सोराक
सोराक हि गोवन लोकांची एक पारंपारीक, साधी, सोपी ओला नारळ घालून केलेली एक लाल ग्रेव्हि आहे जी खासकरुन पावसाळ्यात करतात. कोसळणार्या पावसात जेव्हा ताजी मासळी मिळणं दुरापास्त असतं तेव्हा अश्या वेळी सुखी मासळी आणि जोडिला हे कालवण करतात. व्हेजवाले ह्यात त्यांच्या आवडिच्या भाज्या (उदा. बटाटा - हिरवी सिमला मिरची, तोंडली, फरसबी ई.) घालू शकता पण हे असचं प्लेन मस्त लागतं (स्वानुभव आहे!!!).
खरं तर हे सोराक भाज्या घालून किंवा न घालताहि छान लागतं...पण ते दुसर्या दिवशी अधीक चवदार लागतं कारण कच्च्या कैरीचा आंबटपणा पुरेपुर उतरतो.
साहित्यः
१. खवलेलं ओलं खोबरं - १ बाउल
२. लसुण ३ पाकळ्या
३. कांदा - १ मध्यम वाटणासाठि आणि १ मध्यम चिरलेला
४. सुख्या लाल मिरच्या (बिया काढलेल्या) - ४ ते ५
५. तिखट - १ चमचा, हळद - पाव चमचा
६. मसाला - २ चमचा
७. मधुन चिरलेल्या हिरव्या मिरच्या - ३
८. टोमॅटो - १ मध्यम चिरलेला
९. जिरं - १ चमचा
१०. आख्खे धणे - २ चमचे
११. कच्च्या कैरीच्या फोडि - ६
१२. तेल - १/२ वाटि (चित्रात कमी आहे पण नंतर जास्त घेतलं)
१३. चवीनुसार मीठ, बारीक चीरलेली कोथींबीर
कॄती:
१. मिक्सर मधे ओलं खोबरं, १ कांदा, टोमॅटो, धणे, जीरं, सुख्या लाल मिरच्या आणि लसुण घालुन गरजेप्रमाणे पाणी घालुन मुलायम वाटुन घ्या
२. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत तेल तापलं कि चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालुन कांदा मउ होईस्त परतत रहा. आता वाटलेली पेस्ट घाला. एक ५ मि. हळद, तिखट आणि मसाला घालून बाजुच्या कडेने तेल सुटेस्त पेस्ट सतत परतत रहा. आता आंब्याच्या फोडि घालून त्या मउ होईस्त परतुन घ्या.
४. चवीप्रमाणे मीठ आणि गरजेप्रमाणे पाणी घालुन मंद आचेवर एक ५-७ मि. ग्रेव्हि उकळू द्या.
५. ५-७ मि. गॅस बंद करुन गरमागरम सोराक वाफाळणार्या भातासोबत वाढा.
टीपा:
१. जोडिला वांग्याचे काप, लोणचं/पापड हा बेत फक्कड जमेल - गोड कोळाच्या शेंगांची तिखट बाजु :)
२. कच्ची कैरी न मिळाल्यास आंबटपणासाठि चिंच किंवा कोकम घालू शकता
वाचन
17325
प्रतिक्रिया
48