✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मामाचं गाव (इसावअज्जा)

द
दशानन यांनी
Tue, 04/23/2013 - 23:22  ·  लेख
लेख
"राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे." मे महिन्याच्या सुटीसाठी बस स्टॅन्डवरुन अजून घरात पाऊल न ठेवलेल्या आपल्या एकुलत्या एक भाच्याला उंबरठ्यावरच प्रश्न विचारणारा मामा आठवला की या मामा लोकांनी माझे लहानपण कसे वाया घालावले याबद्दल दोन-चार आश्रु मी गाळून घेतो. दिड-दोन फुटी आपला भाचा वर्षभर मास्तर व बाईचा मार खाऊन खाऊन वैतागलेला, अभ्यास कर हे एकच पालूपद वर्षभर ज्याच्या मानगुटीवर भुतासारखे बसलेले, तिमाही, सहामाही, वार्षिक च्या सोबत असंख्य तोंडी परीक्षेतून पार पडून थोडा निवांत झालेला असतो तर लगेच घरात टूम निघते.. चला मामाच्या गावी! मामाच्या गावाला जायचे, आंब्याच्या झाडावर घर बांधायचे.. विहीरीवर अंघोळीला जायचे, तेव्हा थोडे पेरु चोरायचे... असली अफाट कल्पना घेऊन पोहचलेला आपला भाचा पाहिल्या पाहिल्या पहिला प्रश्न काय तर "राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे." अरे कसा आहेस विचार, गाल-गुच्चा घे, मामासाठी काय आणलं आमच्या राज्यानं असे बोबड्या भाषेत विचार! पण नाही "राखुंड्या" मास्तरासारखा पहिला प्रश्न अभ्यास नाही तर मार्काचा... पहिले काही दिवस बोंबलून सांगावे असे वाटत असेल मला की लेको.... तुमच्या कर्नाटकात आमच्या पेक्षा आधी २०-२५ दिवस निकाल लागतो रे.. आम्ही घरी गेल्यावर माझा निकाल कळेल.. पण कोण ऐकून घेईल तर शपथ! तर गावच्या सुट्टीची सुरवात! त्यात मी नवसाचा.. एकुलता एक मुलगा जवळपास २०-२५ घरात (पाहुण्यांच्यात) कोणाच्या पण घरी गेला की पहिला प्रश्न ठरलेला "राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे." मी घरातून का पळून गेलो या प्रश्नाचे हे उत्तर नसेल ही पण कुठल्या पाहूण्याच्या घरी कधीच न जाण्याचा संकल्प करण्याचे हेच नक्की कारण होते. या लोकांना काय असुरी आनंद मिळत असावा असले प्रश्न पोरांना विचारून देवाकं ठावूक! मामाचा वाडा त्यावेळी खूपच मोठा असल्यामुळे व आजोबा वृद्ध असल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात त्यांना भेटायला व सुट्टीचा आनंद घ्यायला सगळेच आजोळी यायचे, १६-१७ बहिणी (मावस, आत्ते इ. + सक्की एक) व त्यांच्या आया-बाबा आणि अनेक लांबचे पाहुणे एकावेळी त्या वाड्यावर हजर असतं! खाण्यात रेलचेल असे, पहाटे पहाटे पेटलेली चुल, आम्ही सर्व अंगणात झोपल्यावर रात्री कधी तरी चर्र असा आवाज करीत शांत होत असे. पहाटे पहाटे जाग यायची ती आजोबाच्या हाकेने. माझे दुदैव येवढे की एकुलता एक मुलगा असल्यामुळे सकाळचा शंख माझ्या नावानेच होत असे.. आजोबा मुलींना चुकून ही काही बोलत नसतं, हा त्यांना प्रेमाने खाऊ घाल, सगळ्यांना गोळा करून गोष्टी सांग, स्वातंत्र्य लढ्यात बेळगाव आंदोलनात कशी इंग्रजाची पळतीभूई केली व नंतर कसा मार खल्ला या प्रामुख्याने गोष्टी. मी आपला बापुडा त्या गोष्टी ऐकण्यासाठी तेथे जाऊन बसावे तोच शेतातील काम संपवून आलेला मामा कडाडत असे "राज्या! लेका बायकांच्यात काय बसला आहेस, बायल्या कुठला!, जा गोठ्यात रम्याला मदत कर" झाले सगळ्या मुली फिदीफिदी हसणार व माझा रंग उडणार हे ठरलेले. रडत आईकडे तक्रार घेऊन स्वयंपाक घरात जावे तर कोणीतरी माउशी, मामी, आत्या, काकी म्हणायची "या राज्याला आईविना करमत नाही, यामुळेच बायकांमध्ये लुडबुड करायची सवय." व तोंडाला पदर लावून गालातल्या गालात हसत. मोठ्याने हसल्या की बाहेरून आजोबांच्या काठीचा आवाज येणार हे नक्की. बरं या सगळ्याला वैतागून घरातून बाहेर पडण्यासाठी अंगणात यावे तोच लहान मामा "राज्या! घराबाहेर पाय टाकलस तर बघ. तंगडे तोडेन." बर त्याचे ऐकून गप्प परसबागेकडे जावे तर लगेच सन्नतात्या (लहान आजोबा आमचे) लगेच "राज्या! आकडे नी काल इड, निंद काल तगद् निंन कयागं उडत्यान नोड!" बोंबललं, मायला पुढून घरातून बाहेर पडायचे तर लहान मामा पाय तोडायला तयार व परसबागेत जावे तर ज्याने बाग (बाग कसली, रोजच्या भाज्या लावलेल्या) लावली तो पाय तोडून हातात देण्याची भाषा करतो. काय करावे काय करावे असले प्रश्न चिन्ह चेहर्‍यावर मिरवत मी इकडे तिकडे भटकत असलो तर एखादी ताई-आक्का हमखास म्हणायची.."नोड.. हुंब ईदे इद" (बघ, वेंधळाच आहे हा) असे म्हणून परत फिदीफिदी हसायच्या. शेवटी मी वैताग वैताग करुन इसावअज्जा च्या रुमकडे वळत असे. इसावअज्जा= पोहायला शिकवणारे आजोबा, हेच नाव त्यांचे गावभर नाही तर पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, या आजोबांनी एका आणि एक पोराला/मुलीला पोहायला आलेच पाहिजे असा चंग बांधला होता. हे आजोबांचे कोणीतरी लांबचे नातेवाईक होते, ब्रम्हचारी. पोरांना पोहायला शिकवले तर घरचे गहू-तांदुळ द्यायचे, कोणी फारच उदार असेल कधी कधी पैसे देखील. मला आज देखील ते आठवतात ते त्यांच्या दंतपंगतीहिन हास्यामुळे. त्यांचे नक्की वय किती आहे याची चर्चा रात्री अंगणात घरचे सगळे झाडून जेव्हा झोपायला गोळा होत तेव्हा वडीलधारी मंडळी करत म्हणजे पहा किती वय असेल त्यांचे. अज्जा-इसावअज्जा असे सगळेच म्हणत त्यामुळे त्यांचे नाव काय असावे याची चर्चा आम्हां लहान मंडळीमध्ये होत असे, त्याचे कारण म्हणजे मोठा मामा लहान होता तेव्हा त्याने धाडस करुन त्यांना नाव विचारले होते म्हणे व त्यांनी मामाला उचलून २०-२५ फुट खोल असलेल्या विहरीमध्ये फेकलं होते.. अश्या अनेक दंतकथा त्यांच्या बद्दल होत्या. पण मामाला त्यांनी उचलून विहीरीत फेकले होते हे ऐकून मला खूप आनंद झाला असलाच पाहीजे. इसावअज्जा व माझे जरा बरं जुळत होते (परवा परवा माझी मोठी मामेबहीण मला सांगत होती, ते जेव्हा आजारी पडले व त्यांचे शेवटचे काही क्षण राहीले होते तेव्हा त्यांनी जुन्याकाळात जमणार्‍या गोतावळ्याची आठवण काढली होती व तु हरवला आहेस हे ऐकून ढसाढसा रडले होते.) इसावअज्जा मला त्याच्याकडे असलेल्या ठेवणीतील गोष्टी दाखवत असे. त्याच्या पत्र्याच्या पेटीत खूप काही अमुल्य असे दडलेले होते, त्या पेटीला एक सोडून दोन दोन कुलपे होती व त्याच्या चाव्या इसावअज्जा नेहमी जानव्यात अडकवून ठेवी. जेव्हा जवळपास कोणी नसेल तेव्हा तो ती पेटी उघडून बसलेला असे. त्या पेटीमध्ये काय आहे याची जेवढी उत्सुकता त्याबालसुलभ वयात मला होती तेवढीच थोरामोठ्यांना देखील होती हे आता-आता कळले. त्यांनी ते विश्व इतरांच्यापासून जरा जास्तच लपवून ठेवले होते. इसावअज्जा माझ्यावर न जाणे का पण खूप प्रेम करायचा, अनेकवेळा इतरांपासून लपवून खाऊ देण्यापासून, प्रसंगी आजोबांचा रोष अंगावर घेऊन मला शेतात मनसोक्त दंगा घालण्यासाठी घेऊन जात असे. पोहणे शिवण्याच्यावेळी प्रसंगी मुलींना देखील उचलुन विहीरीत फेकणारा हा आजोबा मला मात्र पत्र्याचा (डालड्याचा डब्बा) किंवा लाकडाची मोळ बांधल्याशिवाय पाण्यात पाऊल टाकू देत नसे किंवा त्यांनी मला कधीच आधाराविना पाण्यात जाऊच दिले नाही. त्यांनी मला पोहायला शिकवले, त्यांनी मला निर्धास्तपणे पाण्याशी खेळणे शिकवले मग ते पाणी, विहरीचे असो, वाहत्या ओढ्याचे किंवा तुडुंब भरलेल्या कृष्णेचे! क्रमशः
  • मामाचं गाव (इसावअज्जा) - भाग-२
  • मामाचं गाव (आजोबा)
  • मामाचे गाव (आत्या आज्जी)
  • मामाचे गाव - तात्या
  • मामाचे गाव - तात्या (२)
  • मामाचे गाव - तात्या (३)
  • मामाचे गाव - (भरत)

Book traversal links for मामाचं गाव (इसावअज्जा)

  • मामाचं गाव (इसावअज्जा) - भाग-२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10725 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

मस्त!

पैसा
Tue, 04/23/2013 - 23:25 नवीन
लेखाच्या शेवट क्रमशः बघून बरं वाटलं. तिथलं वातावरण छान टिपलं आहेस आणि लहानग्या मनातले तरंग सुद्धा! त्या आज्याबद्दल आणखी वाचायची उत्सुकता आहे. पुढचा भाग लवकर येऊ दे!
  • Log in or register to post comments

असे लहानांचा विचार करणारे

बॅटमॅन
Tue, 04/23/2013 - 23:38 नवीन
असे लहानांचा विचार करणारे इसावआज्जा कधी ना कधी मिळतात म्हणून बरं असतं तेच्यायला नैतर लहानपणी या ना त्या कारणावरून मारणार्‍यांची (सर्व अर्थाने) संख्याच एकुणात जास्त. :(
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात...

मुक्त विहारि
Tue, 04/23/2013 - 23:39 नवीन
आता थांबू नका..
  • Log in or register to post comments

राजे, मस्त रे!

प्यारे१
Tue, 04/23/2013 - 23:40 नवीन
राजे, मस्त रे!
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिलय. त्या वातावरणात

कवितानागेश
Tue, 04/23/2013 - 23:42 नवीन
सुंदर लिहिलय. त्या वातावरणात पोचल्यासारखं वाटलं.
  • Log in or register to post comments

पुढील भागाच्या प्रतीक्षेत

बॅटमॅन
Tue, 04/23/2013 - 23:45 नवीन
पुढील भागाच्या प्रतीक्षेत हेवेसांनल. वर्णन सुर्रेख उतरले आहे.
  • Log in or register to post comments

विषय जिव्हाळ्याचा आहे.

गणपा
Wed, 04/24/2013 - 03:21 नवीन
विषय जिव्हाळ्याचा आहे. सुरवात दमदार झालीये. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

लहान मुलाच्या विश्वाचे खूपच

शुचि
Wed, 04/24/2013 - 03:55 नवीन
लहान मुलाच्या विश्वाचे खूपच छान वर्णन आहे.
  • Log in or register to post comments

मामा म्हंटल की गोडगोड अस

स्पंदना
Wed, 04/24/2013 - 06:55 नवीन
मामा म्हंटल की गोडगोड अस वाटणार्‍या भ्रमाच्या भोपळ्याला पहिल्याच वाक्याने सुरुंग लावल्याबद्दल मोठ्ठा धन्यवाद. मस्त लिव्हलंय. अगदी धमुच्या भाषेत सांगायच तर, "कं लिवलय! कं लिवलय?"
  • Log in or register to post comments

वाचकांचे व

दशानन
Wed, 04/24/2013 - 19:01 नवीन
वाचकांचे व प्रतिसाद्कर्त्यांचे आभार!
  • Log in or register to post comments

पु.भा.प्र. मस्त झालाय हा भाग

Mrunalini
Wed, 04/24/2013 - 19:49 नवीन
पु.भा.प्र. मस्त झालाय हा भाग पण
  • Log in or register to post comments

मस्त जमलाय हा भाग. पुभाप्र !!

सूड
Wed, 04/24/2013 - 20:56 नवीन
मस्त जमलाय हा भाग. पुभाप्र !!
  • Log in or register to post comments

लेखन आवडले.

सस्नेह
Wed, 04/24/2013 - 21:21 नवीन
सुट्टीच्या सीझनला समयोचित धागा.
  • Log in or register to post comments

+१

इनिगोय
Sun, 04/28/2013 - 07:07 नवीन
+१ मस्त लेख. पुढचा भाग येऊद्या लौकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

दशाननराव, काय सुंदर लिहिलंय!

आदूबाळ
Wed, 04/24/2013 - 22:01 नवीन
दशाननराव, काय सुंदर लिहिलंय! पुढचा भाग लवकर टाका. :) तुमच्याकडे कन्नडमिश्रित मराठी बोलायचे का हो? मोठी गोड लागते कानाला...
  • Log in or register to post comments

वा राजे वा

स्पा
गुरुवार, 04/25/2013 - 14:05 नवीन
वा राजे वा बुंगाट लिवलंय सुरेख फ्लो आहे लवकर पुढील भाग टाका
  • Log in or register to post comments

बरली बरली पुढचा भाग लगु बरली

अद्द्या
गुरुवार, 04/25/2013 - 15:05 नवीन
बरली बरली पुढचा भाग लगु बरली
  • Log in or register to post comments

सहमत

अभ्या..
Sat, 04/27/2013 - 02:34 नवीन
यरडनेय भाग लगु लगु बरली. मस्त लिहिलेय. प्रचंड आवडले आहे. खूप खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

हौद री, मुंदिन भाग लगु लगु

बॅटमॅन
Sat, 04/27/2013 - 16:55 नवीन
हौद री, मुंदिन भाग लगु लगु बरली मत्तु बरिली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बरीते इंदेन, स्वल्पू कॅल्सा

दशानन
Sat, 04/27/2013 - 23:32 नवीन
बरीते इंदेन, स्वल्पू कॅल्सा हॅच आगिदे री. * अक्षरास हसू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सरी, तोन्द्रे इल्ला

बॅटमॅन
Sat, 04/27/2013 - 23:39 नवीन
सरी, तोन्द्रे इल्ला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

एकतर ...नाहीतर

चौकटराजा
गुरुवार, 04/25/2013 - 15:41 नवीन
एकतर या लेखनाने यंका माडगूळकरांची आठवण आली नाहीतर जयवंत दळवींची.गावाकडलं वातावरण व मामा, इसावआज्जा व मी ही व्हक्तिचित्रे रोचक. सारे प्रवासी घडीचे व बिटाकाका या सहित्यकृतींची आठवण आली. लिक्खे रहो लग्ग्रे रहो !
  • Log in or register to post comments

अहो कोण मोठी नावे घेतलीत

दशानन
Sat, 04/27/2013 - 23:33 नवीन
अहो कोण मोठी नावे घेतलीत तुम्ही, मी तर त्यांच्या सावलीत उभा राहण्याच्या देखील लायकीचा नाही. सुचते तसे लिहतो येवढेच. प्रतिसादासाठी आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आभारी आहे, पुढील भाग लवकरच

दशानन
Fri, 04/26/2013 - 14:30 नवीन
आभारी आहे, पुढील भाग लवकरच प्रकाशित करतो.
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Fri, 04/26/2013 - 15:24 नवीन
छान आठवणी ! कृष्णेच्या पाण्यात पोहायला शिकलात म्हणजे अजोळ सांगलीजवळ होते का? ( सांगलीकर) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

चिककोंडी अंकली

दशानन
Tue, 06/27/2017 - 21:39 नवीन
चिककोंडी अंकली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

मला वाटलं

अर्धवटराव
Fri, 04/26/2013 - 22:47 नवीन
हि मारीच ची गोष्ट असेल :D मस्त झालीये सुरुवात. पु.भा.प्र. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

मस्त ....

जेनी...
Tue, 06/27/2017 - 22:25 नवीन
मस्त ....
  • Log in or register to post comments

छान लेखन .

सिरुसेरि
Wed, 06/28/2017 - 10:51 नवीन
छान लेखन . सांगली - जयसिंगपुर यांना जोडणारा अंकलीचा पुल , उदगाव , अंकली फाटा आठवला . "संथ वाहते कृष्णामाई " चे चित्रीकरण तिथे झाले होते .
  • Log in or register to post comments

हे अंकली वेगळे, आमचे कर्नाटक

दशानन
Wed, 06/28/2017 - 11:40 नवीन
हे अंकली वेगळे, आमचे कर्नाटक अंकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा