मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गट्टा पुलाव

रेवती · · अन्न हे पूर्णब्रह्म
राजस्थानी खाद्यमेळाव्यात या आठवड्यात आपण गट्टा पुलाव शिकणार आहोत. जालावरील पाककृती पाहून व मारवाडी मैत्रिणीच्या बहिणीचे सल्ले घेऊन ही कृती बेतलेली आहे. साहित्य: एक मोठी वाटी बासमती तांदूळ, तूप, पाणी, मीठ, आले, हिरवी मिरची, एक छोटी वाटी डाळीचे पीठ (बेसन), हळद तिखट, बडीशेपेची पूड, धण्याची पूड, गरम मसाला, कांदा, हिंग, दालचिनी, मसाला वेलची, मिरे, लवंग, कढई, व झाकणासाहित पातेले. कृती: प्रथम तांदूळ धुवून ठेवावेत . अर्ध्यातासाने दुप्पट पाणी, किंचित मीठ व तूप घालून मऊ, मोकळा भात शिजवून घ्यावा. बेसनात तिखट, मीठ चवीप्रमाणे घालावे. एक टेबलस्पून तेलाचे मोहन घालावे. छोटा चमचा बडीशेपेची पूड (बडिशेपेऐवजी ओवाही वापरतात), थोडी हळद, हिंग,धण्याची पूड, गरम मसाला घालून त्यावर एक मोठा चमचा कांदा किसून घालावा. हे सगळे कालवावे. कांद्याला पाणी सुटल्यामुळे मिश्रणाचा गोळा होत येईल पण लागल्यास वरून साधे पाणी शिंपडत घट्ट पीठ भिजवावे. पाव पातेले पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यास उकळी आल्यावर अर्धा वित लांबीचे शेंगोळे वळून घालावेत. शेंगोळे बोटाएवढे जाड असावेत. पातेलीवर झाकण ठेवावॆ. साधारण सात मिनिटात शिजलेले शेंगोळे पाण्यावर तरंगू लागतात. आच बंद करून शेंगोळे काढून घ्यावेत. शिजल्याची खूण म्हणजे त्यावर बुडबुडे आलेले असतात व रंग पांढरा झालेला असतो. त्याचे पेरभर लांबीचे तुकडे करून घ्यावेत. आता कढईत दोन मोठे चमचे तूप घालावे. गट्टे अगदी अर्धा मिनिट परतून काढावेत. नंतर जिऱ्याची फोडणी करून हळद घालावी . आख्ख्या गरम मसाल्याची पूड, आलं, मिरचीचे तुकडे (काहीजण बरोबरीने लसूणही वापरतात), किसलेलं आलं, तळलेले गट्टे, व मोकळा केलेला भात घालून मीठ घालावे. वरून कोथिंबीर घालावी. हा भात मसालेदार असतो. a

वाचने 54663 वाचनखूण प्रतिक्रिया 31

स्पंदना Wed, 07/03/2013 - 04:18
झाकणासहित पातेले.....:)) नविनच ऐकते आहे. एकुण भारतभर साधारण सारखेपणा आहे पदार्थात, पण चव वेगळी! कारण नागपूरकरांचा "वडाभात" खाल्लाय. साधारण तसच असावं. भात आणि शेंगोळे वेगवेगळे तयार ठेवुन ऐनवेळी फोडणी देउन गरमागरम तयार होत असेल अस वाटतय. चला आज रात्रीचा मेन्यु तयार. हे लिहितानाच तोंडाला पाणी सुटलय.

पैसा गुरुवार, 07/04/2013 - 16:13
सोपा पुलाव आहे आणि झक्कास लागत असणार! फोटो सुंदरच आलाय!

प्रभाकर पेठकर Sat, 07/06/2013 - 09:26
कांही साहित्याची प्रमाणे न दिल्याने मनांत गोंधळसदृष परिस्थिती निर्माण झाली आहे. पण पाहीन प्रयत्न करून. गट्ट्यांमध्ये खायचा सोडा नाही टाकायचा?

रेवती Sun, 07/07/2013 - 08:24
अनन्या, याबरोबर दह्यातली कोशिंबीर चांगली लागेल. पॆठकरकाका, प्रमाणे ही अंदाजे घेतली आहेत, आपापल्या आवडीप्रमाणे. त्रिवेणी, गट्टे करताना दही घातले तरी चालते, किंबहुना घालतातच पण मी कांदा घातल्याने त्यात दही घातले नाही .

प्यारे१ गुरुवार, 07/11/2013 - 04:47
आभार मानून झालेत, संपला का भात? :( छान झाला असणार. स्वगतः पुढच्या वेळेला वेळेत पातेले (तेच झाकणासकट) आणलेस तरच भात मिळेल बरंका प्यारे.

In reply to by आतिवास

रेवती गुरुवार, 07/11/2013 - 19:52
हा पुलाव रेस्टॉरंटात कुठे मिळतो हे माहित नाही. मैत्रिणीला या पुलाबद्दल विचारले तर तिने बरेच काही सांगितले. जावई घरी येण्याच्यावेळी गट्ट्यात सुकामेवा घालून करतात. त्याला थोडे वेगळे नाव आहे. कांदा किसून न घालता दही घालतात, पनीर घालून करतात असे प्रकार समजले.