Skip to main content

स्त्रीजन्मा, कशी रे तुझी कहाणी ?

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

विश्वंभरशास्त्रींचा मोठा मुलगा सदाशिव आणि मी शाळूसोबती. एकाच वयाचे.

उत्तम कीर्तनकार म्हणून विश्वंभरशास्त्री पंचक्रोशीत विख्यात होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी राष्ट्रभक्ती, स्वदेशी चळवळ, क्रांतिकारकांची स्फूर्तिदायी चरित्रे या विषयी सुरेल कीर्तनांच्या माध्यमातून चांगली जनजागृती केली होती.

शास्त्रीबुवांच्या घरातले वातावरण खेळकर, आनंदी, होते. ते संध्याकाळी मुलांना पुराणातल्या गोष्टी सांगायचे.

त्यांच्या मुलांपैकी सदाशिव  सर्वात मोठा.

सदाशिवहून लहान दत्तात्रय आणि सर्वात लहान कौशांबी.

मध्यप्रदेशात धार जिल्ह्यातला एका लहान गावात आम्ही रहायचो. सदाशिव आणि मी मॅट्रिक पास झालो, त्यानंतर आमच्या वाटा बदलल्या. तो बी.कॉम. करायला धारला, तर मी इंदौरला चित्रकला शिकायला गेलो.

काळ झपाट्याने उलटत होता…

सदाशिव बी.कॉम करून बँकेत नोकरीला लागला, तेंव्हा दत्तात्रय आणि कौशांबी शिकत होते.

एकदोन वर्षानंतर सदाशिव आणि कौशांबीसाठी स्थळे  बघायला सुरुवात झाली. कौशांबी जरा बुटकी, सावळी, हुशार आणि प्रेमळ स्वभावाची होती.

 

त्याकाळी बॅंकेतला मुलगा म्हणजे लग्नाच्या बाजारातले खणखणीत नाणे. याउलट कौशांबीला बहुतेक तिचा बुटकेपणा आणि सावळा वर्ण, यामुळे नकार येऊ लागले. खरेतर सगळ्यात आधी कौशांबीला उजवावे, मग सदाशिवचे लग्न उरकावे अशी शास्त्रीबुवांची इच्छा होती. पण तो योग काही जुळून येईना. बऱ्याच स्थळांकडून नकार मिळालेली कौशांबी हळूहळू कोमेजू लागली, त्यात सदाशिवासाठी मोठ्या घराण्यातली चांगली मुलगी सांगून आली. मुलीकडले थांबायला तयार नव्हते, त्यामुळे लगेचच त्याचे लग्न थाटामाटात पार पडले.

 

नवीन सुंदर नलिनी वहिनी बघून कौशांबी अगदी हरखून गेली. तिच्या भरजरी पैठण्या, दागिने, तिचे लाजणे, अदबशीर वागणे,

घरातला तिचा सहजसुंदर वावर, सगळेच साजिरे गोजिरे  होते. तिची मंगळागौर, सण-उत्सव, डोहाळजेवण वगैरे बघताना कळत नकळत कौशांबी तिच्यात स्वतःचे भविष्यातले रूप बघत होती.

आरश्यासमोर बसून बटा सावरताना ‘चांदोबा’तला कोणी देखणा राजकुमार मागून येऊन हळूच आपले डोळे मिटत आहे, आणि आपल्याला पुढे बसवून घोडा उडवत भरधाव वेगाने जात आहे … असे काहीबाही भास तिला होऊ लागले…

पुढे कौशांबीला गावातल्या शाळेतच शिक्षिकेची नोकरी मिळाली, त्यानंतर लवकरच तिची आई देवाघरी गेली.

शास्त्रीबुवा आणि घराच्या अर्ध्या  भागात राहणारे त्यांचे लहान बंधू आणि त्यांची पत्नी पण आता खालावत चालले होते.

सदाशिवाची बदली लांब गावी झाली. तो बायको-मुलासह तिकडे राहायला गेला.

कौशांबीचे ‘मुलगी दाखवण्याचे’ अनेक कार्यक्रम झाले, पण सगळीकडून नकार आला. कौशांबीचे लग्न काही केल्या जुळत नव्हते.

दत्तात्रयाचे  शिक्षण पूर्ण होऊन तोपण जवळच्या एका गावातल्या बँकेत चिकटला. आता त्याच्यासाठीपण मुली सांगून येऊ लागल्या.

लवकरच तोही चतुर्भुज झाला. त्याची बायको चंद्रिका आधुनिक विचारांची, बिनधास्त स्वभावाची होती.

तिने आल्याआल्या बँकेच्या गावात भाड्याने घर घेऊन वेगळा संसार थाटला.

सुट्टीच्या दिवशी ते दोघे घरी यायचे, तेंव्हा चंद्रिकाचे नवऱ्याला खेटून बसणे, मोठमोठ्याने हसणे, रात्रीचा सिनेमा बघायला दोघांनीं थेटरात जाऊन सकाळी खूप उशीरा उठणे वगैरे बघून कौशांबीला कसेतरी व्हायचे. एकदोनदा त्या दोघांचा प्रणय ओझरता नजरेस पडल्यावर तर ती कमालीची अस्वस्थ झाली…

तशात तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या शाळेतल्या शिक्षिकांची लग्ने होऊन त्या सासरी जाऊ लागल्या. आपल्याला काही लोक आता ‘जरठ कुमारी’ म्हणू लागले असल्याचे तिच्या कानावर आले.

हळूहळू कौशांबी अबोल, कठोर, चिडकट  होऊ लागली. विद्यार्थ्यांना ती पट्टीने मारत असल्याबद्दल पालकांच्या तक्रारी येऊ लागल्या.  शाळेतून घरी आल्यावर ती तासनतास शून्यात नजर लावून बसायची. हाक मारल्यावर दचकून उठायची.

– शास्त्रीबुवा मोठ्याच चिंतेत पडले.

आता त्यांची प्रकृतीपण तोळामासा राहू लागली होती आणि आपल्या लाडक्या लेकीला चांगले स्थळ मिळून याची देही याची डोळा तिचा पण संसार फळत फुलत असलेला बघायला मिळावा,  यासाठी ते व्याकुळ झाले होते. कौशांबीला मात्र  ‘दाखवण्याचे’ कार्यक्रम, त्यासाठी  नटून थटून बसणे, गाणे म्हणून दाखवणे, कांदेपोहे-चहा देणे, सुईत दोरा ओवून दाखवणे या सगळ्या गोष्टींचा अगदी वीट आलेला होता.

आणखी काही वर्षे उलटली.

– कौशांबी आता निराश, उदास झाली होती.

पण एक दिवस जिल्हयाच्या शहरातून शास्त्रीबुवांना भेटायला आलेल्या नातेवाईकाने कौशांबीसाठी एक स्थळ सुचवले. मुलगा वयाने जरा मोठा, पण शहरात नोकरी करत होता.

मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पसंत असल्याचा निरोप आला, आणि  रुपयानारळ वगैरे सगळे व्यवस्थितपणे पार पडले.

कौशांबीला मुलगा फारसा आवडला नसला, तरी नाही म्हणण्यासारखेही काही नव्हते. लग्नाची तारीख ठरली. घरात आनंदाचे वातावरण पसरले. लग्नाच्या आदल्या दिवशी दुपारी शहरातून वराती, मुलाचे आईवडील सगळे आले. नवरामुलगा त्याच्या मित्रांना घेऊन संध्याकाळपर्यंत येणार होता खरा, पण रात्र उलटली तरी तो पोहोचला नाही. सगळ्यांना चिंता वाटू लागली. कौशांबीला रात्रभर झोप लागली नाही. नको नको त्या शंकांचे काहूर तिच्या मनात दाटले.  

सकाळ उजाडली. लग्नविधीच्या तयारीच्या गडबडीत सगळे गुंतले. सकाळी दहाचा मुहूर्त होता, तोही टळून गेला पण मुलाचा पत्ता नाही. कोणीतरी घाईघाईने चवकशीसाठी शहराला रवाना झाले. शेवटी अगदी संध्याकाळी मुलगा एकटाच, थकलेला, अगदी गबाळ्या वेषात येऊन हजर झाला. काय झाले, उशीर का झाला, मित्र का आले नाहीत, त्याने काहीच सांगितले नाही. मग घाईघाईत लग्नविधी आटोपण्यात आला. सकाळी वरातीबरोबर कौशांबी सासरी रवाना  झाली. शास्त्रीबुवा खूप शिणलेले होते. काका - काकूने तिला प्रेमाने निरोप दिला.

– हे सगळे घडले, त्या काळात मी दिल्लीत राहात होतो. अधून मधून थोडे दिवसांसाठी गावी जायचो, तेव्हा तिकडल्या गोष्टी कळायच्या. पुढे माझे आईवडील निवर्तले, आणि माझे गावी जाणेही बंद झाले.

– अनेक वर्षे उलटली.

– बरीच वर्षे माझे परदेशातही  वास्तव्य झाले.

– शेवटी तिकडला गाशा गुंडाळून भारतात परतलो. लहानपणीच्या मित्रांच्या, आईवडिलांच्या आठवणी मनात रुंजी घालत होत्या.

गावातली मातीची कौलारू घरे, त्यांचे प्रशस्त ओटे, विहिरी, पाणवठा, गाईगुरे, डोंगर, ओढे, गुरांना चरायला सोडून वडाच्या  पारावर निवांत पावा वाजवत बसणारे गुराखी, आठवड्याचा बाजार … सगळ्याचे अनिवार आकर्षण वाटत होते.

– मग एक दिवस गावी आलो.

– सगळे बदलले होते.

– मातीच्या  सुंदर, प्रशस्त घरांच्या जागी काँक्रीटच्या घाणेरड्या इमारतींची दाटी झालेली होती.

– ओढयांची  जागा घाणेरड्या गटारांनी घेतली होती.

– डोईवर पदर घेतलेल्या आया - बहिणींऐवजी भडक फुलाफुलांचे भोंगळ गाऊन घातलेल्या लठ्ठ, बेढब बायका.

– टीशर्ट - जीन्स घातलेल्या पोरी,  गुटका- पान चघळत हिंडणारे  टोळभैरव.

– भिंतींवर मोठाले बॅनर्स, किराणा दुकानासमोर लटकणाऱ्या तंबाखू, गुटका आणि  कसल्या कसल्या लांबलचक माळा.

– जोराने भोंगा वाजवत जाणारे टेम्पो, बाईक, मोठाल्या गाड्या.

कमालीचा उद्विग्न झालो. ‘जाने  कहां गये वो दिन’ गाणे मनात घोळू लागले.

 

तेवढ्यात समोरून एक लांब पांढरी दाढीवाला , रुद्राक्षाच्या माळा घातलेला माणूस येताना दिसला.

चेहरा ओळखीचा वाटला.

अरे, हे तर पंडित रामचरण त्रिवेदी. यांचे पुस्तकांचे मोठे दुकान होते. पण हे अजून जिवंत कसे ?  

अगदी जवळ आल्यावर ते मला निरखून बघू लागले. “प्रणाम रामचरणजी” म्हणत मी हात जोडले.

ते मोठ्याने हसू लागले. त्यांच्या नजरेतही ओळख दिसू लागली.

“अरे वामन, तू यहां कब आया” ?

मी थक्कच झालो.

“तूने मुझे पहचाना नही. मै पंडित रामचरणजी का बेटा राघव. तेरा बचपनका दोस्त”

मला लख्ख आठवले. राघव माझा शाळेतला चांगला मित्र होता. तो आता हुबेहूब त्याच्या वडिलांसारखा दिसू लागला होता.

आम्ही रस्त्यावरच  एकमेकांना मिठी मारून हसू लागलो. लोक बघू लागले हा काय प्रकार आहे.

“चल यार, घर चल. कित्ते साल बाद मिले है”

जवळच्या गल्लीतच त्याचे दुकान आणि घर होते.

दुकान अजून अगदी तसेच होते. दुकानाची मोठी पाटी:  ‘किताबे ही किताबे’  (प्रो. पंडित रामचरण त्रिवेदी)

 

दुकानात गॉगल घातलेला एक तरुण बसलेला होता. राघवचा मुलगा असावा.

सगळीकडे पुस्तकेच पुस्तके.

जाडजूड ‘चरक संहिता’ ‘रामायण’ ‘कोकशास्त्र’ ‘महाभारत’ ‘अनंगरंगरतिशास्त्र’ एकमेकांना खेटून उभे.

‘किस्सा तोता मैना’ - ‘अकबर बिरबल’ - ‘हातिमताई के सात सवाल’ - ‘सिंदबाद के साहसी सफर’ ‘विक्रम वेताल’.

‘मुकेश के दर्दभरे गीत’ ‘रफी के १०१ नग्मे’ ‘ओपी नय्यर के सदाबहार गीत’ ‘बिनाका गीत माला’

विविध व्रतांच्या कथा असलेल्या पुस्तकांच्या थप्प्याच्या थप्प्या.

रस्त्यावर उभा केलेला एक ठळक बोर्ड:

‘नकल से सावधान’

“हमारे यहाँ सभी व्रतों की असली पुस्तके मिलती है”

यहां से खरीदी हुवी व्रतों की असली पुस्तके बाँटने से ही उनका फल मिलता है

गलत साबित करने वाले को १०१ रुपये नगद इनाम. (नोट : आजतक सैकडो लोगों को इनाम दिया जा चुका है)

पलीकडे “जिंदा तिलिस्मात यहाँ मिलता है” अशी पाटी लटकवलेली.

मला हे सगळे पूर्वीसारखेच असलेले बघून एकीकडे आनंदही होत होता आणि हसू पण येत होते.

दुकानाला लागूनच असलेल्या दारातून आम्ही घरात शिरलो. घरसुद्धा पूर्वी होते तसेच होते . आता समृद्धीच्या खुणा पूर्वीपेक्षा जास्त दिसून येत असल्या, तरी जुन्या घराचा दिमाख आणि सौंदर्य व्यवस्थितपणे टिकवून ठेवलेले  होते.

मध्ये फरसबंदीचा चौक. त्यात तुळशीवृंदावन. विहीर.

पितळी कड्यांचा मोठा झोपाळा. तिन्ही बाजूला खोल्या.

पांढरीशुभ्र गादी घातलेल्या प्रशस्त लाकडी चौरस पलंगावर लोड - तक्के. पानाचा चांदीचा डबा. अडकित्ता.

भिंतींवर देवादिकांच्या तजबिरी. जुने, मोठे लंबकाचे दिमाखदार घड्याळ.

सुबक घडणीचे नक्षीदार खांब आणि तुळया.

डोक्यावर पदर घेतलेल्या सुनेने लगबगीने येऊन वाकून नमस्कार केला.

तिच्या कांकणांच्या किणकिणीने मन एकदम भूतकाळात गेले.

“बढिया अदरक की  चाय बनाना बेटा, बचपन के दोस्त है हमारे” .

“ जी बाबूजी”

मग आमच्या गप्पा चांगल्याच  रंगल्या. लहानपणीच्या सगळ्या आठवणींची उजळणी झाली.

शास्त्रीबुवांचा विषय निघाला. सदाशिव आणि दत्तात्रयचे  सगळे ठीक चालले होते. दर तीन वर्षांनी बदल्या होत होत ते बऱ्याच ठिकाणी राहून आले होते.

सदाशिव इटारसीला तर दत्तात्रय जबलपूरला घर बांधून राहत होता. त्यांची मुले नोकऱ्या करत होती. शास्त्रीबुवा आणि काका काकू केंव्हाच निवर्तले होते.

 

कौशांबीच्या लग्नानंतरचे मला काहीच ठाऊक नव्हते.

आता तीपण साठी-सत्तरीत असेल. कशी असेल ? काय करत असेल ?

तिला मुले-बाळे असतील. सुखात असेल….

 

– पण प्रत्यक्षात असे नव्हते.

राघवचा आवाज जड झाला. तो कौशांबीबद्दल सांगू लागला.

 

तिच्या लग्नानंतर काही काळ बरा गेला. वर्षभरात तिला मुलगा झाला.

तिचे बाळ, घरकाम आणि नोकरी यात ती जास्त व्यग्र राहू लागली.

 

हळूहळू तिच्या नवऱ्याचा व्यवहार बदलू लागला. दर रविवारी येणारा नवरा महिन्यातून एकाद वेळीच तिच्याकडे  येऊ लागला.

आला तरी आपली  बायको आणि मुलाशी त्याला काही घेणे देणे नसायचे. त्या दोघांची कोणतीच हौसमौज त्याने पुरवली नाही. उलट तो आला कि दर वेळी कौशांबीकडेच  पैसे मागायचा.

तिने नाही म्हटले तर आरडाओरडा,  भांडण, हिसकाहिसकी करायचा. ती शाळेत गेली की घरात शोधाशोध करून पैसे, तांब्यापितळेची भांडी गोळा करून निघून जायचा.

कौशांबीला खूप वाईट वाटायचे पण तिला यावर काय तोडगा काढावा, कळत नव्हते.

पुढे शाळेतल्या तिच्या एका मैत्रिणीचा भाऊ पोलिसात होता त्याच्यातर्फे माहिती काढल्यावर, कौशांबीचा नवरा तिकडे दुसऱ्या एका बाईच्या नादी लागलेला असल्याचे समजले. पुढे त्याचे सगळे पैसे लुटवून झाल्यावर ती पण त्याला सोडून गेली.  नोकरीतून त्याला बडतर्फ करण्यात आलेले होते आणि आता तो भणंगासारखा दारोदार फिरत असतो, असे समजले.

– एवढे सगळे झाले तरी कौशांबीचे दुर्दैव अजून संपले नव्हते.

 

कौशांबीचा  मुलगा सुरेश आता मोठा होत चालला होता.

हळूहळू तोही बापाच्या वळणावर जातोय की काय असा कौशांबीला संशय येऊ लागला. शालेय शिक्षण कसेबसे पूर्ण झाल्यावर त्याला पुढे शिकायचे नव्हते. काहीतरी बिझनेस करून त्याला एकदम श्रीमंत व्हायचे होते. त्यासाठी तो आईकडून वारंवार पैसे मागू लागला.

भरपूर पैसे घेऊन तो कुठेतरी निघून गेला की कित्येक दिवस त्याचा पत्ता नसायचा. तो कुठे जातो, काय करतो हे कौशांबीला तो कधीच सांगत नसे.

एकुलतं एक लेकरू म्हणून आई त्याचे सगळे हट्ट आजवर पुरवत आलेली होती.

– तोच तिच्या म्हातारपणाचा एकमेव सहारा होता.

सुरेशला रस्त्यात भेटणाऱ्या ओळखीच्या लोकांना तो आपण मोठ्या कंपनीत ‘एक्झिक्युटिव्ह’ची नोकरी करतो,  इतक्या लाखाचे पॅकेज आहे, लवकरच फॉरेनला पाठवणार आहेत, वगैरे बढाया मारायचा.

‘अमेरिकेचा व्हिसा’ घेण्यासाठी आता जरा तातडीची गरज आहे, लवकरच परत करीन, असे काहीबाही सांगून बरेच जणांकडून त्याने मिळतील तितके पैसेही घेतले होते. ते लोकही कौशांबीकडे तक्रारी करू लागले.

गावातल्याच, पण आता शहरात लहानशी नोकरी करणाऱ्या मुलीवर त्याचे प्रेम बसले होते, तिच्याशी लग्न करायचा हट्ट धरल्यावर कौशांबीने पुढाकार घेऊन तिच्याशी त्याचे लग्न लावून दिले खरे, पण सुनेच्या आईवडिलांनी कौशांबीशी त्यानंतर  काहीच सबंध ठेवला नाही.

 

राघवची बायको आणि कौशांबीची चांगली ओळख होती. सुखदु:खाच्या गोष्टी बोलायला त्या भेटायच्या. त्यातून राघवला सगळ्या गोष्टी कळत होत्या.

 

पुढे शाळेच्या नोकरीतून रिटायर झाल्यावर मिळालेल्या फ़ंडाच्या रकमेतून कौशांबीने गावातच सुरेशच्या नावावर एक लहान प्लॉट घेऊन घर बांधून घेतले. दोनतीन  वर्षे ते भाड्याने दिल्यानंतर ते घरही सुरेशने परस्पर विकून टाकले होते, ही गोष्टही  तिला बरेच दिवसांनंतर समजली.

 

– हळूहळू कौशांबी पूर्णपणे हताश झाली आणि  दिवसेंदिवस तिची तब्येत ढासळत चालली.  तिच्या जुन्या घरात आता ती एकटीच रहात होती.

सुरेश आता तिकडे फिरकेनासा झाला होता.

 

– हे सगळे ऐकून मी कमालीचा बेचैन झालो. आपण तिची कधीच खबरबात घेतली नाही, तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही, याची मनाला तीव्र बोचणी लागली.

“अरेरे. आतातरी तिला भेटायला जायलाच हवे”  मी राघवला म्हणालो.

 

– गावात खूप काही बदललेले असले, तरी थोडेसे हुडकल्यावर मला शास्त्रीबुवांचे घर सापडले.

त्या मोठ्या घरात आता शुकशुकाट होता. पुढले मुख्य दार नुसते लोटलेले होते.

मी आत शिरलो. सर्वत्र धूळ, कोळिष्टके.

एका अंधाऱ्या  खोलीत कुणीतरी आहेसे वाटले.  मी त्या खोलीत शिरलो.

पलंगावर एक अगदी सुरकुतलेली, शरीराचे चिपाड झालेली वृद्ध स्त्री छताकडे बघत पडली  होती.

– निराश. उदास. आजारी. केविलवाणी. दीनवाणी. माझ्या जिवाचे पाणी पाणी झाले.

तिला माझी चाहूल  लागली.

“ कोण आहे ?”

“ मी… वामन… सदाशिवचा मित्र.

ती धडपडून उठून बसली. तिच्या डोळ्यात थोडीशी चमक आलेली दिसली.

 

वामन, कुठे होतास इतके दिवस ?

मी तुझी खूप खूप वाट बघितली रे. तू आता आलास.

कुठे असतोस तू ?

लहानपणी छान चित्रं काढायचास, आता काय करतोस ?

– आज माझी कशी आठवण आली तुला, इतक्या वर्षांनंतर ?

 

एवढे बोलताना तिला धाप लागली. मग असंबद्धपणे ती काहीतरी बरळू लागली…

… माझं मन तुला कधीच समजलं नाही …

… तुझी किती वाट बघितली…

… तू माझ्या जीवनात आला असतास तर,

… माझी अशी फरपट झाली नसती रे ….

ग्लानि येऊन ती पुन्हा आडवी  झाली.

 

मी अवाक झालो…असा मी  कधीच विचारही केला नव्हता… काय करावे काही सुचेनासे झाले.

 

तेवढ्यात राघवाची बायको तिच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आली. मला खुणेनेच तिने बाहेर जायला सुचवले.

मी विषण्णपणे बाहेर आलो. तिथे राघव उभा होता.

आम्ही दोघे त्याच्या घराकडे निघालो.

– त्याच रात्री कौशांबी निवर्तल्याचे समजले. 

दिवाळी अंक वर्ष

वाचने 14
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया