Skip to main content

ऑनर किलिंग की मानवी संवेदनांचा खून

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 22/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रातून " घराण्याची इज्जत वाचवण्याकरिता वडिलांनी आपल्या स्वतःच्या मुलीचा खून केला " अशी बातमी छापून आली होती . यावर कळस म्हणजे ती व्यक्ती स्वतः पोलीस स्टेशन मध्ये आपल्या गुन्ह्याची माहिती द्यायला हजर झाली. वाचूनच अंगावर शहारा आला . हल्ली नव्या जगात याला " ऑनर किलिंग " अशी संज्ञा आहे म्हणजे घराण्याची सो कॉल्ड अब्रू वाचवण्याकरिता आपल्याच जवळच्या व्यक्तीचा बळी देणे. वरील घटनेमध्ये बळी गेलेल्या मुलीने आपल्या जातीतील मुलाशी लग्न न करिता परजातीतील मुलाशी प्रेम विवाह करण्याची इच्छा दर्शवली आणि म्हणून शेवटी तिचा बळी गेला. पुरोगामी मनवून घेणाऱ्या महाराष्ट्राच्या समाज जीवनात जातीपाती वरून समाज मन किती दुषित झालेले आहे आणि समाज किती रसातळाला जात आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. दररोज सभोवताली घडणाऱ्या घटना जरा चौकस पाने पाहिल्यास हे अधिकच स्पष्ट होत जाते. दररोज वर्तमान पत्रांमध्ये जाती जातींची संमेलने भरण्याच्या जाहिराती दिसतात. बहुजन समाज संघ , मराठा सेना , कुणबी सेना , ब्राम्हण संघ , संभाजी ब्रिगेड , दलित मेळावा फक्त आपल्या ज्ञातीच्या लोकांचे कडबोळे करून त्याच त्याच जुन्या मध्ययुगीन आणि कालबाह्य कल्पनांचे रवंथ करत बसणे यालाच हल्ली सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे कारण यातून साधली जाणारी राजकीय समीकरणे . ( राजकीय विषयावर बोलणेच नको कारण कोळसा किती उगाळला तरी काळाच ). पण समाजाचे काय .....तो इतका संवेदनाहीन कसा झाला ....आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करणारे पालक वेळप्रसंगी त्यांचा जीव घेवू शकतात हेच खरे वाटत नाही. वरील प्रसंगात खोलात जावून चौकशी केल्यावर ज्या मुलाबरोबर त्या मुलीचे प्रेम संबंध होते तो दलित समाजातील होता अशी माहिती मिळाली आणि कोडे सुटले. त्या दलित मुलाच्या जागी जर उच्चवर्णीय मुलगा असता तर कदाचित त्याला अगदी सहज पणे स्विकारले गेले असते. किंबहुना एखादा परदेशी नागरिक असता तरीही त्याचे कोडकौतुक झाले असते परंतु स्वदेशी खालच्या जातीमधील सुयोग्य तरुण नकोसा झाला ही काय मनोधारणा . वडिलांची बाबागिरी आणि आईची आईगिरी ....पहिली बंद झाली पाहिजे. आपली मुलगी किंवा मुलगा म्हणजे आपली वैयात्तिक मालमत्ता नसून त्यांना देखील या देशाच्या घटनेने आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला आहे याची जाणीव असावी. जो पर्यंत आपले पाल्य आपल्या मनाजोगे वागत आहेत तो पर्यंत त्यंच्या वर प्रेम करायचे आणि जरा आपल्या मनाविरुद्ध काही झाले की त्यांच्या विरोधात अगदी टोकाला जायचे अशी एक मानसिकता हल्ली तमाम दिसू लागली आहे आणि ही मानसिकता असणारे पालक फक्त झोपड पट्टीत राहणारे अशिक्षित लोकच नसून अगदी सुशिक्षित आणि उत्तम अर्थकारण असणारे लोक देखील यात सहभागी आहेत. लग्न आणि तत्सम गोष्टींमध्ये आपल्या जातीची आणि घराण्याची ?? प्रतिष्ठा पणाला लागली असे मानणारा मोठा वर्ग या नव्या जगात अस्तित्वात आहे. सभोवताली जाती-पाती च्या तसेच धर्माच्या भिंती उभ्या करत असताना आपण या समाजाला कुठे घेवून चाललो आहोत याची जाणीवच कोणाच्या मनाला उरली नाही याचाच खेद वाटतो. एकविसाव्या शतकातील भारत हा धर्मनिरपेक्ष , जाती रहित , भाषा आणि प्रांतवाद रहित असावा असे स्वप्नं आपल्या पूर्वजांनी पहिले होते. त्या करिता सर्व प्रथम आपल्या शाळा प्रवेश वेळी अर्जावरील धर्म आणि जात हा कॉलम पहिला काढून टाकला पाहिजे. जाती पतींवरून असलेली आरक्षणे काढून टाकली पाहिजेत . एकदा आरक्षणाचे फायदे गेले की मग आपल्या ओळख पत्रावर आपल्या जातीचा उल्लेख असावा असे कोणालाही वाटणार नाही. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला " मुक्ता " नावाचा चित्रपट याच विषयावर आहे ...त्यात एक संवाद आहे " जात व्यवहारातून जाईल हो कुलकर्णी साहेब पण मनातून कशी जाणार? .तुमच्या साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी एखादा महार येईल कदाचित..... पण तुमच्या घरात महार जावई चालेल तुम्हाला ? " हे वाक्यच अश्या लोकांची मानसिकता सांगून जाते. नुसता विचार नको आचार बदलला पाहिजे ......जातीरहित ...धर्मरहित ..समाज आपल्या पुढच्या पिढी कडे सोपवण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे...आणि महत्वाचे म्हणजे ...समाज सुधारेलच हळू हळू पण सर्वप्रथम आपले घर सुधारुया !!!! यशोधन वर्तक ९३२३९३८२९०.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1603
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया