मी व शेअर बाजार
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
अनेक व बहुतांशी व्यक्ती कोणाच्या तरी सांगण्यावरुन अथवा उत्सुकता म्हणून शेअर बाजारात पडतात (दोन्ही अर्थाने). मग पस्तावतात, नाद सोडून देतात.
पण खरच शेअर बाजार माझ्यासाठी उपयोगी आहे काय? मी यातून संपत्ती निर्माण करु शकतो काय? या बाबत किती लोकं सिरिअसली विचार करतात. तुम्ही जर असा विचार करत असाल तर तुम्हाला हा लेख उपयुक्त आहे. (मात्र ज्याना अगोदरच शेअर बाजारातले बरेच काही कळते वा जे तज्ञ आहेत त्यांचे साठी हा लेख कवडी मोलाचा आहे, त्यानी म्या पामराला क्षमा करावी).
खरेदी करा व विसरुन जा.
देशातील एनएसीवर लिस्टींग झालेल्या पहिल्या पन्नास पैकी बँकींग सेक्टर मधील एक कंपनी, आयटी मधील एक कंपनी, ऑटो मधील एक कंपनी, पिएसयु मधील एक कंपनी, फार्मामधील एक कंपनी, एफएमसीजी मधील एक कंपनी अशा एकूण ६ प्रमुख आघाडीच्या कंपन्याची निवड करा (कंपन्यांची संख्या वगैरे तुमच्या क्षमतेनुसार कमी जास्त करा, सेक्टरची निवड तुमच्या वयानुसार व जोखिम स्विकारण्याच्या तयारीनुसार करा). या सर्व कंपन्यांचे प्रत्येकी आपल्या गुंतवणूकीच्या क्षमतेनुसार जेवढे खरेदी करता येतील तेवढे शेअर्स खरेदी करा. शक्य असल्यास प्रत्येक कंपनीचा किमान एक तरी शेअर प्रत्येक महिन्याला खरेदी करा व विसरुन जा. तुम्ही प्रथमत: गुंतवणूकीसाठी कंपनी निवडताना ती पहिल्या ५० पैकी असून तिला स्थापना होऊन किमान १५ ते २० वर्षे तरी झालेली आहेत अशीच निवडा. त्या कंपनीचे व्यवस्थापन हे अनुभवी, चांगले व्यावसाइक व पारदर्शी असावे. कंपनी नियमीत नफा मिळवणारी असावी. कंपनीची उलाढाल व नफा सतत वाढता आहे याची खात्री करा. आता तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहात म्हणजेच त्या कंपनीचे तुमच्याकडील शेअर्सच्या प्रमाणा इतके भागिदार झाले आहात हे पक्के समजा व सच्चा भागिदार हा वरचेवर शेअर्स विकत नसतो हे लक्षात ठेवा. टाटा, बिर्ला, अंबानी हे कधी त्यांच्या कंपनीचे स्वमालकीचे शेअर्स विकतात काय? तुम्ही सुध्दा त्यांच्याप्रमाणेच विचार करा म्हणजे तुम्हालाही शेअर्स विकण्याची बुध्दी होणार नाही.
हे आवर्जुन करा
जेव्हा जेव्हा बाजारात मंदी येवून तुम्ही घेतलेल्या शेअर्सचे भाव कमी होतील तेव्हा तुमच्याकडे असणारी रक्कम यात अवश्य गुंतवा व शेअर्सची संख्या वाढवा.
नियमीत अथवा जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच पुर्वी गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचेच शेअर्स खरेदी करा.
आपल्याकडील अतिरिक्त रक्कम शेअर बाजारात गुंतवा.
हे करु नका
शेअर्स विकू नका.
वारंवार शेअर्स खरेदी विक्री म्हणजेच ट्रेडींग करु नका.
डे-ट्रेडिंग अजिबात करु नका, हे फक्त ब्रोकरसाठी फायदेशिर व तुमचे नुकसान करणारे होते.
अफवांवर विश्वास ठेवू नका.
लोकांच्या टिपस् वर विसंबू नका.
कर्ज काढून शेअर्स खरेदी करु नका.
लक्षात ठेवा
बाजारात मंदी अथवा तेजी असली तरी या कंपन्या त्यांचा व्यवसाय चालूच ठेवत असतात.
नियमीत नफा मिळवत असतात.
नियमीत लाभांश देत असतात.
हे शेअर्स बाजारात मंदी आली व शेअरची किंमत कमी झाली तरी अथवा तेजी आली व किंमत वाढली तरी तुमच्याकडील असणारे शेअर्स विकू नका.
आंबा, नारळ इ. दिर्घकाळ चांगले व नियमीत उत्पन्न देणारी बहुतांशी झाडाना फळ धारणा होण्यासाठी १० ते १५ वर्षे लागतात, तसेच तुम्ही गुंतवलेल्या शेअर्सवरचा लाभ चांगला मिळण्यासाठी काही वर्षे द्यावीच लागतील.
लवकर सुरुवात करा
तुम्हाला नोकरी अथवा व्यवसायातून नियमीत दर महा उत्पन्न मिळू लागले कि लगेचच तुमच्या उत्पन्नापैकी काही ठरावीक रक्कम नियमीतपणे कंपन्यांच्या शेअर्समध्येच गुंतवावयास सुरुवात करा. लवकर व तरुणपणी सुरुवात करण्याचा फायदा हा आहे कि, सुरुवातीच्या काळात जास्त जबाबदा-या नसतात तेव्हा जास्तीत जास्त रक्कम या प्रकारे नियमीत दरमहा गुंतवता येईल. तरूण वय असल्यामुळे जोखिम स्विकारण्याकडेही कल असतो. तुमचे उत्पन्न जस जसे वाढत जाईल त्या प्रमाणात गुंतवणूकही वाढवत न्या. लग्ना नंतर व होम लोन वगैरे हप्ते सुरु झाल्यावर गुंतवणूक कमी करावी लागेल, म्हणून आत्ताच सुरुवात करा. तुम्ही फक्त नियमीत शेअर्स खरेदी करत रहा, त्याच्या भावाकडे अजिबात पाहू नका. मनाशी पक्के ठरवा कि तुम्ही तुमच्या भविष्यात चांगली संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करत आहात.
काय परतावा मिळेल?
१) दर वर्षी या आघाडीच्या कंपन्या, त्याना होणा-या नफ्यापैकी काही रक्कम डिव्हीडंड (लाभांश) म्हणून समभागधारकाना देतात. हे तुमचे करमुक्त उत्पन्न असते. तसे पहाता सुरुवातीला हे उत्पन्न फारच नगण्य वाटेल. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी काही वर्षे वाट पहावी लागेल.
२) या कंपन्या जेव्हा केव्हा बोनस शेअर देतील तेव्हा तुमच्याकडील शेअर्सची संख्या त्या प्रमाणात वाढेल व मिळणारे लाभांशाचे उत्पन्नही वाढत जाईल.
३) या कंपन्या काही वेळा राईट इशु आणतात, तेव्हा बाजारापेक्षा कमी भावाने तुम्हाला शेअर्स मिळतात.
४) या कंपन्या काही वेळा शेअर्स स्पि्लट करतात, या वेळीही तुमच्याकडील शेअर्सची संख्या वाढेल.
५) तुमच्याकडे जेवढे जास्त शेअर्स तेवढे तुमचे लाभांशाचे उत्पन्न जास्त मिळते.
६) तुम्ही प्रथमत: गुंवणूकीला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा लाभांश मिळेल त्याचे प्रमाण फारच अल्प म्हणजे १.५% ते ३% (तुमच्या गुंतवणूकीच्या तुलनेत) एवढेच मिळेल.
७) जस जसे तुमच्याकडील शेअर्सची संख्या वाढत जाईल व काही (किमान २०) वर्षे निघून जातील तेव्हा मिळणारा वार्षीक लाभांश हा सरासरी २५% ते १००% (किंवा या पेक्षा जास्त सुध्दा) या प्रमाणात (तुमच्या गुंतवणूकीवरील प्रमाणानुसार) काळानुसार वाढत जाईल.
८) जर तुम्ही तुमच्या गुंतवणूकीची सुरुवात वयाच्या २० ते २५ या दरम्याने केलेली असेल व जर तुम्ही नियमीतपणे वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करत रहाला तर नंतर दर वर्षी मिळणारे लाभांशाचे उत्पन्न तुमच्या सा-या गरजा भागवू तर शकेलच, परत तुमच्याकडे चांगली संपत्ती (शेअर्सचे मुल्य) निर्माण झालेली असेल.
टिप: मी शेअर ब्रोकर नाही. तुम्ही कोणाकडेही डिमँट खाते उघडा पण शक्यतो बँकेशी संलग्न असणारा ब्रोकर निवडा. सेवा चांगली असल्याची खात्री करा.
प्रतिक्रिया
धन्यवाद फार चांगली माहिती दिली....
पद्धत
काही शंका आहेत कदाचित बाळबोध
शंका आहेत
चांगले मार्गदर्शन
लेखा बद्दल धन्यवाद अशा एकूण ६
चांगला लेख व तुमचा ब्लॉग
इझ ऑफ अॅक्सेसीबिलिटी
बहुतेक माहिती चांगली आहे, पण
पण मंदीच्या काळात शेअर