इतिहास

नाना चेंगट's picture
नाना चेंगट in जनातलं, मनातलं
14 May 2012 - 12:01 pm

इतिहास म्हणजे असे असे घडले असे सांगणारी कथा.

इतिहास आपल्यापर्यंत अनेक मार्गांनी येतो.

लहानपणी आजीने, आईने सांगितलेल्या कथा. ज्यात भुते असतात, राक्षस असतात. चेटकीणी असतात. राजकुमारी असते. राजकुमार असतो. शेवटी लग्न होऊन ते सुखी होतात. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र लग्न झाल्यावर कथा अशी सहजासहजी सुखी होत संपत नसते. वाढणारे आयुष्य त्याची जाणीव करुन देते. मग लग्न झाल्यावर पुढे काय झाले हा विचार मनात येत रहातो. कल्पनाशक्ती सुसाट धावत सुटते आणि आपल्या स्वतःच्या, आजुबाजुच्या परिस्थितीशी साधर्म्य असणारी कथा आपलेच मन तयार करुन पुढे असे झाले असावे असा आपल्या मनाचा समज करुन देते. भन्नाट कल्पना शक्ती कितीही सुसाट धावत असली तरी तिच्यामधे वास्तवतेचा थोडा तरी अंश असतो त्यामुळे कथा, कादंबरी मधून समाजाच्या मनस्थितीचे, मागील इतिहासाचे धागेदोरे मिळतात. कल्पना आणि वास्तव यातील सीमारेषा काळाच्या ओघात पुसट होत जाते. कर्तृत्वशक्तीला गवसणी घालण्यासाठी आकाश मिळेनासे झाले की जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणेच जीवन जगण्याचे भोग नशिबी येतात आणि त्यातच जीवनाची कृतार्थता वाटू लागते. मग परंपरेने आलेल्या कथा कादंबर्‍यांनाच वास्तव समजून पवित्रतेचे आच्छादन घालुन मनाचे समाधान केले जाते. आणि कथेला इतिहासाचे रुप दिले जाते. ती कथा हाच खरा इतिहास आहे असे समजले जाते. इतिहासाचा विपर्यास इथे सुरु होतो आणि कथेतील इतिहासाचा अंश दाण्याप्रमाणे बाहेर काढून स्वाद घेण्याऐवजी फोलपटे खाल्ले जातात आणि दाणे फेकून दिले जातात.

इतिहास केवळ याच मार्गाने येत नाही. शाळेतुन इतिहास शिकवण्याची जबाबदारी राजसत्तेने उचललेली असते. राजसत्तेमार्फत केले जाणारे कुठलेही कार्य निर्हेतूक नसते. विशिष्ट तारतम्य बाळगून आवश्यक असलेला इतिहास संस्कारक्षम वयात मुलांना शिकवला जात असतो. सुजाण नागरीक बनण्यासाठी कायदेकानुन यांचे पालन करणे हे आधुनिक नागरी व्यवस्थेतील एक मुलभुत कर्तव्य आहे ही बाब बिंबवण्यासाठी इतिहासाचा आधार घेतला जात असतो. बहुमताचा रेटा असलेल्या लोकशाही देशांमधे कित्येकदा दरवर्षी वेगळा इतिहास पुस्तकांमधून शिकवला जातो. शाळांमधून शिकवल्या जाणार्‍या इतिहासामधे असे असे घडले असे सांगण्यापेक्षा जे काही असेच घडले असे बहुमताने सिद्ध होते ते सांगण्याचा प्रघात असल्याने अशा गमती होत असतात. सुदैवाने म्हणा अगर दुर्देवाने शालेय इतिहास हा फारसा गंभीरपणे अभ्यासला जात नसल्याने इयत्ता दहावीनंतर बर्‍याच जणांचे इतिहासाचे ज्ञान दोन चार राजे, त्यांचे जन्म मृत्यचे सन आणि महत्वाच्या लढायांचे स्थळे आणि तहाची कलमे यापुरतेच मर्यादीत रहाते. कॉलेजात गोड चेहर्‍यांच्या आणि नाजुक हातवार्‍यांच्या लयीत ते ज्ञान कधीच लयाला जाते.

काही जण मात्र झटून इतिहासाचा अभ्यास करतात. कुठल्यातरी महाविद्यालय अथवा विद्यापीठामधे चिकटतात. चिकटतांना त्यांचे जे ज्ञान असते तेच बर्‍याच वेळेस सेवानिवृत्त होईपर्यंत असते. मधल्या तीस चाळीस वर्षांमधे जे काही नवे संशोधन झाले, नवे पुरावे मिळाले, वेगळ्या उपपत्ती मांडल्या, हे सर्व त्यांच्या गावी नसते. कारण त्याचा अभ्यास करुन त्यांचा पीएफ बॅलन्स काही वाढणार नसतो. त्यापेक्षा संस्थाचालकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या, संस्थाचालकांच्या घरातील सदस्यांचा सोईस्कर इतिहास लक्षात ठेवल्यास अधिक फायदा असतो. इतिहासात संशोधन करुन काही मिळेल याची शक्यता कमी. बर्‍याचदा जे माहित होते ते चुकीचे होते असा निष्कर्षच निघण्याची शक्यता जास्त असते. नकोच तसले त्रासदायक काम.

अशा परिस्थितीत इतिहासाचे वर्णन करणारी कथानके, उपकथानके कथा कादंबर्‍यांचा वेष धारण करुन येतात. खटकेबाज संवाद, काळजाचा ठोका चुकवणारे प्रसंग, देवाची, धर्माची रक्षण करण्याचा विडा उचलणार्‍या माणसांची रेलचेल असलेल्या इतिहासामधे आपण रमुन जातो. धाड धाड आवाज करत जाणार्‍या घोड्यांच्या सैन्यासमवेत आपण रपेट करुन येतो. प्राणाची बाजी लावता लावता धारातीर्थी पडणार्‍या योद्ध्यांसमवेत आपणही जखमी होतो. त्यांच्या हालासमवेत आपलेही हाल होतात. त्यांच्या मुठी वळण्याआधी आपल्या मुठी वळलेल्या असतात आणि त्यांच्या अश्रुंच्या आधी आपला हुंदका बाहेर पडलेला असतो. अमुक गोष्ट जर अशी झाली असती तर नक्कीच तसे झाले असते असे आपण गळ्याच्या शिरा ताणून ताणून सांगतो आणि पगारवाढ होणार नाही कारण कंपनीची स्थिती खराब आहे हे सत्य विसरुन जाण्याचा प्रयत्न करतो. बहुतेकांचे असेच असते. प्रत्येक जण इतिहासातला तत्ज्ञ बनतो आणि दुसर्‍याची माहिती चुकीची आहे हे ठामपणाने सांगतो.

कधी तरी वेगळे पुस्तक समोर येते. आजवरच्या कल्पना चुकीच्या होत्या असे लेखक सांगतो. त्याचे मुद्दे चुकीचे नसतात. तेच सत्य त्याने वेगळ्या कोनातुन मांडले असते. त्याचा दृष्टीकोन चुकीचा असतो असे नाही. आपण तो विचार केलेला नसतो. मुळात आपल्याला विचार करायची सवयच नसते. आपण समोरील मनुष्य जे सांगतो ते बरोबर आहे हेच मनात धरत त्याचा तर्क आपलाच तर्क असे समजून वागत असतो. नंतर कधीतरी अजून वेगळा मनुष्य वेगळा तर्क घेऊन समोर येतो. मग लक्षात येते की इतिहास म्हणून ज्याला आपण आजवर कवटाळले आहे ते आणि खरा इतिहास यात कुठेही साम्य नाही. असे का होते?

खरी गोष्ट ही आहे ही इतिहास म्हणजे असे असे घडले या अर्थाने पहाण्यापेक्षा आपण इतिहासाकडे आपल्या भविष्यात आपल्याला काय हवे आहे ह्या दृष्टीने पहात असतो. आपल्या भविष्याचा आशा आकांक्षांना आपण भुतकाळातील सुवर्णकाळ असे नाव देऊन त्यांना प्रत्यक्षात आणू पहातो. यासाठी आपण हवे ते करतो. भुतकाळातील व्यक्तींना आपण विस्मृतीतुन खेचून आणतो. त्यांची थडगी उकरुन काढतो. सर्वभक्षी काळाने घाला घातल्यावर शांतपणे अग्नीच्या स्वाधीन झालेल्या त्यांच्या देहाचे तुकडे शोधून शोधून गोळा करतो. त्यांना भेसुर अशा मखमली वस्त्रांनी मढवतो. भरजली शेले आणि रुबाबदार पागोटे त्यांच्या मस्तकावर बांधतो. चुकून त्यांचे डोळे खरे बोलतील म्हणून त्यांच्या डोळ्यांच्या बाहूल्या हिरे माणक्यांनी चिणून टाकतो. त्यांच्या तोंडी आपण आपले संवाद टाकतो. त्यांच्या कृती आपण आपल्या पध्दतीने मांडतो. आपला धर्म त्यांना देतो. आपली कर्मकांडे त्यांच्या हातून करवतो. आपल्याला हवी असलेली फळे त्यांना मिळाल्याचे दाखवतो. आपल्याला हवा असलेला भविष्यकाळ त्यांना प्राप्त झाला होता असे दाखवून आपणही तसेच वागूया असे आपणच आपली समजूत घालत वागतो. या सर्व खटाटोपाकडे मुळचा इतिहास एका कोपर्‍यात दिनवाणा होत खुजा खुजा होता एक दिवस नष्ट होऊन जातो आणि आपण इतिहासाचे मढे मिरवत रहातो.

कुणी धर्माचे अधिष्टान मुलभुत प्रेरणा असे समजून इतिहासाची मांडणी करतो, कुणी वर्णाचे अस्तित्व ही मुलभुत प्रेरणा असे समजून इतिहास मांडतो. कुणी आर्थिक अस्तित्वाची लढाई ही संकल्पना मध्यवर्ती मांडतो तर कुणी वंशराजसत्ता टिकवणे ह्या प्रेरणेने इतिहास मांडतो. इतिहास प्रत्येक वेगवेगळ्या दृष्टीकोनातुन मांडता येतो. मांडला जातो. हा विचार एकदा समजला की इतिहासकाराचा हेतू त्याच्या मांडणी मागे हे समजून येते. ज्याला धर्माच्या आधारावर एकीकरण अपेक्षित असते तो धार्मिक आधार सिद्ध करतो. प्रत्येक लढाई, डावपेच ही त्याच दृष्टीकोनातून समोर येते. ज्याला धार्मिक कट्टरवादाच्या विरुद्ध लढा द्यायचा असतो तो इतिहासातील धर्म निरपेक्षता मांडण्याचा प्रयत्न करतो. भांडवलशाहीच्या विरुद्ध लढणारा त्याच इतिहासाला वर्गकलहाचे रुप देतो.

वेगवेगळे विचार मांडणारे पुस्तके, विश्लेषणे यांचा अभ्यास केल्यावर ते ते विचारवंत आपल्याला खुजे वाटू लागतात. पण आपण हे विसरता कामा नये की आपण त्यांच्या खांद्यावर उभे राहून त्यांच्याकडे पहात आहोत म्हणून आपल्याला ते खु़जे वाटत आहेत. त्यांच्या खांद्यावरुन खाली उतरुन आपण जमिनीवर उभे राहू तर आपल्याला कळेल की आपणही एका खुजा समुदायाचे भाग आहोत जो भविष्याच्याच नजरेने इतिहासाकडे पहात आहे.

मुक्तक

प्रतिक्रिया

sneharani's picture

14 May 2012 - 12:13 pm | sneharani

इतिहासाचा "इतिहास" चांगलाच शब्दबध्द् केला आहात!
ऑस्सम!
:)

बॅटमॅन's picture

14 May 2012 - 12:45 pm | बॅटमॅन

>>काही जण मात्र झटून इतिहासाचा अभ्यास करतात. कुठल्यातरी महाविद्यालय अथवा विद्यापीठामधे चिकटतात. चिकटतांना त्यांचे जे ज्ञान असते तेच बर्‍याच वेळेस सेवानिवृत्त होईपर्यंत असते. मधल्या तीस चाळीस वर्षांमधे जे काही नवे संशोधन झाले, नवे पुरावे मिळाले, वेगळ्या उपपत्ती मांडल्या, हे सर्व त्यांच्या गावी नसते. कारण त्याचा अभ्यास करुन त्यांचा पीएफ बॅलन्स काही वाढणार नसतो. त्यापेक्षा संस्थाचालकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या, संस्थाचालकांच्या घरातील सदस्यांचा सोईस्कर इतिहास लक्षात ठेवल्यास अधिक फायदा असतो. इतिहासात संशोधन करुन काही मिळेल याची शक्यता कमी. बर्‍याचदा जे माहित होते ते चुकीचे होते असा निष्कर्षच निघण्याची शक्यता जास्त असते. नकोच तसले त्रासदायक काम.

अगदी खरे आहे. पुणे (अथवा इतर कोणत्याही-काही सन्माननीय अपवाद वगळता) विद्यापीठातील इतिहास विभाग आणि भारत इतिहास संशोधन मंडळ यांची तुलना केल्यास हे सहज लक्षात येते. मंडळातील सर्व संशोधकांच्या तुलनेत हे इतिहासाचे तथाकथित प्राध्यापक तद्दन अज्ञानी असतात. यांचे अज्ञान पाहता असे डोक्यात जातात की काय सांगू. मराठी इतिहासाच्या प्राध्यापकाला धड मोडी वाचता येत नाही, मुघलकालीन इतिहासाच्या प्राध्यापकाला फार्सी येत नाही, जवळपास सगळे साले इंग्रजी पुस्तकांवरून शिकवतात. मूळ साधने वाचायची तसदी चुकून एखादाच घेतो. कशाला म्हणायचे यांना प्राध्यापक/संशोधक? काही संशोधन न करता थातुरमातुर शिकवूनदेखील यांना पैसे मिळतात, पण खरे संशोधक पैशाअभावी किती नडतात हे मी स्वतः पाहिले आहे. इतके करून त्यांची दखल पण जास्त घेतली जात नाही. निव्वळ परप्रत्ययनेय (बिन) बुद्धीच्या अशा लोकांचा तीव्र निषेध असो.

रमताराम's picture

14 May 2012 - 1:26 pm | रमताराम

नाना इतके सुंदर विवेचन केले आहेस की टोपी काढल्याविना राहूच शकलो नाही.

कल्पनाशक्ती सुसाट धावत सुटते आणि आपल्या स्वतःच्या, आजुबाजुच्या परिस्थितीशी साधर्म्य असणारी कथा आपलेच मन तयार करुन पुढे असे झाले असावे असा आपल्या मनाचा समज करुन देते.

कल्पना आणि वास्तव यातील सीमारेषा काळाच्या ओघात पुसट होत जाते.

शाळांमधून शिकवल्या जाणार्‍या इतिहासामधे असे असे घडले असे सांगण्यापेक्षा जे काही असेच घडले असे बहुमताने सिद्ध होते ते सांगण्याचा प्रघात असल्याने अशा गमती होत असतात.

<आमची रिक्षा> या तीन मुद्यांबाबतचे आमचे विवेचन आमच्या नुकत्याच इतिहासजमा झालेल्या 'जंगलवाटांवरचे कवडसे' मालिकेतील भाग १ मधे आले आहे. <आमची रिक्षा बाहेर>

परंपरेने आलेल्या कथा कादंबर्‍यांनाच वास्तव समजून पवित्रतेचे आच्छादन घालुन मनाचे समाधान केले जाते. आणि कथेला इतिहासाचे रुप दिले जाते.

शाळेतुन इतिहास शिकवण्याची जबाबदारी राजसत्तेने उचललेली असते. राजसत्तेमार्फत केले जाणारे कुठलेही कार्य निर्हेतूक नसते.

अमुक गोष्ट जर अशी झाली असती तर नक्कीच तसे झाले असते असे आपण गळ्याच्या शिरा ताणून ताणून सांगतो आणि पगारवाढ होणार नाही कारण कंपनीची स्थिती खराब आहे हे सत्य विसरुन जाण्याचा प्रयत्न करतो.

एकाहुन एक नेमकी विधाने. जबरदस्त!

कुणी धर्माचे अधिष्टान मुलभुत प्रेरणा असे समजून इतिहासाची मांडणी करतो, कुणी वर्णाचे अस्तित्व ही मुलभुत प्रेरणा असे समजून इतिहास मांडतो. कुणी आर्थिक अस्तित्वाची लढाई ही संकल्पना मध्यवर्ती मांडतो तर कुणी वंशराजसत्ता टिकवणे ह्या प्रेरणेने इतिहास मांडतो. इतिहास प्रत्येक वेगवेगळ्या दृष्टीकोनातुन मांडता येतो. मांडला जातो. हा विचार एकदा समजला की इतिहासकाराचा हेतू त्याच्या मांडणी मागे हे समजून येते. ज्याला धर्माच्या आधारावर एकीकरण अपेक्षित असते तो धार्मिक आधार सिद्ध करतो. प्रत्येक लढाई, डावपेच ही त्याच दृष्टीकोनातून समोर येते. ज्याला धार्मिक कट्टरवादाच्या विरुद्ध लढा द्यायचा असतो तो इतिहासातील धर्म निरपेक्षता मांडण्याचा प्रयत्न करतो. भांडवलशाहीच्या विरुद्ध लढणारा त्याच इतिहासाला वर्गकलहाचे रुप देतो.
एका परिच्छेदात आजपर्यंतच्या सार्‍या इतिहासाच्या मांडणीचे सार सांगितलेत की. पण हे एकारलेपण जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग असते. आपले तत्त्वज्ञान हा बाजारात मिळणार्‍या रेडिमेड कपड्यासारखे असते, एकाच मापाचा शर्ट सार्‍यांना फिट बसत नाही, काही जणांना तर स्वतंत्रपणे शिवून घ्यावा लागतो हे आपण डोळे उघडे ठेवून मान्य करत नाही. त्याच्या विरोधी पुरावे अस्तित्त्वातच नाही अशी ताठर नि हेकट भूमिका घेऊन आपण जगतो. मुळात सार्‍या विश्वाला फिट बसेल असा रेडिमेड शर्ट - त्यातील वैविध्य पाहता - अस्तित्त्वात असणे अवघड आहे हे समजून घेत नाही हेच तर दुर्दैव.

टोपी काढलेली आहे. बास. नानाने आता एक अक्षरही लिहिले नाही आयुष्यभर तरी काही बिघडत नाही. एका लेखात सारी कसर भरून काढली सायबा. कुर्निसात मालक.

मुक्त विहारि's picture

14 May 2012 - 1:27 pm | मुक्त विहारि

अप्रतिम...

रणजित चितळे's picture

14 May 2012 - 1:43 pm | रणजित चितळे

छान लेख. सहमत.

इतिहास जेत्याच्याच दृष्टीकोनातून लिहिला जातो.

शैलेन्द्र's picture

14 May 2012 - 2:13 pm | शैलेन्द्र

मस्त.. आवडला...

उदय के&#039;सागर's picture

14 May 2012 - 2:13 pm | उदय के'सागर

खुपच अप्रतिम. शब्द-न-शब्द अगदी खरा!

हे तर लाख बोललात "आपली कर्मकांडे त्यांच्या हातून करवतो."

परिकथेतील राजकुमार's picture

14 May 2012 - 2:16 pm | परिकथेतील राजकुमार

साला आमचा नान्या म्हणजे न कोळशातला हिरा आहे. असे काय काय लिहून जातो ना बरेचदा की बस नतमस्तक व्हावे.

नान्या आज रात्री आपल्याकडून तुला वाईन विथ तुझे आवडते चीझ चेरी पायनॅपल. आणि त्यानंतर डायरेक्ट नगर रोडला बारीला हजेरी.

साला आमचा नान्या म्हणजे न कोळशातला हिरा आहे. असे काय काय लिहून जातो ना बरेचदा की बस नतमस्तक व्हावे.

:)
सहमत आहे.

शुचि's picture

14 May 2012 - 2:23 pm | शुचि

ये हुई ना बात! वेगळाच लेख. खूप खूप आवडला.

प्रीत-मोहर's picture

14 May 2012 - 2:31 pm | प्रीत-मोहर

मस्तच नान्या.

आपली बी टोपी उडाल्या गेली आहे.

स्मिता.'s picture

14 May 2012 - 8:42 pm | स्मिता.

असेच म्हणते.

श्रावण मोडक's picture

15 May 2012 - 11:03 am | श्रावण मोडक

आपली बी टोपी उडाल्या गेली आहे.

नाना, करशील असं लेखन पुन्हा?

कसला जबरी लेख आहे.. नान्याची गाडी धडधड सुटली आहे.

- (नान्याला भेटण्याची अपेक्षा बाळगून असलेला) पिंगू

प्राध्यापक's picture

14 May 2012 - 3:32 pm | प्राध्यापक

अप्रतीम ,नाना चेंगट ,आपण शब्दप्रभु आहात.

प्रास's picture

14 May 2012 - 4:33 pm | प्रास

हे लई भारी लिवलंय की!

प्रथम वाचनी इतकंच म्हणतोय आणि लेख पुन्हा वाचायला घेतोय........

(अभ्यासू) प्रास

टुकुल's picture

15 May 2012 - 2:08 am | टुकुल

घाईघाईत मिपा उघडले, जास्त वेळ नव्ह्ता जवळ तरी हा लेख थोडा वाचुन सोडता नाही आला. संपवावा लागलाच :-)

घरी जावुन परत एकदा निवांतपणे वाचतो.

--टुकुल

पैसा's picture

14 May 2012 - 7:43 pm | पैसा

वाचनखूण साठवली आहे. कारण एकदा वाचून समाधान झालं नाही. नाना, इतके दिवस का गायब होतास?

तिमा's picture

14 May 2012 - 7:57 pm | तिमा

विचार करायला लावणारा लेख. जुन्या माननीय सदस्यांनी अशीच मिपाची पालखी पुन्हा एकदा खांद्यावर घ्यावी.

नितिन थत्ते's picture

14 May 2012 - 8:44 pm | नितिन थत्ते

फारच छान.

नुकत्याच आलेल्या एका दोन धाग्यांची प्रकर्षाने आठवण झाली.

सानिकास्वप्निल's picture

14 May 2012 - 8:59 pm | सानिकास्वप्निल

छान लेख ..आवडला :)

शिल्पा ब's picture

15 May 2012 - 3:14 am | शिल्पा ब

छान.

स्पंदना's picture

15 May 2012 - 5:28 am | स्पंदना

नाना. सुरेख विवेचन.

५० फक्त's picture

15 May 2012 - 7:07 am | ५० फक्त

इतिहास अन फार जुना इतिहास, ज्याला पुराण म्हण्ण्याची पद्धत आहे, त्यावर उगा फुकाच्या चर्चा करणा-यां साठी उत्तम उतारा आहे हा लेख. धन्यवाद.

छान लिहितोस की रे नान्या , मग मध्येच ते पांचट चहाचे काय सुचले ?

प्यारे१'s picture

15 May 2012 - 10:18 am | प्यारे१

अहो का चांगलं लिहीणारे चहा करत नाहीत का काय???????

हे म्हणजे
बाबासाहेब आंबेडकर ...नको त्यांचं नाव नको,
शिवाजी महाराज ...नको त्यांचं नाव नको,
मो. पैगंबर... नको त्यांचं नाव नको,
येशू ...नको त्यांचं नाव नको,
.
.
.
.
.
असो.

हे म्हणजे मी वाईट लिहीतो तर का घरची भांडी घासत नाही का???? ;)

प्रचेतस's picture

15 May 2012 - 1:27 pm | प्रचेतस

अप्रतिम लिखाण.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 May 2012 - 1:58 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2012 - 1:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तक आवडलं.

-दिलीप बिरुटे

किचेन's picture

18 May 2012 - 2:12 pm | किचेन

सुंदर.

मन१'s picture

18 May 2012 - 6:20 pm | मन१

ज्यांना समजायला हवे त्यांना कधीही समजणार नाही ह्याचीही खात्री आहे.

मृत्युन्जय's picture

18 May 2012 - 6:23 pm | मृत्युन्जय

च्यायला हा लेख का नाही आधी वाचला. सुरेख लिहिलाय.

चिगो's picture

18 May 2012 - 7:20 pm | चिगो

पराने लिहीलंय तसंच.. नतमस्तक..

खरी गोष्ट ही आहे ही इतिहास म्हणजे असे असे घडले या अर्थाने पहाण्यापेक्षा आपण इतिहासाकडे आपल्या भविष्यात आपल्याला काय हवे आहे ह्या दृष्टीने पहात असतो. आपल्या भविष्याचा आशा आकांक्षांना आपण भुतकाळातील सुवर्णकाळ असे नाव देऊन त्यांना प्रत्यक्षात आणू पहातो. यासाठी आपण हवे ते करतो. भुतकाळातील व्यक्तींना आपण विस्मृतीतुन खेचून आणतो. त्यांची थडगी उकरुन काढतो. सर्वभक्षी काळाने घाला घातल्यावर शांतपणे अग्नीच्या स्वाधीन झालेल्या त्यांच्या देहाचे तुकडे शोधून शोधून गोळा करतो. त्यांना भेसुर अशा मखमली वस्त्रांनी मढवतो. भरजली शेले आणि रुबाबदार पागोटे त्यांच्या मस्तकावर बांधतो. चुकून त्यांचे डोळे खरे बोलतील म्हणून त्यांच्या डोळ्यांच्या बाहूल्या हिरे माणक्यांनी चिणून टाकतो. त्यांच्या तोंडी आपण आपले संवाद टाकतो. त्यांच्या कृती आपण आपल्या पध्दतीने मांडतो. आपला धर्म त्यांना देतो. आपली कर्मकांडे त्यांच्या हातून करवतो. आपल्याला हवी असलेली फळे त्यांना मिळाल्याचे दाखवतो. आपल्याला हवा असलेला भविष्यकाळ त्यांना प्राप्त झाला होता असे दाखवून आपणही तसेच वागूया असे आपणच आपली समजूत घालत वागतो. या सर्व खटाटोपाकडे मुळचा इतिहास एका कोपर्‍यात दिनवाणा होत खुजा खुजा होता एक दिवस नष्ट होऊन जातो आणि आपण इतिहासाचे मढे मिरवत रहातो.

ही वाक्ये मी मिपावर वाचलेल्या, कशाला, आजपर्यंत वाचलेल्या सर्वोत्कृष्ट वाक्यांपैकी आहेत.. अत्यंत उत्कृष्ट विवेचन. व्वा, मालक व्वा !

राही's picture

3 Mar 2013 - 2:11 pm | राही

मलाही हाच परिच्छेद अतिशय आवडला. लेख तेव्हाही आवडला होताच पण सध्याच्या पार्श्वभूमीवर अधिकच समर्पक वाटला आणि (सध्याच्याच पार्श्वभूमीवर)उठून दिसला.

सोत्रि's picture

22 May 2012 - 11:45 pm | सोत्रि

हायला नान्या, लैच भारी रे!

हा लेख कसा काय वाचायचा राहिला काय माहिती :(

- (ऐतीहासिक) सोकाजी

मन१'s picture

3 Mar 2013 - 12:50 am | मन१

पुन्हा पटला.
प्रत्येक वाक्य quote करुन जपून ठेवण्यसारखं आशयपूर्ण; तरीही ओघवतं; समजेलसं.

अस्वस्थामा's picture

3 Mar 2013 - 4:02 am | अस्वस्थामा

अप्रतिम धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद..
बादवे हे आपण मनावर घेतलत की काय ? ;)

नीलकांत's picture

3 Mar 2013 - 8:24 am | नीलकांत

हा लेख वाचायचा राहून गेला होता.

नाना अप्रतिम लिहीलं आहेस.

विकास's picture

5 Mar 2013 - 10:14 pm | विकास

असेच झाले होते. खूप छान लेख आहे.

इतिहास लिहीणार्‍याने स्वतःच्या वृत्तीस, दृष्टीस, आणि प्रेरणेस मुलभूत धरून लिहिल्याने फरक पडत नाही. जेंव्हा तसे लिहीताना उद्देश हा जास्तकरून वर्तमानात कलह निर्माण करण्याचा असतो, तेंव्हा त्या समाजाचे/देशाचे वर्तमान आणि भविष्य बिघडू शकते...

बाकी, शा़ळेत शिकलेल्या विंदांच्या चारोळी आठवल्या:

इतिहासाचे अवघड ओझे, घेऊन डोक्यावर ना नाचा
करा पदस्थल त्यावर आणिक, चढून त्यावर भविष्य वाचा

ऋषिकेश's picture

1 Apr 2013 - 1:38 pm | ऋषिकेश

+१ असेच म्हणतो..
अतिशय छान लिहिलंय

रमेश आठवले's picture

3 Mar 2013 - 1:31 pm | रमेश आठवले

इतिहास हा शब्द मुळ संस्कृतातील - इति ह आस - म्हणजे- असे घडले होते - या वरून निर्माण झाला आहे.
नानांचा लेख आणि भाषा दोन्हीही उत्तम .

अन्या दातार's picture

3 Mar 2013 - 9:36 pm | अन्या दातार

एक एक वाक्य पटण्यासारखे. :)

कवितानागेश's picture

4 Mar 2013 - 1:16 am | कवितानागेश

हा लेख कसा काय वाचायचा राहून गेला कुणास ठाउक.
अप्रतिम! :)

स्पंदना's picture

4 Mar 2013 - 6:29 am | स्पंदना

कुठे हरवला अलिकडे तो
अमुचा नाना ॥

पैसा's picture

5 Mar 2013 - 9:15 pm | पैसा

कुठे हरवला? इतिहासजमा झाला!!

हासिनी's picture

6 Mar 2013 - 1:14 pm | हासिनी

लेख आवडला!
:)

मन१'s picture

1 Apr 2013 - 12:48 pm | मन१

हा धागा न वाचताच http://www.misalpav.com/node/24377 हा धागा निघाला का?

अशक्य जबरा लेख.. पुन्हा वाचला, पुन्हा पटला, पुन्हा आवडला. शिक चिन्म्या काही, शिक..

पूर्वी दुस-या संस्थळावर वाचला होता; तेव्हा आवडला होताच. आज पुनर्वाचनातही तितकाच आवडला.
इतिहासाचे असे भान सगळ्यांचे जागे झाले तर ... असा विचार मनात आलाच! :-)

सुमीत भातखंडे's picture

2 Apr 2013 - 12:46 pm | सुमीत भातखंडे

.

चिगो's picture

26 Jul 2019 - 4:59 pm | चिगो

मिपावरच्या जुन्या लेखांचं खोदकाम करतांना (वय झालंय वाटतं माझं आता ;-) ) हाती आलेलं हे रत्न.. ज्यांनी वाचला नसेल, त्यांनी आवर्जून वाचावा.

नानाला पुन्हा एकदा सलाम..

यशोधरा's picture

26 Jul 2019 - 5:57 pm | यशोधरा

सुरेख!

जगात आतापर्यंत जे काही इतिहास च्या नावावर शिकवलं जाते ते खोटे आहे आणि खरा इतिहास काही वेगळाच आहे हे तुम्ही कोणत्या आधारावर म्हणता .
तुम्हाला तस वाटत म्हणून की काही विशिष्ट घटनेचे लिखित पुरावे आहेत तुमच्या कडे

विजुभाऊ's picture

27 Jul 2019 - 11:18 am | विजुभाऊ

नाना चेंगट , अवलीया , आणि रामदास काका परत लिहीते व्हा मिपावर

प्रसाद_१९८२'s picture

27 Jul 2019 - 8:19 pm | प्रसाद_१९८२

बाकिच्या दोघांचे माहीत नाही. मात्र नाना चेंगट यांच्या सदस्यत्वावर क्लिक केल्यास खालील मेसेज येत आहे.

Access denied
You are not authorized to access this page.

नाना चेंगट यांचा आयडी ब्लॉक झालेला दिसतोय.