निवळशंख डोळे

Primary tabs

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in दिवाळी अंक
27 Oct 2013 - 3:57 pm


निवळशंख डोळे

क्षितिजावर पसरलेली लाली
सूचिपर्णीवृक्षांनी पांघरलेले गडद धुक्याचे अस्तर
आणि तुझे निवळशंख डोळे
बस्स.. इतकचं लक्षात आहे आता
----
तुझे हात माझ्या हातातून सुटले
तेव्हापासून फक्त
थोडेसे शब्द आणि थोडे जास्त मौन
इतकचं उरल होते माझ्या हातात...
----
सागर तीरावरच्या वाळूवर लिहिलेली
अक्षरे जशी लाटेगणीक पुसट होत जातात
तसाच तुझ्या हाताचा स्पर्श मिटत गेला
माझ्या हातावरुन....
कधीकाळी त्या स्पर्शाने माझ्या हातातली
अबोलीची फुले मोहरुन यायची
याची आठवण तरी आहे का तुला?
मला मात्र आता फक्त
ती अबोली मोहरतांना विलक्षण
विस्मयतेने पाहणारे
तुझे ते निवळशंख डोळे
तेवढेचं लक्षात आहेत
----
गडद धुक्याचे अस्तर पांघरलेल्या
घनदाट सूचिपर्णाखाली
एकाच शालीत घालवलेले ते क्षण
आता त्या धुक्यासारखेच धूसर झाले आहेत
पण मला तर त्याक्षणी माझ्यात विरघळणारे
फक्त ते तुझे निवळशंख डोळे
तसेच्या तस्से आठवतात
----
कदाचित ते तुझे निवळशंख डोळे
परत एकदा भेटले तर
सगळं सग्गळं आठवेल..
----
पण आत्ता याक्षणी मात्र
मला ते तुझे निवळशंख डोळे
बस्स… तेवढेचं लक्षात आहेत

-(पराग मांडे)

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

1 Nov 2013 - 2:54 pm | यशोधरा

सुरेख.

छान पण जजजरारारा लांबलंय.. अधिक आटोपशीर असतं तर मजा वाढली असती

प्यारे१'s picture

1 Nov 2013 - 3:49 pm | प्यारे१

छान उतरलीये पण तरी पोचत नाहीये. विस्कळली आहे.
थोडी 'एडिट' कर ऋ म्हणतात त्याप्रमाणं.

चित्रगुप्त's picture

1 Nov 2013 - 4:02 pm | चित्रगुप्त

सुंदर अविष्कार.
l....

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Nov 2013 - 4:15 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तिसर्‍या फटूशी एकदम बाडीस... :)

चित्रगुप्त's picture

1 Nov 2013 - 6:50 pm | चित्रगुप्त

यातील पहिल्या सुरैय्याच्या फोटोबद्दल एक खास आठवण आहे. मी चाळीशीत असताना इन्दौरला (जिथे बालपण गेले) गेलेलो असताना एका ट्रंकेत माझे लहानपणचे सामान सापडले. त्यात चांदोबाचे अंक, माझी जुनी चित्रे, मी जादूचे खेळ करायचो त्याचे सामान, बासरी वगैरे होते. आश्चर्य म्हणजे एका चांदोबाच्या अंकात हा फोटो पण होता. माझ्या अजिबात लक्षात नाहीये की हा फोटो मला तेंव्हा कुठून मिळाला होता, आणि हा सुरैय्याचा फोटो आहे, हेही तेंव्हा ठाऊक नसणार. पण त्या लहान वयात सुरैय्याचे डोळे भूल टाकणारे वाटले असणार, त्यामुळे तो फोटो ठेवला असेल. आज जालावर हुडकताना अचानक हा फोटो दिसला, अन हे सर्व आठवले. तुमच्या कवितेला याहीसाठी सलाम.

प्रचेतस's picture

1 Nov 2013 - 5:45 pm | प्रचेतस

अप्रतिम मिका.

मुक्त विहारि's picture

1 Nov 2013 - 7:11 pm | मुक्त विहारि

छान..

पैसा's picture

2 Nov 2013 - 7:54 am | पैसा

छान रचना!

सुधीर मुतालीक's picture

3 Nov 2013 - 9:40 pm | सुधीर मुतालीक

दिल खुष कर दिया ! सुरेख !!

स्पंदना's picture

6 Nov 2013 - 7:06 am | स्पंदना

निव्वळ्शंख डोळे!!

मस्त!

कवितानागेश's picture

11 Nov 2013 - 1:01 am | कवितानागेश

काय लिहू? :)

पाषाणभेद's picture

11 Nov 2013 - 1:27 am | पाषाणभेद

कवितेचे शिर्षक वाचू जी ए ची आठवण झाली. मस्त आहे कविता.

चाणक्य's picture

17 Nov 2013 - 5:12 pm | चाणक्य

'तेव्हा'ही आवडली होतीच.

अमेय६३७७'s picture

28 Nov 2013 - 10:26 pm | अमेय६३७७

सुरेख. निवळशंख डोळे... व्वा!