Skip to main content

पौष्टिक धिरडी

Published on बुधवार, 02/01/2013
. साहित्या: १ वाटी ज्वारीचे पीठ १ वाटी नाचणीचे पीठ १ वाटी बाजरीचे पीठ १/२ वाटी गव्हाचे पीठ १/४ वाटी तांदळाची पिठी १ वाटी बारीक चिरलेली मेथी १/२ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात २-३ लसूण पाकळ्या ठेचून घेणे १-२ हिरव्या मिरच्या चिरुन घेणे १/२ टीस्पून जीरे १-१/४ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १-१/२ टीस्पून धणेपूड मीठ चवीनुसार तेल . पाकृ: एका भांड्यात सर्व पिठं एकत्र करावी. त्यात जीरे, लाल तिखट, धणेपूड, मीठ, ठेचलेला लसूण, हिरव्या मिरच्या, चिरलेली मेथी व चिरलेली कांद्याची पात घालून एकत्र करावे. थोडे थोडे करुन त्यात पाणी घालावे. मिश्रण मध्यमसर असावे ,खुप जास्त पातळ नको.(मिश्रणात अजिबात गुठळी राहता कामा नये) नॉन-स्टीक तवा मध्यम आचेवर तापवायला ठेवावा. त्यावर थोडे तेल ब्रश करावे किंवा लाकडी चमच्याने / उलथण्याने पसरावे. डावभर मिश्रण तव्यावर गोलाकार ओतावे व कडेने तेल सोडावे. झाकून १-२ मिनिटे शिजवावे. एक बाजू शिजली की दुसर्‍या बाजूला धिरडे पलटावे व खरपूस भाजून घ्यावे. लागल्यास थोडे तेल सोडावे. . गरमा-गरम पौष्टिक धिरडे लोणच्याबरोबर, सॉसबरोबर, रायत्याबरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावे. . नोटः आवडत असल्यास ह्यात पालक , किसलेला मुळा,गाजर व बीट ह्यापैकी काही ही घालू शकता. कांद्याच्या पातीबरोबर कांदा ही चिरुन घालू शकता. ह्यात जवसाची पूड घालू शकता, जवस कोरडेच मिक्सरला लावून घ्यायचे व ती पूड ह्या पिठांमध्ये मिक्स करायची.

वाचन संख्या 28189
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

सॉलिड दिसतायेत. बघुनच भूक लागली.

पोटभरीचं उत्तम खाणं.

पाकृ आणि फोटूज आवडले. पूर्वी मला पोळ्या करता येत नव्हत्या (म्हणजे आता फार चांगल्या येतात असे नाही) तेंव्हा मी चक्क सरसरीत कणिक भिजवून अशी धिरडी करायचो.

छान दिसतयात धिरडी....सकाळच्या नाष्त्यासाठि मस्त पर्याय दिलास...थॅक्यु

लय लय लय आवडत्यात धिरडी....

ही पौष्टिक धीरडी माझ्या उपहारगृहात नाष्ट्याला ठेवावीत अशा विचारात आहे, त्यातच सर्व कौतुक आले. अभिनंदन.

मी सगळ्या डाळी (चार वाट्या चण्याची डाळ+प्रत्येकी दोन वाट्या मूगाची व उडीद डाळ+प्रत्येकी एक वाटी मसूराची व तुरीची डाळ) आणि तीन वाट्या तांदुळ हे सर्व एकत्र दळून ठेवते. आयत्या वेळी आवडीप्रमाणे लसूण्,कांदा, कोथिंबिर वगैरे मिक्स करावे. ही पण छान होतात.

अरे वा! एकदम न्युट्रीयन्ट ओव्हरलोड धिरडी आहेत, मस्त!