मी अन माझी बंद पडणारी ‘चालू’ यंत्रे

सस्नेह's picture
सस्नेह in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:15 pm

मी अन माझी बंद पडणारी ‘चालू’ यंत्रे

अखिल ब्रह्मांडात मला दचकावणार्‍या अन धास्ती वाटणार्‍या दोन गोष्टी आहेत. योगायोगाने दोन्ही ‘म’ने सुरु होणाऱ्या. एक, म्हैस आणि दुसरे मशीन. लहानपणी एका म्हशीने आपल्या शिंगांचा इंगा दाखवल्यापासून मी या भारदस्त प्राण्यापासून कमीतकमी दहा फूट अंतर नेहमीच राखून असते.

आणि मशीन म्हणाल तर, संगणक आणि मोबाईल ही दोन यंत्रे सोडून इतर यच्चयावत यंत्रजमात सदैव माझी फजिती करायची संधी पहात असतात. कुठलेही नवीन यंत्र दिसले की माझ्या मस्तकात अनेक घंटा खणखणू लागतात, बरेच दिवे उघडझाप करू लागतात अन काही सर्किटे ठेंगणी (शॉर्ट) होतात. म्हणून नवीन यंत्र हाताळण्याचे मला चटकन धाडस होत नाही.

पहिला परिचय झाला यंत्राशी तो शाळा नामक कोंडवाड्यात बाई नामक जेलरने दिलेल्या, गणकयंत्राच्या आद्य जंतूशी. या ‘पाटी’ नामक यंत्राचा अर्धा भाग दोन्ही बाजूंनी सपाट काळा असून उरलेल्या अर्ध्या भागास काही सळ्या जोडून त्यात, वरून सुंदर रंगीत पण आतून खवचट व दुष्ट असणारे काही मणी ओवलेले असत. रोज बाई ते मणी मोजायला सांगत. मी ते मोजू लागले, की ते बेटे एकाएकी घाईची लागल्यागत सळीच्या दुसर्‍या बाजूला पळत सुटत. मोजून होईपर्यंत थांबायला ते मुळीच तयार नसत. त्यांच्या या अचपळ वागण्यामुळे मला सारख्या बाईंच्या टपल्या खाव्या लागत. पुढे पाट्या जाऊन वह्या आल्यावरच या मण्यांच्या जाचातून सुटका झाली.

जरा मोठे होऊन कुंपणावरून बाहेर डोकावण्याइतकी डोकी पोचू लागल्यानंतर आणखी एका रम्य यंत्राशी ओळख झाली. ते म्हणजे बेल. बटन दाबल्यावर कुठेतरी काहीतरी वाजते, हा अचाट शोध लागल्यावर दुपारी बेल वाजवून पळ काढणे हा आम्हा पोराटोरांचा आवडीचा उद्योग झाला. मी अंमळ उंच असल्याने यात विशेष प्रवीण.

या डोअरबेलने एकदा चांगलाच पोपट केला. तिसर्‍या मजल्यावरच्या कौलगुडअण्णांची बेल वाजवणे आम्हाला विशेष आवडायचे. कारण दार उघडल्यावर समोर कुणीच नसलेले पाहून कौलगुडअण्णा जे काही अप्रतिम आदरार्थी, कन्नड शब्द उच्चारत, ते ऐकून आम्हाला दिवाळीचे फटाके उडाल्यासारखा आनंद होई. त्यादिवशी त्यांची बेल वाजवून आम्ही पळ काढण्यासाठी माघारी वळलो, तर साक्षात कौलगुडअण्णा समोर उभे. आमच्या दुदैवाने त्यांना त्यादिवशी बस वेळेत न मिळाल्यामुळे त्या वेळी जेवून झोपण्याऐवजी ते, कोळिष्टके काढण्याची नवीन आणलेली काठी घेऊन घराची पायरी चढत होते. मग कोळिष्टकांच्या काठीचे उद्घाटन आमच्या धुलाईने झाले, हे वेसांनल.

बेलने आणखी एकदा माझी पंचतारांकित फजिती केली होती.

शाळेत नाटक होते. रामायण. रंगमंचावर चमकण्याइतके नाट्यगुण माझ्या अंगी नसल्यामुळे मी पडद्यामागील कलाकारांमध्ये स्थान मिळवले होते. माझ्याकडे इतके महत्त्वाचे काम होते, की माझ्याशिवाय नाटक सुरूच होऊ शकत नव्हते ! ते काम म्हणजे अंकांच्या सुरुवातीला अन शेवटी घंटा वाजवणे !

नाटक सुरु झाले. पहिल्या अंकाच्या शेवटी रावण सीतेला खांद्यावर उचलून पळवून नेतो हे दृश्य होते अन तिथेच पडदा पडायचा. म्हणजे मी घंटा दिल्यावर.

आमची मुलींची शाळा असल्यामुळे रावण दहावीची एक दणकट बांध्याची मुलगी अन सीता ही सहावीतली एक नाजुकशी मुलगी झाली होती.

पहिल्या अंकातच नाटक असे रंगले, की ते बघत बघत मी अंकाच्या शेवटी घंटा वाजवायलाच विसरले. रावण सीतेचे ओझे खांद्यावर पेलत उभा. तब्बल तीन मिनिटे झाली तरी घंटा झालीच नाही. अखेर रावण, खांद्यावरच्या सीतेचे ओझे न पेलल्यामुळे सीतेसहित धरणीवर कोसळला आणि मग मी खडबडून जागी झाले. ताबडतोब घंटेचे बटन दाबले आणि सीतेला रावणासहित धरतीमातेने पोटात घेतले !

...घंटेच्या बटनाऐवजी मी तिसर्‍या अंकाच्या शेवटी सीतेला भूमाता पोटात घेते, त्यावेळी दाबायचे, फळी पाडण्याचे बटन दाबल्याने हा चमत्कार झाला असे नंतर केलेल्या संशोधनात निष्पन्न झाले !

यानंतर माझ्या जीवनात क्रांती घडवून आणणारे यंत्र हे चलत-यंत्र होते. ते म्हणजे सायकल !

मी नववीत गेल्यावर माझ्या इतर वर्गभगिनी सायकल घेऊन येऊ लागल्या. पण मी अजून सायकल शिकले नसल्याने मला ईर्षा की काय म्हणतात ते व्हायला लागले. मग मी धाकट्या भावाच्या मागे लागून त्याला, मला सायकल शिकवण्यासाठी राजी केले. त्यासाठी मला दोन कॅडबर्‍या अन कंपासमधले नवीन करटक (की कर्कट?) यांचा त्याग करावा लागला.

भावाने पहिल्या दिवशी माझ्या हातात सायकल दिली आणि सांगितले, ‘जा, कॉलनीच्या त्या टोकापर्यंत रस्त्यावरून नुसती हातात धरून फिरवून आण.’

मी दोन्ही हातात सायकलचे हँडल जाम धरले अन रस्त्याच्या मधोमध चालू लागले. पन्नासेक पावले गेल्यावर मला आढळून आले की ती सायकल, सिनेमातल्या वैट्ट वळणाच्या मुलीप्रमाणे सरळ रस्ता सोडून भलत्याच दिशेने चालत आहे. मी तिला ‘अगं, अगं..’ करून रोखण्याचा प्रयत्न केला. पण ती काही माझे ऐकेना अन सरळ रस्त्याकडेच्या गटाराच्या दिशेने पळू लागली. तिच्या बरोबर मीही त्याच दिशेने पळू लागले अन माझ्या मागून धाकटा भाऊ. अशी आमची वरात अखेर गटारात विसर्जित होणार इतक्यात एक केळेवाली मावशी, सूर्य अन जयद्रथाच्या मध्ये असलेल्या सुदर्शन चक्राप्रमाणे आमच्या अन गटाराच्या मध्ये आली आणि डोक्यावरच्या केळ्यांसहित तिचे जयद्रथाप्रमाणे पतन होऊन सर्व केळी रस्ताभर झाली. त्यानंतर दोन दिवस त्या केळ्यांवरून घसरून पडणार्‍या प्रत्येक दुचाकीस्वराचे शिव्याशाप मला लागत असल्यामुळे साहजिकच माझी सायकल-प्रगती अंमळ स्लो झाली.

..पण माझ्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आधाराने मी अखेर सायकलवर विजय मिळवलाच !

एका सु-सोमवारी मी सायकलवर स्वार होऊन वार्‍या शी स्पर्धा करीत शाळेत पोचले. शाळा सुटेपर्यंत मैत्रिणींकडून सायकलचे अन माझे कौतुक ऐकले अन शाळा सुटल्यावर सायकलवर स्वार होऊन घरी जात असताना घात झाला. समोरून धावत येणार्‍या एका बालवाडीला पाहून मी सायकल थोडी उजवीकडे वळवली. त्याच वेळी पलिकडच्या शाळेचा एक मुलगा आपल्या सायकलवरून माझ्या उजवीकडच्या समोरून येत असल्यामुळे माझी सायकल वेगाने त्याच्यावर झेपावली. मी ताबडतोब सायकलची मालकी सोडून दिली अन डोळे घट्ट मिटून घेतले. दोन सेकंदांनी दोन सायकलींचे कडाक्याचे भांडण झाल्याचा आवाज आला. त्या भांडणाचा शेवट एका मोठ्ठ्या स्फोटाच्या आवाजात झाला अन शांतता पसरली. मी डोळे उघडले तेव्हा माझा शाळूमित्र आपल्या सायकलच्या तंगडीत आपली एक तंगडी अन माझ्या सायकलच्या हँडलच्या अशक्य कोनामध्ये आपली मान देऊन सुखेनैव जमिनीवर पहुडला आहे असे मला आढळले. यानंतर बरेच दिवस आसपासच्या शाळांमधे माझ्या सायकलचा अन सायकल चालवण्याच्या कौशल्याचा दबदबा पसरला होता.

सायकलवरून भरपूर वेळा आपट्या खाल्ल्यामुळे इंधनवाल्या दुचाक्यांनी मला त्यामानाने फारसा त्रास दिला नाही. एकदोनदा भर रहदारीच्या रस्त्यावर मधेच बंद पडून मागच्या-पुढच्या वाहनधारकांचे प्रलाप माझ्या कानी मारणे अन ब्रेक मारल्यावर तो वेळेत न लागल्याने पुढच्या दुचाकीच्या शेपटाचे चुंबन घेणे, यापलीकडे त्यांची मजल गेली नाही.

यानंतर गृहिणी जीवनात अनेक गृहोपयोगी यंत्रांनी मला धुवून काढले. त्यात अग्रेसर म्हणजे वॉशिंग मशीन.

इवल्याशा पाहुण्याचे घरात आगमन झाल्यावर पहिली निकडीची गरज भासू लागली ती वॉशिंग मशीनची. पहिल्याने मी एक सेमीऑटो मशीन घेतले. काही दिवस ते सुखाने चालले. मग एकदा मी गडबडीत त्यात पाणी सोडायला विसरले. त्यादिवशी त्याने आपला इंगा दाखवला. भारत-पाक सीमेवर नित्य उडणार्‍या बंदुकांच्या फैरीसारखे आवाज त्यातून निघाले अन अखेर भारतीय जवानांच्या गोळीला बळी पडलेल्या पाक सैनिकासारखे ते एक गचका देऊन शांत झाले.

मग मी फुलऑटो मशीन आणले. आता पाणी बिणी सोडण्याची भानगड नसल्याने ते सुरु करून मी निर्धास्तपणे ऑफिसला जाऊ शकत होते. अशीच एकदा मशीन लावून अन लहानग्याला पाळणाघरातल्या मावशींच्या स्वाधीन करून मी हापिसात गेले. संध्याकाळी घरी आल्यावर मला आढळले की घरात सुमारे चार इंच खोल तळे तयार झाले असून त्यावर संसारोपयोगी वस्तूंचे नयनरम्य नौकानयन सुरु आहे! त्या तळ्याच्या उगमाचा शोध घेतल्यावर दिसून आले की मी जाताना मशीनचा ड्रेन पाईप मोरीच्या बिळात सोडायला विसरले होते.

याशिवाय एकदा मिक्सरचे झाकण मी पुरेसे घट्ट न बसवल्यामुळे किचनच्या छतावर पालकाच्या प्यूरीची जी कलाकुसर उमटली होती, तिची तुलना केवळ अजंठ्याच्या नक्षीदार घुमटांशीच होऊ शकेल. अन मावेओमध्ये मी अंडाबॉम्ब फोडला होता तेव्हा झालेल्या स्फोटात, बाहेरच्या खोलीत चहा पीत असलेल्या माझ्या नवर्‍या ने, नव्याकोर्‍या बोनचायना कपाचा बळी दिला होता.

थोडे आर्थिक स्थैर्य आल्यावर आणखी एका हुच्चभ्रू चलत-यंत्राशी संबंध आला. कार !

कार चालवायला शिकणे मला बाये हाथका खेल वाटण्याचे कारण म्हणजे एकतर चालक सुरक्षित, भक्कम अन बंदिस्त तटबंदीत बसलेला असतो. अन दुसरे म्हणजे बॅलन्सिंग अन ब्रेक दाबल्यावर पाय बाहेर काढून तो टेकण्यासाठी सुरक्षित जागा शोधणे हा प्रश्न नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता कमी. त्यामुळे मी मोठ्या उत्साहाने कार शिकण्याच्या मागे लागले. क्लच, गिअर, ब्रेक, अ‍ॅक्सीलरेटर इ. मंडळींनी ओळख होईपर्यंत जरा दमवले. विशेषत: क्लच अन गिअर यांचे तादात्म्य साधणे हे सुरुवातीला मला साधारण कुंडलिनी जागृत करण्याइतके कठीण वाटू लागले. तो क्लच बेटा, गिअर पडतो न पडतो तोच स्वस्थानी यायची इतकी प्राणांतिक धडपड करायचा की मेली गाडी बंदच पडायची सारखी.

पण सुदैवाने कुंडलिनी जागृत होण्याआधीच मला गाडी चालवता येऊ लागली.

आता त्यावर लायसन नामक शिक्कामोर्तब करणे जरुरीचे होते. त्यासाठी आरटीओ ऑफिसात जाऊन योग्य ते सोपस्कार पार पाडल्यावर एक दिवशी माझे सुकाणूकौशल्य पाहण्यासाठी मला सकाळी अकरा वाजता गावाबाहेरच्या माळावर पाचारण करण्यात आले. तिथे लावण्यात आलेल्या ‘चक्र’व्यूहाची कल्पना माझ्या चतुर वाहन-गुर्द्येवाने मला आधीच देऊन ठेवलेली होती. तो व्यूह असा.

गाडी फिरवून दाखवण्याच्या वर्तुळाकार मार्गावर मधेच एक उलट्या V सारखा, घाटाप्रमाणे चढ अन उतार भाग बनवलेला असतो. त्यावर तुम्ही गाडीसह चढू लागला, की तो दुष्ट आर्टीओ तुम्हाला ताबडतोब गाडी थांबवायला सांगतो. अन तीन मिनिटे स्टॅच्यू घातल्यासारखे थांबायला फर्मावतो. यावेळी झटकन ब्रेक दाबून नंतर दुसर्‍या पायाने त्वरित फुल्ल क्लच मारायचा, असे वाहन-गुर्द्येवांनी अगोदरच बजावून ठेवले होते.

त्याप्रमाणे मी चढ चढू लागताच थांबण्याची आज्ञा झाली. मी ताबडतोब उजवा पाय ब्रेकवर आपटला अन दोन सेकंदांनी डाव्या पायाने जीव खाऊन क्लच दाबला. तथापि उजव्या पायाने माझी थोडीशी अवज्ञा करून ब्रेकऐवजी अ‍ॅक्सीलरेटरवर जोरदार आक्रमण केले. त्यामुळे माझ्या कारने समोर दोन फुटांवर सुरु होत असलेल्या उतारावरून, हिंदी चित्रपटातल्या हीरोच्या कारप्रमाणे एक अशक्य जंप घेतली अन उतार बनवण्यासाठी वापरलेल्या फळ्यांचा दाणकन चुराडा करून, आपला वर्तुळाकार मार्ग सोडून ती वेगाने सरळ धावू लागली. त्यासरशी ‘लायसन’ मिळवायला आलेल्यांची गंमत बघायला आलेल्या आणि कडेला थांबलेल्या बघ्यांची अघोषित स्वयंस्फूर्त मॅरेथॉन सुरु झाली.

यांनतरही मला दुसर्‍या च दिवशी लायसन मिळाले, ते केवळ गुर्द्येवांची कृपा व त्यांचे आर्टीओ खात्यात असलेले वजन, यांच्यामुळे होय.

लायसन मिळाल्यानंतर माझे कार चालवण्याचे कौशल्य जरी वृद्धिंगत झाले, तरी कार रिव्हर्स घालणे हा प्रकार मला अजुनी म्हणावा तितका रुचत अन जमत नाही. खरं म्हणजे हा ‘रिव्हर्स’ नावाचा गिअर कारसारख्या प्रतिष्ठित वाहनाला असू नये असे माझे मत आहे. माघार घेण्याची नामुष्की यावी ती स्कूटर किंवा स्कूटी अशा सटरफटर किरकोळ दुचाक्यांना! कारने माघार का म्हणून घ्यावी? पण दुर्दैवाने माझे हे परखड विचार कार बनवणार्‍या एकाही कंपनीला पटत नाहीत.

तर त्या दिवशी मी नरसोबाच्या वाडीला देवदर्शनाला गेले असताना दर्शन आवरून कारकडे आल्यावर माझ्या लक्षात आले की माझ्या कारच्या नाकाला नाक लावून एक भलीथोरली स्कोडा, पाण्यात बसलेल्या म्हशीसारखी बसली आहे. तिच्या मालकाचा अर्थातच पत्ता नव्हता. आता मला कार रिव्हर्स घेणे भाग होते. मी मागे पहार्‍या साठी रस्त्यावरच्या दोघांना उभे केले अन ‘श्री गुरुदेव दत्त’ असे म्हणून रिव्हर्स गिअर टाकला. मागचे मैदान साफ असल्याने आरशात पाहून मी झटक्यात कार मागे घेतली अन ब्रेक लावणार इतक्यात ती एक हादरा बसून आपोआपच थांबली. मग मी फर्स्ट टाकून तिला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण, रस्त्यावर मधोमध बसलेल्या आणि कितीही हाकलले तरी ढिम्म न हलणार्‍या म्हशीप्रमाणे ती मुळीच जागची हलेना. मागचे लोक मघाशी जोरजोरात हातवारे करून मला काहीतरी सांगत होते, हे माझ्या आता लक्षात आले. मग मी खाली उतरून पाहिले, तर कारची मागची दोन चाके मागे असलेल्या गटारात जाऊन, शाळा चुकवून सिनेमाच्या थेटरात जाऊन बसणार्‍या चुकार मुलांसारखी अगदी फिट्ट बसली होती.

मग रस्त्यावरच्या दोघांनी आणखी दोघांना आणले अन चौघांनी मिळून कारच्या मागच्या भागाचा मोरया केला तेव्हा कुठे ती चाके पुन्हा शाळेत, नव्हे, रस्त्यावर यायला राजी झाली.

...आता तुम्ही म्हणाल इतकी जर उलथापालथ यंत्रांनी माझ्या आयुष्यात केली आहे, तर मी अभियांत्रिकीच्या वाटेला गेलेच का अन कशी ?

...तर ती एक वेगळीच कथा आहे. पण आता नाही, पुन्हा कधीतरी.

...आता सध्या मी या दिवाळीला कोणते नवीन यंत्र घरी आणायचे याचा सावध अन सुरक्षित विचार करते आहे!

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Oct 2014 - 12:25 pm | माम्लेदारचा पन्खा

यंत्रं माणसाला धार्जिणी नसतातच... ऐनवेळि तोंडघशी पाडणं हाच त्याचा प्रमुख उद्योग !

आयुर्हित's picture

21 Oct 2014 - 3:17 pm | आयुर्हित

सर्वात आवडलेले "सीतेला रावणासहित धरतीमातेने पोटात घेतले!"

दमदार व खुसखुशीत लेख!

कडेला थांबलेल्या बघ्यांची अघोषित स्वयंस्फूर्त मॅरेथॉन सुरु

अशक्य हसतीये....मस्त लेख...

एस's picture

21 Oct 2014 - 8:26 pm | एस

मॅरेथॉन कुठली? स्प्रिंटच सुरू झाली असेल सगळ्यांची... लेख नेहमीप्रमाणेच खुसखुशीत! एकदोन पंचेस वाचताना हसून हसून मरायचाच बाकी राहिलो होतो! :-D

रामपुरी's picture

22 Oct 2014 - 2:57 am | रामपुरी

पण अजूनही तुमच्या हे लक्षात आलेलं दिसत नाहीये की क्लच आणि अ‍ॅक्सलरेटर एकत्र 'दातओठ' खाउन दाबले असतील तर गाडी इंचभरही पुढे जाणार नाही. चढावर असेल तर घरंगळत मागेच जाईल. :) :)

सस्नेह's picture

22 Oct 2014 - 6:43 am | सस्नेह

नाही हो ! पहिले एक्लरेटर रेटला अन मग क्लच दाबला ना

रामपुरी's picture

23 Oct 2014 - 4:19 am | रामपुरी

मंग बराबर हाये...
पण तुमच्या तोडीची आणखी किमान एक वाहनचालक मला माहीती आहे. आमचे कुटुंब. तिने रिवर्स घेताना ब्रेक च्या ऐवजी अ‍ॅक्सलरेटर दाबला आणि गाडी मागच्या फूटपाथवर नेऊन लावली होती.

वेल्लाभट's picture

22 Oct 2014 - 11:55 am | वेल्लाभट

हाहहाहाहाहा जबरदस्त. भलतेच मजेशीर किस्से आहेत ! गाडीचा किस्सा डोळ्यासमोर उभा राहिला.... ऑफिसमधे एकटाच हसलो मी :)

सही लिहिलंयत! क्लास. मजा आली.

स्वीत स्वाति's picture

17 Apr 2015 - 11:27 am | स्वीत स्वाति

लेख अप्रतिम ..
वर्णन तर तंतोतंत … मस्त च

मधुरा देशपांडे's picture

22 Oct 2014 - 12:54 pm | मधुरा देशपांडे

स्नेहाताईचा लेख म्हणजे ऑफिसमध्ये वाचायचा नाही असे स्वतःला बजावले होते. नाहीतर काय वेड्यासारखी हसतेय ही अशा नजरेने बघतात आजुबाजुचे. पण तरिही राहवले नाहीच आणि वाचलाच. नेहमीप्रमाणेच खूप आवडला. सगळेच किस्से जबराट आणि ते तेवढेच मस्त लिहिलेस.

कंजूस's picture

22 Oct 2014 - 3:24 pm | कंजूस

खरं आहे काहींना यंत्रे धार्जिणी नसतात यांच्या हातात आली की त्यांची यंत्रणा ठेंगणी होते. अभियांत्रिकीला शेवटच्या वर्षी तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळाले असेल"यांच्या हातात कोणतेही यंत्र देऊ नका"ते फार च थोड्यांना मिळते आणि हल्ली प्रमाणपत्र किती आवश्यक आहे हे सर्वच जाणतात.

कपिलमुनी's picture

22 Oct 2014 - 3:58 pm | कपिलमुनी

जबरदस्त हसतोय ..

तो अंडाबाँब मी सुद्धा फोडला होता .

चौकटराजा's picture

22 Oct 2014 - 4:37 pm | चौकटराजा

स्नेहाजी पुरोगामी म्हाराष्ट्राच्या खर्‍या पाईक आहेत. तेंचा त्याकारनास्तव " रिवर घेर" ला इरोध हाय !
लेख पी येल स्टाईलचा झाला आहे ! मस्त !

स्वाती दिनेश's picture

22 Oct 2014 - 10:44 pm | स्वाती दिनेश

अगदी मस्त..
(अवांतर-बर्‍याच ठिकाणी स्वतःचे प्रतिबिंब दिसले.. मशिने आणि मी यांचेही असेच 'प्रेमाचे' नाते आहे)
स्वाती

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Oct 2014 - 11:09 pm | लॉरी टांगटूंगकर

अतिकमाल!!! लेख कहर जमलाय!

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Oct 2014 - 11:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

खी...खी...खी... ! *lol*

सखी's picture

23 Oct 2014 - 12:26 am | सखी

मस्त गं स्नेहांकिता, धरणीमातेचा आणि रिव्हर्स’ नावाचा गिअर कारसारख्या प्रतिष्ठित वाहनाला असू नये वाचुन डोळ्यात पाणी यायचेच राहीले होते.
तर अभियांत्रिकीच्या वाटेला कशी गेली तेही वाचायला आवडेल :)

पैसा's picture

23 Oct 2014 - 11:22 am | पैसा

हसून मेले अगदी!

दिपक.कुवेत's picture

26 Oct 2014 - 7:19 pm | दिपक.कुवेत

तु लिहिलेला एकेक किस्सा म्हणजे बाँम्ब आहे बाँम्ब.

स्पंदना's picture

27 Oct 2014 - 5:58 am | स्पंदना

देवा!
प्रत्येक वाक्य डोळ्यासमोर काही ना काही चित्र उभं करुन जातं, अगदी कर्कटक सुद्धा!!

मस्ताड!! तीन्ताड!!!

यांत्रिक कसरती आणि लेखातल्या शाब्दिक करामती दोन्ही खुसखुशीत जमल्यात. तू अन् मी अगदी इंचपिंच गं स्नेहा, गाडी घेऊन एकटीच अगदी पहिल्यांदा बाहेर पडले तेव्हा हँडब्रेक लावून जोशात कार चालवल्याची आठवण जागी झाली...

राजेश घासकडवी's picture

28 Oct 2014 - 8:26 am | राजेश घासकडवी

मस्त खुसखुशीत लेखन.

प्रभाकर पेठकर's picture

28 Oct 2014 - 1:27 pm | प्रभाकर पेठकर

छान विनोदी अनुभवकथन.

यंत्रे हाताळताना, पुरुषांच्या बाबतीत एव्हढे दुर्धर प्रसंग येत नाही हे खरे असले तरी माझ्या एका मित्राने आयुष्यात प्रथमच स्कूटर चालवायचा प्रयत्न(?) केला होता तो प्रसंग आठवला. साहेब स्कूटरवर बसले. इंजिन सुरु केले. एक्स्लेटर, क्लच आणि ब्रेकचे नातेसंबंध समजून घेतले आणि 'हं चालव आता' असे कोणीतरी म्हंटल्याचे त्याने शेवटचे ऐकले होते. डोळे उघडले तेंव्हा बाजूच्या गटारातून त्याला दोघे-तिघे (आपले कपडे खराब होणारा नाहित अशा बेताने) बाहेर काढायचा प्रयत्न करीत होते. त्याची मैत्रीण चिंताग्रस्त चेहर्‍याने, गटारातल्या वाहत्या पाण्याने लडबडलेल्या, मित्राकडे पाहात होती. आणि सख्खे मित्र हर्षवायूने जमिनीवर फक्त गडबडा लोळायचे बाकी होते.

कुसुमावती's picture

28 Oct 2014 - 6:07 pm | कुसुमावती

एकेक यंत्राचा किस्सा कहर आहे.

अनन्न्या's picture

28 Oct 2014 - 6:18 pm | अनन्न्या

हहपुवा......

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Oct 2014 - 10:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त... आवडला लेख.

खरं म्हणजे हा ‘रिव्हर्स’ नावाचा गिअर कारसारख्या प्रतिष्ठित वाहनाला असू नये असे माझे मत आहे.

एक नंबर विचार आहे हा!

जबरदस्त लिहिता हो तुम्ही !!!

अंडा बॉम्ब फुटतो हे माहित होतं म्हणून तसा डायरेक्ट फोडला नाही कधी पण एकदा उकडलेलं अंड दोन भाग करून गरम करायला गेले आणि सत्यानाश झाला…. बॉम्ब ऐवजी लक्ष्मी तोटा वगैरे फुटला एवढंच समाधान.

आतिवास's picture

30 Oct 2014 - 3:54 pm | आतिवास

स्नेहांकिता शैलीतला खुसखुशीत लेख.
आवडला.

सानिकास्वप्निल's picture

2 Nov 2014 - 7:43 pm | सानिकास्वप्निल

लेख वाचून हहपुवा

चाणक्य's picture

2 Nov 2014 - 8:04 pm | चाणक्य

मस्त. आवडला लेख

जुइ's picture

3 Nov 2014 - 12:16 am | जुइ

:) बर्‍याच गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या!!

सविता००१'s picture

3 Nov 2014 - 12:39 am | सविता००१

स्नेहा, मेले हसून. आता अभियांत्रिकीला कशी गेलीस ते पण लिही गं पटकन...
:)

श्रीरंग_जोशी's picture

3 Nov 2014 - 4:18 am | श्रीरंग_जोशी

एकदम खुसखुशित. मजा आली वाचताना. सायकल शिकत असताना माझेही थोडे असेच अनुभव आहेत.

साहिच्च .. डोळ्यासमोर चित्र उभे झाले agadi....

योगेश आलेकरी's picture

5 Nov 2014 - 11:45 am | योगेश आलेकरी

काय वर्णावा महिमा या विनोदी लेखाचा ...