ग्रंथसखा -श्याम जोशी

अजया's picture
अजया in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:18 am

लहान असताना मी एक स्वप्न पाहिलं होतं, सर्व बाजूनी पुस्तकांनी भरलेल्या घरात मी राहते आहे. अभ्यास नाही, तहान भूक नाही. फक्त पुस्तकं आणि मी. पहाटे पडलं होतं का काय माहिती नाही पण ते स्वप्न मी प्रत्यक्षात अवतीर्ण झालेलं पाहिलं, आमच्या बदलापूरच्या ग्रंथसखा ग्रंथालयात, वाचन संस्कृतीच्या माहेरी, माझ्या माहेरी, माझ्या काकामुळे .

बदलापूरभूषण श्याम जोशी सर हे बदलपूरातलं चिरपरिचीत नाव. जोशी सर म्हणजे मराठी साहित्याचा चालताबोलता ज्ञानकोश! जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तकं पोचली पाहिजेत्, वाचली गेली पाहिजेत्, बदलापूरासारख्या ठिकाणी संदर्भ ग्रंथ उपलब्ध झाले पाहिजेत या वेडाने झपाट्लेला हा माणूस.

सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधुन टेक्सटाइल डिझाइनींगची पदवी घेतल्यानंतर शिक्षकी पेशा स्विकारला. काका अत्यंत विद्यर्थीप्रिय शिक्षक ! त्याबरोबरच गोनिदांच्या सहवासात दुर्गभ्रमंती, इंटीरीयर डिझाइनींग्, फोटोग्राफी, ग्रंथ संकलन असे अनेक छंद. वाचनवेड तर रक्तातच होतं. आमचे आजोबा साने गुरुजींच्या सान्निध्यात राहिलेले, त्यांच्या विचार प्रभावातले. त्यांच्या खोलीत भिंत भरून ग्रंथसंपदा होती. आम्ही घरात कायम वाचणारी माणसंच पाहिली! त्यांचा मुलगा ग्रंथवेडा झाला यात काहीच आश्चर्य नाही! पण त्याने हे वेड खूप पुढे नेण्याचं स्वप्न पाहिलं. आणि २१ मार्च २००५ च्या मुहुर्तावर ग्रंथसखाची सुरुवात झाली. का तर सर्वांपर्यंत वाचनाचा आनंद जावा, पुस्तकं नुसती पाहायला नाही तर हाताळा, वाचा, विचार करा या हेतुने!

काकाला ग्रंथसखा हे नुसतं वाचनालय म्हणून अभिप्रेत नाही. त्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत अखंड भ्रमंती करुन जमा केलेली ही ग्रंथसंपदा लोकांपर्यंत पोचवणारा दुवा असावा असं वाटतं. त्यामुळे इथे नेहेमीच्याच फीमध्ये कोणतेही ग्रंथ्, पुस्तकं वाचता येतात्, डिपॉझिटच्या आडकाठ्याना इथे जागा नाही. लोकाना हवे ते पुस्तक हातात आणून देण्याची तळमळ असणारा इथला कर्मचारी वर्ग आहे. सध्या ग्रंथसखामध्ये पन्नास हजाराहून जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत. दहा हजार दुर्मिळ पुस्तकं, मासिकं. मराठीतलं पहिलं प्रकाशित झालेलं मासिक सुद्धा या संग्रहात आहे.

.

‘वाचावे काय- का आणि कसे’ ही तर ‘ग्रंथसखा’ची तळ्मळ. काका आणि त्यांच्या सहकार्‍यांनी निवडक पंधराशे पुस्तकांची ग्रंथसूची आपल्या सभासदांसाठी उपलब्ध केली आहे. या निवडक पुस्तकांचा वाचनालयात स्वतंत्र कक्ष आहे. साहित्याचा अभ्यास करणार्‍या व्यक्तीला कोणताही ग्रंथ उपलब्ध व्हावा व वाचनालयात बसून त्याचा अभ्यास करता यावा म्हणून अभ्यासिकेचीही सोय आहे. वाचनालयाला शेषराव मोरे, गिरीश कुबेर, संजय भास्कर जोशी, भानू काळे, गंगाधर गाडगीळ, शंकर वैद्य, मंगेश पाडगावकर, प्रवीण दवणे, अनिल अवचट, अनंत सामंत, सुधीर मोघे, सुभाष भेंडे, फैय्याज अशा मान्यवर साहित्यिक-कलावंतांनी भेटी दिल्या आहेत. या बरोबरच इथे श्रवणशाळा, पालकशाळा, काव्यसंध्या, वातानुकुलित अभ्यासिका, कै. रवींद्र पिंगे कलादालन इत्यादी उपक्रमांचे आयोजन करून आपला वेगळा ठसा साहित्यिक व सांस्कृतिक जीवनावर उमटवला आहे. यासाठी काकाला मुंबई मराठी साहित्य संघाचा मंगेश नारायण कुलकर्णी पुरस्‍कार (२००९); तसेच ठाण्यात भरलेल्या चौ-याऐशीव्‍या मराठी साहित्य संमेलनात (२०११) ‘ग्रंथप्रसारक’ असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

.

एवढ्यावरच ग्रंथसखाचं काम थांबलेलं नाही. साहित्यिकांच्या कारकिर्दीचं डॉक्युमेन्टेशन जपणं, उपलब्ध करुन देणं, एक बूक युनिवर्सीटी जिथे कसं, काय्, केव्हा वाचावं याचं मार्गदर्शन मिळेल्, ग्रंथालयांच्या वाचकांची पातळी जाणून घेऊन ती उंचावण्यासाठी प्रयत्न करणं, पुस्तकांचा प्रवास दाखवणारं संग्रहालय उभारणं, बूक टूरीझम असे अनेक प्रकल्प डोक्यात ठेवुन काकाचं अखंड काम चाललेलं आहे. या अफाट कामासाठी लागणारा पैसा जमवताना स्वतासाठी काहीही शिल्लक ठेवलेलं नाहीच! पंधराशे स्क्वेअर फूटाचं पुस्तकांचं घर असलेल्या माणसाच्या घरात सर्वत्र पुस्तकं, बेड साठी जागा नाही, त्यामुळे पुस्तकांवरच गाद्या घालून झोपणं वगैरे गोष्टी नेहेमीच घडणार्‍या!
शब्द चि आमुच्या जिवाचे जीवन
शब्दे वाटू धन जनलोका !
हेच आयुष्याचे लक्ष्य मानून जगणार्या अवलिया ग्रंथसखा श्याम जोशी ना माझा शि.सा.न.!!

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

एस's picture

21 Oct 2014 - 8:07 pm | एस

शब्द चि आमुच्या जिवाचे जीवन
शब्दे वाटू धन जनलोका !
हेच आयुष्याचे लक्ष्य मानून जगणार्या अवलिया ग्रंथसखा श्याम जोशी ना माझा शि.सा.न.!!

अशक्य झपाटलेपण. अशा ध्येय्यवेड्या माणसांना मनापासून सलाम!

विशाखा पाटील's picture

22 Oct 2014 - 10:39 am | विशाखा पाटील

अशा बोटावर मोजण्याएवढ्या व्यक्ती महाराष्ट्रात आहेत, म्हणूनच मराठी वाचनसंस्कृती टिकून राहण्याची आशा आहे...खरोखरंच अफाट काम...

बोका-ए-आझम's picture

25 Oct 2014 - 12:41 am | बोका-ए-आझम

क्या बात है!

मुक्त विहारि's picture

25 Oct 2014 - 5:36 am | मुक्त विहारि

बदलापूरला कधी गेलोच तर ह्या मंदिरांत एक तरी फेरी नक्कीच मारतो...

सस्नेह's picture

25 Oct 2014 - 6:53 am | सस्नेह

लहान असताना मी एक स्वप्न पाहिलं होतं, सर्व बाजूनी पुस्तकांनी भरलेल्या घरात मी राहते आहे. अभ्यास नाही, तहानआभूक नाही. फक्त पुस्तकं

अगदी माझंच स्वप्न चोप्य पस्ते !!
सुरेख ओळख. पण आणखी विस्तृत हवी होती.
हे ग्रंथघर पाहण्याची जिद्द आहे..

सानिकास्वप्निल's picture

25 Oct 2014 - 12:00 pm | सानिकास्वप्निल

लेख आवडला, सुरेख लिहिले आहेस :)

हेच आयुष्याचे लक्ष्य मानून जगणार्या अवलिया ग्रंथसखा श्याम जोशी ना माझा शि.सा.न.!!

हॅट्स ऑफ ___/\___

प्रभाकर पेठकर's picture

25 Oct 2014 - 9:07 pm | प्रभाकर पेठकर

नतमस्तक.

निवृतीनंतर कधी जमलच तर त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करेन.
पण मी डिपॉझीट घेऊनच हे समाजकार्य करेन. कारण वाचायला म्हणून नेलेली माझी व्यक्तिगत कित्येक पुस्तके आणि ध्वनीफिती (ऑडिओ कॅसेट्स) कधी परत आलीच नाहीत. प्रत्येक पुस्तकावर माझे नांव आणि दूरध्वनी क्रमांक लिहून दिलेली पुस्तकेही येत नाहीत. परस्पर दूसर्‍यांना दिली जातात आणि दूसर्‍याकडून तिसर्‍याकडे फिरत राहतात शेवटी आपण ट्रॅक ठेवू शकत नाही आणि ती पुस्तके, ध्वनीफिती आपल्याला 'गहाळ' ह्या खात्यावर टाकावी लागतात. असो.

कपिलमुनी's picture

28 Oct 2014 - 12:22 pm | कपिलमुनी

अतिशय चांगली आणि दुर्मिळ पुस्तके भीडेखातर दिली आणि पुन्हा कधीही परत आली नाहीत .
एका महाभागाने तर प्रत्येक पानावर आवडलेला भाग हायलाईट केला होता त्यानंतर सध्या कोणी दुखावला तरीही नम्रपणे नाहीच म्हणतो .

सविता००१'s picture

26 Oct 2014 - 5:53 pm | सविता००१

मस्तच. एकदा तरी पहायलाच हवे.

मस्त अजया ताई. छान लिहले आहेस. :)

अरेवा येथे नक्की जायलाच हवे ...लवकरच वेळ काढून एक चक्कर टाकण्यात येईन ..माहितीसाठी धन्यवाद ग

आतिवास's picture

3 Nov 2014 - 1:05 pm | आतिवास

अशी झपाटलेली माणसं आहेत समाजात म्हणून गाडा चालू राहतो हे पुन्हा एकदा जाणवलं!
चांगली ओळख करुन दिलीत, धन्यवाद.

बहारिन् चा खलिफा's picture

6 Nov 2014 - 2:48 am | बहारिन् चा खलिफा

येथे कर माझे जुळती!

सामान्यनागरिक's picture

6 Nov 2014 - 6:36 pm | सामान्यनागरिक

हे बदलापूर मुंबई लोकल लाईन वरचं की दुसरीकडे कुठे आहे ? नक्की कळवणे ! आमच्या पुस्तक भिशीची सहल तेथे नेण्याचा विचार आहे . तेंव्हा तिथला पत्ता, दूरभाष क्रमांक मिळाल्यास सोयीचे होईल. पूर्वसूचना न देता एकदम चाळीस लोकांनी जाणे योग्य नाही म्हणुन.

लोकल लाईनवरचंच बदलापूर!
ग्रंथसखा वाचनालय
१० अर्जुनसागर,पाटील पाडा
कुळगांव.बदलापुर(पूर्व)
९३२००३४१५४
(बदलापूर स्टेशनजवळ)

अरे वा! अजया, वाचन वेडी तर मी ही आहे. तुला तर भरभक्कम पाठिंबा दिसति वाचनासाठी.
सुरेख ओळख या वाचनवेड्या काकांची. त्यांना मनःपुर्वक नमस्कार!!

पैसा's picture

7 Nov 2014 - 6:36 pm | पैसा

अप्रतिम सुरेख ओळख! अजून असे झपाटलेले लोक आहेत हे पाहून बरं वाटलं!

सखी's picture

11 Nov 2014 - 12:24 am | सखी

अप्रतिम ओळख! अजून असे झपाटलेले लोक आहेत हे पाहून बरं वाटलं! +१ पैताईसारखेच म्हणते अजया.

बोबो's picture

7 Nov 2014 - 10:59 pm | बोबो

छान ओळख :)

चौथा कोनाडा's picture

17 Nov 2014 - 12:56 pm | चौथा कोनाडा

ग्रंथ-पुस्तकांसाठी आपले आख्खे जीवन ओवाळून टाकणार्‍या एका ध्येय-वेड्याची सुरेख ओळख ! लेखाची सुरूवात छान आहे, आवडली ! स्नेहांकिता यांनी सुचविल्या प्रमाणे आणखी विस्तृत ओळख करून दिलीत तर तो महत्वाचा दस्त-ऐवज होईल ! बदलापूरला गेलो तर नक्की श्याम जोशी काकां समोर नतमस्तक होऊन येइन !

अनिता ठाकूर's picture

27 Jul 2017 - 11:13 pm | अनिता ठाकूर

आताच सह्याद्री वाहिनीवर रात्री ८.३० ते ९ ह्या वेळात अम्रृतवेल कार्यक्रमात श्री. श्याम जोशी व ग्रंथालीचे श्री.हिंगलासपूरकर ह्या महोदयांची मुलाखत पाहिली. पुस्तकांसाठी इतक्या तळमळीने काम करणा-या जोशी सरांना माझा नमस्कार! नेटवर शोध घेता, ग्रंथसखा वाचनालयावरचा हा लेख सापडला.बदलापूरकर भाग्यवान आहेत. इतकं सम्रृध्द वाचनालय त्यांना उपलब्ध आहे.त्यांच्या कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा !