Skip to main content

सुरळीच्या वड्या

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 13/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी बेसन (चणाडाळीचे पीठ) २ वाट्या पाणी ३/४ वाटी ताक १ इंच आले+२-३ हिरव्या मिरच्या भरड वाटून किंवा पेस्ट मीठ चवीनुसार १/२ टेस्पून हळद १/२ छोटी वाटी खवलेले ओले खोबरे १/२ छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर फोडणी चे साहित्यः २ टेस्पून तेल १/२ टीस्पून मोहरी १/२ टीस्पून तीळ चिमूटभर हिंग पाकृ: पीठ चाळायच्या चाळणीत बेसन, आले+मिरची पेस्ट, मीठ, हळद, ताक व पाणी घालून गाळून घेणे म्हणजे गुठळी होणार नाही. . जाड बुडाच्या पातेल्यात गाळलेले मिश्रण घालून गॅसवर ठेवावे व सतत ढवळावे. . मिश्रण घट्टसर होत आले की झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवावे. . शिजलेले मिश्रण असे दिसेल. . स्टीलची ताटं पुसून कोरडी करावी , पाणी , तेल अजिबात लावू नये. तयार मिश्रण गरम असतानाच ताटावर पटपट पसरावे. . त्यावर सुरीने उभ्या रेषा माराव्यात व त्यावर तयार फोडणी , खोबरे, कोथंबीर घालावी. . अलगदपणे पट्टी गुंडाळून वड्या तयार कराव्यात. . पुदिनाच्या चटणीसोबत खायला द्याव्यात. (नुसत्याही खायला छान लागतात :) ) .

वाचने 27829
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

शॉल्लीट दिसतय..... करून पाहील पाहिजे.....

वा वा वा...मला सुव फार्फार आवडतात, ते शेवटचं नाजूकपणे वड्या गुंडाळायचं काम जमेल की नाही याची शंका वाटतेय..पण नक्कीच करुन बघेन

काय मस्त दिसत आहेत त्या वड्या! मला खूप आवडतात. एकदा करायला घेतल्या होत्या पण बेत फसला. पीठ शिजवताना त्यात गाठी झाल्या. पसरवल्यावरही ते काही पोळीसारखं एकसंध झालं नाही. शेवटी कैरीच्या डाळीसारखं चमच्याने खाल्लं होतं. पुन्हा करायची हिम्मतच झाली नाही.

आआआआआआआआआआआआ अरे हा आयडी बॅन करा रे ! आता आज चकण्याला कावेरीत सुरळीवड्याच. ठरले ! अवांतर :- बर्‍याच दिवसांनी '१ इंच आले' वाचनात आले. 'टेक वन इंच ऑफ जिंजर अँड किस इट' आठवले ;)

मस्त जमल्या वड्या, पण खोबरे-कोथिंबिर पसरण्यात इतका चिक्कूपणा का? दुकानांत तयार मिळणार्‍या सुरळी वड्या फक्त बाहेरुन गुंडाळी करतात आणि मग त्यावर नावापुरते खोबरे कोथिंबिर पेरतात. खरी सुरळीवडी तीच जी सारणाला पोटात घेऊन गुंडाळली जाते. हे सुरळी वडी प्रकरण म्हणजे 'उडाला तर पक्षी, नाहीतर बेडूक' या कॅटॅगरीतले. पीठ सैल झाले, की ताटाला चिकटत नाही आणि घट्ट झाले, की मग पिठले म्हणून खाणे आले. म्हणून नवी म्हण. 'साधली तर सुरळीवडी, नाहीतर पाटवडी' हे पीठ बरोबर शिजले आहे, याची अचूक वेळ म्हणजे पीठाला जीभ येणे. म्हणजे स्पॅट्युलावर मिश्रण उचलून भांड्यात पडू दिल्यास ते पताकेसारखे दिसते. (हा एक फोटो हवा होता इथे) जेव्हा तेल लावलेल्या ताटलीवरची ती सुरळी वडी हलक्या हाताने अलवार गुंडाळली जाते तेव्हा तिच्यावरची चमक बघण्यासारखी असते.

In reply to by योगप्रभू

अहो काय सांगू माझ्या नवर्‍याला जास्त खोबरे-कोथिंबीर घातलेली आवडत नाही :( म्हणून कमी घातले...प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अगदी बरोबर शिजलेल्या पीठाला जीभ येणे म्हणजे पीठ तयार , तसा फोटो काढला ही असता,पण काय करू सगळे फोटो काढा आणी पा़कृ पण बनवा सगळं एकत्र जमवणं तसं कठीणच होत. मी पा़कृ मधे सांगितले आहे की ताट्लीला तेल, पाणी लावायचे नाही कारण वडी उचलणं कठीण होतं, मिश्रण शिजवताना हळद घातली तर वड्या छान चकचकीत दिसतात.

माझा आवडता प्रकार. :) (कोथिंबीर्-खोबर्‍याचं सारण मात्र भरपूर हवं बॉ! नाहीतर मजा नाय! :() -रंगा

नेहमीप्रमाणेच पाकृ व फोटु खासच, म्हणजे आम्ही खलासच! वरच्या योगप्रभूंच्या टीपाही आवडल्या.

मी या धाग्यावर आलोच नाही, फटु पाहीलेच नाहीत आणि जळजळसुद्धा झालीच नाही! हुश्शऽऽऽऽऽ!!! वाचलो!!! :-) (इनोचा मोठा डोस, सुरळी के वडी के नाम) --असुर

हेच काय ते करुन बघायचं राह्यलंय !! करुन बघेन आणि फोटुही डकवेन, डकवेपर्यंत वड्या शिल्लक राह्यल्या तर !!

मी ही करुन बघेन.............खुप मस्त झालेला दिसतोय...... आवडीचा पदार्थ... पण या साठी खूप वेळ जातो म्हणून केला जात नाही...कोणी आयता दिला तर आवडतोच.

शेवटचा फोटो जबरदस्त :) माझ्या ह्या वड्या बरेचदा फसल्यात :( मी ह्यात अगदी थोडासा मैदा घालते, त्यामुळे वड्या चकचकित होतात

मी ही अशाच करते. माझीही अत्यंत आवडीची डिश आहे. एकदा मी २ वाट्या पाण्याऐवजी, थोडासा पालक शिजवून तो २ वाट्या पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घातला होता. आणि घातला होता. त्याने रंग हिरवा आला होता वड्यांचा. चवीलाही तशा चांगल्या लागत होत्या. कधीतरी वेगळाप्रकार म्हणून ठीक आहेत.. एरवी या पिवळ्या धम्मक वड्याच आवडतात.

मस्तच दिसतायेत ह्या सुरळीच्या वड्या. बाकी तो शिजलेल्या मिश्रणाचा फोटु अगदी आम्रखंडासारखा दिसतोय :) हे सुरळीच्या वड्या करायचं काम मात्र अगदीच बेभरवशाचं असतं, थेट पाकिस्तानच्या टीम सारखं - खेली तो टीम , नही तो तुक्का :)

एकदम झकास, प्रयत्न करुन बघेन

माझी आवडती पाकृ. फोटो एकदम मस्तं आहे .

सहीच. पण हे करायला साधारण किती वेळ लागतो ?

छान...सध्यातरी शेवटच्या फोटोशीच मतलब आहे... पण वेळ मिळाला की करून बघेन.. बाकी सुरळीच्या वड्यांची पाककॄती म्हणलं की "वार्‍यावरची वरात" नाटकाची आठवण होते :-).

लय भारी ...एकच नंबर.... माझा खुपच आवडता पदार्थ,,.... सानिकास्वप्निल लगे रहो....अजुन येउ द्या.... फोटो कृती छानच....आईला आठवण करुन द्यावी लागणारे...

सोपी (वाटणारी) क्रमवार कृती आणि सुरेख प्लेटिंग ! मी खोबरं अजिबात खात नाही पण या पदार्थासाठी थोड़ा अपवाद करतो :-) कधीच न चुकवता जे पदार्थ सौंना करता येतात त्या पैकी हा एक. वरुन chilly oil चा शिडकाव केल्यास १ गुण जास्तीचा.