एक कप चहा...!
एक कप चहा..!
अगदी मनापासून सांगतो चहाच्या "या" कपाने मी नेहमी भारावतो.
परत परत हरवतो.
कितीदा तरी पिऊन "हा " चहाचा घोट मला पुन्हा पुन्हा वेडावतो.
आज बाहेर पाऊस तुफान "पेटलाय", अगदी माझ्यासारखा..!
रागरंग बघून लवकर "विझेल" असं वाटत नाही...जुनीच सवय दोघांची.!
भर दुपारीच दाटलाय मिट्ट काळोख डोळ्यांसमोर.!
मी उभा असतो बाल्कनीमध्ये, भिंतीवर अंग रेलून...ध्यानमग्न योग्याप्रमाणे "त्याच्यावर" त्राटक जमवून.!
मधेच चमकते लख्ख सय तुझी, एखादी वीज बनून माझ्या चेह-यावर.!
आवेगाचे तुषार बघ हा कसा उडवतो उनाड वारा,
अन् "फुलवतोय" काटा देहावर एक एक फटकारा..!
एक, दोन, तीन....अगणित अगणित फटक्यांची शिक्षा.
सरसरून शिरशिरी!
नाही.! कोणतीही गझल किंवा शास्त्रीय राग ऐकायचा नाही मला.
फारच फिल्मी वाटतं मग आयुष्य ...एखाद्या आर्टफिल्म सारखं.!
आहे तसंच वाहू द्यायचंय "ते" ..."त्याच्या" सारखं.!
तार सप्तक आता टिपेला पोहचलंय ”त्याचं", माझ्या इतकंच.!
थैमान!! नुसतं थैमान घातलंय "त्यांनी". ऐकायलाच तयार नाहीत...
बेबंद पाट पाण्याचे....
बाहेर आणि आतसुद्धा...
त्याला "कोसळताना" बघता बघता जाणवलं..
अरे! इथे ओल आहे बाल्कनीच्या दगडी भिंतीस..
तिनेच...होय त्या भिंतीनेच आजवर रोखून धरलय मला.!
नाही तर कधीचाच वाहवत गेलो असतो "तुझ्या" प्रवाहात.!
भानावर येतो कधी तरी, तिच्या आवाजाने "अहो ऐकलं का? चहा गार झालाय ...दुस-यांदा"
- जयपाल
सुरेख!!
मुक्तक अस्वस्थ करून गेले...
जिंदगी तेरे नाम पे आज ये क्या
हं.... !
मुक्तक आवडलं.
अस्वस्थ करण्याइतपत!
वाह!
यप्प... हेच बोलतो !!
शुद्धलेखन दुरुस्ती - सौजन्य किसन शिंदे.
__/\__