ब्याटबॉल स्टंपा आणि घामटा..
आता क्रिकेटशी अजिबात संबंध नाही. पण लहानपणी घनिष्ठ होता.
..त्यामुळे या मिपा जल्लोशात भर म्हणून आमचाही एक सरपटी चेंडू..
जो आपण जिंकला तो (नवसाचा) आणि त्यानंतरचा एक अशा दोन वर्ल्डकपच्या वेळी शाळकरी हापचड्डी पोरं होतो आम्ही.. तिकडे वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरु झाल्या की आम्ही पोरं अंगणात त्याहून जास्त उत्साहाने फसफसत घामटा गळेपर्यंत क्रिकेट खेळत रहायचो.
टी.व्ही.चा व्हॉल्यूम फुल्ल. आणि मग त्यातून "हॉ" असा आनंदी चीत्कार आला की आम्ही गोटीब्याट टाकून तेवढा काय फोर किंवा सिक्स असेल तो शॉट रीप्ले मधे बघायला आत पळायचो.
मग परत आमचा खेळ सुरु. अगदी बॉल अंधारात दिसेनासा झाला तरी.
रात्रीच्या गिळायची वेळ झाली की घरचे शोधायला यायचे.
कोकणातल्या मातीने तांबडेलाल झालेले आम्ही रात्री आंघोळ करायचो तेव्हा लाल "खून की नदियां" टाईप ओघळ वहायचे मोरीतून.
या अंगणी क्रिकेटचे नियम तर अफलतूनच. त्याची नियमावली म्हणून एक पुस्तक बनवायला लागेल. म्हणजे, लोकल फिल्डच्या भूगोलावर ते नियम अवलंबून असायचे. चौधरीच्या कंपाउंडमधे खेळत असलो तर- कंपाउंडबाहेर गेला की आउट. एक टप्पी आउट. तिथे पलीकडे विहीर होती.. त्यात शॉट गेला की आउट तर आहेच, प्लस मारणार्याने बादली सोडून तो पडलेला बॉल नेम धरून बाहेर काढावा किंवा "भरून द्यावा"..अर्थात नवा आणून द्यावा.
ती शेजारच्या निर्जन आवारातली खास कोकणातली भुताळी विहीर होती..बळीबिळी घेणारी..खोल.. काळीशार..
त्यामुळे बहुधा त्यात "बाल्दी" सोडण्याऐवजी तो ब्याट्स्मन पोरगा बी.आर.आय किंवा एम.आर.आय चा नवीन लाल बॉल वाण्याकडून घेऊन यायचा.
आता खूप वर्षं झाली आहेत, पण मला आठवतील त्या गल्ली क्रिकेटच्या व्हर्शन्स आणि नियम मी सांगतो :
क्रिकेटसाठी लागणार्या बेसिक जिनसा :
-बॅट -
जालंधरमधे बनवलेली गुळगुळीत एरंडेलासारखा वास येणारी खरीखुरी भारी ब्याट परवडू शकणारा पोरगा माझ्या गल्लीत तरी नव्हता. त्यामुळे कोणतंही फळकूट घेऊन मेकशिफ्ट अरेंजमेंट केली जायची. शिवाय शुभ्र रंगाच्या साध्या स्वस्त बॅट विकणारे काही सज्जन फेरीवाले क्रिकेट सीझनमधे गावाबाहेर उघडं दुकान लावायचे. तिथे जाऊन साग्रसंगीत खरेदी व्हायची.
खेरीज कोकणाची देणगी म्हणून नारळाच्या झावळीच्या मधल्या लाकडाचा कोयत्याने कापलेला तुकडा हाही बॅट म्हणून वापरण्यासारखा एक आयडियल प्रकार होता. झावळीच्या मधल्या कण्याला असलेल्या निमुळत्या शेपमुळे आपोआप हातात धरायला बारीक हँडल आणि खाली फताडा किंचित वक्र फळीसारखा भाग मिळायचा. वेगळ्या तासकामाची गरज नाही.
शाळेत वापरली जाणारी पुठ्ठ्याची कडक पॅड्ससुद्धा बॅट म्हणून वापरली आहेत. बीलिव्ह इट ऑर नॉट. मात्र या प्रकारच्या बॅटचा उपयोग वर्गात किंवा खोलीत इनडोअर क्रिकेट खेळताना जास्त व्हायचा आणि त्यासाठी सरपटी बॉल चालायचा नाही. सर्व खेळ वरच्यावर हवेत चालायचा.
-बॉल -
सीझनचा बॉल गावात मिळायचाच नाही. मिळाला तर परवडायचा नाही. आणि चुकून कोणी दाखवायला आणला तरी आमच्या कोकणातल्या खडबडीत कातळी जमिनीवर तो असा काही वेडावाकडा उडायचा की आम्हाला तो जमायचाच नाही.
मग दुसरा ऑप्शन म्हणजे एमआरआयचा टेनिस बॉल. हा मऊ कव्हरवाला. हाही खूप महाग.
आमच्या उपरिनिर्दिष्ट धेडगुजरी ब्याटांमुळे आमचे बॉल दर दोन दिवसांनी फुटून दोन शकलांत परिवर्तित व्हायचे. (बाय द वे.. यातले एक शकल ..भकल म्हणावे हे जास्त उत्तम.. हे उलटं ताणून त्यात माती भरायची आणि कोणाच्यातरी पायात ठेवून पळायचं. दहाबारा सेकंदात ते फट्ट करुन सरळ व्हायचं आणि माती "टार्गेट"वर उधळली जायची. कुत्रे हे आवडतं टार्गेट असायचं कारण ते सूं सूं करुन त्या शकलाचा वास घ्यायला जायचे आणि तेवढ्यात फट्ट करुन सचैल मृत्तिकामुखप्रक्षालन करुन घ्यायचे..)
विषयांतर झालं.
तर बॉलचा पुढचा ऑप्शन म्हणजे भरीव कॉर्क किंवा बुचाचा चेंडू. शिवाय घरात खोलीच्या आत खेळायला कापडी चिंध्यांचा बॉल. अगदी ऑड म्हणजे गुलमोहोराच्या शेंगा कुटून त्याचा चिकट पल्प लाडूसारखा वळून वाळवला की बॉल व्हायचा. ("प्रोसेस"मधली चू.भू. दे.घे.)
स्टँडर्ड ऑप्शन म्हणजे बीआरआय कंपनीचा लाल नक्षीवाला रबरी बॉल. स्वस्त टिकाऊ. हरवला तरी दिलावर ओरखडा नाही.
-स्टंप-
हे कधी तीन उभ्या काठ्यांच्या स्वरुपात वापरल्याचं आठवत नाही. कोकणातला एक उभा चिरा (जांभा दगड) किंवा भिंतीवरच्या दोन-तीन रेषा, दोन चपला, स्कूटरचं चाक किंवा एकूणच सर्वानुमते मान्य असा एक चौकोनी आकारविशेष हा स्टंप म्हणून ग्राह्य धरला जायचा. या सर्व प्रकारात स्टंपला "उंची" ही डायमेन्शन नसल्याने आउट होऊ घातलेला ब्याट्समन नेहमीच बॉल उंचावरून पास झाल्याचा जोरदार दावा करायचा..
त्यानंतर पंचनामा, प्रत्येक उपस्थित साक्षीदाराने त्या काल्पनिक स्टंपवर हाताने बॉलचा उड्डाणमार्ग दर्शवणे, उच्चारवात ताणाताणी अशा मार्गांनी "आउट" की "नॉटाउट" ते ठरायचं.
भिंतीवरचा एक इमॅजिनरी चौकोन हाच स्टंप असला की मग बॉलचा "छाप" कुठे उमटलाय त्यावर "बोल्ड"आहे की नाही ते ठरायचं. बॉल ओला असला तर भिंतीवर ताजा छाप सहज दिसायचा. पण एरवी मात्र तो छाप आत्ता पडला की आधीपासूनच होता यावर कचकावून खडाजंगी व्हायची.
......
आता या तीन बेसिक जिनसा जमल्या की यायचे ते अत्रंग नियम. त्यातल्या काहींची झलक :
१) करंट आउट - बॉलरच्या साईडला एक छोटा दगडच स्टंप म्हणून ठेवलेला असायचा. बॉलरने त्याला पाय लावला आणि बॉलला स्पर्श केला तरी त्याच्या शरीरातर्फे करंट पास होऊन तो बॉल जणू स्टंपला लागला आहे असं समजून आउट द्यायचं.
२) एक टप्पी / दोन टप्पी कॅच आउट.- थेट कॅच घेतला तर आउटच पण बॉलचा एक टप्पा पडून मग कॅच घेतला तरी आउट.
३) भिंतीवर टप्पा कॅच आउट.- भिंतीवर बॉल आपटला आणि हातात आला तर तो टप्पा न समजता थेट झेल समजणे.
४) लांजेकरांच्या कंपाउंडमधे बॉल गेला की आउट. कारण तिथे वासराएवढा मोठ्ठा कुत्रा होता.
५) दीड ब्याटएवढे "क्रीज"..याची एक रेष ब्याटीनेच मातीत आखली जायची आणि रनाउटच्या मोक्याच्या वेळी ती पुसली गेलेली असायची. की परत ब्याट जमीनीवर धपाधप आडवी घालून ती दीडब्याटीची लाईन काढली जायची आणि लगेच आपण त्या रेषेच्या आत होतो हे सिद्ध करण्याचा कलगीतुरा सुरु.
६) "बॉलरला स्टंप दिसतील अशा बेताने उभा रहा" असं बॅट्समनला सांगणे म्हणजेच "कव्हर मागणे"
७) बॅटिंग "घेतली" तर फिल्डिंग "दिलीच" पाहिजे. बॅटिंग घेऊन पळून जायचं नाही.
८) कॉमन प्लेअर अलाउड आहे. विषमसंख्येच्या मित्रचमूत समसमान टीम पाडताना एका प्लेअरला कॉमन अर्थात दोन्ही बाजूंनी खेळावे लागेल.
९) टॉस म्हणजे चपट्या दगडावर थुंकून तो हवेत उडवणे.
१०) "फास" बॉल अलाउड नाही.
११) बॉल सरपटी टाकला तर रडीचा डाव.
१२) ज्याची बॅट त्याला दोनदा आउट अलाउड.
१३) लेफ्टी खेळणार्याला भलती प्रतिष्ठा. मग राईटी असलेली पोरंही बळजबरी डावीकडे तोंड करुन लेफ्टी बनून उभी राहायची.
१४) कितीही रीतसर आउट झाला तरी बॅट्समनने शांतपणे बॅट सोडायची नाही. बचावाचा पूर्ण प्रयत्न करायचा. आपल्या टीममधला एखादा चमचा वकील म्हणून घ्यायचा. तरीही पाड न लागल्यास जाताजाता बॅट फेकून "घे..घे बॅटिंग हवी ना तुला..तुझी लाल.." असं म्हणून कुस्करी करायची.
एक फ्रेंच क्रिकेट म्हणून प्रकार असायचा. त्यात पायाला बॉल लागला की आउट. असा नेम धरुन मारण्याला कोचून मारणे किंवा कोची बॉल म्हणायचे.
कोकणात मासे रापतात.. त्या संदर्भाने असेल, पण कॅच सोडण्याला "रापणे" म्हणायचे आणि सारखा सारखा कॅच सोडला की त्या पोराला "राप्या " म्हणून पर्मनंट नाव पडायचं.
.................
आणिही खूप काही आहे. गल्ली क्रिकेट हा नुसता खेळ नाही. ते बालविश्व आहे.
अजूनही वाटतं की त्याच कंपूसोबत त्याच अंगणात एका फळीने बॉल पिदवून घामाघूम व्हावं. दुपारच्या भाजत्या उन्हात "ड्रिंक ब्रेक" घेऊन मित्राच्या आईने केलेलं कोकम सरबत ढसाढसा प्यावं.
तशीच नेटाने सेन्च्युरी काढावी. समोरचा बॉलर रडायच्या घाईला यावा. रात्र व्हावी .. बॅट, बॉल स्टंप दिसेनासे होईपर्यंत काळोख व्हावा.. आणि आईने शोधायला यावं..घरी येऊन ती गरम पाण्याची आंघोळ (खून भरी..!!) ..आणि बाहेर कुकरची शिटी वाजावी..
या झाल्या जुन्या मेमरीज. आता स्थूल प्रकृति आणि जीवनरगाडा यामुळे क्रिकेटशी इतका कमी संपर्क उरला आहे की ज्याचे नाव ते..
..पण आता मिपाच्या क्रिकेट फीवरमुळे ही खूप वर्षांची मरगळ झटकली गेलीय आणि माझ्यासारखे क्रिकेटपासून दूर गेलेले खूप फॅन्सही पुन्हा या जोशील्या माहोलात खेचले जाताहेत ही गोष्ट एकदम धमाल आहे. त्याबद्दल मिपाचे आभार..
..कोण जाणे नवीन ब्याटबॉलची खरेदीही होईल लवकरच..
याद्या
11296
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखन आवडले.
मस्त लिहिले आहे, शेवट जास्त
मस्त
In reply to मस्त लिहिले आहे, शेवट जास्त by गणेशा
शिवाय घरात खोलीच्या आत
+१
In reply to शिवाय घरात खोलीच्या आत by नरेशकुमार
मस्त हो गवि. लहानपणीचे
प्लॅस्टिकचा बॉल फुटला कि
In reply to मस्त हो गवि. लहानपणीचे by परिकथेतील राजकुमार
गवि जुन्या आठवणींना उजाळा
सही
>> लहानपणी नेहमी वाटायचे की
In reply to सही by सहज
मस्त हो गवी... फ्रेंच
अह प्रह तिही मह लेख भन्नाट
गवि लेख मस्तच!!!!
मस्त!
साला हा गवि. एकदम्नॉस्टेल्जीक
In reply to मस्त! by पैसा
मस्त लेख
मस्त लिहिलंय... आम्ही गॅलरीत
मस्तच हो गवि, एकदम नास्टालजिक केलंत
खुप मस्त लेहिले आहे अमोल
छान!
फ्रेंच क्रिकेटवरुन आठौलं. लेग
अरे ते : "कुजी बात नस्से" ची
हा हा हा मस्तंच ... मला
आता..
मस्तंच
व्वा व्वा वा....
आणि कोणी चिक्कीबॉल करून
त्या शेंगांची चिक्की
In reply to आणि कोणी चिक्कीबॉल करून by बॅटमॅन
अगदी अगदी! लै लै बॉल बनवायचो
In reply to त्या शेंगांची चिक्की by अन्या दातार
अक्षरशः आत्ताही आठवतोय तो
In reply to त्या शेंगांची चिक्की by अन्या दातार
उत्खनन
हा धागा कसा काय सुटला ????????माझ्याकडून......
अरे इरसाल,
In reply to हा धागा कसा काय सुटला ????????माझ्याकडून...... by इरसाल
स्साला
In reply to अरे इरसाल, by वपाडाव
बरोबर वप्स........
In reply to अरे इरसाल, by वपाडाव
नेहमीसारखंच,वाचायचं राहुन कसं
आम्हि
मित्रा,
In reply to आम्हि by मी-सौरभ
:)
In reply to मित्रा, by वपाडाव
अंधारात बॉल दिसेनासा
गवि परत एकदा वाचून तेवढाच
जुन्या आठवणी जागवलयत
वाह...!
लहानपणची सुंदर सफर घडवलीत.
डावरे खेळायचे