Skip to main content

कथाकाराची कैफियत!

लेखक पिवळा डांबिस यांनी रविवार, 11/05/2008 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच मिपावर 'अब्दुल खान' लिहीलं. चार भागात विखुरलेलं असूनही वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक भागाची शेकडो वाचनं झाल्याची नोंद झाली. मिपावरच्या मित्रमैत्रिणींनी अगदी हातचं काही न राखता मनापासून कौतुक केलं. खूप खूप बरं वाटलं. काही वाचकांनी 'क्रमशः' बद्द्ल गोड तक्रारीही केल्या. पण त्या पुढचं वाचायच्या उत्सुकतेपोटी असल्याने त्याचं काही वाटलं नाही. एका नवोदित ललित लेखकाला सुरवातीच्या लिखाणालाच अशी शाबासकीची थाप पाठीवर पडली की त्याला किती हुरूप येतो हे शब्दांत मांडता येण्याजोगं नाही. एकदा असाच, मला वाटतं तिसरा की चवथा भाग लिहीत होतो. विचारांची लिंक अगदी मस्त लागली होती. झराझरा पुढची वाक्यं सुचत होती. डोक्यातल्या विचारांचा पाठलाग करतांना टाईप करत असलेली बोटं थकत होती.... आणि इतक्यात आमचे चिरंजीव जवळ आले, "डॅडी, व्हेन कॅन वुई गो फॉर स्विमिंग?" हे कार्टं अगदी अमेरिकन होत चाललंय. त्याला सगळं मराठीबिराठी येतं, अगदी स्तोत्र आणि श्लोकांसकट! पण आईबापांशी मराठीतून बोलेल तर शपथ!! भारतातून आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईक आले, अथवा आम्ही मुंबईला गेलो तर सगळ्यांशी व्यवस्थित मराठी बोलतो, पण आईबापांशी? रामा शिवा गोविंदा!! "ए गपरे! मी काम करतोय!" आमचा द्वैभाषिक संवाद सुरू झाला... "बट ऑल यू आर डूईंग इस रायटींग इन मराठी" स्क्रीनकडे नजर टाकत तो म्हणाला. "तेच! मी मराठी कथा लिहीतोय!" "कथा मीन्स स्टोरी? व्हाय?" "मला मिसळ-पावच्या साईटवर द्यायची आहे" तो थोडा थांबला. काहीतरी डोक्यात चालू होतं. मग पुन्हा विचारतो कसा, "डॅडी, कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन?" "आता नाही, मग! आता मी लिहीतोय, दिसत नाही का?" "बट इट इज रिलेटेड टू धिस..." "बोला.." "प्रॉमिस मी, यू वोन्ट गेट अँग्री..." "हं..." "इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" मी त्याच्याकडे बघतच राहिलो. काय बोलावं तेच मला सुचेना. इतक्यात पाठीमागून आवाज आला... "हा, हा, हा, हा, हा!!!' बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... "वा, वा, क्या बात है!! बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां सुभानल्ला!!" ती आनंदातिशयाने चीत्कारली!! "नुसत्या मिपावर मिळणार्‍या शाबासक्यांनी फुशारून जाऊ नकोस! खरा लेखक असशील तर हाही अनुभव मिपावर लिहीशील!!" तिने खिजवलं. फक्त तिची जिरवण्यासाठी ही गोष्ट प्रामाणिकपणे आणि अत्यंत दु:ख्खद अंतःकरणाने इथे लिहीत आहे... सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8384
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया