कुंग पाऊ चिकन

गणपा's picture
गणपा in पाककृती
23 Jan 2014 - 3:59 am

सध्या मिपाचे धुरंधर बल्लव आणि अन्नपुर्णा एकदम फुल्टू जोमात आले आहेत. त्यांचा दांडगा उत्साह पाहुन मृतवत असलेल्या आमच्या उत्साहाला पालवी न फुटती तर नवलंच.
त्यामुळे तो उत्साह मावळायच्या आत, घरात जे काही पदार्थ सापडले त्यांचा उपयोग करुन हे कडबोळं केलेलं आहे. वर पाककृतीचं नाव 'कुंग पाऊ चिकन' असलं तरी मुळ पाककृती अगदी १००% अश्शीच असते असा माझा बिल्कुल दावा नाही. काही पदार्थ कमी जास्त झाले असतील तर तो अपराध उदार मनानं पोटात घ्याल अशी खात्री आहे.

चला तर घरात काय काय कच्चा माल सापडला ते पाहू....

श्वेत वारुणी (व्हाईट वाईन), तिळाचं तेल, सोया सॉस, व्हिनेगर, (प्रत्येकी २-३ मोठे चमचे)
प्रत्येकी एक कांदा, भोपळी मिरची मोठे कापलेले.
पातीचा कांदा, लसुण, आलं, भाजलेले शेंगदाणे (मुठभर)
२ लाल सुक्या मिरच्या. तीळ, साखर, कॉर्न स्टार्च.
चवी नुसार मीठ.
हो आणि मुख्य म्हणजे (बोनलेस) चिकन साधारण १/२ किलो.
(एकवेळ एखाद्या इमामाच्या घरात कुराणाची प्रत नाही सापडायची पण या गणाच्या घरात चिकन सापडणार नाही, ये कदापी हो नही सकता.
-इति. आमचे मित्रगण.)
असो.


सगळ्यात आधी चिकनचे मध्यम आकारेच तुकडे करुन ते स्वच्छा धुवून, निथळवून घेतले. त्यात प्रत्येकी १ मोठा चमचा तिळाचं तेल, सोयासॉस, व्हिनेगर, वाईन, कॉर्न स्टार्च, किंचीत मीठ हे सगळे जिन्नस मिसळुन, चिकन झाकून फ्रीजमध्ये २०-३० मिनीटं मुरत ठेवलं.

दुसर्‍या एका बाऊलमध्ये उरलेलं तिळाचं तेल, सोयासॉस, व्हिनेगर, वाईन, कॉर्न स्टार्च, कोल्हापुरी ठेचा (हा आयत्यावेळी घातला) हे सगळं एकत्र करुन घेतलं.

एका नॉन्स्टीकच्या भांड्यात चमचा भर तेलात थोडं आलं-लसुण परतुन, मुरवलेलं चिकन मध्यम आचेवर शीजवून घेतलं.


चिकन शिजल्यावर ते एका दुसर्‍या भांड्यात काढुन त्याच कढईत, बारीक चिरलेलं आलं लसुण, लाल मिरची परतुन घेतली.
आलं लसणाचा खमंग वास आल्यावर मग त्यात कांदा आणि भोपळी मिरची टाकुन परतुन घेतलं. कांदा गुलाबी झाल्यावर मग त्यात वर तयार केलेलं मिश्रण टाकून आच मंद करुन परतलं. अगदीच सुकं सुकं झाल्याने खाली लागेल की काय या भितीनं किंचीत पाणी घातलं.

साधारण एक हलकीशी उकळी आल्यावर मग त्यात चिकन आणि कांद्याचीं पातं घातली. हलक्या हाताने सगळं एकत्र केलं.
वरुन भाजलेले शेंगदाणे, तिळ टाकाले.

गरमागरम न्युड्लस सोबत ओरपायला घेतलं.
वाटल्यास फ्राईड राईस सोबतही वाढता येईल.

प्रतिक्रिया

सानिकास्वप्निल's picture

23 Jan 2014 - 4:50 am | सानिकास्वप्निल

तरी बरं आज बुधवारीच पाकृ बघीतली...उद्या बघीतली असती तर जळजळ झाली असती भौ ;)
पाकृबद्दल काय बोलणार... नेहमीप्रमाणेच +१

बर्‍या दिवसांनी इथे पाकृ दिलीत त्याबद्दल धन्यवाद :)

विनटूविन's picture

23 Jan 2014 - 12:47 pm | विनटूविन

आज तर गुरूवार आहे ना!!

अर्धवटराव's picture

23 Jan 2014 - 5:10 am | अर्धवटराव

आमची अ‍ॅडीशनः
पाकृ बनवताना तीन चमचे वाईन वापरावं. उर्वरीत वाईन हौशा-गौशांसाठी राखीव ठेवावी (त्यात आपलंही नाव असावं). रसीकता असल्यास जय सोत्रीभौ म्हणुन त्यांचे कॉकटेल धागे उघडावे. तेव्हढे पेशन्स नसल्यास घरात जे काहि बीअर, व्हिस्की, व्होडका, टकीला असेल ते बाहेर काढावे. भरपूर ढोसावं. तोवर गणपाभौंची डीश तयार झालीच असेल. त्यावर यथेच्च ताव मारावा. आणि मग ताणुन द्यावी.

हि आमची अभिनव पाकृ केवळ वर मेन्शीत किंग पाऊ चिकनपुरती लिमीटेड नाहि हां. गणपाशेठ, स्नेहांकिता, सानिका, पेठकरकाका, आमचे अत्यंत लाडके पार्टीवाले संजोपराव इत्यादीं व इतर समस्त बल्लव/सुग्रणींच्या प्राणिमात्रांना सद्गती देणार्‍या कुठल्याही पाकृ.शी आमच्या पाकृचा घरबंध अगदी आरामात जोडता येईल.
परत एकदा, जय हो.

ओळखीचा प्रकार आहे कारण कंग पाओ स्पगेटी दोनदा खाल्लीये. ती शेंगदाणे, लाल मिरच्यांमुळे लक्षात राहिली आहे. त्यात तिळाचे तेल वापरतात हा साक्षात्कार आत्ता झालाय कारण स्वाद किंचित वेगळा (चांगला) लागला होता.
वरील फोटू रंगीबेरंगी असल्याने आवडला.

पहाटवारा's picture

23 Jan 2014 - 6:55 am | पहाटवारा

वाहवा ..तिळाच्या दाण्यांनी काय रंगत आणलीये !
असल्या थाय प्रकरणां-मधे दाण्याचा कूट पाह्यलाय.. पण तीळ पहिल्यांदाच पाहिले.
ते नूडल्स काय पॅन्-फ्राईड आहेत काय ?
-पहाटवारा

सुहास झेले's picture

23 Jan 2014 - 7:23 am | सुहास झेले

सहीच... माझी अतिशय आवडती स्टार्टर डिश. पाककृतीसाठी आभार रे गणपा :)

यशोधरा's picture

23 Jan 2014 - 8:14 am | यशोधरा

वा, वा मस्त!

मुक्त विहारि's picture

23 Jan 2014 - 9:45 am | मुक्त विहारि

जय हो....

प्रभाकर पेठकर's picture

23 Jan 2014 - 10:16 am | प्रभाकर पेठकर

अतिशय रंगबिरंगी, आकर्षकरीत्या सादर केलेली, दिलखेचक पाककृती. न करून सांगतो कोणाला. टॉप ऑन द लिस्ट.

दिपक.कुवेत's picture

23 Jan 2014 - 11:12 am | दिपक.कुवेत

काय कलरफुल डिश दिसतेय. खाताना ते भाजलेले शेंगदाणे आणि तिळाचे दाणे लज्जत वाढवतील ह्यात काहिच शंका नाहिच.

दिपक.कुवेत's picture

23 Jan 2014 - 11:13 am | दिपक.कुवेत

"एकवेळ एखाद्या इमामाच्या घरात कुराणाची प्रत नाही सापडायची पण या गणाच्या घरात चिकन सापडणार नाही, ये कदापी हो नही सकता." - ह्या वाक्याशी १००% बाडिस!

स्वाती दिनेश's picture

23 Jan 2014 - 12:23 pm | स्वाती दिनेश

मस्तच दिसते आहे चिकन.. एकदम आमच्या येथील "थाई एक्सप्रेस" मध्ये मिळते तसे..
स्वाती

Mrunalini's picture

23 Jan 2014 - 12:38 pm | Mrunalini

वा वा.. खुपच छान. मस्त दिसतीये पाकृ. आता ह्या विकेन्डलाच करुन बघते. :)

मिपावर बऱ्याच दिवसांनी सगळे बल्लव आणि अन्नपुर्णा जोशात आलेले दिसताहेत.
आत्ता पर्यंत कधीही इतक्या कमी कालावधीत एवढया अप्रतिम पाककृती मिपावर आल्या नव्हत्या.

समस्त संपादक मंडळास मी विनंती करतो कि त्यांनी हा महिना 'मिपा पाकृ विशेष महिना' घोषित करावा आणि यासारख्या आणखी काही अप्रतिम पाककृती मिपावर लिहिण्यास समस्त बल्लव आणि अन्नपुर्णा यांना प्रोत्साहित करावे.

ही पाककृती आवडली गेली आहे हेवेसांनल.

कुंदन's picture

23 Jan 2014 - 4:54 pm | कुंदन

लै भारी रे गंपा.

सुहास..'s picture

23 Jan 2014 - 4:56 pm | सुहास..

लव्ह यु गणपा !!

सोत्रि's picture

23 Jan 2014 - 8:28 pm | सोत्रि

हे आणि हेच म्हणायला खाली येत होतो आणि वाश्याने नेमका प्रतिसाद देऊन आधिच नंबर लावला.
गणपा आपण प्रत्यक्षात कधी भेटायचे रे? त्या दिवसाची आतुरतेने वाट बघतो आहे!

- (गणपाभौच्या स्वच्छ रेसिप्यांच्या फुल स्पीड पंखा) सोकाजी

खादाड's picture

23 Jan 2014 - 5:24 pm | खादाड

लवकरच करुन बघण्यात येइल !!!!

@ अर्धवटराव अ‍ॅडिशन आवाडली बर्का.

@ पहाटवारा, न्युडल्स फक्त उकळत्या पाण्यात शिजवून घेतल्यात. अजुन रुचकर करण्यासाठी तुम्ही सुचवलेला पर्याय उत्तम आहे.

@ सानिकास्वप्निल, रेवाक्का, सुझे, यशो, मुवि, पेठकर काका, दिपक, स्वातीताई, मृणालीनी, भाते, कुंद्या, वाश्या, खादाड
अन समस्त वाचकांचे आभार्स.

प्यारे१'s picture

23 Jan 2014 - 6:33 pm | प्यारे१

कन्क्लुडेड?
शाकाहारींसाठी बटाटा/कॉलिफ्लॉवर थोडा उकडून त्याच्या फोडी कॉर्नफ्लोअर मध्ये घोळवून तळून काढल्या तर मस्त लागतं.
आमचा कूक करतो ब्वा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2014 - 7:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त पाकृ. तोंपासू.

@ प्यारे १ : त्याच तळलेल्या फोडींचे पुढे व्हेज मांचुरियन किंवा स्विट अँड साव्र व्हेज बनवायला सांगा. हाकानाका.

तुमच्या (ब-याच) पाककृती मला 'उपयोगी' नसतात - पण तुमची सादरीकरणाची शैली आवडते म्हणून धागे वाचते नेहमी. प्रतिसाद द्यायला मला काही वाव नसतो कधीच!

सस्नेह's picture

23 Jan 2014 - 10:29 pm | सस्नेह

'ही पाकृ चिकन न घालता कशी करता येईल ?..'
'पनीर घालून !'
वरील प्रतिसाद गणपाभौच्या कोणत्याही चिकन पाकृला च्योप पस्ते करता येईल !
पाकृ नेहमीप्रमाणे ब्येष्ट !

एखादी व्हेज पाकृ येऊ दे आता. ;)

प्रचेतस's picture

23 Jan 2014 - 8:35 pm | प्रचेतस

काय तुफ्फान कलाकृती आहे रे.

@ सोत्रि उस दिनका हमें भी बेसब्रीसे इंतजार है.
@ प्यारे अरे ऑल टाईम फेव्हरेट पनीर विसरलास?
@ आतिवास, सुड देवाने घडवताना केमीकल लोच्या करुन ठेवलाय राव. :(
तरीही काही जमलं तर नक्की करुया व्हेज मध्ये.

@ एक्का काका, वल्लीशेट धन्यवाद.

मस्त चखना...दिसतेय पण एकदम झकास्स्स्स्स्स.....

विजुभाऊ's picture

23 Jan 2014 - 10:37 pm | विजुभाऊ

गणपा भौ. लै भारी. बृहन अफ्रीका कट्यासाठी हीच डीश करुयात?

तुमचा अभिषेक's picture

23 Jan 2014 - 11:04 pm | तुमचा अभिषेक

पुन्हा एकदा जेवायला जायच्या आधी बघायची चूक केली..... पण क्लास च !!!!

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jan 2014 - 11:23 pm | अत्रुप्त आत्मा

आद्य खाद्य साहित्यिक गंपाभाऊ रंगीतकर यांचा इजय असो! :)

सोत्रि's picture

23 Jan 2014 - 11:30 pm | सोत्रि

गंपाभाऊ रंगीतकर

आवडले!

- (रंगीन)सोकाजी

अनन्या वर्तक's picture

24 Jan 2014 - 2:38 am | अनन्या वर्तक

गणपा पाककृती छान आहे. अगदी Panda Express मध्ये मिळते तशीच. भोपळी मिरची, कांद्याचीं पातं आणि Caramelized onions मुळे फोटो सुधा खूप छान आला आहे.

इरसाल's picture

24 Jan 2014 - 9:47 am | इरसाल

आज मनमोकळेपणाने वाचु शकलो. काल गुरुवार होता.
जबराट्पाकृ.
वरील सगळ्यांशी सहमत.
ह्याच्या सुरीखाली यायला कोंबड्यांची ना नसते.

जेपी's picture

24 Jan 2014 - 11:29 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

@शिद, अभिषेक, बुवा, अनन्या, ईरसाल धन्यवाद.

@विजूभौ कधी येताय? कल्ला करुया. :)

सर्वसाक्षी's picture

24 Jan 2014 - 10:53 pm | सर्वसाक्षी

गणपाशेठ,

अफलातुन प्रकार. अर्थात पनीर/ फ्लॉवर/ बटाटे वापररुन खरा पण हा प्रकार नक्की बनवला पाहिजे. मस्त!

ब़जरबट्टू's picture

25 Jan 2014 - 10:06 am | ब़जरबट्टू

गणपाभाऊ,
मस्त आहे प्रकार व फोटो. काल करुन बघितला, जमला, पण विशेष असा वेगळेपणा जाणवला नाही हो.. कोणतेही चिकन प्रकार चायनिज मध्ये सारखेच टेस्ट करतात.....

पैसा's picture

28 Jan 2014 - 8:55 pm | पैसा

काय सॉलिड रंगीबेरंगी पाकृ आहे. आमच्या पाकृंना बरेचदा एकच एक काळसर रंग येतो! ;)

ganu's picture

5 Feb 2014 - 3:52 pm | ganu

मस्तच.