Skip to main content

विचारांची शेती

लेखक प्रा.भरत खैरकर यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

विचारांची शेती

पहाटेच्या धुक्यात इंद्रायणीच्या काठावर बसलेला प्रकाश वहीत काहीतरी लिहीत होता. नदीचा संथ प्रवाह, दूरवरून येणाऱ्या मंदिरातील काकड आरतीचा आवाज आणि पाण्यावर चमकणारे उगवतीचे सूर्यकिरण त्याच्या शब्दांना जणू अर्थ देत होते.    

गावातले लोक त्याला 'लिहिणारा मुलगा' म्हणून ओळखत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रकाशला शेती, माणसं आणि त्यांच्या आयुष्याच्या कथा बालपणापासून खुणावत होत्या. शाळेत असताना तो भिंतीवरच्या हस्तलिखित मासिकाचा संपादक होता. एखाद्या शेतकऱ्याचं पीक निसर्गामुळे नष्ट झालं, एखाद्या मुलीने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं किंवा गावात नवीन पाणी योजना सुरू झाली, की त्याच्या वहीत त्यावर एक लेख तयार व्हायचा! त्याला वाटायचं, शब्द हे फक्त अक्षर नसतात, तर त्यात समाज बदलण्याची ताकद असते.

महाविद्यालयात गेल्यावर त्याने स्थानिक वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम सुरू केलं. मानधन कमी होतं, पण अनुभव मोठा होता. बस स्थानक, तहसील कार्यालय, शेतकरी मेळावे, ग्रामसभा आणि आंदोलनं हीच त्याची पत्रकारितेची विद्यापीठं होती. प्रत्येक बातमी लिहिताना तो स्वतःला एकच प्रश्न विचारायचा - 'या बातमीमुळे सामान्य माणसाला काय उपयोग होईल?'

काही वर्षांनी त्याला कृषी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित एका मोठ्या संस्थेत जनसंपर्क विभागात काम करण्याची संधी मिळाली. संस्थेचं मुख्य कार्यालय बेंगळुरूमध्ये होतं. पहिल्याच दिवशी त्याच्या लक्षात आलं की, तिथे काम करण्याची पद्धत वेगळीच आहे. कार्यालयात प्रत्येक कल्पनेला महत्त्व होतं. भिंतींवर प्रेरणादायक विचार, चर्चा करणारे कर्मचारी, प्रयोगशील वातावरण.. सगळीकडे सर्जनशीलतेचा श्वास जाणवत होता!

एक दिवस संस्थेने 'यूजर नीड्स' या नावाचं विशेष प्रशिक्षण आयोजित केलं. स्वीडनहून आलेल्या प्रशिक्षकाने तीन विभागांतील निवडक कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं. पाच अभ्यास मॉड्यूल्स, संवादात्मक उपक्रम आणि प्रत्यक्ष मुलाखती अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम होता. कंपनीने त्यावर जवळपास अडीच लाख रुपये खर्च केले होते.

प्रशिक्षण संपलं. अनेकांनी प्रमाणपत्र घेतलं आणि विषय विसरले. पण प्रकाश तसा नव्हता. प्रत्येक सत्रात तो टिपणं काढायचा. रात्री हॉटेलमध्ये परतल्यावर त्या टिपांची उजळणी करायचा. 'आज जे शिकलो, ते उद्या कामात कसं वापरायचं?' हा त्याचा कायमचा प्रश्न असायचा.

काही महिन्यांतच फरक दिसू लागला. ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याची त्याची क्षमता वाढली. बैठकींमध्ये त्याचे प्रस्ताव स्वीकारले जाऊ लागले. त्याच्या विभागाची कामगिरी सुधारली. वरिष्ठ अधिकारी त्याच्याकडे विश्वासाने पाहू लागले.

त्यानंतर त्याला प्रशिक्षणाच्या सर्वाधिक संधी मिळू लागल्या. 'लीडरशिप ॲक्सिलरेशन' हा पाच टप्प्यांचा कार्यक्रम त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचं वळण ठरला. प्रत्येक टप्पा दोन दिवसांचा होता. राजेंद्र नावाचे प्रशिक्षक देशातील अनेक उद्योगसंस्थांमध्ये नेतृत्वविकासाचं प्रशिक्षण देत होते. राजेंद्र सर म्हणायचे, “नेता म्हणजे पुढे उभा राहणारा माणूस नव्हे, तर इतरांना पुढे चालायला शिकवणारा माणूस!"

ते शिकवत की काम लोकांकडून कसं करून घ्यायचं, जबाबदाऱ्या कशा वाटायच्या; चुका शिक्षा म्हणून नव्हे तर शिक्षण म्हणून कशा स्वीकारायच्या. एका सत्रात त्यांनी सांगितलेलं वाक्य प्रकाशच्या मनात कायमचं कोरलं गेलं, “तुम्ही ज्या गोष्टीचा सातत्याने विचार करता, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करता, त्या दिशेने निसर्गही तुमच्यासाठी वाट तयार करू लागतो!"

त्या दिवसापासून प्रकाशने स्वतःलाच एक ओळख दिली - 'मला संपादक व्हायचं आहे!' त्याची ही इच्छा केवळ स्वप्न राहिली नाही. त्याने स्वतःमध्ये संपादकाचे गुण निर्माण करायला सुरुवात केली. वाचन वाढवलं. उत्तम लेखकांचा अभ्यास केला. नव्या पत्रकारांना मार्गदर्शन करू लागला. प्रत्येक बातमीमागचा सामाजिक परिणाम समजून घेऊ लागला. संस्थेचा मालकही दूरदृष्टीचा होता. शेती, ट्रॅक्टर, कीटकनाशकं, बागायती, जलव्यवस्थापन अशा विषयांवर मोठमोठ्या कार्यशाळा आयोजित केल्या जात. प्रगतिशील शेतकऱ्यांना व्यासपीठ मिळत असे. प्रतिष्ठित शेतकऱ्यांशी सामंजस्य करार केले जात. हजारो शेतकऱ्यांना ज्ञानाच्या साखळीत जोडण्याचं उद्दिष्ट ठेवलं जायचं.

पर्यावरण, युवक, महिला आणि संस्कृती यांनाही तितकंच महत्त्व दिलं जात होतं. पर्यावरण संवर्धनासाठी मोहिमा, महिलांसाठी नेतृत्व मंच, युवकांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरं, महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा, संशोधन प्रकल्प आणि विविध प्रदर्शनं यांमधून समाजाशी सतत संवाद साधला जात होता. संस्थेच्या कुटुंबातील मृण्मयी, योगिनी, राजेश आणि इतर सदस्य वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सांभाळत होते. एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सहभागामुळे या उपक्रमांना अधिक व्यापकता मिळाली होती.

प्रकाशला या सगळ्यात एक वेगळी गोष्ट दिसली.. जाणवली .. व्यवसाय फक्त नफा कमावणं नाही, तर समाजाशी नातंही निर्माण करणं होय! हळूहळू त्याच्या लेखनाचे विषय बदलू लागले. तो केवळ बातम्या लिहीत नव्हता, तर माणसांच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या कथा लिहू लागला. एका शेतकऱ्याने ठिबक सिंचनामुळे वाचवलेलं पाणी, एका महिलेने सुरू केलेला बचत गट, एका युवकाने गावात उभारलेलं ग्रंथालय अशा प्रेरणादायक कथा लोकांच्या मनात घर करू लागल्या.

काही वर्षांनी एका प्रतिष्ठित दैनिकाने त्याला उपसंपादक म्हणून बोलावलं. त्याने संधी स्वीकारली. संपादन, नियोजन, टीमवर्क आणि नव्या पत्रकारांना घडवण्याची त्याची हातोटी पाहून काही वर्षांतच तो मुख्य संपादक झाला!

पहिल्याच संपादकीय बैठकीत त्याने एक नवीन उपक्रम जाहीर केला - 'आम्ही फक्त समस्या मांडणार नाही. प्रत्येक समस्येबरोबर उपाय शोधणाऱ्या माणसाची गोष्टही छापणार.' या निर्णयामुळे वर्तमानपत्राला नवी ओळख मिळाली. 'उपयोगी पत्रकारिता' हा त्यांचा विशेष विभाग खूप लोकप्रिय झाला. त्यांनी डिजिटल माध्यम, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा पत्रकारिता आणि ग्रामीण वार्तांकन यांचा सुंदर संगम घडवला. प्रत्येक जिल्ह्यातील तरुण पत्रकारांना ऑनलाइन प्रशिक्षण सुरू झालं. अनुभवी शेतकरी, वैज्ञानिक, शिक्षक आणि उद्योजक यांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणण्यात आलं.

एका दिवशी एका पत्रकाराने प्रकाशला विचारलं, “सर, तुमच्या यशाचं रहस्य काय?”

प्रकाश हसला.

“मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतात बी पेरल्यावर लगेच पीक येत नाही. आधी माती तयार करावी लागते, पाणी द्यावं लागतं, तण काढावं लागतं. विचारांचंही तसंच असतं. चांगला विचार म्हणजे बी. सातत्य म्हणजे पाणी. शिकण्याची तयारी म्हणजे खत. आणि कृती म्हणजे सूर्यप्रकाश. मग यशाचं पीक आपोआप उगवतं!"

त्या संध्याकाळी तो पुन्हा इंद्रायणीच्या काठावर आला. अनेक वर्षांपूर्वीची वही त्याच्या हातात होती. पहिल्या पानावर त्याने विद्यार्थी असताना लिहिलेली एक ओळ होती - 'एक दिवस मी समाजाच्या मनाशी संवाद साधणारा संपादक बनेन.'

तो क्षणभर शांत राहिला. नदी तशीच वाहत होती. बदलला होता तो प्रवाहाचा आणि प्रकाशाचा विस्तार !

दिवाळी अंक वर्ष

वाचने 37
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया