दसरा झाला आणि बघता बघता दिवाळी समोर येऊन ऊभी राहिली. घराची आवराआवरी, साफ़सफ़ाई करताना मुख्य ऎवज असतो घरातील रद्दी! आजकाल मुख्य पेपर + त्याच्या खंडीभर पुरवण्या यांनी बघता बघता रद्दीचा डोंगर होतो. रद्दी आवरताना पुन्हा एकदा नजरेखालून पेपर जातातच. नवरात्राच्या नऊ दिवसातील पेपर व त्यांच्या पुरवण्यांमध्ये सर्वत्र वेगवेगळ्या मंडळांच्या देवींची चित्रे, फ़ोटो व त्यांची वर्णने असतात. हे वाचून खूप चांगले वाटते म्हणूनच टाकून मात्र देववत नाही. पण त्या पेपरांचा काही उपयोगही करता येत नाही. कारण ते वापरणार कसे? कपाटात खाली कसे घालणार? फ़राळाच्या डब्यात कसे काय देवीला खाली घालणार? कचर्याच्या डब्यात खाली कागद टाकताना वाटते चुकून देवीचा फ़ोटो असलेला पेपर तर नाही गेला? गणपतीच्या दिवसात पण असेच होते. गणपतीच्या दहाही दिवसात बाप्पाचे वेगवेगळे सुंदर फ़ोटो, देखावे यांनी सगळे पेपर भरलेले असतात. माझ्या माहितीत अशी खूप माणसे आहेत ते ही सर्व चित्रे कापून ठेवतात. पण एवढे फ़ोटो ठेऊन त्याचे करायचे तरी काय? आणि दरवर्षी या फ़ोटोत वाढच होणार. ते फ़ोटो चुरगळले गेले, चुकून कचर्यात टाकले गेले तर मनाला सतत टोचणी लागते ते वेगळेच.
याला काही उपाय नाही का? म्हणजे वेगवेगळ्या मंडळांनी बसविलेल्या गणपतींचे, देवींचे फ़ोटो न देता नुसती वर्णने करायची.(कल्पना करायला ही नको वाटते ना?) अर्थात आजकालच्या Marketing च्या जमान्यात पेपरला फ़ोटो आले की जास्तीत जास्त लोक तिथे प्रत्यक्ष भेटी देण्याची शक्यता असते. असेलही. पण फ़ोटो न देता नुसती वर्णने पण प्रभावीपणे करता येतात की. आता उदाहरण द्यायचे झाले तर "अष्टविनायक" चित्रपटातील "अष्टविनायका तुझा महिमा कसा? दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा" या गाण्यात अष्टविनायकांचे इतके सुंदर वर्णन खेबुडकर साहेबांनी केले आहे की मूर्तीमंत आठही गणपती डोळ्यासमोर उभे रहातात. असेही खेबुडकर साहेबांच्या प्रभावी प्रतिभेचे प्रत्यंतर आपण प्रत्यही घेतच असतो. मी तर असे ऎकले आहे की हे गाणे जेंव्हा त्यांनी लिहीले तेंव्हा प्रत्यक्ष ते अष्टविनायकाला एकदाही गेले नव्हते. "जे न देखे रवी ते देखे कवी" म्हणतात ते उगाच नाही.
दिवाळी झाल्यावर ख्रिश्चन बांधवांचा नाताळ सण येईल पण येशूख्रिस्ताच्या फ़ोटोनी पेपर एवढे कधीच भरत नाहीत. बकरी ईद, रमझान ईद वगैरेच्या बाबतीतही तसेच. असे का? बरे आपल्याकडे सगळ्या देवांच्या बाबतीत हे घडत नाही. म्हणजे दत्तजयंतीला दत्ताच्या फ़ोटोंनी एवढे पेपर भरत नाहीत. शंकर, राम, मारुती या सगळ्या देवांच्या बाबतीतही त्यांच्या त्यांच्या उत्सवाला एवढे फ़ोटो कुठे येतात?
गणपती बाप्पाला तर आपण इतका जवळचा मानतो की त्याला आपण आपला मित्रच करून टाकले आहे. म्हणूनच My friend Ganesha सारखे सिनेमे निघतात. देवी तर काय सार्या दुनियेची आईच आहे. आणि आई नेहमी जवळचीच असते. म्हणजे एव्हढा जिव्हाळा/जवळीक देवाप्रती निर्माण झाल्यावर त्यांच्या चित्रांची/फ़ोटोंची आपल्याकडून जाणते/अजाणतेपणाने विटंबना होऊ द्यायची का?
पूर्वीच्या काळात ऋषिमुनी घनदाट अरण्यात जाऊन किंवा डोंगर द्र्याखोर्यात जाऊन एकाग्र मनाने नामस्मरण/जप करीत खडतर तपाचरण करायचे. इतकी एकाग्रता असायची की अंगावर मुंग्यांनी वारुळ केले तरी त्यांची समाधि भंग पावत नसे असे पुराणात दाखले आहेत. त्यांच्यासमोर कोठलीही मूर्ती नसायची. पण आपल्या सारख्या सामान्य लोकांचे मन एकाग्र होण्यासाठी, एक दिशा मिळण्यासाठी त्यांनी आपल्याला मूर्तीपूजेची सुरूवात करून दिली. म्हणजे लहानपणी आपण मूळाक्षरे गिरवून लिहायला शिकतो. एकदा लिहायला येऊ लागले की आपण सुलेखनाचा आधार सोडून देतो. मोठेपणी परिक्षेला जाताना काही कोणी मूळाक्षरे गिरवून जात नाही. पूर्वीच्या ऋषिमुनींना आपल्याकडून हेच अपेक्षित असावे. एकदा का मन एकाग्र झाले की आपल्याला स्वत:च्या अंतरंगात डोकावून स्वत:मध्ये दडलेला देव सापडेल असे त्यांना वाटले होते. पण आपण मूर्तीचा/फ़ोटोंचा आधार सोडतच नाही. म्हणूनच एव्हढी व्रतवैकल्ये, पूजाअर्चा करूनही, देवळांपुढे रांगा लाऊनही, जास्त पैसे देऊन स्पेशल दर्शन घेऊनही कोणी समाधानी होताना दिसत नाही. असे आपले मला वाटते.
असो.
आगामी दिपावली मिपा च्या सर्व सभासदांना सुखाची, समृद्धिची, भरभराटीची जावो हीच सदिच्छा.
वाचन संख्या
1824
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिलं आहे. हे मात्र खर
लेख आवडला.
सुंदर लेखन...
सुरेख लेखन
झाडांमधे?
In reply to सुरेख लेखन by सुधीर काळे
आहे खरी मोठी अडचण
नास्तिकातले नास्तिक हिंदूसुद्धा .....
general वर्तमानपत्रांच्या तुकड्यांबद्दल
In reply to नास्तिकातले नास्तिक हिंदूसुद्धा ..... by सुधीर काळे
प्रभाआत्या, लेखन चांगले झाले
लग्नाच्या आमंत्रण पत्रिका
योग्य विषय...