धोनीला साष्टांग नमस्कार
पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना जिंकल्याबद्दल.
त्याने नेहरा व मुनाफ पटेलला संघात का घेतले या सामना सुरु होण्यापुर्वी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल. तो सामना सुरु होण्यापुर्वी म्हणाला की नेहरा संघात असला की बरेच पर्याय असतात.
त्या वेळेला समलोचकांनी आणि आमच्यासारख्या (अनेक .. किंबहुना सर्वच) अडाणी लो़कांनी त्याला शिव्या घातल्या व सामना आता हरलाच ही खात्री मनाशी बाळगुन, जीव मुठीत धरून, सामना बघायला लागलो.
हा पर्याय, जेव्हा पाकी फलंदाज नेहराच्या गोलंदाजीवर सहज खेळत होते, तेव्हा अगदी नापास पर्याय दिसायला लागला. दूरदर्शनच्या पडद्यावर डोळे अश्विनला शोधायला लागले. पण त्यात काही अर्थ नव्हता, नेहरा मैदानात होता, संघात होता.
पण धोनीचे डोके थंड होते. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यातून धडा घेतला होता. यावेळेस धोनीने आपल्या गोलंदाजांना अगदी व्यवस्थीत हाताळले. त्याला यावेळेस रैना किंवा सघिन (आणखी एक नमस्कार) यांच्या गोलंदाजीची आवश्यकता भासली नाही. याची कारण असेही असू शकते की पाकी फलंदाज आणि द.आ.चे फलंदाज यात फरक आहे.
महादेव सचिन आणि त्यांची प्रतिकृती विरेन्दर यांनी नेहेमीप्रमाणे दणदणीत सुरुवात केल्यावर असे वाटले की ३०० धावा आपण ४०व्या षटकांतच पार करू. पण गौतम, विराट आणि युवी यांनी तो बेत हाणून पाडला. शेवटी रैनाच्या खेळीमुळे आणि उमर गुल याने मनापसून मदत केल्यामुळे २६० धावांपर्यंत कसेबसे पोचलो.
असाच आणखी एक प्रश्न होता - रैनाला संघात का घेतले असावे ? त्याचे ऊत्तर रैनाने एक अत्यंत जबाबदार आणि विश्वासू खेळी करून दिले.
पाकी संघाने या धावसंख्येस आपल्याकडून होईल तेव्हढा .. नव्हे त्याहुनही जास्तच हातभार लावला .. किंबहुना .. हात लावला नाही. अहो किती ते झेल सोडायचे ? शेवटी सचिनला लाज वाटायला लागली. मला नको जा असे रडीच्या डावाने केलेले शतक .. असे म्हणून तो स्वतःहूनच बाद झाला.
आता .. २६० ही काही फार मोठी धावसंख्या नाही. पण आपल्या(?) मनमोहनसिंगांनी सांगून ठेवले होते - मैदानावर मला माझा गेम कयानीला दाखवता आला पाहिजे. शिवाय राहुलही आला होता आपल्या आईचा पदर धरून. या सगळ्यांचा पाकी फलंदाजांवर फार फार दबाव आला. शिवाय नेहरा आणि पटेल ..शिवाय युवराज यांचे चेंडू आपल्यापर्यंत कधी पोचतील, याची वाट बघून बघून कंटाळून पाकी फलंदाज सगळे बाद झाले. मिसबा तर शेवटी रूसून धावाच घेत नव्हता... कप्तान करा, मगच मी धाव काढीन असे त्याने खुणांनी सांगीतले. पण उत्तर येइपर्यंत सामना संपला होता !
यापुढे, आपण सर्वांनी अशी शपथ घ्यावी की धोनीने कुणालाही संघात घेतले, तरी निमुटपणे मान्य करावे.
वर्गीकरण
एक लेख
-१
In reply to -१ by रमताराम
जाउ दे रे रारा.. रिझल्ट
In reply to -१ by रमताराम
नाय तर काय ? अगदी रमत गमत