Skip to main content

वाजे पाऊल

लेखक गवि यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

वाजे पाऊल

वाजे पाऊल

गोष्ट जुनी आहे.

नेहमीचं ठरलं होतं त्या वेळी, त्याप्रमाणे भल्या पहाटे बेल न वाजवता दूधवाला रोज पिशवी दाराबाहेर लटकवलेल्या बादलीत ठेवून जायचा. त्या दिवशी शनिवार होता आणि  वीकएंड म्हणून जरा जास्त लोळून किंचितच उशिरा अर्धवट झोपेत मी दार उघडलं, दुधाची पिशवी उचलताना दिसलं की
दारासमोर एक लिंबू पडलं होतं. तिथून ते सगळं सुरू झालं.  

मी तसा जगात जनरली यशस्वी मनुष्य म्हणतात तसा होतो. मध्यम यशस्वी. म्हणजे मध्यमवर्गीय. नोकरीत बरा पगार, घर, गाडी, सोफासेट, युरोप ट्रिप यांचे महिन्याचे हप्ते आणि वीकएंडच्या सकाळी जरा उशिरा उठण्याची आवड असं जगणं. पण एक गोष्ट मात्र आहे. कुठल्याही गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास ठेवणं मला कधी जमलं नाही. देवधर्माशी भांडण नव्हतं, पण मला स्वतःला काही विधी बिधी करायला बसवू नका इतकंच मी म्हणायचो. ग्रह, वास्तुदोष, शकुन अपशकुन, करणी वगैरे विषय निघाले की मात्र माझ्यातला तर्कवादी माणूस आपोआप जागा व्हायचा. अशा गोष्टींना थोडाही सपोर्ट करणाऱ्या लोकांची मी खिल्ली उडवायचो. अगदी त्यांच्या तोंडावर. वस्तुनिष्ठ विचार हेच आपल्याला खरी मदत करतात या माझ्या विचाराचा मी शक्य तितका प्रचार करत असतो. आपल्या स्वतःवर ताबा आपणच ठेवायचा, बाहेरच्या कुठल्यातरी न दिसणाऱ्या काल्पनिक शक्तीला तो द्यायचा नाही, एवढं माझं साधं तत्त्व होतं. आणि ते पाळणं अगदी व्यवस्थित चाललंही होतं.

तर काय लिहीत होतो?

हो. त्या शनिवारी दार उघडल्यावर दिसलं की समोर एक लिंबू पडलं होतं.  वरवर तरी साधं पिवळं लिंबूच दिसत होतं.  मी दुरूनच पाहण्याचा प्रयत्न केला. कुंकू किंवा टाचण्या असं काही दिसत नव्हतं. पण उंबऱ्याजवळ अगदी दाराच्या मधोमध पडलं होतं. माझा अशा गोष्टींवर विश्वास नसला, तरी ते जोवर तिथे पडून राहील तितका वेळ मी नकळत अस्वस्थ राहिलो असतो, असं मात्र मला जाणवलं.

मी मिनिटभर त्याच्याकडे पाहत राहिलो. मग स्वतःशीच हसलो. करणी, लिंबू मारणे हे शब्द डोक्यात आले आणि हसता हसता अंगावर उगीच काटा आला.  

राशीभविष्यावर विश्वास नसलेला, वास्तुशास्त्राची टिंगल करणारा, ग्रहदशेऐवजी आपल्या मनगटावर आणि बँकबॅलन्सवर विश्वास ठेवणारा मी? लिंबामुळे माझं काय वाकडं होणार होतं?

काहीच नाही. आणि त्यावर टाचण्या सुया किंवा कुंकू, बुक्का काही नव्हतं.  साधं लिंबू.

दूध घेऊन आत आलो. चहाचं आधण ठेवलं. तिथेच विषय संपायला हवा होता. पण नाही..

कारण डोक्यात दुसरा विचार आला. वस्तुनिष्ठ आणि तर्कशुद्ध...

लिंबू माझं काही करणार नाही. पण ते इथे ठेवणारा माणूस? त्याच्या मनात माझा नाश व्हावा असंच आहे ना? लिंबाने काही होत नाही. पण कोणीतरी इतकं वाईट चिंततो आहे माझं..? का?

मी पुन्हा दार उघडून त्या लिंबाकडे पाहिलं. अजून तासभर तरी सोसायटीचा झाडूवाला येणार नाही. तोवर कोणकोण हे सगळं बघेल आणि व्हॉट्सॲपवर गावभर पसरवेल कोण जाणे. झाडूवाला मामाच आधी चार घरांत सांगेल. आणि वॉचमनलासुद्धा.

वॉचमन आणि मामा, दोघांनाही दिवाळी मागायला आले तेव्हा मी जरा सुनावलं होतं. काम नीट करत नाहीत आणि दिवाळी मागायला मात्र नियमाने येतात. त्याचा खार खाऊन तेच दोघे करत असतील की काय हा अघोरी प्रकार. वॉचमनला राऊंडच्या वेळी मध्यरात्री अंधारात लिंबू टाकून जाणं सहज शक्य आहे.  त्यातून तो परप्रांतीय. पण मामाशी मी खरंच इतका वाईट वागलो होतो?

समजा, हे कुणी मुद्दाम ठेवलं असेल, तर त्या माणसाचा त्या मंत्रतंत्रावर नक्कीच विश्वास आहे. आणि त्याने मनापासून हे माझं नुकसान करण्यासाठीच केलं आहे, यात काही शंका नाही.  नसावी.  तर्कशुद्ध विचारच आहे हा. म्हणजे कुणीतरी माझं नुकसान व्हावं असं मनापासून इच्छितंय, हे जवळपास निश्चित होतं.

किती नुकसान व्हावं अशी इच्छा केली असेल डोळे मिटून लिंबू टाकताना?

नोकरी जावी? ॲक्सिडेंट व्हावा? कॅन्सर व्हावा? मृत्यू व्हावा? निर्वंश व्हावा..?  सोन्यासारखा संसार बरबाद व्हावा?

मी बेडरूमच्या दारात जाऊन अजूनही साखरझोपेत असलेल्या हिच्याकडे आणि बाळाकडे पहिलं. घशात एक गोळा आला. परत किचनमध्ये येऊन चहाखालचा गॅस बंद केला. खाण्यापिण्याची इच्छा मेली होती.

ते लिंबू दारात नकोच. केरसुणी घेतली आणि लिंबू दूर करायला गेलो. पण केरसुणी पुन्हा घरातच येणार. दुसरी काही वस्तू मिळते का ते बघत रस्त्यापर्यंत गेलो. एका झुडपाची डहाळी तोडून आणली. त्या डहाळीने जिन्यात उडवून ढकलत ढकलत ते लिंबू खाली रस्त्यापर्यंत आणलं आणि पलीकडच्या गटारात जाईल इतक्या जोरात गोल्फ शॉट मारला. कोणी लोक अजून बाहेर पडलेले नव्हते म्हणून बरं. ते लिंबू गटारात गेल्यावर मनाला हलकं वाटलं. दृष्टीआड गेली ती किळसवाणी वस्तू.  

पण मग एकदम वाटलं की ते लिंबू दिसत होतं तेव्हाच नीट जवळून सर्व बाजूंनी पहायला हवं होतं. एखादी दुरून न दिसणारी टाचणी किंवा कुंकू वगैरे ठिपका त्यावर असता, तर मग समोरच्या व्यक्तीच्या उद्देशाबद्दल शंकाच उरली नसती. मी गटाराकडे परत गेलो. पण झाकणाच्या भोकांतून जे दिसत होतं, त्यावरून लिंबू वाहून गेलं होतं. पुरावा कायमचा नष्ट झाला होता. आता मला आता ते कधीच कळणार नव्हतं. म्हणजे न दिसलेली टाचणी किंवा कुंकू असू शकेल असं गृहीत धरणं आता भाग होतं.

आणि त्या क्षणी मला माझीच चीड आली.

मी घाबरलो होतो का? नाही. नसावा. नसणार नक्कीच.. अशक्य. याला भीती म्हणत नाहीत. नक्की फॅक्ट्स काय आहेत ते चेक करण्यासाठी मी इंटरनेटवर सर्च केलं. तेव्हा कळलं की टाचणी कुंकू नसलं तरी नुसत्या लिंबाचा वापर करूनही लोक काळी जादू करतात. करू शकतात. म्हणजे नुसतं लिंबू हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही.

माझा वीकएंड मूड एकदम खलास झाला.

बरं ,ठीक आहे. मला वस्तुनिष्ठ विचार करता लिंबाची भीती नव्हती. पण ते माझ्या दारात ठेवणाऱ्या माणसाची भीती होतीच ना..? भीती म्हणजे रिस्क. जोखीम.

आज त्याने लिंबू ठेवलं. उद्या सुपारी देईल. कोणीतरी वाटेत माझी कार थांबवून...

स्टॉप ओव्हरथिंकिंग. ॲप्लाय युवर ॲनालिटीकल माईंड. मी स्वतःला आवरलं. इतकं जास्त कोणी नसेल माझ्या वाईटावर. नसावं.  लॉजिकली. पण मग लिंबू?

घरात येऊन बळेच चहा ओतला. बायकोला उठवून तिलाही दिला. माझं शनिवारचं सुखाचं रूटीन मी असं कोणाच्या करणीने का बिघडवून घ्यावं?  

चहाचे घोट घेताना डोक्यात एकच प्रश्न फिरत राहिला.

कोण असेल? का? मला सुखाने जगण्याचा अधिकार नाही का? आणि माझ्या बायको-मुलाचा काय दोष? माझ्याशिवाय त्यांच्यावर केवढा डोंगर कोसळेल दुःखाचा. आणि लिंबू घराच्या समोर होतं. म्हणजे पूर्ण घरावरच कोणाची तरी अभद्र नजर? नजर म्हणजे वाईट विचार. ती अंधश्रद्ध लोकांची नजर नव्हे.  

नकोय असं सावट आपल्याला.  

हा अनोळखी माणूस असण्याची शक्यता कमी होती. तशातला कोणी कशाला उगीच असं करेल.  

अनोळखी माणसाला माझ्याशी काय देणंघेणं? म्हणजे ओळखीचा कुणीतरी नक्कीच. हा विचार आधीच्या विचारापेक्षा जास्त अस्वस्थ करणारा होता.

आपल्या ओळखीच्या माणसांपैकी कुणीतरी भेकड हरामखोर सकाळी किंवा रात्री आपल्या दारापर्यंत आलं असेल... समोरासमोर यायची हिंमत नाही ना.

त्याने आजूबाजूला पाहिलं असेल...आणि गुपचुप हे गदळ ठेवून निघून गेलं असेल.

मी सोसायटीचा सीसीटीव्ही बघायला मागू का? असा विचार आला. पण माझ्या दारासमोरचा भाग कोणत्याच कॅमेऱ्यात कव्हर होत नाही. आतापर्यंत मला प्रायव्हसीच्या दृष्टीने ते बरंच वाटायचं. पण आता वाटलं की असता तर बरं झालं असतं. अर्थात असं फुटेज बघायला मागण्याने ही बातमी सगळीकडे पसरली असती आणि तो शत्रू आनंदाने हसला असता. मी अस्वस्थ होणं म्हणजे तो जिंकला असंच ना?

आणि समजा, बाकीचे कॅमेरे तपासू म्हटलं, तरी काय सांगणार सिक्युरिटीवाल्याला?

“माझ्या दारासमोर लिंबू कोणी ठेवलं ते बघायचं आहे?  शुक्रवार संध्याकाळ ते शनिवार पहाट, कोणकोण सोसायटीत आलं होतं ते दाखव..?"

सोसायटीत चाळीस बिल्डिंग्ज आहेत. प्रत्येक बिल्डिंगला दहा मजले. तो मनातल्या मनात हसेल. मुख्य म्हणजे त्याला कळेल की मी घाबरतो. म्हणजे तोच जर लिंबू ठेवणारा असेल तर तो सोकावेल आणि पुन्हा पुन्हा असेच काहीतरी करत राहील. त्याला आणि मामाला एखादं निमित्त काढून राहिलेली दिवाळी रक्कम देऊन टाकावी, हे बरं.. असं ठरवलं.  

संध्याकाळी लिफ्टमध्ये समोरच्या फ्लॅटमधल्या बिडवेकाकू भेटल्या. त्यांच्या हातात भाजीची पिशवी होती.  वर दोन लिंबं दिसत होती.  मी दचकलो. वरती का ठेवली आहेत? पटकन टाकता यावीत म्हणून?

म्हणजे बिडवेकाकू? शिट. मागे दोन-तीन वेळा त्यांनी आणि त्यांच्या नवऱ्याने आमच्याकडे विषय काढला होता की आमचा फ्लॅट विकायचा आहे का.. बिडवेंच्या भावाला हवा होता. दोन्ही भाऊ शेजारी शेजारी राहतील अशा उद्देशाने.  तेव्हा ते म्हणाले की भावाची खूप इच्छा होती बांधकाम चालू होतं त्या वेळी बिल्डरकडूनच हा फ्लॅट घेण्याची. ते आणि त्यांची मिसेस येऊन बघून पण गेले होते. पण त्या वेळी लोन नाही होऊ शकलं. म्हणून त्यांना हा माझा फ्लॅट घेता नाही आला. त्यांनी खूप स्वप्नं बघितली होती. पण मला फ्लॅट अर्थातच विकायचा नव्हता. तरी ते अध्येमध्ये विचारत असत. विचार बदलला तर सांगा.. असं.

आणि माझ्या मनाने हा पहिला खरा आरोपी शोधला. मी हे माझं घर सोडून जावं.. म्हणजे विकून जावं.. यासाठी ते आता या थराला गेले? मला मनस्ताप देऊन देऊन मी घर सोडून जाईपर्यंत आता हे चालू राहणार?

क्षणभरासाठी सगळं स्पष्ट झालं. फक्त क्षणभर.

आणि लगेच मी स्वतःला झापलं.

महाराष्ट्रात तरी असंख्य पदार्थांत लिंबू पिळतात. एखाद्या माणसाच्या भाजीच्या पिशवीत लिंबू सापडलं म्हणून त्याच्यावर संशय घ्यायचा?

वेड लागलंय का? लागलंय? नाही. नसणार. नसावं.

काकू माझ्याशी नेहमीप्रमाणे हसून बोलल्या. मला चीड आली. कशाला तोंडदेखलं हसताय? आधी माहीत असतं की तुम्ही इतकी नजर लावून बसला आहात, तर दुसरीकडे घेतला असता फ्लॅट.  

पण ते सगळं गिळून टाकून मीही तोंडदेखलं हसलो. लिफ्टमधून बाहेर पडताना अचानक वाटलं... त्या माझ्याकडे जरा जास्तच पाहत होत्या का? हो. असाव्यात. असणार.

दोन दिवसांनी ऑफिसमध्ये एका बोर्ड मीटिंगसाठी बनवलेल्या रिपोर्टमध्ये माझ्याकडून ब्लंडर म्हणतात तशी चूक झाली. रेव्हेन्यू नंबरच चुकला. अक्षम्य.

बॉसने ऑफिसात पोहोचायचीदेखील वाट न बघता कारमधूनच फोन करून वाईट सुनावलं. स्टिंकर मेल टाकली. वरच्या सर्वांना मार्क केलं.

साधी गोष्ट नव्हती. माझ्याकडून घोडचूक झाली होती.

पण फोन ठेवल्यावर मला एकदम प्रशांत आठवला.

तीन महिन्यांपूर्वी एका छोट्याशा गोष्टीवरून आमच्यात थोडी कुरबुर झाली होती. स्टेजवर जाऊन श्रेय घेण्यात काही वेळा मान-अपमान होतात तसं.

त्याला माझ्यामुळे मोठं काही पैशाचं नुकसान झालं होतं का? तसं नाही. पण लोकांना इगो असतो. प्रेस्टिज इश्यू करतात. तो खूपच दुखावला गेला असेल का? डूख धरला असेल ? नाही. बहुधा नाही. नसावा. आणि तेवढ्यासाठी तो माझ्या घराच्या दारापर्यंत रात्री-अपरात्री येईल असं वाटत नाही. पण बोर्ड प्रेझेंटेशन ज्या शेअर्ड फोल्डरमध्ये होतं, त्याचा पूर्ण टीमला ॲक्सेस आहे. प्रशांतलादेखील. आणि प्रत्येक जण आपापल्या स्लाईडवर काम करत होता. माझ्या स्लाईडला त्याने हात लावला असेल? ॲडमिनच्या मदतीने तपासून पाहता येईल म्हणा. पण उगीच सगळीकडे चर्चा होईल की मी संशय घेतो म्हणून.

आणि हा विचारही मूर्खपणाचा होता. प्रशांत करणी करणारा माणूस? एवढ्याशा कारणाने? नो. नाही. नसणार.

मी हसलो. पण हसणं उगीच अचानक थांबलं. नाही हसता आलं फार.

माझ्या लक्षात आलं. माणूस करणी करणारा आहे की नाही हे त्याच्या कपाळावर किंवा चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं. काम अवघड आहे.

मी स्वतःला अंधश्रद्धाळू समजतच नव्हतो. उलट मी स्वतःला तर्कशुद्धच मानत होतो. आणि मी आहेच तसा. माझं म्हणणं अगदी साधं होतं. करणी, वशीकरण, मूठ, लिंबू मारणे हे अस्तित्वात नाही. पण शत्रू मात्र अस्तित्वात असतात. सगळीकडे. अदृश्य. कुठून वार येईल सांगता येत नाही. कधी चांगल्या चाललेल्या आयुष्यातून कोणाचा बाप मरेल, कोणाची आई मरेल, कोणाचं बाळच.. अकाली..

समजा, आज एखाद्याने माझं वाईट व्हावं म्हणून फक्त लिंबू ठेवलं. उद्या त्याला शक्य झालं, ऐपत आली तर प्रत्यक्ष हानीदेखील करू शकतो ना? हा विचार तर्कशुद्ध आहे. अंधश्रद्धा नाही.

तो दुसरं काही करेल? गाडीच्या ब्रेकशी छेडछाड?

खाण्यात काही घालणं? एखादा खोटा आरोप? आयुष्यातून उठवणारा?

ऑफिसमध्ये माझ्याविरुद्ध काही?

अंधश्रद्धा नव्हे. ही एक साधी रिस्क असेसमेंट आहे. आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मला ती करायलाच हवी.

या विचारांनी मला थांबवणारा शेवटचा अडसरही गेला.

मी दुसऱ्या दिवशीपासून पार्किंगमध्ये गेल्यावर आधी गाडीभोवती फेरी मारू लागलो. चारी टायर पाहायचो. गाडीखाली वाकून पाहायचो. मग इंजिन चालू केल्यावर पूर्ण ब्रेक मारून थांबते आहे, हे चेक करूनच बाहेर काढायची.

एकदा ब्रेक थोडा सैल वाटला. कार लगेच सर्व्हिस सेंटरला नेली.

“ब्रेक एकदम ओके आहेत, सर.” मेकॅनिक म्हणाला.

विचार आला. ब्रेक्स ओके आहेत. म्हणजे आज तरी आहेत. वन डे ॲट अ टाईम. चेक करतोय हे बरं.

मी घरात येणाऱ्या वस्तूंबाबतही सावध झालो.

दारात ठेवलेली दुधाची पिशवी. पेपर. त्यावर कोणी काही लिहून ठेवलं आहे का? कारण एकदा पेपरच्या वरच्या कोपऱ्यात माझा घर नंबर आणि एक आकडा लिहिला होता. काय अर्थ असेल त्याचा, म्हणून शोध घेतला. बायकोकडून ती बिलाची रक्कम असल्याची खातरी करून घेतली. पण नेहमी असंच असेल असं नाही.

कुरिअर. एक दिवस एक मिठाईचा डबा आला. बायकोने थेट त्यातला बॉक्स उघडून एक काजू कतली तोंडात टाकली. मी समोर होतो म्हणून बरं. मी ओरडलो आणि म्हटलं, "कोणाकडून आलंय पार्सल तेही न बघता थेट खातेस काय? काही झालं तर कोण जबाबदार?"

"अरे ,इतका अपसेट का होतोयस? मी बघितलं होतं.  दिवाळी आलीय ना. तुझे ते शक्तीग्रूपवाले व्हेंडर आहेत, त्यांचीच आहे दर वर्षी येते तशी..", ती म्हणाली.

"हे बघ. शक्तीग्रूप असं नाव कुणीही लिहू शकतं. प्रशांतसुद्धा. किंवा सिक्युरिटी गार्डला पण माहीत असतं."

ती दचकल्यासारखी होऊन काही वेळ माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या नजरेत काळजी होती. माझ्याबद्दल. बहुधा. की तिला काही माहीत होतं? जे मला माहीत नाही? आणि मला निष्कारण त्रास नको म्हणून ती काहीतरी लपवते आहे? तिला खोदून खोदून विचारलं तरी ती नाहीच म्हणाली.

त्या रात्री मला झोप आली नाही. एक विचार सतत डोक्यात होता.

ज्याला माझा मृत्यू हवा आहे, तो माझ्या किती जवळचा आहे? माझा फोन नंबर त्याला माहीत असेल? माझी गाडी माहीत असेल? असणार. सैल ब्रेक प्रकरणात शंभर टक्के खातरी कधीच देता येत नाही.  

इंटरनेटवर शोधलं की कारची चावी नसेल तरी कोणी ब्रेक सैल करू शकेल का? तर तांत्रिकदृष्ट्या ते शक्य आहे असं कळलं.

मी किती वाजता घराबाहेर पडतो हे त्या व्यक्तीला माहीत असेलच.  माझं रूटीन तसं रेग्युलर आहे.  तो माझ्या घरात सहज येऊ शकणारा आहे. दारापर्यंत तर आलाच होता की.

शेवटचा विचार आल्यावर मी शेजारी झोपलेल्या बायकोकडे पाहिलं.

मी हळूहळू खूपच खोलात पोहोचलो होतो.. बहुधा.

दुसऱ्या दिवशी मी ठरवलं. बस. आता पुरे. मी विज्ञान मानणारा माणूस आहे. एका लिंबाने माझ्या आयुष्याचा इतका कंट्रोल घ्यायचा? आणि मी घेऊ द्यायचा?

मी ठरवून जोर लावून मुद्दाम बिल्डिंगच्या खाली गेलो.

गेटबाहेर टपरीवर चहा घेतला. मुद्दाम सिक्युरिटीवाल्याशी गप्पा मारल्या. छान बोलत होता. त्याच्या घरच्या लोकांच्या आठवणी, गावाकडच्या गोष्टी असं सगळं. तो माझ्या वाईटावर नसावा. त्याच्या हातावर पाचशेची नोट ठेवली. "बच्चोंको मिठाई खिलाओ"

मग जरा शांत मनाने घरी आलो. पन्नास टक्के शांत. मामाचे द्यायचे राहिले होते अजून.

दार उघडणार, इतक्यात माझी नजर उंबऱ्याजवळ कोपऱ्यात गेली. तिथे काळ्या रंगाचा एक छोटासा धागा पडला होता.

मी जागेवर थांबलो. नीट बघितलं. या वेळी पुन्हा तीच चूक नको, म्हणून सरळ डाव्या हाताने तो उचलून पाहिला. जवळून. नंतर साबणाने हात धुता येतात.  

बहुतेक कुणाच्यातरी कपड्यातून निघालेला साधा धागा असू शकत होता. पण पुरावा नव्हता. जरा जाडसर वाटला. आणि धाग्यांचा समूह. गंडा असतो तसा. गंडेदोरे. त्याचा फोटो काढून ठेवला. मग खाली जाऊन गटारात टाकून आलो. साबण आणि डेटॉलने हात धुऊन नंतर इंटरनेटवर बसलो. काळ्या धाग्याचा वापर मंत्र-तंत्र किंवा काळ्या जादूत होतो का? तर अनेक प्रांतांत तो होऊ शकतो, असं कळलं.

दोन दिवसांनी पार्किंगमध्ये गाडीवर लांब ओरखडा दिसला. विशिष्ट आकारात. आता मात्र माझ्याकडे पुरावा होता. कोणीतरी नीट प्लॅन करून हे करत होतं.

मी पार्किंगचं फुटेज मात्र तपासलं. गाडीचं नुकसान ही वैध तक्रार होती. तसं काही कोणी येऊन मुद्दाम तो विशिष्ट आकारात ओरखडा काढला, असं व्हिडिओत स्पष्ट दिसलं नाही. एक-दोन लहान मुलं सायकल चालवत गाडीच्या आसपास फेऱ्या मारून गेली होती. ओरखडा पडलेली बाजू कॅमेऱ्याच्या थेट समोर नव्हती. त्यामुळे सायकलीचा ओरखडा आहे असं सिद्ध झालं नाहीच.

"बाहर ऑफिसमे कहींपे लगा होगा साब. किसीने चाबी मारा है लगता है." सिक्युरिटीवाला म्हणाला.

मी त्याच्याकडे पाहिलं. तो माझी समजूत घालत होता, की काही लपवत होता?

"बाहर का मैं देख लूंगा. पहले यहाँ का बता सब ठीकसे.  काल रात्री कोण कोण आलं होतं सोसायटीत."

"सौ दो सौ लोग आया होगा सर..."

"डिलिव्हरी वगैरे.? पूरा रजिस्टर दिखाओ."

त्याने रजिस्टर पुढे केलं. एका दिवसाच्या एन्ट्र्यांची तीन पानं होती.  

मी त्या पानांचे फोटो घेऊन ठेवले.  त्यात आलेल्या लोकांचे मोबाईल नंबरही होते. तेही नंतर एकेक करून लुक अप करता आले असते. मी एकेक नाव वाचलं. माझ्या ओळखीचं नाव शोधत. आणि तसं कोणी सापडू नये अशी प्रार्थना करत. नाहीच सापडलं.

कारण घातपात करायला आलेला मनुष्य खरं नाव देईल हे शक्य नाही. अर्थात तो खरा मोबाइल नंबरदेखील देणार नाहीच म्हणा. तरीही.

दुसऱ्या दिवशी रस्त्यात माझ्या कारची ठोकठोकी झाली. चूक तशी तर माझीच होती.

समोरच्या गाडीने कुत्र्याला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक मारला आणि मी जरासा उशिरा मारला.

कारण मी रिअर व्ह्यू मिररमध्ये मागची एक काळी बाईक खूप वेळ पाहत होतो. ती बाइक गेली दहा मिनिटं माझ्यामागे होती. मी वळलो की माझ्यामागे तीही तेच वळण घ्यायची. इतका योगायोग?

माझी टक्कर झाल्यावर तो बाइकवाला माझ्या शेजारून पुढे निघून गेला. त्याने माझ्याकडे पाहिलंसुद्धा नाही. साहजिक आहे. आता त्याचा काही उद्देश असला तरी तो आता या भानगडीमुळे साध्य होणार नव्हता. तूर्त तरी मी वाचलो होतो. गर्दी जमायला लागली. मग भांडण, भरपाई.. सगळं. बाइकचा नंबर नोट करता आला नाही.

रस्त्याच्या कडेला उभं राहून कारच्या मोडलेल्या बंपरकडे पाहताना माझ्या डोक्यात एकच विचार होता.

खरंच काही लोक म्हणतात तसं नष्टर सुरू झालं की काय..

शेवटी एके दिवशी मी लिफ्टमध्ये बिडवेकाकूंना सहज बोलल्यासारखं बोललो.. की, "मागे एकदा आपल्या दोघांच्या दारांच्या मधोमध कोणीतरी एक लिंबू ठेवलं होतं. थोडंसं तुमच्या साईडला.. तुम्हाला मी त्या वेळी बोललो नाही, उगीच तुम्हाला मनस्ताप नको म्हणून.  माझा विश्वास नाही.  पण तुमच्या सहज कानावर घातलं. तुमचं कोणाशी काही वैर नाही ना काकू? किंवा काकांचं?"

"काय की.. कोणी टाकलं बाई लिंबू?" बिडवेकाकू म्हणाल्या.  पण त्यांना फार धक्का बसला नव्हता. म्हणजे त्याच होत्या की काय टाकणाऱ्या? माझा अंदाज खराच होता तर..

मग त्या हसल्या आणि म्हणाल्या, "कोणाच्या तरी पिशवीतून पडलं असेल. किंवा कचऱ्याचा डबा ठेवतात त्यातून सांडलं असेल. मांजरं येतात रात्री."

मी हसलो नाही. कचऱ्यात अख्खं लिंबू? काहीही.  

त्या काहीतरी आणखी बोलून निघून गेल्या.

मी दार बंद केलं. खुर्चीत बसलो. बराच वेळ.

समोर कार इन्शुरन्स पॉलिसी पडली होती. गाडी गॅरेजमध्ये गेली होती. खिशातूनदेखील बराच खर्च होता.

ऑफिसमध्ये माझी इमेज हळूहळू खराब झाली होती. काही ना काही चुका होतच होत्या आणि मी माझ्या पर्सनल गोष्टींवर गॉसिप करणाऱ्या एकादोघांशी उगीचच जास्त चिरडीस जाऊन वाद घालून प्रकरण वाढवलं होतं.

बायको नंतर नंतर माझ्याशी कामपुरतंच बोलायला लागली.

प्रशांतशीही माझं भांडण झालं. जोरदार. किरकोळ कारण. पण चिघळत गेलं. एकमेकांशी बोलणं थांबलं. तशीही त्याला अजून क्लीन चीट नव्हतीच माझी.

बिडवेकाकूंशी बोलताना माझ्या आवाजातला संशय त्यांनाही जाणवायला लागला होता असं वाटतं. शक्य आहे.

सिक्युरिटीवाला मला दुरून पाहून आता मामा आणि इतर वॉचमन लोकांशी खिदळायचा. बहुधा. आणि जवळ आलो की चूप.

हे सगळं खरं होतं. म्हणजे किमान त्यातला काही भाग तरी. लिंबू दिसल्यानंतरच घडलं होतं. म्हणजे तो जो काय अपशकुन किंवा करणी म्हणतात ते खरं ठरलं होतं.

मी जर पूर्ण भानावर राहून विचार केला, तर मला हेच दिसत होतं की.. माझं वाईट व्हावं म्हणून ते लिंबू कुणी मुद्दाम ठेवलं नव्हतं. माझ्या मृत्यूचा विचार कुणी करत नव्हतं. माझ्या गाडीशी कुणी मुद्दाम छेडछाड करत नव्हतं. माझ्या ऑफिसमध्ये खास मला संपवण्याचा काही कट शिजत नव्हता. किमान हे सर्व एकमेकांशी संबंधित तरी नक्कीच नव्हतं.

पण त्यासाठी भानावर राहायला हवं ना? फार फार तर दोन मिनिटं भानावर राहता येईल. पण पुढे? समोर दिसणाऱ्या पुराव्यांना कसं नाकारणार?

माझा लपलेला शत्रू शोधण्याच्या नादात मी एकेक मित्र मात्र गमावत गेलो. बरंच काही नष्ट झालं.

मी म्हटलं तसं आता त्या गोष्टीला खूप वर्षं झाली. किती ते महत्त्वाचं नाही. आणि त्या वर्षांत काय काय घडलं ते लिहिण्याची माझ्यात ताकद नाही आता. पण बायको आणि पोर आता वेगळे राहतात. ती नोकरी गेली. दुसरीही गेली. तिसरी शोधतोय. फ्लॅट विकून टाकला. भाड्याने जागा घेतली. इतकं होण्यासाठी जितकी वर्षं लागतील तितकी गेली, असं समजून घ्या.

त्या दिवशी दारात पडलेल्या लिंबाने माझ्यावर करणी झाली, हे मात्र खरं. माझं तळपट झालं.

आणि ते करण्यासाठी कुणा शत्रूची किंवा मांत्रिकाची गरज नव्हती.

मी एकटाच त्यासाठी पुरेसा होतो..

दिवाळी अंक वर्ष

वाचने 152
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया