याला समांतर’ काही तरी घडतंय याची पूर्ण कल्पना त्याला होती. खरं सांगायचं तर वाढत्या स्पर्धेत नोबलची स्थिती पूर्वीसारखी मजबूत राहिली नव्हती, धंदा वाढवताना दमछाक होत होती, पहिल्यासारखी कॉंट्रिब्युशनही मिळत नव्हती. दुसरी कडे खर्च आणि वेज बील वाढत होते. पारंपारिक पद्धतीने नबाबी धंदा आता परवड्णारा नव्हता. आता पुन्हा एकदा नवी सुरूवात करायची वेळ आली होती. स्वत: नायर कसल्याही नावीन्याच्या विरोधात होता आणि नायर असताना बाहेरचा माणूस येऊन काही करेल अशी शक्यताच नव्हती. मुळात उमेदवाराची कुंडली वाचताना नाकापेक्षा जड मोती तो अलगद खड्यासारखा बाजुला काढायचा. शक्यतो सुमार उमेदवार बरा. आपल्या धाकात राहील. नायर तसा फार धूर्त. एखाद्याच्या हातून लोचा झाला तर त्याला बोलावून बेमौत चढायचा पण त्याला एक्स्पोज करायचा नाही. अर्थातच त्या उपकाराखाली तो कर्मचारी त्याचा गुलाम व्हायचा. तसा एम टी किंवा इंडस्ट्रीतले प्रोफेशनल्स आणायचा प्रयत्न झाला होता, पण नायर आणि त्याच्या बगलबच्चांनी त्यांना वर्षभरही टिकून दिलं नव्हतं. फक्त बी ए पास असलेल्या नायर ला एम बी ए या शब्दाची प्रचंड ऍलर्जी होती. ’आय टेल यु,दे आर गुड फॉर नथिंग. दीज स्टुपिड फेलोझ फील, दे बीकेम एम बी ए सो दे नो एव्हरीथिंग. लेट देम गो टू मार्केट, वन्स दे फेस डीलर्स दीज हीरोज वील रन अवे.आय डोण्ट नो व्हाय मॅनेजमेंट वॉंट्स टू वेस्ट मनी’. एखादा हुषार निघाला, टिकलाच तर डीलर्स कडून त्याच्याविषयी खोट्या तक्रारी करवून, ऍप्रेजल मध्ये डाऊन करुन त्याची पद्धतशीर वाट लावली जात असे. एखादा प्रोफेशनल म्हणून भरती झालेला आर एम आपटून थकायचा पण मागितलेला आणि आवश्यक सपोर्ट न मिळाल्यामुळे निराश होऊन आणि अपयश पदरी घेऊन निघून जात असे. गेल्या काही वर्षात अशा प्रकारे गेलेल्या काहींनी रमण सेठशी बोलायची / त्याला मेल टाकायची हिंमत केली होती आणि होणारे नुकसान टळले नाही तरी रमणला हळुहळू कल्पना येऊ लागली होती.

रमण सेठ. जेमतेम चाळिशीतला पण प्रचंड प्रगल्भता आलेला अफाट हुषार माणूस. आय आय टी - आय आय एम असं डेडली कॉम्बिनेशन; वर गोल्ड मेडालिस्ट. एका नामांकित आर्थिक संस्थेत असलेलं हे रत्न एस्पी ग्रुपच्या चेअरमननी अचूक पारखलं आणि उचललं होतं. प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहणं आणि खोलात शिरुन पूर्ण कीस काढणं हा त्याचा छंद. एखादी मेल वाचताना मजकूरात न लिहिलेलं देखिल तो वाचु शकायचा. जॉईन झाल्यापासून अवघ्या दोन एक वर्षात त्याने सगळं काही इतकं आत्मसात केलं होतं की जणू या इंडस्ट्रीत तो २५ - ३० वर्षे खेळतोय. याची स्मरणशक्ति अफाट. कंपनीतल्या किमान पाचशे जणांना तो नावाने ओळखायाचा आणि किमान दोनशे जणांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती त्याचा लक्षात असायची. काहीसा गूढ व्यक्तिमत्वाचा. एकीकडे अतिशय साधा, उदार मनाने चुका माफ करणार तर दुसरीकडे भयंकर इगो जपणारा. त्याला ’नाही’ शब्द ऐकायला आवडत नसे. त्याने सांगीतल्याप्रमाणे काम करुन कुणी अयशस्वी झाला तरी तो ’असं होतं’ म्हणून सोडुन द्यायचा मात्र कुणी ऐकलं नाही तर त्याला माफी नसायची. पंजाबी असूनही शांत, माणसाना जपणारा आणि अगदी साधा. कुणाच्याही समारंभाला बोलावल्यावर आवर्जून जाणारा. एस्पी ग्रुपने टेक ओव्हर केल्यापासून रमणने दिवस रात्र एक करुन नोबल केमिकल्स वर आणली. नंतर सात आठ वर्षे स्पर्धकांना डोके काढायला वाव नव्हता. मात्र गेल्या ४-५ वर्षात परिस्थिती बदलत होती. देशी आणि परदेशी कंपन्यांची आक्रमक चाल रोखणं फार जड होतं. नोबल केमिकल्सचा मुख्य व्यवसाय म्हणजे बांधकामात लागणारी केमिकल्स, ऍड्मिक्सचर्स व वॉटर्प्रूफिंग कंपाउंड्स, सिलंट्स वगैरे. देशभर पसरलेलं डीलर्सचं जाळं आणि नाव लौकिक यावर धंदा बरा चालत होता. पण गेल्या ५ वर्षात काळ बदलला आणि आपणही चाल बदलली पाहिजे हे चाणाक्ष रमणने ओळखले आणि आपले व्यावसायिक आराखडे त्याप्रमाणे बनविले. ’बॅक टू बेसीक’ चा मंत्र देउनही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. तोच तो जुना सेल्स फोर्स आणि कसलाही बदल नको असलेला सुखासीन नायर आता परवडणारा नव्हता. मात्र गेली १०-१५ वर्षे ज्याला नावाजला आणि ज्याचा मार्केटवर, टीमवर होल्ड आहे अशा नायरला तडकाफडकी हटवणे शक्य नव्हते आणि आपल्या माणसांना एकदम सोडून देणे त्याला आवडत नव्हते. शिवाय त्याची व्यवहारबुद्धी त्याला सांगत होती की छत पेलणारा खांब पोखरला गेला तरीही मापाचा, ताकदीचा नवा खांब मिळेपर्यंत आणि तो उभारेपर्यंत पहिला खांब हटवुन चालत नाही. थोडीशी सहानुभूती आणि काहीसा नाइलाज यामुळे तो नायरला तडकाफडकी हटवणार नव्हता. मात्र त्याने नवा खांब शोधायला सुरूवात केली होती.

गेल्या दोन वर्षात एक महत्वाचा बदल आला होता. तो म्हणजे झकासपैकी नांव देऊन हळुहळू नायरच्या सत्तेच्या विकेंद्रीकरणाला रमणने सुरुवात केली होती. आजपर्यंत चाललं म्हणून केवळ डीलरवर विसंबून राहणं चालणार नव्हतं. प्रत्यक्ष ग्राहकांची म्हणजे बांधकाम व्यावसायिक, तांत्रिक सल्लागार, अभियंते यांची भेट घेउन उत्पादनांची माहिती देउन त्यांना अनुकूल केल्याशिवाय धंदा मिळणार नव्हता. आणि नव्याने घुसणाऱ्या कंपन्या - अमेरिकेची लॅंबर्ट, जर्मनीची शॉन, फ्रान्सची नाईस शिवाय ह्या मार्केटची व्याप्ती बघून या प्रांतात शिरलेल्या देशी कंपन्या हे सर्व करत होत्या. दोन वर्षांपूर्वी नायरला गोड बोलुन रमणने रिटेल सेल आणि स्पेसिफायर सेल वेगळे केले होते. अर्थातच दोन्हीचा एकत्रित प्रमुख नायरच होता, मात्र स्पेसिफायर सेलचा हेड अभिजित झाला होता. कन्सल्टंटला भेटायचं तर तांत्रिक ज्ञान पाहिजे, शिवाय अदबीनं वागलं पाहिजे जे नायरला जमणार नव्हतं. मात्र तो बिथरु नये म्हणुन रमणने अभिजितच्या, म्हणजे ’जित’च्या वर त्याला ठेवला होता. रमण तसा चालू माणूस. प्रत्यक्षात तो ’जित’ ला थेट भेटायला बोलवायचा आणि चर्चा करायचा. एकीकडे पारंपारिक उत्पादनांचा मार्केट शेअर गोठला असताना नवी उत्पादने जोर धरत होती. रमणने बारकाईने अभ्यास केला होता आणि गपचुप जितलाही या संशोधनाला लावला होता. दोन वर्षे स्पेसिफायर्स आणि थेट ग्राहकांबरोबर काम करताना जितने आज कन्स्ट्रक्शन जगतात काय चाललंय, काय बदल होताहेत याचा बारकाईने अभ्यास केला आणि मार्केट गॅप वर एक मोठा रिपोर्ट रमणला गुप्तपणे सादर केला. या रिपोर्टमध्ये आज मार्केटमध्ये काय नाहीये जे आणल्यास उत्तम चालेल, मार्केट नवी उत्पादने किती घेतील आणि काय किमतीला घेतील आणि अशी उत्पादने परदेशात कोण बनविते हा सर्व तपशिल होता. महत्वाकांक्षी रमणचे डोळे लकाकले. नायरला बेसावध ठेवून आणि कधी मधी थातुरमातुर माहिती देउन रमण आणि जित नव्या कामात शिरले होते. सूममध्ये दोघेजण दुबईला ’कॉन्स्ट्रो गल्फ’ आणि जर्मनीत ’कॉंक्रिट वल्ड’ सारखी प्रदर्शने पाहून आणि तिथल्या उत्पादकांना भेटून आले होते. चक्रे फिरत होती. आहेत ती उत्पादने विकत असतानाच नवी आघाडी उघडायची आणि भारी किमतीची व उच्च नफ्याची उत्पादने विकण्यासाठी नवी डिव्हिजन उघडायची असे प्रपोजल चेअरमनकडे गेले आणि ताबडतोब मंजूर झाले. चेअरमनचा रमणवर व्यावसायिक निर्णयाबाबतीत आणि इमानदारीच्या बाबतीत पूर्ण विश्वास होता. हे सगळं आतापर्यंत इतक्या गुप्तपणे हाताळलं गेलें, की परदेश दौऱ्याची तिकीटे देखील परस्पर चेअरमन ऑफिसमधूनच बुक झाली होती. सुरुवातीची दोन वर्षे इथे उत्पादन न करता क्रिटिकल व्हॉल्युम मिळेपर्यंत स्पेशिआलिटी प्रॉडक्टस थेट आयात करायचे ठरले.

नोबल हेड ऑफिसमध्ये एके संध्याकाळी एम डी ऑफिस मधुन सर्व सिनिअर लोकांना मेल गेली. रमणनी सोमवारी तातडीची एक्झेक्युटिव्ह कमिटी मिटिंग बोलावली होती. आता नायर हादरला. काहीतरी घडतय हे त्याला समजलं पण काही खबर लागत नव्हती. कशी लागणार? सूत्रे थेट एमडी ऑफिस मधून हालत होती, एकही पेपर बाहेर आला नव्हता. अंदाज घेतल्यावर नायर समजुन चुकला की ती बातमी इतर वरिष्ठांना तितकी कुतुहलाची वा अस्वस्थ करणारी वाटली नव्हती. म्हणजे हरामखोरांना काहीतरी माहीत होते किंवा कसली पडली नव्हती. अखेर सोमवार उजाडला. चार वाजता ऑपरेशन्स हेड, फायनान्स हेड , एच आर हेड, कंपनी सेक्रेटरी, हेड पर्चेस ऍण्ड इम्पोर्ट्स आणि नायर असे सगळे मेंबर एमडी च्या कॉन्फरन्समध्ये जमले. सेक्रेटरीने सर्वांची खबरबात घेत चहा कॉफी ची व्यवस्था केली आणि तिथुनच रमणला इंटरकॉम लावला, ’सर सगळे आले आहेत, तुम्ही येऊ शकता’. ती बाहेर पडताच नायरने नेहेमी प्रमाणे उथळ टिकेला सुरुवात केली. क्या राठीसाब? व्हॉट यु फिल ही कॉल्ड अस सडनली फॉर? ऐसा कोनसा टॉप सिक्रेट है? इसको ना काम धंदा नही है, जब देखो मिटिंग लेता है. पलिकडुन चॅटर्जीचे परस्पर उत्तर, ’नायरसाब आपके सिवा कोन जान सकता है? पावलांचा आवाज आला आणि एकदम शांतता पसरली. खास स्माईल देत, ’बसा’ अशा अर्थाने हात हलवत रमण सेठ आत शिरला. पाठोपाठ जित. नायरचे बीपी वाढायला सुरुवात झाली. धिस **** इस जस्ट अ डी जी एम; हु द ** कॉल्ड हीम हिअर? मात्र हे सगळं मनातल्या मनात. रमणच्या पुढ्यात आवाज बंद. सगळ्यांची विचारपूस झाल्यावर, किरकोळ बातचित झाल्यावर रमणने औपचारिकपणे विचारले, ’शॅल वी स्टार्ट?’. होकार अपेक्षितच होता. जित लगबगीने लॅपटॉप घेउन उठला आणि त्याने तो एलसीडी प्रोजेक्टरला जोडला. प्रेझेंटेशन संपताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या. नवा प्रकल्प, नवी उत्पादने, परदेशी सहकार्याचा नवा अनुभव, कंपनीचा वाढणारा टर्नोव्हर, होऊ घातलेला नफा सगळच अगदी सुखकारक होतं. फ़ायनान्सवाल्या राठीच्या चेहेऱ्यावरुन चतुर नायरने ओळखलं की हे याला माहित होतं, आकडे त्याच्या नजरेखालुन गेलेले होते. रमण पाण्याचा घेट घेत सर्वांना उद्देशुन म्हणाला ’आता नवीन उत्पादने चालवायची, नवे तंत्र हाताळायचे, नव्या परदेशी कंपनीशी सातत्याने संपर्कात राहायचे, नवी सेल्स टीम उभी करायची म्हणजे मोठी जबाबदारी आहे. आणि सध्या विद्यमान उत्पादन विक्री नाजूक स्थितीतून जात असल्याने मी एसेन वर अधिक भार टाकु इच्छित नाही, त्याला मार्केट्मध्ये मोठी जबाबदारी पेलायची आहे. एक क्षण थांबत रमणने जाहिर केले, ही नवी डिव्हीजन ’जित’ सांभाळेल आणि माझी खात्री आहे, जेव्हा जेव्हा वेळ पडेल तेव्हा एसेन त्याला मदत करतील. मग रमणने जितला जवळ बोलावुन हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या आणि सर्वांनी त्याचे अनुकरण केले. नायरने सुद्धा. चहा आणि सॅण्डविचेस चा स्वाद घेता घेता सगळे नव्या डिव्हिजनच्या चर्चेत रंगून गेले. राठी ,ऑपरेशन हेड चॅटर्जी, एच आर हेड विक्रम परांजपे, कंपनी सेक्रेटरी स्वामिनाथन आणि हेड - इंपोर्ट्स ऍण्ड पर्चेस मुकेश शाह या सर्वांनी जितला गराडा घातला होता. कॉन्ग्रॅट्स, गुड लक, ’अरे तुम तो छुपे रुस्तुम निकले’ असे अनेक प्रकारचे अभिवादन जित हसतमुखाने स्विकारत होता. हे सगळं कसं घडलं, कल्पना कशी सुचली, एमडींनी स्वत: पुढाकार घेतल्यामुळे काम कस वेगानं झालं, परदेशी कंपन्यांबरोबर व्यवहार करण्यात साहेबांचे कौशल्य कसे दिसले अशा गप्पा होत असताना नायर मात्र सटकला होता.

रात्री आठची वेळ. नायर विमनस्कपणे आपल्या घरात एकटाच बसला होता. बायको आणि मुलगी कोचिनला गेलेल्या होत्या. एव्हाना बातमी पसरली होती, एक एक करत चमचे घरी येत होते. ’डोंण्ट वरी सर. हेल विथ न्यु डिविजन, लेट द बगर फेल मिजरेबली ऍण्ड डिव्हिजन विल कम टु यु’ अशा अर्थाचे संभाषण होत होते. कंपनीने तुमच्या सारख्या मोठ्या, अनुभवी आणि मार्केटमध्ये नावाजलेल्या माणसाला सोडुन या नवख्या माणसावर एव्हढा विश्वास ठेवावा? तो तसाही आजकाल रमणच्या पुढे पुढे खूप करायचा. रमणला काय, हे मोठमोठी प्रेझेंटेशन दाखविणारे एम बी ए आवडतात. एक नी अनेक शेरे पेल्यागणिक उमटत होते. ही गोष्ट नायरने मनाला फारच लावुन घेतली होती. आतापर्यंत जित फक्त स्पेसिफायर सेलचा प्रमुख होता आणि नायरला रिपोर्ट करत होता. आता तो एका डिव्हीजनचा हेड झाला होता, कुणी सांगावं, कदाचित उद्या एस बी यु हेड! रमण चे मत एखाद्याविषयी एकदा बरे झाले की तो त्याला वर यायच्या संधी देतो हे नायरला पूर्णपणे ठाऊक होते. अखेर नायरने स्वत:चे सांत्वन करुन घेतले - ’बेटा जातो कुठे डीलर सपोर्टसाठी त्याला माझ्याकडेच यावे लागेल. मग तो आहे आणि मी आहे’. शोकसभा संपली, चमचे मंडळी घरी गेली तरी नायर धुमसत राहीला. त्याचा इतका मोठा अपमान कधी झाला नव्हता. आता त्याच्या जीवनाचे एकच ध्येय ठरले - जितचे अध:पतन. त्याशिवाय नायर स्वस्थ बसणार नव्हता. अपमाना व्यतिरिक्त परदेशात फुकट जायला मिळणार नाही याचे दु:खही होतेच.त्याहुन वाईट म्हणजे उद्या मार्केट मध्ये ही बातमी पसरल्यावर आपली पत कमी होणार?

जित आता झपाटला होता. विद्यमान कार्यभार आणि जोडीला नवी मोठी जबाबदारी. मान होता, बढती होती पण जबाबदारीही तितकीच मोठी होती - रमणच्या कसोटीवर उतरायची. नव्या उत्पादनांचे कॅट्लॉग, लिफलेट्स, नव्या टिमची उभारणी, ट्रेनिंग, सोर्सिंग प्लान, कॉस्टिंग एक ना अनेक आव्हाने होती. सुदैवाने प्रोजेक्ट टीम खूप सकारात्मक विचारसरणीची होती. रमणने दोन वर्षांपूर्वी स्पेसिफायर सेल चालु करतानाच त्याला सांगीतले होते की नव्या डिव्हीजनसाठी योग्य तो अनुभव आणि प्रोफईल असलेले सगळे नवे खेळाडु घे. आता टीमही उत्साहाने कामाला लागली होती. बाहेरच्या स्पर्धेबरोबरच घरात नायरला तोंड द्यायचे होते. आपल्याला तो काड्या करणार याची सर्वांना पूर्ण कल्पना होती. जर्मन कंपनीशी करार करताना त्याच इंड्स्ट्रीतल्या आणखी एका भारतिय कंपनीशी गाठ पडली होती. मात्र जितचे उत्कृष्ठ प्रेझेंटेशन आणि रमणचा आत्मविश्वास, त्याचे ज्ञान, आंतरराष्ट्रिय व्यवहारांची माहिती यावर नोबलने बाजी मारली होती. अर्थात आता खरी कसोटी होती. ठरलेल्या अटीनुसार किमान रकमेचा व्यवसाय देणे भाग होते. आणि एक दिवस दैवाने पहिल्या दोन वर्षांचे कबूल केलेले टारगेट पहिल्याच वर्षात करण्याची दुर्मिळ संधी थेट जितच्या पायाशी आणुन ठेवली. नॅशनल एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच एन ए ए आय ने भारतातल्या चौदा विमानतळांचा कायापालट करायचा प्रकल्प जाहीर केला होता. दोन वर्षे मिळुन सगळ्या विमानतळांची स्पेशॅलिटी प्रॉडक्टसची खपत बघता किमान ७०-७५ कोटींचा धंदा पक्का. आता जित आणि त्याच्या टीमला श्वास घ्यायला फुरसत नव्हती. सर्वच्या सर्व चौदा विमानतळांची खडानखडा माहिती टीम काढणार होती तर एन ए ए आय मुंबई मुख्यालयातली माहिती खणुन काढायचे काम जितने स्वत:वर घेतले होते. टेंडर कसे निघणार, खरेदी एन ए ए आय करणार की नियुक्त कंत्राटदार करणार? अटी काय? हमी किती मागितली आहे अशा व्यावहारिक बाबींसोबतच नक्की काय कशासाठी वापरणार, काय दर्जाचे उत्पादन हवे, आंतरराष्ट्रिय मानके कोणती लावणार? निकष काय असणार? प्रत्येक विमानतळाची त्या त्या हवामानानुसार बदलणारी गरज व अनुषंगिक उत्पादने काय असतील, एक ना अनेक. इथे माहिती गोळा करायची आणि जर्मन कंपनीशी संपर्क साधुन त्यांचा सल्ला घ्यायचा आणि तांत्रिक तपशिल तयार करायचा यात जित बुडुन गेला. बारकाईने अभ्यास करुन जितने असे काही स्पेक्स टाकले की जी उत्पादने फारशी कोणाकडे जशीच्या तशी नसतील. हे होत असताना एन ए ए आय च्या साहेब लोकांची रेकी सुरु होतीच. या कामावर जितने मोहन मिरचंदानीला लावले होते. तिसेक वाय असेल मोहनचे, पण माणुस हेरण्यात आणि ’लेनदेन’ची बोलणी करण्यात मोहन बाप माणुस. एन ए ए आय च्या अधिकाऱ्यांना ’चुकिचे उत्पादन वापराल तर गोत्यात याल’ असे इशारे देणारे वजा घाबरवणारे टेक्निकल प्रेझेंटेशन आर ऍण्ड डी चा जोसेफ तयार करत होता. कॉस्टिंग ची डोळे बारिक करणारी कसरत करायला अकाउंट्सची अलका इनामदार होती. जितने रमणकडे शब्द टाकुन जर्मन गोऱ्यांना ग्राहक भेटींसाठी इथे आणायच्या खर्चाची मंजुरी घेतली होती. थोडक्यात जितने आपली कोअर टिम व्यवस्थित बांधली होती. अखेर ही सगळी मेहनत कामाला आली आणि प्रसिद्ध झालेल्या टेण्डरमध्ये फक्त दोनच नावे होती. नोबल आणि लॅम्बर्ट. बाकी सगळे साफ. आता फिल्डिंग लावायची होती ती एन ए ए आय परचेस कमिटी मध्ये. काम कठिण होते आणि भरवसा अजिबात ठेवता येणार नव्हता. अखेर सगळे बारिक सारिक मुद्दे लक्षात घेत, जमेल तिथे काट्छाट करत कॉस्टिंग तयार झाले आणि ठरलेल्या मुदतित टेण्डर फॉर्म एन ए ए आय च्या पेटीत पडला.

केवळ जितचंच नव्हे तर नोबलचं नशिब बदलणारं टेण्डर आता बंदिस्त झालं होतं. अखेर टेण्डर उघडायचा दिवस उजाडला. एन ए ए आयच्या कचेरीत छातीचे ठोके मोजत जित आणि राठीसाहेब बसले होते. समोर लॅम्बर्ट वाले होते. एन ए ए आयच्या उच्चाधिकाऱ्याने सगळे नियम , अटी, स्पेक्स वगैरे सविस्तर बोलुन निर्णय जाहिर केला. टेण्डर लॅम्बर्ट्ला गेले होते. फक्त नऊ लाख बाविस हजाराच्या फरकाने.

नोबलच्या मुख्यालयात एक प्रचंड अस्वस्थता पासरली होती. हार जीत ठिक आहे, पण अवघ्या एक दशांश टक्क्याने समोरचा आपल्या अथक मेहनतीवर पाणी फिरवुन जातो हे सहन होण्यासारखे नव्हते. नायर खुष. हळुच नायरने आपल्या चमच्यांना कामाला लावले. स्वत: अगदी गंभीरपणे जितशी चर्चा केली, पाठोपाठ राठींकडे गेला. ’राठी साहेब, मला कसलही महत्व नकोय, मला कंपनीने गेली २५ वर्षे खूप काही दिलं. पण या कंपनीचं मिठ खालाय म्हणुन राहवत नाही. अहो मला जर या मुलाने विश्वासात घेतलं असतं, माझा सल्ला घेतला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. आता बघा हातातली संधी गेली आणि कंपनीचं नुकसान झालं’. तिकडे नायरच्या चमच्यांनी हळुच पसरवायला सुरुवात केली ’इतक्या थीन मार्जिनने कसं गेलं? समोरच्याला नक्की आपल्या फिगर्स माहित होत्या. कोण जाणे कोणी बेईमानी केली.’ टेण्डर गेलं ते गेलं वर ही बदनामी जितला असह्य झाली. रमण चार दिवसांसाठी यु के ला गेला होता. जितने मनोमन ठरवलं. रमण आला की सरळ पेपर टाकायचा. बास झालं. नायर इकडे वरकरणी चेहरा लांब करुन बसला असला तरी आतुन त्याला उकळ्या फुटत होत्या. अखेर हा घाटी आपल्या मार्गातुन दूर होणार. पुन्हा एकदा रमण नायरवर विश्वास टाकणार. रमणची सगळीच टीम पार कोसळली होती. एक अविश्वासाचं वातावरण तयार झालं होतं. जित सगळ्यांना धीर देत होता. ’माझा कुणावरही संशय नाही. ऍज बिझिनेस हेड आय टेक टोटल रिस्पॉन्सिबिलीटी’. तरीही प्रश्न अनुत्तरीत होता. माहिती बाहेर गेली कशी? एखाद्याला कुणाचा पीसी टॅप करताही येइल पण ते लॅम्बर्टला द्यायला तिथे कुणाचा कॉण्टॅक्ट आहे वा झाला? मोठे अमिष दाखवुन कुणीतरी माहिती मिळवली खरी. भरीत भर म्हणजे कचेरीत नायरने प्लॅन केल्याप्रमाणे कुजबुज सुरु झाली. ’हल्ली कुणाचाच भरवसा देता येत नाही. समजा टेण्डर मिळाल असतं तर फार तर फार एक प्रमोशन मिळालं असतं, पण फिगर फोडायचे एक रकमी रोख वर त्या कंपनिच्या दुबई ऑफिसमध्ये मोठी पोस्ट!’ कुणी विश्वास ठेवेल की नाही हा वेगळा प्रश्न पण ही भयानक बदनामी जितला सहन होत नव्हती. तो शुक्रवारचा दिवस होता. शनिवार रविवार सुटी. रमण रविवारी संध्याकाळी परत येणार होता. म्हणजे सोमवारी ऑफिस मध्ये. आला की सरळ पेपर द्यायचा. जित हताशपणे बाहेर पडला. बायको माहेरी गेलेली होती. घरी सोलापूरला जायचा मूड नव्हता.तो पाय नेतील तिथे भरकटत निघाला.

सोमवार उजाडला. जितही नेहमीप्रमाणे हजर झाला. सगळं ऑफिस सुरु झालं. तेच जरा दबलेलं वातावरण. बरोबर अकरा वाजता एम डी ऑफिसमधुन समस्त कर्मचाऱ्यांना मेल आली. ’धिस इज टू इन्फॉर्म यु दॅट अवर मिस्टर एस नायर, हेड सेल्स हॅड एक्स्प्रेस्ड हिज डिझायर टु रिझाईन फॉर पर्स्युईंग हीज ओन इंट्रेस्ट्स ऍण्ड ऍकॉर्डिंगली ही हॅज बीन रिलिव्ड विथ इम्मिजिएट ईफेक्ट. मि. अभिजित कुलकर्णी, हेड - स्पेसिफायर सेल्स ऍण्ड स्पेश्यालिटी प्रॉडक्टस डिव्हिजन विल टेक चार्ज ऑफ रिटेल सेल्स इन ऍडिशन टू हिज करंट रिस्पॉन्सिबिलीटीज’. सर्वत्र प्रचंड खळबळ. शुक्रवारी संध्याकाळी ऐकलं ते खरं की आज मेलवर आलय ते खरं? कुणाला काही समजत नव्हतं. जितची टीम त्याला शोधायला आली तर तो रमणकडे गेलेला. लगेचच सर्व एक्स कॉम सदस्यांना तातडीच्या एक्स कॉम मिटिंगचा निरोप आला. रमणनं सर्वांना स्थानापन्न होण्याची खूण केली. ’लोकहो, दीर्घकाळ इथे सेवा केलेल्या नायरला अशा पद्धतीने तडकाफडकी जावे लागेल असे मलाही वाटले नव्हते. केवळ त्याचं वय आणि एकेकाळी त्याने नोबलची केलेली सेवा यामुळे कंपनी त्याच्यावर खटला भरणार नाही, त्याने स्वखुशीने जावे असा मार्ग त्याला देण्यात आला. ते टेण्डर नायरनेच लिक केले होते. केवळ पैसा हवा म्हणुन नव्हे तर जित बरबाद व्हावा म्हणुन. आय मस्ट ऍप्रिशिएट द वे जित हॅण्डल्ड द होल मॅटर. लेट अस विश गुड लक टू जित.

बाहेर येताच जितला त्याच्या टीमनं गराडा घातला. बॉस, हे सगळं काय आहे? हा चमत्कार कसा घडला? नायर अचानक रिझाईन करतो आणि कंपनी तडकाफडकी त्याला रिलिव्ह करते, हे सगळं डोक्यापलिकडचं आहे. आणि हो आता आम्हाला एक जंगी पार्टी हवी आहे. ’डन’. जित हसत हसत म्हणाला. आज संध्याकाळी आपण कॉकटेल आणि डिनरला भेटतोय! माफ करा, पण मला आता रमण साहेबांबरोबर मिटिंगला बाहेर जायचे आहे. संध्याकाळी सगळं समजेलच, तुम्ही हॉटेल ठरवा आणि मला एसेमेस करा. जित गेला खरा पण टीमला कुतुहल अनावर होत होतं. परवा हताश झालेला, बदनाम झालेला आपला लाडका बॉस आज अचानक हीरो बनतो काय, त्याला पाण्यात बघणारा नायर एका क्षणात दूर होतो काय आणि जित एकदम टॉपवर नियुक्त होतो काय. खळबळ तर आख्ख्या ऑफिसमध्ये माजली होती. इकडे जितची टीम आनंदात होती तर नायरच्या पित्त्यांचे धाबे दणाणले होते. एव्हढ्या मोठ्या पोझिशनचा आपला बॉस जर चुट्कीसरशी बाहेर होतो, मग आपले काय? नायरचा फोनही स्विच ऑफ. जितच्या टीमने जितच्या संध्याकाळच्या पार्टीचा तमाम बंदोबस्त चोख केला.आनंद होताच पण उत्सुकता अधिक होती. बरोबर सहाला मोजकी मंडळी बाहेर पडली ती थेट हॉटेल सी व्ह्यु च्या सी फेसिंग लॉनवर. दाट शोभिवंत झाडीचे कुंपण, पलिकडे समुद्राची गाज, मुंबईत असे निवांत एकांत देणारे ठिकाण शोधुन मिळाले नसते. आता धीर धरणे कठिण झाले होते. कधी एकदा जित येतोय असे सर्वांना झाले होते. आणि जितने प्रवेश केला. आत येताच त्याने आपल्या सहकाऱ्यांना आलिंगन दिले. ’जित सर’ असा मोठा आवाज मागुन आला. जित वळला आणि सामंतने नेमका क्षण पकडुन त्याच्यावर शॅंपेनचा फवारा मारला. धडाधड ग्लासेस भरले गेले आणि चिअर्स चा जल्लोष झाला. जितने हात वर करुन सगळ्यांना बसून घ्यायची विनंती केली. सगळं कोंडाळं जित भोवती जमलं. ’बॉस, अब और मत खिचो, ये सस्पेन्स बरदाश्त नही होता है. जल्दी बताओ ये मिरॅकल हुआ कैसे?’. ’सांगतो’. हातातला ग्लास ठेवत जितने दोन बोटे वर केली आणि कुणीतरी ताबडतोब बोटात सिगरेट अलगद ठेवली. एक दमदार झुरका घेत मनसोक्त धूर सोडत जित सुरू झाला. लोकांनी कान टवकारले.

’त्या शुक्रवारी मी अत्यंत विमनस्क स्थितीत बाहेर पडलो. घरी तसेही कुणी नव्हतेच. घरी जायची ओढ नव्हती. मी गाडी कंपनीतच ठेवली, चालवायची अजिबात इच्छा नव्हती. पाय नेतील तसा भरकटत मी चाललो होतो. चालत चालत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला समांतर सर्विस रोडवर चालत असताना एक गाडी माझ्या अगदी जवळ खड्डा चुकवत, मला हॉर्न देत खूप स्लो झाली, जरा पुढे गेली आणि थांबली. मी गाडीजवळ जाताच मागची काच खाली सरकली आणि हाक आली, ’अभ्या’! कॉलेज संपल्यावर आणि तेही मुंबईत मला या नावाने असं हाक मारणारं कुणीच नव्हतं. काचेतून एक डोकं बाहेर आलं आणि नकळत मी म्हणालो ’अन्या?’. तो अन्याच होता. अन्या मुकादम. कॉलेज ग्रुपच्या भाषेत ’आचरट अन्या’.

’काय रे हे? बघतोस कुठे, चालतोस कुठे अरे आहेस कुठे?’ मी गप्पच. अन्याने ओळखलं, काहीतरी गडबड आहे. त्यानं नको म्हणत असताना मला गाडीत बसवलं आणि आम्ही निघालो. अन्यानं बराच वेळ मला काहीही विचारलं नाही. गाडी बहुधा मढला आली असावी. गाडी पर्ल इंटरनॅशनल या नव्यानेच झालेल्या अलिशान हॉटेलच्या पोर्चमध्ये शिरली आणि स्टाफने कडक सलामी दिली. अन्या मला घेऊन उतरला. अन्या तिथे कुणीतरी बडा असावा. लोक सर सर करत होते. अन्या तिथे खरोखरच मोठ्या पदावर होता. मालकाचा उजवा हात. एकुण मालका खालोखाल त्याचा मान असावा. अन्या मला एका छोट्याश्या मिटिंग रूममध्ये घेउन गेला. पाठोपाठ बेरा थंडगार बिअर, स्नॅक्स आणि मग्ज घेउन आला. ’आता आम्ही महत्वाच्या कामात आहोत. डोन्ट डिस्टर्ब. बोलावल्याशिवाय कुणी येउ नका.’ अदबीने यस सर म्हणत बेरा गेला. अन्याने दुसऱ्य वर्षीच कॉलेज सोडले होते. अनेक वर्षे तो कुठे होता कुणाला माहित नव्हते. ’मी इथे जी एम आहे. जी एम नावाला, मी इथले सगळे व्यवहार बघतो आणि सहीसुद्धा माझी चालते. शेठचा आपल्यावर विश्वास आहे. बर मी कुठे गेलो, काय केलं ते सोड. आज इथे तुझ्यापुढे आहे हे खरं. चल, आता तु बोल. काय लोचा आहे? काही गडबड? कुणाची धमकी? असेल तर बोल, घाबरु नको, आपण कुणालाही उचलु शकतो. अन्याने ग्लास भरले. मी त्याला सर्व हकिकत सांगितली. ’सोड रे. असे हरामखोर भेटतात’ पण तुझ्या बॉसचा तुझ्यावर भरवसा आहे तर तु का टेन्शन घेतोस? एनी वे. आधी रिलॅक्स हो. गप्पा मारता मारता अन्याने सांगितलं ’आज तु माझा गेस्ट. मस्त पिऊ आणि जुन्या आठवणी काढत गप्पा मारु. रात्र आपलीच आहे. उद्या सकाळी घरी सोडतो; तसही तुझ्या घरी कुणी नाहीये ना?". अचानक कुणाचातरी फोन आला आणि अन्या गंभीर झाला.’एक्स्क्यूज मी’ असं म्हणत अन्या घाईघाईने बाहेर गेला आणि जवळ जवळ १० मिनीटांनी परत आला. ’सॉरी यार. सालं निवांत बसाणं नशिबातच नाही. मला जायला हवय, तातडीने निघायला हवं. मात्र आज तू इथच राहणार आहेस. माझा रॉयल गेस्ट म्हणुन. अन्याने इंटरकॉमवर काहीतरी सांगितलं आणि एक सुटातला तरुण हॉटेलचा लोगो असलेल्या पेपरकेस मध्ये ठेवलेलं स्वाईप कार्ड घेउन आला. ’चल’. अन्या मला घेऊन निघाला. लिफ्ट मधे शिरताच अन्याने ते स्वाईप कार्ड आकडे लिहिलेल्या पॅनेलवर धरले आणि हिरवा दिवा लुकलुकला. ’पब्लिक एंट्री फक्त ३० मजल्यांपर्यंत. वर जायच तर हे ऍक्सेस कार्ड असाव लागतं.’ लिफ्ट थांबली आणि आम्ही बाहेर आलो. पाय रुतणारे अलिशान कार्पेट अन्थरले होते. कुणाचा वावर मात्र दिसत नव्हता. ’हा फ्लोर एकदम म्हणजे एकदम खास’. इथे व्हि आय पी कपल्स तरी येतात नाहीतर माझा शेठ वा त्याचे खास गेस्ट! येस्स! दचकू नकोस, शेठ सध्या परदेशी आहे आणि त्याच्या स्वीट्मध्ये आज तू राहणार आहेस. सॉरी मित्रा, असे अचानक इतक्या वर्षांनी भेटलो पण गप्पांचा योग नव्हता. चल. तू आराम कर, मी निघतो. सकाळी उठलास की तयार हो, गाडी तयार असेल. चल भेटू पुन्हा.’ अन्या परत लिफ़्टकडे निघुन गेला. मी एकटाच त्या अलिशान स्वीट्मध्ये शिरलो.

जित ने मोठा घुटका घेतला आणि त्याने पुन्हा एक सिगारेट शिलगावली. तो काही सेकंदांचा खंड देखिल टीमला सहन होत नव्हता. दोन झुरके घेउन राख झटकत जित पुन्हा सुरू झाला...

’मी आत आलो आणि पाठोपाठ फोन किणकिणला. पलिकडून मंजुळ आवाजात जेवण खाणाची विचारणा झाली. टेण्डरचा विचका आणि मग अन्याची भेट या दोन धक्क्यांतून मी सावरलो नव्हतो. खायची इच्छा नव्ह्ती. काहीच नको म्हणताना पलिकडून आवाज आला ’ मिनी बार फुल आहे, स्नॅक्स आहेत आणि कधीही काहीही लागलं तर या पांढऱ्या फोनचा रिसिव्हर फक्त उचला, आम्ही हजर असू.’

तो स्वीट कसला, तो तर एखाद्या अरेबियन नाईट्स सारख्या कथेत शोभेल असा अलिशान महाल होता. सर्वत्र मंद प्रकाश आणि पुसटसा पण प्रसन्न करणारा सुगंध. बघणाऱ्याचे डोळे दिपावेत असाच सगळा प्रकार होता. अत्यंत कलात्मकतेने तो स्वीट सजवला होता. अगदी क्रिस्टलच्या झुंबरांपासुन ते पुरुषभर उंचीच्या चिनी रांजणांपर्यंत आणि लेदर सिट्सच्या गुबगुबीत इटालियन सोफ्यांपासुन ते पर्शियन कार्पेट्स पर्यंत. आत शिरताच समोर विस्तिर्ण अशी बैठक व्यवस्था. अगदी समोर किमान १२-१५ फूट रुंद आणि अलिशान पडद्यांआड लपलेली खिडकी. पावलं नकळत समुद्र बघायला खिडकीकडे वळली. खिडकीचे पडदे सरकवायला मी पडदा हलक्या हाताने सरकावणार इतक्यात गुइइइं असा सूक्ष्म आवाज करत पडदे आपोआप दुभंगले आणि आतले तलम जाळीदार पडदे दिसले. समोर अथांग सागर पसरला होता. उजव्या हाताला दूरवर मुम्बईतले दिवे लुकलुकत होते. एका भिंतीवर शेल्फमध्ये मोजकी पुस्तके आणि मासिके होती तर दुसऱ्या हाताला म्युझिक सिस्टिम. स्पिकर्स अदृश्य होते हे सांगायलाच नको. शेल्फच्या मधोमध स्वच्छ पांढरा पडदा होता, खाली दोन तीन रिमोट पडले होते. मी पडद्याकडे पाहत माझ्या डाव्या खांद्यावरुन वर पाहिले. माझा अंदाज बरोबर होता. वर लाकडी पॅनेल आड एक एल सी डी प्रोजेक्टर लपला होता, आपले भिंग पडद्यावर रोखलेला.’

हातातली सिगारेट एव्हाना राखेची कांडी झाली होती. एक मोठा घोट घेत जित थांबला. पेले रिकामे होत होते, मात्र पार्टीचा जल्लोष अजिबात नव्हता. हॉटेलचा स्टाफ देखिल चकित झाला होता. बरोबरच आहे. सगळे कानात प्राण आणुन जितला ऐकत होते. तो खंड सहन न होत मोहन ओरडला, ’बॉस, क्यु तडपा रहे हो. प्लिज कम टु द स्टोरी, आपका पिक्चर दूर, साला न्यूज डॉक्युमेंटरीही अभी खतम नही हो रहा!’ सगळ्यांनी माना हलवल्या, जणु प्रत्येकाच्या मनात तेच होते.जितने ग्लास संपवला आणि कथा पुढे सुरू झाली.

मी बघत होतो त्याच बाजुला टोकाला दरवाजा होता, आणि पुढे कॉरिडॉर, तो उघडत होता शयनगृहात. बरोबर समोरच्या बाजुला स्टडी होती. संगणकासकट अगदी सुसज्ज. सहा जणांना एकत्र बसून काम व चर्चा करता येईल असे टेबल स्ट्डी टेबल पासून थोडे दूर आणि समोर मांड्लेल्या लेदर च्या रिक्लाइनिंग चेअर्स. एव्हढ्या अवाढव्य जागेत मी एकटाच भूतासारखा वावरत होतो. डोक्यावर पराभवाचे ओझे आणि नामुष्किचा कलंक घेऊन. सरकत्या काचेच्या चिलरची काच सरकावली आणि मांडलेल्या प्रदर्शनातुन मी हनिकनची पाईंट उचलली आणि शेजारच्या मांडणीतला तलम काचेचा उभा ग्लास भरला आणि एका घोटात अर्धा केला. बराच वेळ मी खिन्न पणे समुद्राकडे एकटक बघत होतो. डोक्यातुन किरकोळ रकमेने गेलेले टेण्डर, आणि नायरने पसरवलेली बदनामीची आग हटत नव्हती. नाईलाजाने मी बेडरूमकडे वळलो. प्रचंड थकवा जाणवत होता. डोकेही सरभैर झाले होते. बेडरूम म्हटली तरी ती एखाद्या टू बी एच के सारखी प्रशस्त होती हे चार कोपऱ्यातल्या चार मंद प्रकाश देतानाही उजेड न पडु देणाऱ्या फूट लॅंपच्या प्रकाशातही जाणवत होते.. बेडच्या डेकमागे चिनी युवतींच्या झऱ्यातील स्नानाचा देखावा रंगवलेलं तलम रेशमी चित्र होतं. का कुणास ठाऊक, मला ते चित्र मागुन प्रकाशमान केले असावे असे वाटले. बेडला वळसा घालुन मी मागच्या बाजुला गेलो. बेड आणि भिंत यात चांगले चार एक फुटाचे अंतर होते. मी चित्राच्या जरा जवळ गेलो आणि पुन्हा एकदा आधी खिडकीच्या बाबतीत झाले तसेच झाले. चित्राच्या तळाच्या गोल आडव्या दांडीभोवती गुंडाळत चित्र आपोआप वर जाउ लागले पडदा वर जाऊ लागताच मागे जे काही दिसले त्यामुळे मी नखशिखांत हादरलो. चित्रापाठी अगदी चिकटूना चित्राच्याच आकाराची भली मोठी काच होती. डोक्यात झण्णकन दिवा पेटला - टू वे मिरर! बाप रे! मला लख्कन अन्याचे शब्द आठवले. ’हा मजला स्पेशल आहे. इथे जनरल गेस्ट्ना एंट्री नाही. एकतर व्ही आय पी कपल्स नाहीतर खासे स्वीट्स! ओ माय माय - म्हणजे ह्या खाजगी स्वीटमधून आजुबाजुच्या काही खोल्यांमधले सगळे काही दिसणार होते. बेडरूममधील काचेतुन पलिकडे मंद प्रकाश दिसत होता. गेस्ट नसावेत किंवा झोपले असावेत. मी पुरता हादरलो होतो. समोर वॉल पॅनेलवर २१ तापमान दिसत असतानाही माझ्या कपाळावर पुसटसे घर्मबिंदु जमले होते. सगळं आकलनाच्या पलिकडचं होतं. मला कुठेतरी वाचलेली वांद्र्याच्या एका अलिशान हॉटेलची दंतकथा आठवली. ते हॉटेल एकेकाळच्या कुख्यात तस्कराचे होते. या शौकिन इसमाने आपला स्वीट स्विमिंगपूलच्या बरोबर खाली बनवला होता आणि स्विमिंगपूलची फ्लोर रंगीत खास काचेची होती. त्या ईवल्याश्या पूलमध्ये रमणी एकांतात नि:संकोच पोहताना हा खाली आरामखुर्चित बसून त्या रमणींच्या जलक्रिडा बघायचा म्हणे. हा काहीसा तसाच प्रकार असावा. मी तडक स्टडी कम कॉन्फरन्समध्ये आलो. माझा तर्क अचूक होता. टेबलच्या पलिकडे उजव्या अंगाला भिंतीवर हातातल्या घडातली द्राक्ष खाणाऱ्या युवतीच चित्र होतं अगदी बेडरुममधल्या चित्राच्याच आकाराचं. मी चित्राच्या जवळ गेलो आणि अर्थातच चित्र आपोआप गुंडाळत वर जाउ लागलं. चित्र वर जाइल तसतसं पलिकडच्या स्वीटमधलं दृश्य अगदी स्पष्ट दिसू लागलं. आणि जे दिसलं ते पाहुन माझा डोळ्य़ांवर विश्वास बसत नव्हता. ती त्या स्वीटची बेडरूम होती. बेड समोरच आडवा पसरला होता. त्या बेडवर एक जोडपे अस्ताव्यस्त पसरले होते, ब्लॅंकेट अर्धवट अंग झाकत होते. ती स्त्री ऍंजेला होती. मी स्वत:ला अनेकदा चिमटे घेतले. ते दृश्य खरे होते. बाजुच्या छोट्या टेबलवर लॅगावुलिनची बाटली, ग्लास आणि प्लेट्स होत्या. ऍंजेलाच्या बरोबरचा तो पुरुष पलिकडच्या दिशेने तोंड करुन कुशीवर झोपल्याने पटकन ओळखता आला नाही. शिवाय ऍंजेला बऱ्यापैकी आडवी येत होती. ऍंजेला म्हणजे ऍंजेला थॉमस; नोबल केमिकल्सच्या फायनान्स हेड्ची, दिलीप राठीची सेक्रेटरी. नखरेल आणि बोल्ड कपडे घालणारी, महागडे परफ्युम्स वापरणारी आकर्षक दिसणारी ऍंजेला. ऍंजेला इथे एकटीच राहत होती, नवरा म्हणे सौदीला एका अमेरिकन ऑईल कंपनीत होता. कोणी ती रजेवर सौदीला गेल्याचे ऐकले नव्हते आणि तिचा नवरा इथे आल्याचेही. तीच ऍंजेला उत्तान अवस्थेत पसरली होती. एका पुरूषाबरोबर. आतापर्यंत ढोसलेली बिअर क्षणात उतरली होती. माझ्या घशाला कोरड पडली. टेबलवर ग्लासेस आणि मिनरल वॉटरच्या छोट्या बाटल्या होत्या. त्यातली एक गटागटा संपवुन मी परत काचेजवळ आलो. बराच वेळ मी तिच्याकडे पाहत राहीलो आणि अचानक बेडवर थोडी हालचाल झाली. ऍंजेलाच्या बरोबरचा तिच्या पलिकडे असलेला पुरुष किंचीत वळला आणि त्याने आपला डावा हात अलगदपणे ऍंजेलाच्या अंगावर सोडुन दिला. उजळ रंगाच्या त्या हातातल्या बोटावरची नवग्रहाची अंगठी माझ्या नजरेला पडली आणि तोंडुन नकळत शब्द निघाला, ’नायर! यु बास्टर्ड....’. मी किती शिव्या मोजल्या कुणास ठाऊक. आता सगळं चित्रं डोळ्यापुढे लख्ख दिसत होतं. टेण्डर चा डाटा हिच्याकडुन नायरला मिळाला होता आणि नायरकडुन लॅम्बर्टला. दुपारी टेण्डर फुटलं आणि रात्री हे सेलिब्रेशन. म्हणजे काम होताक्षणी माल पोचला होता. हरामखोर, मला आयुष्यातुन उठवायला निघाला होता; आता त्याचीच पाळी होती. मला धीर धरणं शक्य नव्हतं. रात्रीचे साडे बारा म्हणजे यु के मध्ये संध्याकाळचे सात. मी क्षणार्धात रमणला मेसेज टाकला ’टेण्डर कल्प्रिट राईट इन फ़्रंट ऑफ मी, ऍज नेकेड ऍज ट्रुथ. दुसऱ्या मिनिटाला रमणचा कॉल आला -’जित, टेक इट इझी. आर यु ऑलराईट? प्लीज काम डाऊन’. ’नो सर, आय आय मीन इट सर!’ मी भडाभडा सगळी हकिकत सांगितली. रमण जबरदस्त हुशार माणुस. त्याने मला काही सूचना दिल्या.आता माझं सेलिब्रेशन सुरू झालं होतं. असुरी आनंदानं मी हनिकन उघडली आणि खुषीनं एक मस्त सिगरेट शिलगावली. असुरी आनंद म्हणजे काय हे मी त्या क्षणी उपभोगलं. मी फक्त सकाळ उजाडायची वाट बघत होतो. सहाला मी अन्याला फोन लावला.’सॉरी अन्या, तुला अवेळी उठवतोय’. अन्या गडबडीने उत्तरला, ’एनी प्रॉब्लेम?’. मी मोकळं ह्सलो आणि म्हणालो, ’प्रॉब्लेम संपलाय अन्या, तुझे आभार कसे मानु समजत नाहीये. आता फक्त आणखी थोडीशी मदत कर’.

आईल्ला! साला हे सिनेमात दाखवलं असतं तर विश्वास बसला नसता! जितच्या सगळ्या टीमची ऐकताना एकच प्रतिक्रिया. सगळ्यांना एकाएकी जाणवलं, आपण फक्त ढोसतोय तेही चाकणा आणि स्टार्टर्स बरोबर. आता पोटात आग पडल्ये. पटापट जेवण ऑर्डर करुन सगळे पुन्हा जित भोवती. मग बॉस तुम्ही सकाळी त्या हरामखोरांना रेड हॅण्डेड पकडलात? ’नाही’. मला त्याची गरज नव्हती.

’मी अन्याला फोनवर ते दोघेही चेक इन करतानाचे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते, भले ते वेगवेगळे आले असतील. अन्याने संध्याकाळी मला ते क्लिपिंग मेल केलं आणि आणखी एक खतरनाक बातमी दिली. ते दोघे मजा मारत होते तो टोपाज स्वीट लॅम्बर्ट च्या नावाने बुक झालेला होता. मी ते सगळं फक्त रमणलां फॉरवर्ड केलं. रविवारी संध्याकाळी रमणने परत येताच नायरला फोन लावला ’मि. नायर, उद्या मला ब्रेकफास्टला बरोबर नऊ वाजता लॅण्ड्स एण्ड ला भेट.

पुढे काय झाले ते सर्वांनाच माहित आहे.

इतक्या मोठ्या बातमीपुढे ऍंजेलाच्या राजीनाम्याची बातमी कुणाला दखल घेण्यासारखी वाटली नाही.

(सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन)

धन्यवाद

साक्षी

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

श्वास रोखून धरणारी अद्भुतरम्य कहाणी!

समीरसूर's picture

21 Oct 2014 - 3:04 pm | समीरसूर

जबरदस्त कुतुहल जागवणारी कथा! मस्त जमली आहे. वाचतांना मजा आली. :-)

'कॉर्पोरेट'मधला संदीप मेहता आठवला; बिपाशासोबत दारू पिऊन तर्र होणारा. 'त्रिशुल'मधला युनुस परवेझ पण असाच संजीव कुमारचे टेंडरचे आकडे अमिताभला पुरवणारा.

नाखु's picture

21 Oct 2014 - 3:56 pm | नाखु

वाचक (नकळत) कथेचा सहप्रवासी होतो हेच विलक्षण आहे

पुन्हा धन्यवाद.

इनिगोय's picture

22 Oct 2014 - 12:58 am | इनिगोय

कहानी पुssरी फिल्मी है! :-D

मस्त रंगवली आहे कथा. मजा आली! विशेषतः पात्रपरीचय करून देण्याची स्टाईल आवडली.

अमित खोजे's picture

22 Oct 2014 - 1:05 am | अमित खोजे

पकडून ठेवणारी कथा! मस्त सजवलित.

फक्त एकाच जाणवले. जीतला या सगळ्याचा गौप्यस्फोट योगायोगाने झाला. म्हणजे संधी अन्याच्या रूपाने चालून आली. पुढचे काम त्याने हुशारीने केलेच म्हणा. मला वाटले होते कि या षड्यंत्रामागील सूत्रधार तो स्वतः स्वतःच्या बुद्धीने शोधून काढेल.

पण तरीही, खिळवून ठेवले कथेने. मस्तच.

भाते's picture

28 Oct 2014 - 7:55 pm | भाते

काल रात्री दिड वाजता हा लेख (एका दमात) वाचुन झाला.
लेख वाचल्यावर, त्यावेळी प्रतिक्रिया द्यायचे सुध्दा त्राण उरले नव्हते.

मस्तच! यावर एखादा चित्रपट नक्कीच येऊ शकेल!
शेवटी, हे सगळे अनुभवाचे बोल!

प्रभाकर पेठकर's picture

29 Oct 2014 - 2:00 am | प्रभाकर पेठकर

सुंदर रहस्यकथा. कॉर्पोरेट जगतातील अनैतिक राजकारणं, आर्थिक गणितं आणि सरकारी टेंडर्स मिळवायच्या कॢप्त्या ह्या सर्वच गोष्टी सर्वसामान्यांच्या आकलना पलीकडच्या आणि अत्यंत विस्मयकारक असतात. त्या सर्व यतार्थपणे कथेत उतरविण्याचे लेखकाचे कसब वाखाणण्यासारखे आहे. कथा आवडली.

स्पंदना's picture

29 Oct 2014 - 4:25 am | स्पंदना

काय रंगवलाय प्लॉट!!
व्वॉव!! फन्टास्टिक.

मस्त रंगवली आहे कथा, खिळवुन ठेवते अगदी. अजुन वाचायला नक्कीच आवडेल.

पैसा's picture

31 Oct 2014 - 11:14 am | पैसा

अप्रतिम रंगवलीय कथा!

अविनाश पांढरकर's picture

7 Nov 2014 - 12:46 pm | अविनाश पांढरकर

पकडून ठेवणारी कथा!

पिलीयन रायडर's picture

7 Nov 2014 - 3:39 pm | पिलीयन रायडर

सुंदर रंगवली आहे कथा!!!!

सविता००१'s picture

9 Nov 2014 - 3:41 pm | सविता००१

कंपनी चं नाव वगळलं तर हाच नायर आमच्या हपिसात आहे की काय अस वाटतंय. सगळे गुणावगुण सेम. आणि नाव तर तेच. नायर :(