तळ्याचं रुप फार सुरेख आहे.
अलगद वा-याच्या झुळकेबरोबर डोलत असतं. कधी खट्याळपणा करत किना-याला ढुशी देत देत उठणा-या लाटा किना-यावरुन मागे परततांना आता पुरे असे म्हणुन मागे हटणा-या मैत्रिणीची आठवण करुन देतात. कोणती आठवण कधी येईल याचा काही नेम नसतो. तळ्यातला मासा पकडणारा ससाणा कसा ऐनवेळी सूर मारुन मासा पकडतो हे आजवर मला कळले नाही. ते कळले तर कदाचित मनात अचानक येणारा विचार कुठुन पटकन येतो हे कोडे पण सुटेल. पण कोडे सुटणार नाही हे नक्की. का ते माहित नाही, पण आयुष्याची मजा कमी होउ नये असे वाटत असेल तर काही काही कोडी न सुटलेलीच चांगली असतात.
शांत डोळे मिटुन बसलेली सूसर हळूच हालचाल करत चालायला लागते. आताशा सरावाने मी उचंबळणा-या लाटांमधुन सुसरीमुळे तयार झालेली हालचाल ओळखायला लागलो आहे असे वाटते. पण कधी तरी घोळ होतोच. शिकार झाल्यावर कळते, सुसर जागी झाली होती. सुसर जागी झाले की मासे पळुन जातात. पण तळ्यात राहुन जाणार कोठे? कधीतरी सुसरीच्या तावडीत सापडतातच. पण कधीतरी मोठा मासाच धरतो. तळ्यातलं जीवन असंच आहे. एकमेकांशिवाय रहाता येत नाही. पण एकमेकांना मारल्याशिवाय जीवन पुढे सरकत नाही.
कधीतरी तळं निवांत होतं. शेवाळ्याचा दाट हिरवा थर पसरतो. बहुरंगी शेवाळं जसं गालिच्यासारखं दिसतं. एकच हिरवा रंग. पण त्याच्या किती छटा दिसतात. बघत रहाव्या अशा. कधीतरी सूर्याच्या कवडशात त्या मोरपंखी गालिच्याकडे पाहिलं आणि तिची आठवण आली. असाच शालु पांघरुन आयुष्यातुन निघुन गेली. भलती आठवण येते आणि डोळे धुसर होउन जातात. आठवणींना हाकलुन दिले तर आयुष्यात काय राहिल असा विचार मनात येतो आणि परत त्या गाभा-यात दडवुन ठेवतो.
पावसाची झिमझिम चालु झाल्यावर गालिचा कुठे जातो कळत नाही. अलगद पडणारे थेंब कधी तडतड करत कोसळायला लागतात ते कळत नाही. मुकाट्याने वर्षाव सोसत असणारं तळं आता बेभान होउन नाचायला लागतं. नाचता नाचता मखमली गालिच्याच्या उरलेल्या खुणा पुसल्या जातात पण काही काही अवशेष शिल्लक रहातातच, नंतर कधीतरी परत डोकं वर काढण्यासाठी. काल अशीच ती रस्त्यात दिसली. ओळख न दाखवता गेली पुढे, पण वळुन पाहिलंच असेल. खरं तर वळुन का पहावं? पण पाहिलं असेल असं म्हणुन समाधान करुन घेतो. यातना जरा कमी होतात. पण अशी न पहाणारी ती काय एकटीच आहे का? त्यावेळी तर तसंच वाटत होतं. तुझ्याशिवाय जगुच शकणार नाही. असं कधी घडतं का? मला नाही वाटत.
पावसाळा संपला की पिठुर चांदणं पसरतं. तळं भलतंच निखरुन जातं. मंद सुटलेला वारा सलगी करत केस भुरु भुरु उडवतो. असेच उडणारे केस हाताने सावरत तिने छातीवर डोके घुसळलं होतं. स्वर्गसुख का काय म्हणतात ते हेच असा विचार करत मी तिला हळुवार थापटत होतो. आज त्याच आठवणी वैराण आयुष्याला सुखावह करण्यास मदत करत आहेत.
त्याच तळ्यात एक डोह आहे. मध्यभागी. खोल. कधीतरी त्या डोहातला तो काळाकभिन्न साप हळुच वर येतो आणि वाकुल्या दाखवतो. पहिल्यांदा फार भिती वाटली होती त्याला पाहुन. अनामिक चेतना नको तेव्हा जागृत करायचा. डोलायला लागला की सगळं जग दिसेनासं व्हायचं. हळु हळु सवय झाली. येतो मधुनच केव्हातरी आणि तळं पार ढवळुन काढतो. कधीतरी शांत होतो तेव्हा फक्त आक्रोश उरतो. पुढे पुढे सवय झाली. आजकाल मित्रासारखा झाला आहे. मला पाहुन गप्प बसतो. पण तरी भिती वाटते मला तळ्यात घेवुन जाईल आणि डोलायला लावेल. आता फक्त त्याच गोष्टीचं भय आहे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3086
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाना, अरे तु काय लिहितोयस
सहमत.
In reply to नाना, अरे तु काय लिहितोयस by अर्धवट
आजकाल मित्रासारखा झाला आहे.
हाय क्लास
जरी काळरात्र होती ती तुझ्या
वाहवा!
शेवाळ
तरल !
नाना... नुकतीच गटारी झाली,
ह्म्म हा नाना असेच काहीतरी
नानु, शेवटचा परीच्छेद सोडला
शेवटचा परीच्छेद
!
छान लिहिता हो तुम्ही. मग इतके
सहि......
अरे नान्या नान्या लेका एवढा
आवडलं!
मस्त रे नाना........अजून येऊ दे.
सर्व वाचकांचे आणि
बरोबर
In reply to सर्व वाचकांचे आणि by अवलिया