कोणे एके काळी...
कोणे एके काळी...
कोणे एके काळीच म्हणावे लागेल. कधी घडले यावर जर एकमत नसेल, असे काही घडलेच नसेल असे तथाकथित विचारवंत ठासुन सांगत असतील, पण सत्य कुठे अग्नी वा कुठे धुराच्या रुपात लोककथांमधुन, बोलीतुन पुढे सरकत असेल, त्याला इतिहास म्हणुन मान्यता द्यायची की नाही यावर काथ्याकुट चालत असेल तर माझ्यासारखा सामान्य माणुस कोणे एके काळी असे घडले असे म्हणुनच सुरवात करणार.
तर कोणे एके काळी.
काशी नगरीतल्या एका वृद्ध ब्राह्मणाची कथा. पहाटे उठावे. गंगेवर स्नान करावे. काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे. घरी येवुन नित्य नैमित्तिक पूजा अर्चा करावी, वाचन मनन चिंतन लेखन करावे. कित्येक संस्कृत ग्रंथांचे लेखन करणारा हा ब्राह्मण सर्व लोकांमधे अतिशय प्रिय होता. शिष्यांना मार्गदर्शन करुन तयार करावे असा दिनक्रम चाललेला असायचा. गेले कित्येक पिढ्या चाललेला हा नेम. आजुबाजुच्या परिसरात एक ज्ञानी, सारासार विचार करणारा विवेकी पंडीत म्हणुन ख्याती झालेली. काशीविश्वेश्वर म्हणजे सर्वस्व !
एके दिवशी स्नान करुन शंभू महादेवाच्या दर्शनाला जात असतांनाच रस्त्यावर सैनिक आडवे आले. पुढे जाण्यास मनाई केली. चौकशी करता कळाले पातशहाचा हुकुम आहे देवळात जाण्यास बंदी आहे. व्यथित मनाने घरी आले. दोन चार दिवसांत परत सुरळीत होईल अशी भाबडी आशा मनाशी धरुन गंगेवर जावे, स्नान करावे, कळसाच्या दिशेने हात जोडुन नमस्कार करावे, घरी परतावे. वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. कुणी काय सांगायचे, कूणी काय.. जीवाची घालमेल वाढत चालली. विश्वेश्वर आता परत दिसणार नाही हे मनाला ठाम कळले. ब्राह्मण हताश झाला. जीवनातले सर्वस्व संपले. जगुन तरी काय फायदा? मृत्युचे विचार मनात रुंजी घालु लागले. मन हताश झालं की शरीर साथ देईनासं होतं. दिवसेंदिवस थकवा वाढत चालला. शिष्यांना समजेना. काय करावं म्हणजे आचार्य परत ठिक होतील.
एक दिवशी आचार्यांनी हिमालयात निघुन जातो असा विचार बोलुन दाखवला. शिष्यवर्ग डगमगला. काही विचारी शिष्य होते. त्यांनी आचार्यांना थोपवुन धरले. आज नको.. थोडे दिवस जावु द्या समजुत काढली. आशा तुटता तुटत नसते. तितक्यात काही बातमी कानावर आली. ब-याच दिवसांनी गुरुंचा चेहरा उजळलेला पाहुन शिष्य सुखावले. अन एके दिवशी तो ब्राह्मण काही निवडक शिष्यांसह निघाला. बघता बघता त्याने दक्षिणेची वाट धरली. ज्यांना माहित नव्हते ते आश्चर्यचकित झाले. गुरु तर उत्तरेला प्रयाण करणार होते मग अचानक दक्षिणेची वाट का ? त्यांनी विचारले. ब्राह्मण स्मित करुन शांत रहात असे आणि भराभर चालत असे. शिष्य आश्चर्यमुग्ध होत होते.. अचानक अशी काय सिद्धी प्राप्त झाली की गुरुंची तब्येत सुधारली? बघता बघता नर्मदा ओलांडली. तापी ओलांडली.
ब्राह्मण मनात विचार करत होता. बघता बघता आपण विंध्य ओलांडुन आलो. तोच सूर्य तोच चंद्र पण इथलं वातावरण किती वेगळं आहे. चालता चालता तो ब्राह्मण न्याहाळत होता. ताठ मान, पुढे आलेली छाती. प्रत्येक जण कसा आनंदी दिसत होता. काय वेगळं आहे इथं. मान देतात पण लाचारी दिसत नाही. बोली वेगळी आहे, फटकळ आहे. पण उत्तरेकडच्या लाचार जुबानीपेक्षा हे वातावरण कितीतरी सुखावह आहे. गोदेवर स्नान केलं. पूढील रस्ता विचारला. परत वाटचाल चालु केली. तेवढ्यात कुणीतरी समोरुन घोडेस्वार येत आहेत असं बोललं. जरा किंचित भयानेच पाहु लागले. स्वतःच्या मुलखातही घाबरुन रहायची सवय झालेली, परका मुलुख आपसुकच भय निर्माण करत होता.
घोडेस्वार पायउतार झाला. नमस्कार करुन ओळख विचारली. ओळख पटल्याबरोबर बरोबरच्या लोकांना पुढे बोलावले. समोर पालखी आली. ब्राह्मणाला पालखीत बसायची विनंती झाली. आक्रितच झालं. कधी अशी सवय नव्हती. ब्राह्मणाला नवल वाटलं. ज्याला भेटायला चाललो त्याला आपण येणार हे कसं कळलं विचार करत होता. शंका बोलुन दाखवली. स्पष्ट उत्तर मिळालं नाही पण उलगडा झाला. पालखी चालु लागली.
पालखीच्या हलत्या गोंडाबरोबर ब्राह्मण कधी भुतकाळात तर कधी वर्तमानात विचार करत होता. कधी काळी सात आठ पिढ्यांपुर्वी महाराष्ट्र सोडुन काशीत आलेला आपला पूर्वज. पूढे त्याच वंशाचा झालेला विस्तार. त्याच वंशात कुणीतरी केलेला काशीविश्वेश्वराचा जीर्णोद्धार. आणि आपल्याच आयुष्यात त्या काशीविश्वेश्वरावर आलेली पातशाही वक्र नजर. डोळ्यात आलेले पाणी काढण्यासाठी हात डोळ्याला लागला की भानावर येवुन वर्तमानात यायचा. ज्याला भेटायला जात आहोत तो कसा असेल ? काय काय त्याच्या योजना असतील? एक ना अनेक प्रश्न मनात होते. कधी वाटायचे ही पालखी नसती तर अजुन भरभर गेलो असतो.
जाता जाता आजुबाजूचा परिसर पहातच होता. मनात जे वाटलं होतं तेच प्रत्यक्षात आहे नव्हे कांकणभर सरसच आहे हे पाहुन सुखावत होता. कालपर्यंत मृत्युला ये ये म्हणणारा आता लवकर न येवो असे म्हणत होता. बघता बघता पोहोचायचे ठिकाण जवळ आलं. उंचचउंच डोंगररांगामधला एक डोंगर. चढण सुरु झाली. बघता बघता माथ्यावर पोहोचला. भव्य दरवाजात स्वागत झालं. आणि समोर तो उभा राहिला. ज्याच्या दर्शनासाठी तो ब्राह्मण शेकडो कोस प्रवास करुन आला होता तो समोर उभा होता. आदबशीर पण रुबाबदार. त्याने सगळा आयुष्याचा प्रवास त्या ब्राह्मणाला सांगितला. अनेक गोष्टी ब्राह्मणास कळल्या होत्याच पण जे काही दुवे माहित नव्हते ते सगळे माहित झाले. ब्राह्मणाचं मन भरुन आलं. आशीर्वाद देत म्हणाला..आपण सिंहासनाधिष्ठित व्हावे ! तो नम्रपणे कबुल झाला आणि अवघ्या महाराष्ट्रात आनंदाचा जल्लोष झाला. शत्रुंच्या मनाचा थरकाप उडाला.
कोण होता तो ब्राह्मण ? काशीविश्वेश्वराची पूजा करणारा विश्वेश्वरभट्ट उर्फ गागा भट्ट.
आणि तो ? शिवाजी शहाजी भोसले अर्थात महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज.
आज ६ जुन. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन.
शिवाजी महाराजांना लक्ष लक्ष प्रणाम !!
जय भवानी ! जय शिवाजी !! जय महाराष्ट्र !!!
याद्या
7974
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
समयोचीत लेख.
जबरदस्त
In reply to समयोचीत लेख. by रामदास
विवेकी पंडीत म्हणुन ख्याती ....
प्रतिसाद
In reply to विवेकी पंडीत म्हणुन ख्याती .... by रामदास
नाना
+१
In reply to नाना by मस्त कलंदर
स्मरण
छान माहीती
In reply to स्मरण by बिपिन कार्यकर्ते
लैभारी रे
जय भवानी जय शिवाजी.....
समयोचित लेख.
छान
छान लेख
जय भवानी जय शिवाजी
समयोचीत
+१
In reply to समयोचीत by सहज
छान लेख....
वाह
मस्त रे....
नानोबा
_/\_
सुंदर
नाना, बिका
मस्त
मस्तच
नाना लेख
सुंदर लेख
सर्व
मस्त लेख.
छान लेख!
छान! लिखाण
सिंहासनाधिष्ठित
>>गागाभट्टा
In reply to सिंहासनाधिष्ठित by प्रियाली
मस्तच रे नाना!