मग पुन्हा सामसूम...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
9 May 2013 - 5:08 pm

अगदी निवांत, निर्मनुष्य ठिकाण..निवांत पहुडलेल्या रेल्वे लाईनी... त्यांचा एकमेकींशीही काही संवाद नाही.. दिसभर बोलणार तरी काय एक-दुसरीशी आणि किती?

एकाकीपणा.. अगदी तासंतास...!

आणि मग अचानक एक उत्साहानं भरलेलं धावतं विश्व येतं..

विलक्षण उत्साह.. विलक्षण गती.. !

नानविध लोकांनी भरलेलं, गजबजलेलं एक धावतं विश्व.. कोण आहेत ही नानविध लोकं?

ती द्योतक आहेत.. रागाची, लोभाची, उत्साहाची, प्रेमाची, मायेची, कर्तव्याची, निराशेची, आशा-आकांक्षांची, जिद्दीची, उमेदीची...!

त्या विश्वात जराही वेळ नाही कुणाजवळ.. त्यातलं कुणीही उतरून साधी चौकशी, साधी विचारपूसही नाही करणार त्या एकाकी रेल्वेलायनींची..!

जगाचा नियम आहे हा.. धावत्या विश्वाचा नियम आहे.. तिथे कुणालाही वेळ नाही, उसंत नाही..

आहे ती फक्त गती.. आहे ती फक्त जिद्द. पुढे जाण्याची, कुरघोडी करण्याची, जग जिंकण्याची..!

हेच सगळं सांगतो आहे त्या इंजिनाचा तो कर्कश्श भोंगा आणि डब्यांची ती थडथड...!

आणि मग निघून जातं ते धावतं विश्व त्या रेल्वेलायनींना लाथाडून..!

उत्साहाचा, रगेलतेचा, रंगेलतेचा, रागालोभाचा, मस्तीचा, चैतन्याचा क्षणिक धुराळा उडतो..

आणि मग पुन्हा तीच सामसूम.. तोच निवांतपणा.. तोच एकाकीपणा..

-- तात्या अभ्यंकर.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

वसईचे किल्लेदार's picture

9 May 2013 - 5:21 pm | वसईचे किल्लेदार

स्वप्नांच्या नव्या प्रदेशात जाण्याचा धिर होत नाहि म्हणुनच... म्हणुनच सहन करतो...

अरे देवा काय लिहिताय तात्या ... नाहि नाहि त्या आठवणि आल्या!

jaypal's picture

9 May 2013 - 5:44 pm | jaypal

दमदार हाय. भोंगा वाजवत एकदम सुसाट चाल्लया. सिग्नल बिग्नल च्या मारी एकदम फात्यावर.

प्यारे१'s picture

9 May 2013 - 6:06 pm | प्यारे१

रुळ आपल्या जागी पक्के असले पाहिजेत.
नसले तर कधी कधी लाईनीत आणायला ठोकावे लागतात.

बाकी ते येणं जाणं लाथाडणं अमुक तमुक क्षणिक असतं. सामसूम, शांतताच कायमची असते. सुखाचीही वर्दळ नि दु:खाचीही, खर्‍याचीही, खोट्याचीही. सच्चाईची नि दांभिकतेचीही.
असो.

अवांतरः अविनाश धर्माधिकारी म्हणालेले एका भाषणात, मराठी माणसानं कर्ज घेतलं तरी ते कोट्यावधी रुपयांचं घ्यावं. बुडाला तर लोक म्हणतील तरी कोटींना बुडाला.

ढालगज भवानी's picture

9 May 2013 - 6:12 pm | ढालगज भवानी

आणि मग पुन्हा तीच सामसूम.. तोच निवांतपणा.. तोच एकाकीपणा..

एकाकीपण व एकटेपण यातील १० फरक लिहा मुलांनो :)
मजा केली.
शेवट चटका लावून गेला.

अनुप ढेरे's picture

9 May 2013 - 7:19 pm | अनुप ढेरे

पु.ल. देशपांड्यांच्या एका लेखाची आठवण झाली. त्याच्यात त्यांनी विविध प्रकारच्या रेल्वे फलटांची वर्णनं केली होती.

झक्कास. तात्यांची गाडी भोंगा वाजवत सुटलेय सुसाट :)

-(रोशनीच्या स्टेशनची वाट बघणारा) आदि जोशी

आजानुकर्ण's picture

9 May 2013 - 9:25 pm | आजानुकर्ण

तात्या ,

लेख सुंदर आहे. फक्त एकच सुचवावेसे वाटते की आता जरा दोनचार दिवस तरी ब्रेक घ्या बुवा! :)

http://mr.upakram.org/node/521#comment-7497

विसोबा खेचर's picture

9 May 2013 - 10:02 pm | विसोबा खेचर

मंजूर रे कर्णा. सदर मुक्तक तुला खरेखरीच सुंदर वाटले असेल अशी भ्रामक समजूत करून घेतो. फक्त उद्या एखादा मन्नादासाहेबांवर एक लेख टाकेन आणि मग ब्रेक घेईन म्हणतो. असो...

मैत्र's picture

10 May 2013 - 8:17 am | मैत्र

आत्ताची पण आणि दिलेल्या दुव्यावरची तुमची पण --

http://mr.upakram.org/node/521#comment-7540

ब्रेक नको.
आजानुकर्ण [08 Jul 2007 रोजी 13:06 वा.]

ज्यांना वाचायचे नाही त्यांना न वाचण्याचा पर्याय आहेच. मात्र ज्यांना वाचायचे आहे त्यांचा वाचण्याचा हक्क असा ब्रेक घेऊन हिरावून घेऊ नका.

विसोबा खेचर's picture

10 May 2013 - 12:08 pm | विसोबा खेचर

धन्यवाद मैत्र साहेब..

पप्पु अंकल's picture

10 May 2013 - 8:40 am | पप्पु अंकल

का कोण जाणे मात्र डोळ्यासमोर स्मशान - कलेवर आल्यानंतर होणारी लगबग - कधि एक्दा सर्व सोपस्कार आटपुन कामाला जाता येइल का? हा विचार करणारी जिवंत प्रेतं - सर्व आटोपल्यावरची स्मशान शांतता ! अशा क्रमाने सार आल

मी_आहे_ना's picture

10 May 2013 - 11:42 am | मी_आहे_ना

बापरे,धकाधकीच्या जीवनात नका हो आठवण करून देऊ अश्या गोष्टींची (त्या कितीही नं टळण्यासारख्या असल्या तरी) ते गाणं आहे ना "दुनिया में जो आये हैं तो जीना ही पडेगा", ते आठवतं असले प्रतिसाद वाचून.

विसोबा खेचर's picture

10 May 2013 - 9:31 am | विसोबा खेचर

सर्व प्रतिसादांना 'Like' करतो. धन्यवाद...

nishant's picture

10 May 2013 - 11:41 am | nishant

तुमच्या लिखाणाला माझा सलाम!!

चेतन माने's picture

11 May 2013 - 2:22 pm | चेतन माने

या बाबतीत मुंबैतल्या रेल्वेलायनी अगदी नशीबवान बघा…… दर २ मिनटाला धडधड, जरा निवांतपणा, एकाकीपणा नाही!!!
दुसर्या बाबतीत मात्र फारच दुर्देवी (सकाळच्या वेळेबद्दल बोलतोय!!!).

तात्या, हल्ली ललितलेखनाला वेळ मिळू लागलेला दिसतोय! 'मिपा'करांच्या दृष्टीने बरे झाले.

चित्रगुप्त's picture

14 Jun 2023 - 6:57 am | चित्रगुप्त

तात्यांचे लेखन पुन्हा एकदा.