टीप : ही व्यक्तीचित्रणे सत्य घटना व पात्रे यांवर आधारीत आहेत. काळ साधारण इ.स. १९८७ ते १९९३ दरम्यानचा आहे. पात्रांची नावे बदलली आहेत. प्रसंगांतील भाषा काही प्रसंगी शिवराळ व अश्लील वाटण्याची शक्यता आहे. ज्यांना अशा प्रकारच्या वाचनाची नावड असेल त्यांनी कृपया येथेच थांबावे.)
शैलू
मी तेव्हा साधारण ५ वी / ६वीत असेन. आमच्या चाळीतच शैलू राहायची. शैलूचा बाप तिच्या लहानपणीच तिच्या आईला टाकून गेला होता. तो कुठे होता, काय करीत होता, जीवंत होता की नव्हता ह्याचा पत्ता शेवटपर्यंत चाळीतल्या बायांना आणि बाप्यांना लागला नाही. शैलूची आई मात्र शेवटपर्यंत त्याच्या नावाने कुंकू लावीत होती. म्हणजे अजूनही लावत असेल. मला माहित नाही. कुठेतरी गारमेंट मधे काम करुन घर चालवत होती. शैलू माझ्यापेक्षा ३-४ वर्षांनी मोठी असेल. दिसायला चारजणींसारखीच. मात्र घरात बाप नसल्यामुळे थोडं मोकळं वातावरण होतं.
आमच्या चाळीत तेव्हा फक्त मोजक्याच एक दोन घरांमधे टिव्ही होता. बहुतेक दर शुक्रवारी हिंदी पिक्चर लागायचं तेव्हा ! वार नक्की आठवत नाही पण शुक्रवार किंवा शनीवार असावा बहुतेक !
घराघरातले बापे कामावर गेले की चाळीतल्या बाया, पोरी आणि लहान पोरे (वय ५ ते ७ च्या आतील) भाभीच्या घरी चित्रपट बघायला गर्दी करायचे. मोठी पोरे कधीही ह्या गर्दीत मिसळत नसत. त्यांना त्यांचे वेगळे उद्योग असायचे.
शैलूला पिक्चर चं फारच वेडं होतं. पिक्चर बघायचे आणी त्याची स्टोरी समवयस्क पोरींना सांगायची हा बहुतेक तीचा आवडता छंद असावा ! तीचा नव्हे तर चाळीतल्या बर्याच बायकांना हा छंद होता !
आम्हाला चाळीच्या बाहेर जायचे तर शैलूच्या खोलीवरुनच पुढे जावे लागायचे. मी जेव्हा जेव्हा तिथून जायचो तेव्हा शैलू दोन चार पोरींना घेऊन पिक्चर ची स्टोरी सांगत असायची.
"आणी मग व्हिलन त्या हिरोईनची इज्जत घेतो" किंवा "आणि मग हिरो हिरोईनचे लव होते" हे डायलॉग मी तीच्या तोंडातून शेकडो वेळा तरी ऐकलेला आहे. पण हाच डायलॉग जेव्हा बायका सांगायच्या तेव्हा "आणी मग व्हिलन त्या हिरोईनची इज्जत लुटतो" असा सांगायच्या. मला तेव्हा नेह्मीच प्रश्न पडायचा की व्हिलन इज्जत घेतो म्हणजे नक्की काय करतो ? तेव्हा मला हिरोईनचा फार राग यायचा. अरे तुला तुझी इज्जत सांभाळून ठेवायला काय हरकत आहे ? जर सांभाळून ठेवता येत नसेल तर कमीतकमी लपवून तरी ठेवायची ना ? असे विचार माझ्या मनात यायचे. पण हे काय प्रकरण आहे ते विचारायची सोय नव्हती. तरी मी एकदा धीर करुन शैलूला विचारलचं. तेव्हा ती आणी तीच्या मैत्रीणी फिदीफिदी हसल्या होत्या.
"लहान आहेस, कळेल तुला मोठा झाल्यावर" असे म्हणून तीने मला उडवून लावलं. मग मी पिक्चर बारकाईने बघू लागलो तेव्हा कळालं की व्हिलन हा दिसायला अजीबात चांगला नसतो आणि तो हिरोईनची कपडे ओढत असतो. मग ती हिरोईन रडत असते. काही वेळा ती हिरोला नाव सांगायची किंवा डायरेक्ट पळत जाऊन कुठेतरी जीव दयायची. बहुतेक यालाच शैलू इज्जत घेणे म्हणत असावी. आता हे नक्कीच रडण्यासारखं आहे हे मला पटलं. सकाळी मी आंघोळ नको म्हणून सांगायचो तेव्हा माझी आई पण माझे कपडे ओढून काढायची आणि मग मी रडत सुटायचो.
कालांतराने शैलू मोठी झाली. शाळेचा गणवेश ही एक भारी गोष्ट आहे. तो पोरापोरींचं रुपडं अगदीच झाकून टाकतो. शाळेच्या गणवेशातून ती जेव्हा पंजाबी ड्रेसमधे आली तेव्हा अगदी वेगळीच दिसायला लागली. पक्या, बाळ्या रोज तिच्या घरावरुन एकदा तरी चक्कर मारायचेच. आता शैलू रात्री चाळीच्या दुसर्या कोपर्यावर पोरांसोबत कुजबूज करतांना दिसू लागली. चाळीतल्या मोठ्या माणसांच्या ते नजरेस पडत नसत. चाळीतल्या सगळ्या बापांची कामावरुन घरी यायची वेळ ही ठरलेली असे. ह्या गाठीभेटी बहूतेक वेळा बाप लोक घरी यायच्या आतच संपायच्या. आमच्यासारख्या लिंबू-टिंबू पोरांना मात्र ती घाबरायची नाही.
मग एक दिवस मी शाळेतून आलो तर चाळीच्या कोपर्यावर मोठी पोरं बसली होती आणि चांगलीच तापलेली दिसत होती. पक्या तावातावाने ओरडत होता "च्यायला, आम्ही काय मेलो होतो काय ?" तिच्यायची xxxxx!@# !
नंतर घरी गेल्यावर कळाले की शैलू एक मुसलमान पोराबरोबर पळून गेली होती. कालांतराने तिच्या आईने राग गिळला व शैलू परत चाळीत दिसू लागली तिच्या लहानग्या पोराबरोबर.
माझा प्रश्न मात्र अनुत्तरीच होता.
फरक स्पष्ट करा : इज्जत घेणे व इज्जत लुटणे.
आज मागे वळून बघतांना जाणवतयं की शैलू घरातल्या प्रेमाला, संस्कारांना पारखी झाली होती. घरात बाप, भाऊ, मामा या कोणत्याही रुपातल्या पुरुषाचं प्रेम मिळालं नव्हतं.
म्हणूनच तिला पुरुषांचं / पोरांचं आकर्षण होतं का ? तीने बघीतलेल्या असंख्य पिक्चरमधील व्हिलन बद्दल तीला सॉफ्ट कॉर्नर होता म्हणूनच तीने लुटणे हा शब्दप्रयोग न करता घेणे हा मवाळ शब्दप्रयोग केला होता का ? मला माहित नाही.
या उलट लग्न झालेल्या बायका ह्या त्या अनुभवातून गेलेल्या असायच्या. नवरा काय किंवा परपुरुष काय ? जबरदस्तीचा मामला म्हणजे लुटालूट नव्हे काय ? १० बाय १५ च्या खोलीत बाजूला आपलीच लहान लहान पोरं, सासू सासरे झोपले असतांना घाईघाईने व जबरदस्तीने शारिरीक धर्म उरकायचा याचा पुरुष व स्त्रीया दोघांना नक्कीच त्रास होत असणार पण पुरुष सकाळी कामावर बाहेर पडले की त्यांचा विसर पडायचा. मात्र बायका दिवसभर घरी, आपल्या मुलांच्या, घरातल्यांच्या नजरेसमोरचं !
माहीत नाही.
मला खरोखरच माहित नाही.
माहित असायला मी सिग्मंड फ्रॉईड नाही.
वाचने
2320
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक लेखन. सूक्ष्म पैलू
इज्जत लुटली ....
दि एण्ड थोडासा गंडल्यासारखा वाटला.
आमच्या लहान पणी तरी इज्जत लुटणे हाच
In reply to दि एण्ड थोडासा गंडल्यासारखा वाटला. by अर्धवटराव
असेलही.
In reply to आमच्या लहान पणी तरी इज्जत लुटणे हाच by मुक्त विहारि
सॉफ्ट कॉर्नर न्हवे तर केवळ लेंग्वेज सॉफ्ट वापरली आहे...
म्हणुनच शैलूच्या वयाचा व
In reply to सॉफ्ट कॉर्नर न्हवे तर केवळ लेंग्वेज सॉफ्ट वापरली आहे... by अग्निकोल्हा
विश्लेषण आवडले.
In reply to म्हणुनच शैलूच्या वयाचा व by अग्निकोल्हा