उकडगरे

पैसा's picture
पैसा in पाककृती
17 Apr 2013 - 11:58 am

सध्या माझी आई माझ्याकडे आली आहे. ती आली की मी नेहमी पारंपरिक पाककृत्या तिला विचारून करत असते. त्या फेसबुकवरच्या मित्रमंडळींना बघाव्या लागतात आणि इच्छा असो नसो, चान चान म्हणावे लागते. एका कन्नड लोकांच्या ग्रुपमधे मराठी पाकृ अजिबात माहित नसल्याने त्या खूपच आवडतात असे तिथले लोक म्हणतात. ते कदाचित त्यांच्या जन्मजात सौजन्यशील स्वभावामुळे असावे. मा. स्पाजींबरोबर "कलेसाठी कला की जीवनासाठी कला" या विषयावर आमचा नेहमी फेसबुकीय वाद सुरू असतो. त्यांचे म्हणणे की पाकृचे प्रेझेंटेशन जास्त महत्त्वाचे तर मला वाटते की ती खाणे हे जास्त महत्त्वाचे. या वादाचा निकाल आजपर्यंत लागला नाही. पण त्याचा बदला घेण्यासाठी एकदा मौ भात करून मा. स्पाजींचे नाव त्यावर "टाचायचा" माझा कृतनिश्चय आहे. आजपर्यंत जेव्हा कधी मौ भात केला तेव्हा तो जास्त जीवनावश्यक वाटल्याने त्याचे छायाचित्राच्या कलाकृतीत रूपांतर न झाल्यामुळे तो प्रसंग टळला आहे. ते असो.

या जाहीर वादात मा. बिका पुणेकर यांनीही एकदा "प्रेझेंटेशनचं र्‍हाऊ द्या" असे माझ्या काळजाला घरे पाडणारे उद्गार काढल्याने माझे पाकृचे प्रयोग आजपर्यंत फक्त फेसबुकपुरते मर्यादित होते. परंतु मिपावरचे बरेच संपादक पाककृती टाकून वाहवा मिळवतात मग मीच का मागे राहू असा विचार मनात आला आणि त्यातच काल सकाळी उठून पाकृ मिपावर टाकायचीच असा निश्चय करताच मिपा बंद असल्याची सुवार्ता आली. कदाचित काही लोकांना माझ्या बेसन लाडवांचे करूण कहाणी गेल्या वर्षीच्या दिवाळीत वाचल्याचे स्मरत असेल. माझी मिपावरची पहिली पाकृ टाकायचा निश्चय मी करताच मिपा बंद पडावे यावरून माझ्या पाकृ मा. स्पा यांच्या भयकथेच्या रांगेतल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त करून ही पाकृ मा. स्पाजी यांना समर्पित करते. ते ही असो. बोलण्याच्या नादात पाकृ विसरून जाईल. तेव्हा आता हे सगळे बाजूला ठेवून पाकृ सांगते.

काल बाजारात गेले तेव्हा फणसाचे कच्चे पण तयार झालेले गरे साफ करून ठेवलेले पाहिले. लगेच माझ्या मनात आले की उकडगर्‍यांची भाजी करूया. एक पाकीट कमी होईल म्हणून २ घेतली. ते बरेच झाले. तर उकडगर्‍यासाठी साहित्यः

१. काप्या फणसाचे कच्चे पण पिकण्याच्या बेताला आलेले गरे आणि आठळ्या

२. हळद लहान चमचाभर

३. मीठ चवीप्रमाणे

४. गूळ जरा जास्त पण चवीप्रमाणे

५. २/३ सांडगे मिरच्या

६. मेथी दाणे चिमूटभर

७. तेल, मोहरी, हिंग फोडणीसाठी

८. ओले खोबरे, कोथिंबीर

कृती: सुरुवातीला फणसाच्या गर्‍यांच्या पात्या काढून त्याचे हातानेच उभे तुकडे करावेत. आठळ्या जरा ठेचून त्यांची साले काढून टाकावीत. गरे आणि आठळ्या रात्रभर पाण्यात भिजत टाकाव्यात. मग सकाळी आठळ्या चिरून घ्याव्यात. दोन्ही भिजत घातलेले पाणी फेकून द्यावे. जीवनसत्त्वे इ. ची चिंता करू नये. कारण फणसाचा चीक त्या पाण्यात उतरलेला असतो.

gare

मग थोड्या पाण्यात हळद घालून आठळ्या शिजत ठेवाव्यात. त्या बर्‍यापैकी शिजताच त्यात गरे टाकून आणखी शिजवावे. गर्‍यातले सगळे पाणी आटून कोरडे झाले पाहिजे आणि गरे अगदी मऊ नव्हे, पण छान शिजले पाहिजेत. नंतर त्यात मीठ आणि गूळ घालून एक वाफ काढावी. हे इतर साहित्य सगळ्यांच्या स्वयंपाकघरात असते आणि मा वल्ली सारखे काही जण सोडल्यास बहुतेकांना ते काय आहे हे ओळखता येत असावे त्यामुळे त्याचे फोटो देत नाहीये.

gare3

एकीकडे सांडगे मिरच्या थोड्या तेलात तळून चुरडून भाजीत घालाव्यात. रत्नागिरीकडे जरा जाड बुटक्या मिरच्या भरून सांडगे मिरच्या करतात. त्या खूप चवदार असतात. पण इथे गोव्यात त्या मिळत नसल्याने ज्या मिळाल्या त्यावर काम भागवले आहे.

gare2

आता भाजी तयार झाली आहे त्यामुळे गॅसवरून खाली उतरवावी. मिरच्या तळलेल्या तेलात हवे तर थोडे आणखी तेल घालून मेथी दाणे, मोहरी, हिंगाची फोडणी करून भाजीवर ओतावी. कोथिंबीर धुवून बारीक चिरून आणि ओले खोबरे खवून भाजीवर घालावे आणि त्यानंतर कोणाचीही वाट न पाहता भाजी मनसोक्त हाडदावी. ही भाजी जेवणात एक भाजी म्हणून खा किंवा दुपारी चहाबरोबर पोहे, शिरा यासारखे खाणे म्हणून खा. कशीही मस्त लागते.

gare1

भाजी जास्त खाऊन पोट दुखल्यास उतारा म्हणून ओवा, पुदिन हरा, इनो यासारख्या वस्तू घरात असू द्याव्यात. किंवा जेवल्यावर आले, कोथिंबीर, जिरे आणि मिरच्या घातलेले ताक पिऊन ताणून द्यावी. या पाककृतीत वाटणे घाटणे असे काही प्रकार नाहीत. साधी शिजवायची पाकृ असल्याने याला उकडगरे असे म्हणतात. बघा तुम्हाला आवडते का! आणि हो, ही पाकृ फक्त महिलांपुरती मर्यादित नसल्याने इथे लिहिली आहे. तेव्हा सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावेत ही विनंती!

प्रतिक्रिया

इरसाल's picture

17 Apr 2013 - 12:14 pm | इरसाल

पण मला वाटले की ही पेशल म्हैलांसाटीची हाये म्हनुन काय ?

असो आवडले.

गौरीबाई गोवेकर's picture

17 Apr 2013 - 12:20 pm | गौरीबाई गोवेकर

मस्त दिसता गो. पण "काप्या फणसाचे कच्चे पण पिकण्याच्या बेताला आलेले गरे आणि आठळ्या" कुठे मिळतात? पिकलेले गरे आणि भाजीचे अगदी कच्चे फणस मिळतात इकडे. पण हे प्रकरण मिळायला कठीण दिसतय....पा.कृ मस्तच. नक्की करून पहाणार. आईला विचारून आणखीन काहीतरी पोस्ट. पाकृत्या.

इरसाल's picture

17 Apr 2013 - 12:22 pm | इरसाल

परत परत प्रतिसाद देवुन गायब होतोय.
असो पाकृ आवडली.
आधी वाटले फकस्त म्हैलांसाटीच हाये की काय म्हुन देनार नवतो पन आवडले म्हणुन पुन्हा पुन्हा (मिपा सारखं-सारखं बोंबलत असताना सुद्धा)प्रतिसाद देतोय

स्मिता.'s picture

17 Apr 2013 - 1:21 pm | स्मिता.

पाकृ एकदम मस्त दिसतेय. सांडगे मिरची चुरून घातली असल्याने चव तर एकदम मस्त येत असणार.

बाकी आम्ही खान्देशी असल्याने आयुष्यात कधी फणस खाल्लं नाहीये :(
कधी संधी मिळते कुणास ठाऊक!

सविता००१'s picture

17 Apr 2013 - 1:31 pm | सविता००१

ज्योताई, फेबु पेक्षा इथे मस्त लिहिल आहेस. लै बेष्ट. नक्की करणारच. आता फणसाचे गरे मिळ्णं फक्त बाकी आहे

प्रभाकर पेठकर's picture

17 Apr 2013 - 1:47 pm | प्रभाकर पेठकर

वा..वा...अगदी वेगळी, कधी न ऐकलेली, न चाखलेली अनवट पाककृती आहे. पारंपारीक असल्याने चविष्ट असणारच.
नक्की करून पाहण्यात येईल.

त्यांचे म्हणणे की पाकृचे प्रेझेंटेशन जास्त महत्त्वाचे तर मला वाटते की ती खाणे हे जास्त महत्त्वाचे.

व्यावसायिक पातळीवर असे म्हणतात की पदार्थाचा स्वाद आधी डोळ्यांनी घेतला जातो (देखणेपणा), नंतर नाकाने (सुगंध)आणि नंतर जीभेने(चव). त्यामुळे तिन्ही मुलभूत गरजांकडे लक्ष द्यायचे असते.

घरी कुठलाही पदार्थ करताना चव आणि आईचे किंवा पत्नीचे प्रेम, त्या पदार्थाचा स्वाद कित्येकपटीत वाढविते. देखणेपणाला, सादरी करणाला महत्व (त्या मानाने) कमी असते.

रुस्तम's picture

20 May 2013 - 9:04 pm | रुस्तम

+१

सूड's picture

17 Apr 2013 - 1:51 pm | सूड

>> मला वाटते की ती खाणे हे जास्त महत्त्वाचे
अगदी अगदी !! चवीच्या नावाने बोंब असेल तर निव्वळ प्रेझंटेशन काय उपयोगाचं.
असो. पाकृ हटके आहे. पण एक शंका, उन्हाळ्याचे दिवस आहेत. अशा दिवसात हे गरे नि आठळ्या रात्रभर पाण्यात ठेवल्यानंतर सकाळला आंबत वैगरे नाहीत ना?

पैसा's picture

17 Apr 2013 - 1:54 pm | पैसा

मला पण हेच वाटले होते. पण आईवर विश्वास ठेवून टाकले पाण्यात! काही वाईट झाले नाहीत.

तर्री's picture

17 Apr 2013 - 2:06 pm | तर्री

पैठणी प्रमाणे मर्मबंधातली पाकृ ......
पैसा ताई धन्यवाद !!!
उकडगरे हे नाव मला भूतकाळात घेवून गेले.
"में महिन्याची सुट्टी , १०-१५ आते -मामे भावंडानी गजबजलेले कोकणातले आमचे घर , दिवस भर हैदोस आणि आंब्याची डाळ , पन्हे , दडपे पोहे , घावन घाटले , मेथांबा, टक्कू, कोयाडे , कैरीचे लोणचे , कोकम सरबत , आणि खास दिवशी उकडगरे हे खाद्य पदार्थ "
उकड गरे जसे खास तशीच आठळाची भाजी ("खेड") हा ही एक अती खास प्रकार आहे.

रुस्तम's picture

20 May 2013 - 9:07 pm | रुस्तम

कोणी तरी क्रुती द्या ना......

सुधीर's picture

17 Apr 2013 - 2:35 pm | सुधीर

पाककृती वेगळी असेल का कशी ते माहीत नाही, पण कोकणात फणसाच्या भाजीला काही ठिकाणी "जनता भाजी" असं म्हटलं जायचं (पूर्वी मे महिन्यातल्या लग्नाच्या जेवणात हमखास दिसायची म्हणून). चव चांगली लागते. पण ते फणसा-फणसावर पण अवलंबून असतं असं म्हणतात. काही फणसाची झाडं कोवर्‍यासाठीच (भाजीचा कोवळा छोटा फणस) प्रसिद्ध असतात.

पैसाताई आठळया व गरे कुकरमध्ये एक शिट्टी देवून शिजवलेतर चालेल का?
पिकलेल्या फणसाची केली तर चालेल का? ते कच्चे फणस चिरायचे कसे माहीत नाही सो पिकलेल्या फणसाची करून पाहीन.

पैसा's picture

17 Apr 2013 - 3:30 pm | पैसा

फक्त त्याचा अगदी लगदा होऊ नये. पिक्या फणसाला गूळ कमी लागेल आणि पटकन शिजेल, पण वास खूप असतो त्याला. मी साफ केलेले गरे बाजारातून आणले होते. कच्चा फणस चीक काढून साफ करणे खरेच कटकटीचे आहे.

प्रचेतस's picture

17 Apr 2013 - 3:08 pm | प्रचेतस

एकदम झकास पाकृ.
फणस तर भयानक आवडतो. त्यामुळे उकडगरे पण आवडणारच.

हे इतर साहित्य सगळ्यांच्या स्वयंपाकघरात असते आणि मा. वल्ली सारखे काही जण सोडल्यास बहुतेकांना ते काय आहे हे ओळखता येत असावे

:(

खरंय.

फणस असतात येथे पण तू जसे तयार पण न पिकलेले मिळण कठिण. तरीही आणुन पहावे म्हणते.
मा. स्पा. उकडगरे हे नाव अगदी छान आहे.

गणपा's picture

17 Apr 2013 - 3:28 pm | गणपा

ठ्यँक्यु, :)

अरे वा.. छान आहे पाकृ. कधीच खाल्ली नाहिये. भारतात गेल्यावर खाउन बघितली पाहिजे.

कवितानागेश's picture

17 Apr 2013 - 4:01 pm | कवितानागेश

छान दिसतेय ही पाक्रु.

किती दिवसांनी पाहिली ही कृती.. शेवटच्या फोटोने कोकणातले दिवस आठवले.. ठांकू ज्योताय!

अक्षया's picture

17 Apr 2013 - 4:10 pm | अक्षया

फोटो आणि पाकॄ. मस्तच. :)

प्यारे१'s picture

17 Apr 2013 - 4:13 pm | प्यारे१

उकड गं रे! ;)
छान पा कृ!

स्पा's picture

17 Apr 2013 - 4:44 pm | स्पा

__/\__

दमदार पाक्रु आणि प्रेझेन्टेशन
हटके पाक्रु आहे हा एकदम

( फणस प्रेमी ) - स्पा उकडगरे

दिपक.कुवेत's picture

17 Apr 2013 - 4:45 pm | दिपक.कुवेत

एकदम अनवट पाकॄ. ईथे गरे मिळणं दुरापास्त त्यामुळे नुसती पाहुनच समाधान मानतोय.

तिमा's picture

17 Apr 2013 - 4:56 pm | तिमा

फोटो व पाककृती वाचून चवीचा अंदाज आला. छान पाककृती. अजून अशा खास कृती येऊ द्यात.

मी पण दोन दिवसांपूर्वीच केली होती भाजी!! पण मिपा बंद मुळे टाकता आली नाही. असो, भाजी इथे आली हे महत्त्वाचे! आमच्याकडे या भाजीवर वरून फोडणी आणि तळलेली सांडगी मिरची चुरून घेतात. आतही सांडगी मिरची असतेच. काय लागते भाजी मस्त!! अजून चव आहे तोंडात!

सानिकास्वप्निल's picture

17 Apr 2013 - 8:11 pm | सानिकास्वप्निल

फणस खूप आवडतो :)
पारंपारीक पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद ज्योतीताई.
इथे एका दुकानात आठळ्या काढलेले गरे मिळाले पण त्यांना आपल्या कोकणातल्या गर्‍यांसारखी चव नाही, उकडलेल्या किंवा भाजलेल्या आठळ्या ही खूप आवडतात.

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग! काय पाकृ म्हणायची की काय! तोंपासू.
फोटू छान आलाय. खोबरे कोथिंबीरवाला फोटू तर खासच.
जेवणात ही भाजी केली तर पोळीबरोबर खायची की मुगाच्या खिचडीसारखी मुख्य पदार्थ म्हणून खायची?

ते कदाचित त्यांच्या जन्मजात सौजन्यशील स्वभावामुळे असावे.
मी कानडी असूनही कोणी बर्‍या स्वभावाचीही म्हणत नाहीत.
उलट अडगी कानडी असल्याचे टोमणे ऐकावे लागतात.

पैसा's picture

17 Apr 2013 - 9:47 pm | पैसा

जेवणात ही भाजी केली तर पोळीबरोबर खायची की मुगाच्या खिचडीसारखी मुख्य पदार्थ म्हणून खायची?

कशीही खा. आवडीप्रमाणे. तसाही पोटभरू पदार्थ आहे.

मी कानडी असूनही कोणी बर्‍या स्वभावाचीही म्हणत नाहीत.

बरं, आता मी म्हटलंय ना!

यशोधरा's picture

17 Apr 2013 - 9:48 pm | यशोधरा

रेवती, तशीच ताटात घेऊन बुकूबुकू खायची. एक ही भाजी आणि एक केळफुलाची!

कच्ची कैरी's picture

18 Apr 2013 - 5:30 pm | कच्ची कैरी

नविन आणि वेगळी पाककृती .

जेनी...'s picture

18 Apr 2013 - 6:47 pm | जेनी...

छानच हो सासुबै :)

कुण्णी काहि म्हणो ... पण माझ्या सासुबैंच्या हाताला चवच भारी ;)

:P :D

पैसा's picture

20 Apr 2013 - 9:24 pm | पैसा

सर्व वाचक आणि प्रतिसाद देणार्‍यांना मनःपूर्वक धन्यवाद!

मुक्त विहारि's picture

20 Apr 2013 - 9:42 pm | मुक्त विहारि

आवडली..

काकाकाकू's picture

20 Apr 2013 - 9:54 pm | काकाकाकू

खुपच छान लागते हि भाजी. माझ्या सासरी बाळवलेल्या गर्यांचे ही उकडगरे करतात. बाळवलेले गरे गरम पाण्यात थोडावेळ भिजत ठेवायचे.... मग बाकी सगळी क्रुती तशीच......अगदी मस्त भाजी होते.

---काकू

अत्यंत वादग्रस्त विधान! एऽऽ...कोण आहे रे तिकडे? जा धा-बारा बस फोडून या रे! ;)

ह्म्म...फणसाची भाजी! आम्ही अस्सल घाटावरचे, त्यामुळं फणसाच्या निरनिराळ्या पाककृतींना फणसाची भाजी हे एकमव वर्गिकरण लाऊन मोकळे होतो. :)
फणसाची भाजी म्हणलं की मला आमच्या एका मित्राच्या आजीची आठवण येते. केळशी की आंजर्ल्याकडची ही शैलजाआजी. अशी सुंदर स्वयंपाक करायची...तिच्या कृपेनंच आयुष्यात पहिल्यांदा हा प्रकार खाल्ला होता..आणि वेडा झालो होतो..चार-चारदा घेऊन भाजी खाल्ली होती (आणि नंतर बायकोची बोलणी! कुठं म्हणून न्यायला नको! लाज आणतोस अगदी..वगैरे वगैरे! )

वरच्या पा.कृ.मधली भाजी पाहून आलरेडी तोंडाला पाणी सुटले आहे. आता टंकन आवरतं घेतो अन 'डिपफ्रिझ्ड' केलेले काहीतरी तुकडे अंमळ गरम करुन उदरभरण करुन घेतो. :)

पैसा's picture

21 Apr 2013 - 10:41 am | पैसा

>> अत्यंत वादग्रस्त विधान! एऽऽ...कोण आहे रे तिकडे? जा धा-बारा बस फोडून या रे!

इथेच वर रेवतीने म्हटलंच आहे, "मी कानडी असून मला कोणी चांगले म्हणत नाहीत." घ्या हा पुरावा! आता हितंच सीमावाद सुरू नका! बेळगाव आमचंच आहे यात काय संशय! पण कानडी लोक चांगलेच असतात तरी!

चिंतामणी's picture

21 Apr 2013 - 12:09 am | चिंतामणी

चे.पु. पेक्षा इथे जास्त छान वाटली.

सानीका, गणपा इत्यादींना नवीन स्पर्धक आला असे म्हणायला हरकत नसावी.

पाकृ वाचुन आणि फटु बघुन खल्लास झालो. पण

. मी साफ केलेले गरे बाजारातून आणले होते.

या वाक्यामुळे मार्क कमी केले आहेत.

पैसा's picture

21 Apr 2013 - 10:45 am | पैसा

>> सानीका, गणपा इत्यादींना नवीन स्पर्धक आला असे म्हणायला हरकत नसावी.

नाय हो! कान पकडते! आम्ही हौशी क्याटेगरीतच बरे!

>>या वाक्यामुळे मार्क कमी केले आहेत.

बिनशर्त शरणागती! पण फणस साफ करायचा तर गावच्या घरच्या तुळशीच्या अंगणात फतकल घालून बसून. आमच्या ६०० स्क्वेअर फुटांच्या फ्ल्याटात तेवढा आळशीपणा केला तर जरा चालवून घ्या!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2013 - 12:32 am | अत्रुप्त आत्मा

येकदम वेगळी पा.कृ. वाचुन मजा आली. म्हणजे खाउन पण येणार. ;-)
गेले 7 दिवस राजापुरात वास्तव्य असल्यामुळे फणसाची 2/3 प्रकारची भाजी/तळलेले गरे,असं बरच काहि खातोय.तरिपण हा प्रकार समोर आला नाहिये,अता उद्या आमच्या बल्लवांना विचारतो,करतात का ते? :-)

इन्दुसुता's picture

21 Apr 2013 - 12:34 am | इन्दुसुता

नविन पाकृ आवडली.
पण " आठळ्या " म्ह्णजे काय?
स्वगतः आता येथे कॅन्ड फणस शोधणे आले.....
आणखी एक प्रश्न : ( म्हणजे आश्चर्यच आहे आतापर्यंत कुणी विचारला कसा नाही ) ही पाकृ अंडे घालून ( म्हणजे अंडं कोंबडी किंवा इतर पक्षी प्राण्यांनीच घातलेलं असावं असा अंदाज , मी नाही ) करता येते का ( ती मी करायची आहे, पक्ष्या प्राण्यांनी नाही ... जाऊ दे झालं* ( काय झालं ते मला विचारू नका )
* ष्टाईल सौजन्य : अपर्णाअक्षय

पैसा's picture

21 Apr 2013 - 10:46 am | पैसा

आठळ्या म्हणजे बिकण!

ही पाकृ अंडे घालून ( म्हणजे अंडं कोंबडी किंवा इतर पक्षी प्राण्यांनीच घातलेलं असावं असा अंदाज , मी नाही ) करता येते का ( ती मी करायची आहे, पक्ष्या प्राण्यांनी नाही ... जाऊ दे झालं* ( काय झालं ते मला विचारू नका )

कोंबडी आधी की अंडे या प्रश्नाचे उत्तर मिळाले की नक्की सांगेन.

प्रभाकर पेठकर's picture

21 Apr 2013 - 2:56 am | प्रभाकर पेठकर

आज गरे आणि आठळ्या आणल्या आहेत. उद्या प्रयत्न करून पाहणार आहे.

प्रभाकर पेठकर's picture

21 Apr 2013 - 2:19 pm | प्रभाकर पेठकर

Fanas-Bhaji--2

पैसा's picture

21 Apr 2013 - 2:30 pm | पैसा

लगेच इतकं सुरेख छायाचित्र इथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!

रेवती's picture

22 May 2013 - 2:30 am | रेवती

अशक्य चांगला फोटू.

पिशी अबोली's picture

21 Apr 2013 - 4:07 pm | पिशी अबोली

रत्नां'गरी' पेशल... :)

चुचु's picture

21 Apr 2013 - 4:12 pm | चुचु

मस्त

सस्नेह's picture

21 Apr 2013 - 5:14 pm | सस्नेह

करून बघायची आहे.

इन्दुसुता's picture

22 Apr 2013 - 9:42 am | इन्दुसुता

आता "बिकण" म्हणजे काय तेही सांगा :D :D

फणसाच्या बियांना आठळ्या किंवा बिकणं म्हणतात.

कोणीतरी कोयाड्याची पण कृती टाका! लहानपणी खाल्ले होते पण कृती ठावूक नाही !

श्रिया's picture

20 May 2013 - 10:36 am | श्रिया

छान आणि वेगळी पाककृती!

मदनबाण's picture

21 May 2013 - 8:46 pm | मदनबाण

ह्म्म... वेगळीच पाकॄ !
हल्लीच फणसाचे पापड खाउन पाहिले आहेत्...वेगळेच लागतात !
कापा फणस आणि बरका फणस कसा ओळखतात बरं ?

अख्खा फणस असताना कसा ओळखतात हे माहित नाही पण चिरल्यावर काप्याचे गरे कमी रसाळ असतात आणि एकेक करून काढणे सोपे जाते असे मला वाटते. बरका मात्र अगदी रसाळ आणि गरे काढताना रसाची धार लागलेली पाहिली आहे. त्याची फणसपोळी करतात. मला तरी बरका जास्त आवडतो, जरा गिळगिळीत असतो म्हणून जपून खावा लागतो.

मदनबाण's picture

22 May 2013 - 4:34 pm | मदनबाण

@आज्जे...

अच्छा असं हाय काय !

यशोधरा's picture

21 May 2013 - 8:54 pm | यशोधरा

आठळ्या आल्या आहेत घरी आजोळच्या फणसाबरोबर! आता भिजायला टाकल्याच आहेत!

पैसा's picture

21 May 2013 - 11:10 pm | पैसा

आठळ्यांची खेड करणार आहेस का?

विडंबन न होता पार पडलेली पाकृ मस्तच गं! :D

स्वाती दिनेश's picture

20 Jun 2015 - 5:04 pm | स्वाती दिनेश

अग किती दिसांनी ही भाजी पाहिली.. आम्ही गर्‍यांची भाजी म्हणतो .. कोकणात आमचे एक पाध्ये म्हणून स्नेही आहेत, त्या काकू आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि फणसाचा सेझन असेल तर आम्हा लोकांसाठी म्हणून मुद्दाम ही भाजी करतातच आणि साफ केलेले गरेही बरोबर देतात.
स्वाती

स्वाती दिनेश's picture

20 Jun 2015 - 5:05 pm | स्वाती दिनेश

हा धागा कसा काय मिसला मी?
स्वाती

पद्मावति's picture

21 Jun 2015 - 2:42 pm | पद्मावति

आहा....एक नंबर!!
रसीपी तर छान आहेच पण रेसिपी देण्यचि स्टाइल तर त्याहूनही छान. तळलेलि सांडगी मिर्ची, वरतून तेलाची फोडणी.....यम्म.....

कविता१९७८'s picture

21 Jun 2015 - 7:02 pm | कविता१९७८

मस्तच दिसतीये भाजी