धूपगंध (२)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
16 Apr 2011 - 12:20 am

रंगमंचावर सगळी पात्रे समोर हात जोडून उभी असतात
आणि खणखणीत आवाजात नांदी सुरू होते.
" नमन नटवरा विस्मयकारा.... "

धूपगंध https://misalpav.com/node/17550
आबा बारगीरकर त्या पात्रांत स्वतःला शोधतात. त्याना त्यात आबा कुठेच दिसत नाहीत. मास्टर गंगाधर सुद्धा दिसत नाही.
मास्टर गंगाधर.... जन्मजात नाव गंगाधर नव्हते पण आई लहानपणी लाडाने गंगाधर म्हणायची तेच नाव रंगमंचावर वापरले. अवघ्या १४ बर्षाचा असताना घर सोडले तेंव्हाच वडीलाना तुमचे नाव लावणार नाही असे ठणकावत सांगितले होते. घर सोडताना आई माजघरात गुपचूप रडत होती. वडीलांची इतकी धास्ती की तोंडातून हुंदका देखील काढायची हिम्मत नव्हती काही बोलली नाही तरी आईचे टपोरे डोळे मात्र बरेच काही बोलले होते.आईची आठवण म्हणून मास्टर गंगाधर नाव घेतले. बारगीरकर हे आडनाव तेंव्हाच सोडले. बहुतेक सौभद्रच असेल ते ..... ऐन दौर्‍यात कुणीतरी बाबा गेल्याची बातमी सांगितली. अर्ध्या रात्री टांग्यातून घरी गेलो होतो.....बाबा खरेतर चार दिवसांपूर्वीच गेले होते.अस्थी सावडूनही झाल्या होत्या. धाकट्या भावाने त्यांचे संस्कार केले होते आपल्याला बातमी नंतर समजली होती . आइ कधीतरी पाच सहा वर्शांपूर्वीच गेली होती. ती गेल्याचे सुद्धा बाबानी आपल्याला सांगायची मनाइ केली होती. धाकटा विष्णू ..... नगरपालीकेत कारकून होता. बाबानी त्याला मोठा भाऊ अपघातात वारल असे सांगितले होते.
का बरे बाबांचा आपल्यावर एवढा राग असेल? नाटकाची आवड त्यानासुद्धा होती. त्यानीच तर आपल्याला नाटकाची आवड लावली होती. नारायणरावांची गाणी ते नेहमी गुणगुणायचे. त्याना गाणे खूप आवडायचे. लहानपणी आपण ती गाणी म्हणायचो तेंव्हा त्याना कित्तीतरी आनन्द व्हायचा.
आपल्याला गाणे यावे म्हणुन शिकवणी सुद्धा ठरवली होती.
नारायणराव बोडसांचा एक मोठ्ठा फोटो दिवाणखान्यात नेहमी लटकत असायचा .
पण मग आपण नाटकमंडळीत गेल्याचे त्याना एवढे वाईट का वाटले?
हा प्रश्न कधीच सुटला नाही? का आपण हा प्रश्न स्वतःला कधी विचारलाच नाही.
आबा ना अचानक जाणीव झाली......अवघड वाटणारे प्रश्न आपण नेहमीच बाजूला ठेवून दिले आणि त्यावर विचार करणेही टाळले.
ज्येष्ठ मुलगा म्हनून आपण बाबांप्रमाणे शिक्षक व्हायला हवे होते. शिक्षक म्हणून मिळणारा मान त्याना आवडायचा. आईलासुद्धा ते आवडायचे. चैत्राच्या हळदीकुंकवाला तीला बारगीरकरमास्तरांची मंडळी म्हणून विषेश मान असायचा. सर्वांआधी तीची ओटी भरली जायची.
बाबा इतिहास शिकवायचे....संस्कृत शिकवायचे. शक्ल पच मुच रिच प्रच्छितः ही कारीका बाबानी शिकवली होती.
कालीदासाने वापरलेल्या रंभोरु या शब्दाची फोड त्यानी काय छान संगितली होती.
मेघदूत शिकवताना
हस्ते लीलाकमलमलके बालकुन्दानुविद्धं नीता लोध्रप्रसवरजसा पाण्डुतामानने श्रीः
चूडापाशे नवकुरबकं चारु कर्णे शिरीषं सीमन्ते च त्वदुपगमजं यत्र नीपं वधूनाम्
या ओळीत कालीदासाची प्रतिभा कुंद, शिरीष , कमळ या फुलानी मढलेली अलका नगरीतील सुंदरी अक्षरशः डोळ्यांसमोर उभी करते हे सांगताना बाबा जणू स्वतःच यक्ष व्हायचे. घरातल्या त्या झोपालळ्यावर मग मेघदूत रंगायचे अंगणातील जास्वन्दी तगर पळस विंध्य पर्वताची शिखरे व्हायचे. आकाशातील ढग जमीनीवर यायचे. रात्रीची उत्तररात्र कधी व्हायची ते कळायचे नाही.
ढग होऊन आई आज्जी सगळेच मेघदूताचा आनंद घ्यायचे.
बाबानी खरेतर कीर्तन करायचे. ते उगाच शिक्षक झाले. काळारामाच्या उत्सवात बाबा कीर्तन करायचे. बारगीरकर बुवांच्या कीर्तनाला ही गर्दी व्हायची.
राम वनवासाला जातो तो प्रसंग ऐकताना गर्दी अयोध्या वासी व्हायची. सीतेसोबत राम लक्ष्मण दशरथाच्या राजवाड्यातून बाहेर पडताना गर्दीतील प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रूधारा लागायच्या.
वाणी अक्षरशः गंगौघ व्हायची. बाबाना आपण कीर्तनकार व्हावे असेही वाटायचे.
कधीतरी छान मजेत असताना बाबा संस्कॄत कोडी घालायचे.
को रंजयती प्रौढाणाम... को रंजयती तरुणानां ....
कीर्तन....नर्तकी
अशी मजेदार उत्तरे असणारी कोडी त्यंच्या खजिन्यात नेहमीच असायची
त्या काळात जगातल्या कोणत्याही मुलाना लाभणार नाहीत असे मित्र असणारे बाबा आपल्या नाटक कंपनीत जान्याच्या निर्णयावर इतके का बिथरले असावेत?
छे हे असे प्रश्न सुटत नसतात. . तो प्रश सोडवून तरी काय मिळणार आहे? बाबा जाऊनही जवळजवळ ३५ वर्षे झाली.
त्या जाणीवेसरशी आबा पुन्हा थोडेसे मोठे झाले
आबाना त्यांच्या समोर नांदीसठी नटवृंद उभा असल्याची जाणीव झाली.
धूपाचा तो परिचीत वास पुन्हा जाणवला ऑर्गनचे सूर ऐकु यायला लागले आणि नटवृंदाने एकसाथ एका सूरात म्हणायला सुरुवात केली
नमन नटवरा विस्मयकारा...................

( क्रंमशः )

संस्कृतीनाट्यप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रास's picture

16 Apr 2011 - 12:28 am | प्रास

धूपगंध छान दरवळतोय..... आवडतोय.....

क्रमशः वर फार वेळ घेऊ नका बरं का.....

धूपगंधप्रिय -

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2011 - 12:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धूपगंध छान दरवळतोय

-दिलीप बिरुटे

मिसळपाव's picture

16 Apr 2011 - 1:48 am | मिसळपाव

...को रंजयती प्रौढाणाम... को रंजयती तरुणानां ....
कीर्तन....नर्तकी

हे खासच आहे !!

प्राजु's picture

16 Apr 2011 - 2:05 am | प्राजु

अरे वाह!! वाचतेय!!

मस्त, विजुभाउ तुम्ही लिहित रहा आम्ही वाचत राहु..

अवांतर - संगीत नाटकांचा विषय निघाला आहे तर एक मागणी आहे,

कुणाकडे - ' नयनि ती ही बहुप्रेमला, मज धर्म हा समजाविला' ह्या नाट्यपदाची एम्पी३ किंवा लिंक आहे का, मला हवी आहे.

यशोधरा's picture

16 Apr 2011 - 10:44 am | यशोधरा

वाचतेय विजूभाऊ...

sneharani's picture

16 Apr 2011 - 12:18 pm | sneharani

मस्त! वाचतेय्..येऊ दे पुढचा भाग!

विजुभाऊ's picture

18 Apr 2011 - 2:17 pm | विजुभाऊ

.
धन्यवाद

क्रान्ति's picture

18 Apr 2011 - 8:24 pm | क्रान्ति

अतिशय सुरेख झालाय हाही भाग.

पुढचा भाग कधी ल्हिताय विजुभाऊ?

पद्मावति's picture

12 Dec 2015 - 11:38 pm | पद्मावति

वाह, दोन्हीही भाग अतिशय सुंदर झाले आहेत.
पुढील भाग लवकरच येईल अशी आशा करते.