Skip to main content

मुळेसाहेब - अंतर्बाह्य शीतल

लेखक स्वधर्म यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

 सांगलीतल्या एका उष्ण दुपारी मी व माझ्या मित्राने टपरीवरचा कडक चहा पोटात ढकलला आणि पिटपिट्या लूनावरून पुढे निघालो. आमची मोहीम होती प्रॉडक्ट डिझाइनच्या सर्विसेस लागणाऱ्या कंपन्यांना भेटण्याची. तशी कुपवाड एमआयडीसी ही मुख्यत्वे सुट्टे भाग पुरवणाऱ्या कंपन्या असलेली. आपले स्वतःचे प्रॉडक्ट्स असलेल्या फारच कमी कंपन्या. तेवढ्यात एका कंपनीच्या बोर्डने आमचे लक्ष वेधून घेतले. नावातच 'इनोव्हेशन' असा शब्द होता. आम्ही आत शिरलो. पुढच्या हॉलमध्ये ऑफिस आणि मागच्या खुल्या शेडमध्ये डंगरी घातलेले सात-आठ कामगार. आम्ही आमची ओळख करून दिली व कंपनीच्या दोन डायरेक्टर लोकांशी बोलायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी एक जणच आमच्याशी संवाद साधत होते, तर दुसरे केवळ ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला काहीच अंदाज येत नव्हता. तीच माझी मुळेसाहेबांशी पहिली भेट. 

 

इंजीनियरिंग कॉलेजमध्ये लागणाऱ्या प्रयोगांसाठीचे सेटअप्स बनवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. आम्हाला पहिली असाइनमेंट मिळाली आणि मग मुळेसाहेबांशी संपर्क वाढत गेला. ही उत्पादने ऑर्डरप्रमाणे दीड-दोन महिने बनवली जात व इंजीनिअरिंग कॉलेजेसना पाठवली जात. प्रत्येक ऑर्डरची स्पेसिफिकेशन्स, डिझाईन, निर्मिती व उत्पादन हे थोडे थोडे वेगळे असे. शिवाय ही उत्पादने मुले सिलॅबसप्रमाणे टर्ममध्ये एक-दोनदाच वापरत असल्यामुळे बराच काळ न वापरता पडून राहायची, पण जेव्हा लागतील तेव्हा ती एकदम व्यवस्थित चालू झाली पाहिजेत, अशी या उत्पादनांची एक वेगळीच गरज होती. त्यामुळे नेमक्या वेळी जर ते चालले नाही, तर कंपनीच्या माणसाला तिकडे जाऊन सर्विस द्यावी लागे. त्यामुळे दर्जा असा ठेवावा लागे की ते कधीही किल्ली फिरवल्यावर चाललेच पाहिजे. यावर गमतीने मुळेसाहेब असे म्हणत की "माझी उत्पादनं म्हणजे माझ्या मुली आहेत. एकदा सासरी गेल्या की वडिलांना तक्रारीचा फोन आलाच नाही पाहिजे."

कंपनी वाढत होती. त्यांच्या उत्पादनांचे भारतभर नाव होत होते. उलाढाल वाढत होती, परंतु कामगार आहे तिथेच राहू नयेत, याचा ते विचार करत असत. प्रत्येक कामगाराचे अपस्किलिंग व्हावे, यासाठी त्यांनी काही सर्जनशील प्रयत्न केले. मराठी माध्यमातून आयटीआय झालेले कामगार हळूहळू एकएकटे २०-३० लाखांचे सेटप घेऊन भारतातल्या लांब लांबच्या इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन इन्स्टॉल करू लागले. त्यांचे पूर्ण टेस्टिंग करून परफॉर्मन्सवर कॉलेजच्या विभाग प्रमुखांची सही घेऊन परत येऊ लागले. इतरांच्या मानाने या कंपनीतल्या कामगारांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि स्वाभिमानत्म दिसून यायचा.

कामगारांना टिकवून ठेवण्यासाठी अनेक उद्योजक त्यांना वेगवेगळी स्वप्ने दाखवतात. भविष्याची ग्वाही देतात. पण शेवटी मिळणारा पगार ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. तो वाढलाच पाहिजे, याची त्यांना जाणीव होती. प्रसंगी आपल्या कामगारांचा पगार वाढवण्यासाठी डायरेक्टर लोकांचा पगार कमी करावा, अशी एक सूचनासुद्धा त्यांनी कंपनीच्या डायरेक्टर मंडळाला केली होती. कंपनीच्या डायरेक्टर्सना मिळणारा पगार आणि कामगारांना देत असलेला पगार याच्यात एक निश्चित समन्यायी गुणोत्तर असावे, असा त्यांचा विचार होता. त्यामुळे वर्षानुवर्षे त्यांच्या कंपनीत काम करणारे अनेक कामगार दुसऱ्या कंपनीत जाण्याचा विचार करत नसत. आर्थिक नियोजनाबरोबरच कंपनीत नव्या नव्या कल्पना राबवणे हे सुरूच होते. एक दिवस मी महिन्याच्या शेवटच्या दिवशी योगायोगाने कंपनीत होतो. त्या वेळी जेवणाच्या सुट्टीनंतर सगळ्यांनी काम थांबवले आणि प्रत्येक जण भंगार, नको असलेली कागदपत्रे इत्यादी एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या कामाला लागला. मी विचारले, "असे अचानक काय झाले?" तर कामगार म्हणाले, "आज गांधी जयंती!" पण तारीख तर वेगळीच होती. कंपनीत दर महिन्याला अशा प्रकारे स्वच्छता करून गांधी जयंती साजरी करावी, ही कल्पना त्यांचीच. एरव्ही वर्कशॉप्स म्हणजे कमालीची कळकट. पण यांच्या कंपनीचे वर्कशॉप म्हणजे एखाद्या हॉस्पिटलसारखे चकचकीत.अशा नव्या कल्पना त्यांच्या डोक्यातून सतत निघत आणि कसलाही गाजावाजा किंवा इव्हेंटीकरण न करता त्या अमलात आणल्या जात.

पुढे आमची मैत्री झाल्यावर, हा माणूस केवळ बुद्धीनेच नव्हे तर मनाने कसा खोल खोल जात आहे, हे लक्षात येऊ लागले. एकदा तिथलाच एक उद्योजक मित्र सहज गप्पा मारता मारता सांगत होता की त्याने कशा पद्धतीने व्यापारी धूर्तपणे एक निगोशिएशन केले व अपेक्षेपेक्षा बराच फायदा करून घेतला. पुढे गप्पांच्या ओघात त्याने त्याच्या बारावीतल्या मुलाबद्दल सांगितले. तो कसा अभ्यास करत नाही, त्याला कसे खूप कमी मार्क्स मिळतात, किती सांगितले तरी ऐकत नाही, याचे कसे होणार इत्यादी इत्यादी. नंतर मुळेसाहेब म्हणाले की "दोघेही बारावीलाच आहेत. मुलाला जर जास्त गुण मिळणार नाहीत, म्हणून त्याच्यासाठी जास्तीत जास्त पैसे जमा करण्याच्या मागे हे लागलेले आहेत." यानंतर जेव्हा मुळेसाहेबांचा मुलगा अकरावीत गेला, तेव्हा त्याची ॲडमिशन कुठे घ्यावी, कोणता कोर्स करावा इत्यादीबाबत मुळेसाहेबांनी स्वतःचे कसलेही मत त्याला सांगितले नाही, लादणे तर दूरच. त्यांचे मत होते - जे करायचे ते त्यानेच ठरवले आणि चुकला तर त्यात काय? त्यानेच निर्णय घेतला तर मी त्याला वाढीची संधी दिली असे होईल; पण मी त्याच्या वतीने ठरवणे म्हणजे त्यांची वाढ रोखणे होय. घरातला माणूस असो, मित्र असो की कामगार, प्रत्यक्ष उपदेश न करता, हाताखालच्या लोकांच्या चुका दिसत असतानाही अधिकारवाणीने काहीही न बोलता, शांतपणे त्याचे त्याला कळण्याची वाट पाहण्याचा जो धीर लागतो, तो अमर्याद प्रमाणात मुळेसाहेबांकडे होता.

उद्योग करणे म्हणजे सरकारी यंत्रणा - उदाहरणार्थ सेल्स टॅक्स, एक्साइज इत्यादीचे अधिकारी यांना हाताळणे अपरिहार्य. त्यांच्या क्षेत्रातील शिक्षण सम्राटांच्या इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये तर प्रचंड कमिशन, लाच इत्यादी प्रकार करावे लागतातच, असे सररास समजले जाई. परंतु कामाला कितीही उशीर लागू दे, त्यासाठी लाच, वशिला किंवा दबाव कधीही वापरायचा नाही, या तत्त्वावर त्यांची पोलादी निष्ठा होती. जिथे हे करावे लागेल, तिथे ती आपली ऑर्डरच नाही असे म्हणून बाजूला होणे, किंवा कितीही वेळ लागला तरी शांतपणे वाट पाहत राहणे हे ते करत. हळूहळू त्यांचा व्यवसाय जसा मोठा होत गेला, तसेच व्यक्तित्वही  विकासित होत गेले. त्यांचे कार्यक्षेत्रही विस्तारू लागले. कोणत्याही उपक्रमाची सुरुवात अगदी हळूच करायची, पण एका शिस्तीने व निष्ठेने ते तडीस न्यायचेच, असा त्यांचा गुण होता. त्यांच्या घरासमोर हायवेला लागूनच पाण्याची मोठी टाकी व ग्रामपंचयातीच्या पडीक जमिनीची एक पट्टी होती. कंपनीतून आल्यावर दररोज संध्याकाळी त्यांनी त्या परिसराची स्वच्छता करायला सुरुवात केली. पाण्याच्या टाकीचा जो प्लॉट होता, तिकडे स्वतःच्या खर्चाने सिंगल बार व डबलबार बसवले. हेतू हा की कॉलनीतली मुले येऊन व्यायाम करतील. दररोज तिथला कचरा काढायचा, जागा स्वच्छ करायची असे करता करता त्यांनी तिथे चांगली झाडे लावण्याचा एक हाती उपक्रम सुरू केला. आज ती झाडे मोठी झाली आहेत व तिथे सरकारच्या एका पैशाच्या खर्चाशिवाय एक उद्यान उभे राहिले आहे.

पुढे त्यांनी विपश्यना केली. जे शिकेन त्यात पूर्ण झोकून देऊन ते संपूर्ण आत्मसात करायचे, असा त्यांचा खाक्या होता. हळूहळू त्यांच्यातील बदल मला जाणवू लागले. कोणत्याही घटनेकडे पाहताना ते आधी आपल्या आत बघायचे आणि मग जरूर तेवढाच प्रतिसाद, प्रतिक्रिया इत्यादी द्यायचे. बोलताना बऱ्याचदा ते अशी काही वाक्ये वापरत, ज्याचा उलगडा खूप दिवसानंतर होई. एकदा म्हणाले की "देअर आर नो अदर्स!" याचा अर्थ कातड्याच्या आतला आणि त्याच्या बाहेरचे हे काही वेगळे नाहीत, जो मला नंतर कळला. "बाहेर बघून किती दिवस जगायचं?" हे त्यांचे आणखी एक वाक्य. सतत स्वतःवर काम करत राहिल्यामुळे त्यांच्या स्वभावात एक प्रकारची मधुर स्निग्धता आली, पण त्याच वेळी मूल्यनिष्ठेचा पोलादी पीळसुद्धा आत मध्ये तयार होत होता.

'चांगल्या लोकांना चांगलेच लोक भेटतात' या उक्तीप्रमाणे मग त्यांचा वावर विपश्यना केंद्रात होऊ लागला. सांगलीतही विपश्यना केंद्र असावे अशी कल्पना मूळ धरू लागली. मग व्यवसाय सांभाळतच मुळेसाहेबांनी जागा शोधण्यापासून ते पहिले शिबिर आयोजित करण्यापर्यंत सातत्याने पुढाकार घेतला. पुढे त्यांना सांगलीच्या केंद्राचे मुख्य ट्रस्टी करण्यात आले. जागा ताब्यात आल्यावर तिथे असलेली झाडे शक्यतो न तोडता त्यांनी सगळी रचना, लेआउट इत्यादी करून घेतली. सार्वजनिक कामात लोकांचे अनेक बरे-वाईट अनुभव येत असतात. एखादी संस्था उभी करायची, त्याचे बांधकाम करायचे म्हणजे सरकारी यंत्रणेशी संपर्क अटळ. सरकारी कार्यालयात प्रचंड अनास्था, दिरंगाई असते. तरीही चिकाटीने आवश्यक त्या परवानग्या मिळवण्यासाठी तासनतास तिथे जाऊन बसणे, कोणताही शॉर्टकट न घेता सगळ्या परवानग्या घेणे, ही कामे कुणाशीही कटुता न येता त्यांनी पूर्ण केली. केंद्राची जागा मुख्य रस्त्यापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर होती. तिथे येण्यासाठी जो रस्ता करावा लागणार होता, त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी जागा देऊ केली, कारण त्यांचाही त्यात फायदा होताच. परंतु एक शेतकरी मात्र काही केल्या रस्त्यासाठी जागा सोडायला तयार होईना. अडवणूक होऊ लागली. बांधकामाचे काम ठप्प होण्याची वेळ आली. त्या वेळी केंद्राच्या ट्रस्टीजनी आणि मुळेसाहेबांनी या समस्येतून अजिबात कटुता न येता शांतपणे फक्त चिकाटीने आणि संवादाच्या माध्यमातून मार्ग काढला. असाच प्रकार बांधकामाच्या कंत्राटदारांनी वाढीव बिले दिल्याने उद्भवला होता. त्याही वेळी मुळे साहेबांनी दोन्ही पातळ्यांवर मार्ग काढला. व्यावहारिक पातळीवर कोणाचेही नुकसान होणार नाही व भावनिक पातळीवर कोणाचेही मन दुखावले जाणार नाही अशा प्रकारे तो पेच सोडवला. कुणालाही दुखावून आपला फायदा झाला, तरी त्या माणसाच्या मनात कायम अढी राहून जाते, त्यामुळे जोपर्यंत समोरच्याला पटत नाही, तोपर्यंत कोणतेही डील फायनल करायचे नाही असा त्यांचा विचार. विपश्यना केंद्राचा त्यांनी इतका ध्यास घेतला होता की रात्री-अपरात्री येणाऱ्या शिबिरार्थीला आपल्या घरातून गाडीने स्वत: स्टेशनला जाऊन घेणे आणि तिथून पुढे केंद्राजवळ सोडायला जाणे याचा त्यांनी कधीही कंटाळा केला नाही.

एकदा एका गुंडाने त्यांच्या कॉलनीच्या कोपऱ्यावर एक अनधिकृत टपरी उभी केली. सर्व लोकांना ते अतिक्रमण नको होते, पण त्याच्या दहशतीमुळे कोणी काही विरोध करायला, वाकड्यात शिरायला पुढे येईना. मुळेसाहेबांनी मात्र शांतपणे जाऊन त्याला अतिक्रमण हटवायला सांगितले. आधी गुंडाने उडवून लावले, पण नंतर तो अपेक्षेप्रमाणे "जा, काय करायचं ते करा" म्हणाला. आता पुढे काय होणार याची मलाही उत्सुकता होती. संघर्ष वाढत गेला, पण मुळेसाहेबांनी विरोध सोडला नाही. शेवटी एक दिवस त्याने मुळेसाहेबांवर हातच उचलला. हे घडले मात्र, इतका वेळ शांत बाजूला राहून पहात राहणारे कॉलनीतले लोक एकदम एकत्र आले आणि त्यांनी तो संघर्ष मग आपलाच केला. त्या माणसाचे अतिक्रमण काढून टाकले. वर त्याला "परत जर साहेबांना त्रास दिलास तर खबरदार" असा सज्जड दम दिला. ते नेहमी विपश्यनेतले एक वाक्य म्हणत असत - "तुम्ही धर्माचे आचरण करा, धर्म तुमचे बाकीचे काम करेल."

बऱ्याच वेळा आपला एखादा प्रश्न घेऊन मुळेसाहेबांकडे गेलो की ते थेट सल्ला कधीही देत नसत. एकदा म्हणाले, "पण खूप प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असतो. एक सोडवला की दुसरा प्रश्न तयार होतोच. प्रश्न सोडवणार तरी किती? त्यामुळे प्रश्न संपले पाहिजेत असे काम आपण केले पाहिजे. " "म्हणजे काय करायचे?" तर "साधना" हे त्यांचे उत्तर. कोणत्याही पेचप्रसंगात त्यांच्याशी बोलल्यावर एकदम शांत, शीतल वाटत असे. त्यांचे प्रेमही अजिबात गाजावाजा न करता शांतपणे जाणवायचे. कंपनीत मी येणार असेन, तर न चुकता सकाळी फोन करून विचारणार, "तुझासुद्धा डबा घेऊन येऊ का?" 

असे मुळेसाहेब २०१९मध्ये अचानक आजारी पडले. त्यांचे वजन भरभर घटले व जेवण जाईना. मी भेटलो, तेव्हा मला एवढेच म्हणाले की "डॉक्टर उपचार करत आहेत आणि मी पाहत राहतोय. एकदा त्यांना शरीर दिल्यावर आपण कशाला जास्त विचार करायचा?" दोन-तीन महिन्यांनी एके रात्री मी त्रिवेंद्रममध्ये असताना अचानक मला फोन आला की मुळेसाहेब गेले! थोडा वेळ मला समजेच ना की बोलणारे नक्की काय म्हणत आहेत? मुळेसाहेबांना कॅन्सरने गाठले होते आणि तेअशा वेळी लक्षात आले होते, ज्या वेळी करण्यासारखे फार काही उरले नव्हते. शेवटी त्यांना मुंबईला नेण्यात आले. डॉक्टरांनी व कुटुंबीयांनी शर्थीचे प्रयत्न करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. नंतर मी त्यांच्या कुटुबीयांना जाऊन भेटलो, तेव्हा मला त्यांनी सांगितले की "मुळेसाहेबांना शेवटपर्यंत कोणताही त्रास किंवा वेदना झाल्या नाहीत. कॅन्सर म्हटले की माणूस गर्भगळित होतो, पण मुळेसाहेब शेवटपर्यंत हसत राहिले." ते दवाखान्यात दाखल असताना त्यांच्या शेजारच्याच कॉटवर एक तरुण मुलगा कमालीच्या वेदना भोगत होता. त्या वेळी मुळेसाहेब म्हणाले की "माझं जगून झालंय, पण याचं सगळंच राहिलंय. माझं उरलेलं आयुष्य देवाने याला द्यावं, मी मृत्यूला तयार आहे." इतकेच नव्हे, तर ते जेव्हा गेले तेव्हा अगदी सुहास्य वदनाने त्यांनी आपल्या प्रियजनांचा निरोप घेतला, असे मला त्याच्या घरच्यांनी सांगितले. 

नंतर मी त्यांच्या घरी जाऊन घरच्यांना भेटलो. माझ्या असे लक्षात आले की ३०-४० कोटी रुपयांचा यशस्वी व्यवसाय करणारा, अनेक ठिकाणी उदारपणे देणग्या देत राहणारा हा माणूस मागे फक्त पाच शर्ट, पाच पॅन्ट आणि एक छोटी पिशवी ठेवून गेला, ज्यात बँकेचे एक पासबुक होते. आजही जेव्हा सांगलीत जातो व मुळेसाहेबांच्या घरासमोरून जायची वेळ येते, तेव्हा मला दिसते एक बाग. जिचे नाव त्या कॉलिनितल्या लोकांनी प्रेमाने ‘शीतल उद्यान’ असे ठेवले आहे, कारण मुळेसाहेब नावाप्रमाणेच अंतर्बाह्य ‘शीतल’ होते.


 

IMG_20191221_125413.jpg
 


 
दिवाळी अंक वर्ष

वाचने 41
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया