श्रावण मोडक - काही मोडक्यातोडक्या नोंदी
लेखनविषय (Tags)
श्रावणची पहिली ओळख झाली ती आंतरजालावरूनच, आणि तीही दुरूनच, म्हणजे एखाद्या धाग्यात आलेल्या प्रतिसादापुरती; खरडी, व्यनिंतून वगैरे नाही. आंतरजालावरच्या वावरावरून एखाद्या व्यक्तीविषयी फारसे आडाखे बांधायला मला अावडत नाही. कारण एखाद्याचं लिखाण आवडलं म्हणून व्यक्तीशी जुळेल असं नाही; आणि लिखाण खास वाटलं नाही म्हणून व्यक्तीशी संवाद होणार नाही असंही नाही. तरीही आडाखे बांधले जातातच. त्यात आंतरजालावर पुष्कळ तथाकथित लेखकांची उगीचच आणि गरजेपेक्षा फार जास्त स्तुती केली जाते असाही माझा अनुभव होता. तशी पत्रकार, किंवा डाव्या विचारांची, चळवळीत असणारी, अगदी नर्मदा आंदोलनात सहभागी असणारी माणसंसुद्धा माझ्या ओळखीत होती. त्यामुळे त्याचंही मला काही नावीन्य नव्हतं. स्वत:हून जाऊन श्रावणशी ओळख करून घ्यावी असं त्यामुळे माझ्या स्वप्नातदेखील कधी आलं नव्हतं. आणि अंगी असलेला जन्मजात उद्धटपणा तर असा काही टोकाचा होता, की ज्यांचं उगीच स्तोम माजवलं जातं आणि भक्तांच्या गराड्यात जे स्वत:वरच खूष राहतात अशा असंख्य भोंदू व्यक्तींपैकी हे आणखी एक असणार, म्हणून त्यांच्यापासून लांबच राहिलेलं बरं अशी खूणगाठ मनात कधीपासूनच बांधून ठेवली गेली होती.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली, तेव्हा सुरुवातीला मी फक्त एकच केलं, आणि ते म्हणजे तोंडदेखलं हसून सभ्यतेच्या मर्यादेत गरजेपुरतं किंचित संभाषण. तिथे असणाऱ्या इतरांना तेव्हा ते कितपत लक्षात आलं असेल, आणि आता ते कितपत आठवत असेल ते मला माहीत नाही. आणि माझा हा अॅटिट्यूड नक्की कधी गळून पडला, पहिल्या भेटीत (ती बहुधा रात्रभर चालली होती), की दुसऱ्या की तिसऱ्या, ते मला आठवत नाही. हळूहळू माझ्या नकळत असं होऊ लागलं, की मराठी आंतरजालावरच्या कुणालातरी भेटायचा प्रसंग असो, की गरीबांच्या हॉस्टेलवर उगीचच (आणि अर्थात ओला!) अड्डा ठोकायचा प्रसंग असो; मोडक असतील ना, हे मी हळूच विचारून घेई आणि त्यावरून जायचं की नाही ते ठरवे. ते असतील, तर बाकी कुणी असोत-नसोत, त्यांच्याबरोबर गप्पा मारता येतील म्हणून मी खुशाल जात असे; आणि अनेकदा असं झालंदेखील - म्हणजे बाकी कट्टा ठीकठाक झाला, पण मोडकांबरोबर वेळ मस्त गेला.
जेव्हा हे घडलं, तेव्हा ते हळूहळू आणि आपसूक घडत गेलं. म्हणजे मुद्दाम त्याबद्दल काही विचार झाला नाही. पण नंतर जेव्हा विचार झाला, की हे नक्की कसं आणि का होतं आहे, तेव्हा लक्षात येऊ लागलं की हे घडणं अगदी स्वाभाविक होतं. असं का झालं असेल?
अॉस्कर वाइल्ड एका ठिकाणी म्हणून गेला आहे -
Action is limited and relative. Unlimited and absolute is the vision of him who sits at ease and watches, who walks in loneliness and dreams. But we who are born at the close of this wonderful age are at once too cultured and too critical, too intellectually subtle and too curious of exquisite pleasures, to accept any speculations about life in exchange for life itself.तशा काहीशा धर्तीत ते होत गेलं. म्हणजे असं, की मोडक डावे किंवा चळवळीतले असल्यामुळे काहींचे त्यांच्याशी स्पष्ट मतभेद होते, तर काहींना त्याविषयी स्पष्ट, पण अगदी मध्यमवर्गीय (म्हणजे लांब राहून, आणि आपलं सगळं काही, म्हणजे संसार-लाइफस्टाइल वगैरे, सांभाळून झेपेल इतपतच) आकर्षण होतं. त्या दोन्ही दिशांशी माझा परिचय होता, पण मी त्या दोन्हींत मोडत नव्हतो. मी इतका लहानही नव्हतो की ते मला गुरुस्थानी वगैरे वाटावेत. अनेक डाव्यांशी माझे आधीही मतभेद होते आणि आताही आहेत. सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या अनेकांचे मातीचे पाय, खोटारडेपणा आणि वैचारिक गोंधळ मी जवळून पाहिले आहेत. (पण अर्थात उजव्यांबद्दलही मी हेच म्हणू शकतो. उजव्या लोकांमध्ये मी डावा म्हटलो जायचो, आणि डाव्या लोकांमध्ये उजवा. असो.) प्रत्यक्ष कृती आवश्यकच, असं मोडक मानत आणि मी पडलो पक्का कृतिहीन (पक्षी : विचारजंत!). पण मग मी त्यांना कृती करताना नव्हे, तर वरच्या उद्धृतातल्यासारखं, म्हणजे शांतपणे बसून फक्त पाहताना पाहिलं. अनेकदा असं झालं की समोर चाललेलं ते आणि मी दोघेही पाहत असू, आणि आमच्यात एक अक्षरही न बोललं जाता, केवळ एखाद्या कटाक्षानं संवाद होई. कधी कधी असं होई, की आम्ही दोघं इतरांबरोबरच, एका गटाचा भाग म्हणून बोलत असू, पण असं वाटे की मी बोलतोय ते त्यांनाच समजतंय आणि ते बोलताहेत ते मलाच. म्हणजे इतरांना त्यातले फक्त किरकोळ तपशीलच जाणवत आणि त्यावरच ते प्रतिक्रिया देत बसत, तर आम्हाला त्यातून त्या तपशीलांपलीकडचं काहीतरी म्हणायचं असे आणि ते सगळ्यांसमोर घडत असूनही फक्त आमच्यापुरतंच राही. आता मी काय, किंवा ते काय, आम्ही अजिबातच अाध्यात्मिक वगैरे नव्हतो, किंवा तसे एकमेकांच्या प्रेमात वगैरेदेखील नव्हतो. पण हे किती गंमतीशीर आणि आनंददायी आणि दुर्मिळ असतं, ते ज्यांना ह्याचा अनुभव आहे त्यांनाच कळू शकेल. (हे असलं धूसर बोलणं बुद्धिभेदी किती वेळा वापरतात ते मला चांगलंच माहीत आहे, पण मला तरी त्याचं याहून वेगळं वर्णन करता येणार नाही.) उदाहरणार्थ, महिन्याभरापूर्वी आम्ही शेवटचं भेटलो तेव्हाही असंच झालं. 'तुला काही कळत नाही; तू मूर्खासारखं बोलतोयस' असं एका प्रौढ माणसाच्या तोंडावर त्याला स्पष्ट म्हणण्याऐवजी मी त्याला फक्त काही प्रश्न विचारले. ते इतके दैनंदिन वाटावेत असे होते, आणि इतर इतक्या गप्पांच्या अधेमधे येऊन गेले, की तिऱ्हाइताला तर त्यांमागचा समान धागाच दिसला नसता. पण इतर शिळोप्याच्या गप्पांत योग्य तो प्रश्न माझ्याकडून आला आणि त्याला अपेक्षित उत्तर समोरच्याकडून आलं, की समोर बसलेले मोडक शांतपणे त्यांचं ते खास मिश्कील हसत होते आणि एका नजरेनं मला दाखवून देत होते, की तू स्वत:ला कितीही हुशार समजत असलास, तरी मला पक्कं कळतंय तुझं काय चाललंय ते. आणि गंमत म्हणजे कदाचित मोडकांची ओळख होण्यापूर्वी मी त्या माणसाला 'तुला काही कळत नाही; तू मूर्खासारखं बोलतोयस' असं उद्दामपणे तोंडावर सांगितलं असतं आणि स्वत:कडे कटूपणा ओढवून घेतला असता. म्हणजे कळत-नकळत माझ्यावर त्यांच्या शैलीचा प्रभाव पडला होता आणि बहुतेक हेसुद्धा लक्षात येऊन ते त्यांचं गोड हसू खुदकन हसत असणार. सगळे मर्त्य असतात, तसे मोडकदेखील होते. जवळचं कुणीही गेलं तर दु:ख होतंच. कुणाचाच त्याला इलाज नसतो. मोडकांसारखं होणं तर मला बापजन्मात जमण्यातलं नाही. पण 'त्यांच्यासारखं' म्हणजे काय, हे कळून घेण्याचा प्रयत्न नक्की करता येईल. त्यांना माणसांत इतका रस होता, आणि ती त्यांना इतकी चांगली आकळायची, की प्रत्यक्ष पाहिलं नसतं तर मला ते अविश्वसनीयच वाटलं असतं. आणि इतकं कळत असूनदेखील माणसाचं माणूस असणं एवढंच त्याच्याशी संवाद आणि जवळीक साधण्यासाठी पुरेसं असतं हेदेखील त्यांना कळलं होतं. हे फार म्हणजे फार महत्त्वाचं असतं, आणि ते माझ्यात किती अभावानं आहे हे मला त्यांच्याकडे बघतबघत कळत गेलं. त्यांनी माणूसजातीच्या ठायी पाहिलं तितकं दु:ख आणि तितका अन्याय मी पाहिलेला नाही. तो पाहायची आणि पचवायची माझ्यात ताकदच नाही. ते पाहून कडवटपणा, चीड आणि नैराश्यच अंगी भिनणं खूप स्वाभाविक होतं. तरीही मोडक रसरशीत आणि हसतमुख असत. एवढ्यातेवढ्याशानं शिरा ताणण्याऐवजी किंवा कपाळावर आठ्या आणण्याऐवजी जमेल तितकी आयुष्याची रेवडीच ते उडवत असत. हे फार दुर्मिळ असतं. मानवी अस्तित्व हे मूलत: कार्यकारणहीन असतं आणि विशिष्ट पातळीहून जास्त संबद्धता त्याला देता येणं अशक्य असतं हे ज्यांना कळलेलं असतं त्यांचं असं असणं हे तर दुर्मिळाहून दुर्मिळ असतं. अशा ह्या माझ्या दुर्मिळ सुहृदाला माझी ही मोडकीतोडकी, माझ्या मगदुराच्या मर्यादेत केलेली, पण विनम्र श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
श्रद्धांजली आवडली.पटली देखील.
पण मी तर...
वाचत आहे.
+१
पर्फ़ेक्ट!
'पर्फेक्ट' ला +१
"जे घडत आहे, ते फक्त पाहत रहा
हे केवळ दुर्भाग्य म्हणायचं काय...
+१
चिं जं भावना पोहोचल्या.
श्रामोंची एक कविता वाचून
हे लिहील्याबद्दल धन्यवाद! अशा
.
धन्यवाद.
एक धागा दु:खाचा.
मोडक वारले. वाईट झाले. रेड सन
माझ्याविषयीच
श्रामोंना भावपूर्ण श्रध्दांजली