Skip to main content

सरमिसळ

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

 

ही आडनावामुळे झालेली एक गंमतीदार सरमिसळ आहे.

मी १९८९ साली दोन महिने - १ जानेवारी ते १ मार्च असा लखनऊ येथे मेडिकल ऑफिसर्स बेसिक कोर्स (MOBC) यासाठी दाखल झालो होतो. आपले एमबीबीएस पूर्ण झाल्यावर इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर हा कोर्स असतो.

यात नवीन डॉक्टरांना लष्करी तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रे, युद्धाचा सराव, लष्करी वैद्यकीय सेवेचे प्रारूप, भारतभर आणि भारताच्या  बाहेर त्याचे काम कसे चालते याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय तेथे परेड, शारीरिक शिक्षण, विविध खेळ, लष्करी परंपरा आणि शिष्टाचार, विविध गणवेश आणि ते घालण्याचे प्रसंग या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. अगदी काट्या-चमच्याने कसे जेवावेपासून रुबाबदार दिसण्यासाठी चालावे कसे, विविध प्रसंगात वागावे कसे असा भरगच्च कार्यक्रम होता.

त्यातून आम्ही ९ जण नौदलात,- १७ जण वायुदलात आणि ७० जण भूदलात भरती होऊन आमच्या इंटर्नशिपसाठी भारतभर विविध लष्करी रुग्णालयात काम करत होतो. बाकी काही जण बाहेरच्या मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करून आलेले होते. एक कॅप्टन चिंतामणी तर एमएस सर्जन होता आणि भरती झाल्यावर त्याला थेट श्रीलंकेत पाठवण्यात आले होते. त्यामुळे त्याचा कोर्स करायचा राहून गेला होता.

नौदलात भरती झालेल्या ९ जणांपैकी आम्ही पाच जण मुंबईत कुलाब्याला अश्विनी या ८२५ खाटांच्या मोठ्या रुग्णालयात काम करून आलो होतो. एक वर्ष इंटर्नशिपनंतर आमचे सर्व वर्गमित्र परत भेटणार होते, यामुळे आम्ही सर्व फार आनंदात होतो. पण कोर्स सुरू झाला, तेव्हा 'घी देखा पर बडगा नही देखा' अशी स्थिती झाली. ज्यांनी 'प्रहार' हा सिनेमा पाहिलेला आहे, त्यांना याची थोडीफार कल्पना येईल.

आमचा कोर्स कमांडो कोर्सइतका कठीण नव्हता. पण ३० मिनिटांत ५ कि.मी. धावणे फार कठीण जात असे. अर्थात आमच्या वर्गात उत्तम धावणारे पंचवीस मिनिटांत हे पूर्ण करत असत. याशिवाय स्टँडिंग ब्रॉड जम्प, ९ फीट डिच (हे म्हणजे ९ फूट लांबीचा खंदक खणून त्यात वाळू भरलेली असते, या वाळूची पातळी एक फूट खाली असते आणि त्याच्या काठाने घट्ट लाकडाचा सांगाडा असतो आणि लांबून धावून ९ फूट पार करताना थोडी चूक झाली, तर पायाच्या नडगीवर त्या लाकडाचा ओंडका लागून मस्तकात कळ जाते. दोरावर इकडे चढून आडवे जाऊन तिकडन खाली उतरायचे असे.)

ज्या मित्रांनी एक वर्ष इंटर्नशिपमध्ये अंगावर 'चरबी' चढवून घेतली होती, त्यांचे सुरुवातीला फार हाल झाले. बिअर पिऊन पोट वाढलेल्यांचेही फार हाल झाले. कारण पोट वाढल्यामुळे दोरावर चढून पाय 'वर' घेऊन आडवे होण्यासाठी त्यांना फार त्रास होत असे.

आमच्या वर्गातील २२ मुलीसुद्धा या कोर्समध्ये होत्या. त्यांच्या धावण्याच्या वेळात किंवा इतर शारीरिक स्पर्धात वेळाची झालेली वाढ याकडे तेथील उस्ताद कानाडोळा करत असत. अर्थात याबद्दल कुणी वाईट वाटूनही घेतले नाही. पण कोर्सच्या शेवटी या सर्व मुली अंगावर वाढलेली सर्व चरबी झडून जास्त आकर्षक दिसू लागल्या होत्या, हे मान्य करावे लागेल. या सर्व मुली आमच्याबरोबर एमबीबीएस केलेल्या होत्या. त्यातून काही मुलामुलींची वर्गातच कॉलेजपासून प्रेमप्रकरणे होती. त्यापैकी काहींची लग्नेही झाली होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर एक तऱ्हेचा मोकळेपणा होता.

एक बिचारी दंतवैद्यक करून आली होती. नवीन असल्यामुळे तिला जास्त चिडवाचिडवीला सामोरे जावे लागे. कुणी वर्गात मस्ती केली किंवा चावटपणा केला किंवा नियमबाह्य काही केले की आमचे इन्स्ट्रक्टर कोणी मस्ती केली विचारत असत की हमखास कुणीतरी "८४ नंबरने" म्हणून सांगत असे. हा तिचा अनुक्रमांक होता.

एक उदाहरण देतो. आमचे एक निरीक्षक कर्नल ओ' लिअरी यांनी एकदा परेडच्या सुरुवातीला आम्हाला सांगितले, "You have come to the apex institute of AMC  (Army medical corps).  Your "turn out" has to be exemplary.  your shoes should be shining. I want to see my face in it."

आमच्या गटात एक कॅप्टन चलपती राव म्हणून होता, तो मागच्या रांगेतून हळूच म्हणाला, "But I dont want to see your face in my shoe."

कर्नल ओ" लिअरी चा चेहरा लाल झाला. त्यांनी कडक आवाजात विचारले, "who said that?" परत मागून हळूच आवाज आला, "रोल नंबर ८४."

त्यांनी परत विचारले, "रोल नंबर ८४ कोण आहे?" तर त्या दंतवैद्य मुलीने हात वर केला.

कर्नल ओ' लिअरी यांच्या लक्षात आले की हा सगळा चावटपणा आहे. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

मुळात मुंबईच्या गुलाबी थंडीतून लखनऊच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीत जाणे जिकिरीचे होते. त्यातून सकाळी ६ वाजता शारीरिक शिक्षणासाठी लखनऊच्या थंडीत आपल्या स्कूटरने परेड ग्राउंडवर जावे लागे. ज्यांनी स्कूटर आणली नव्हती, त्यांच्यासाठी बसची सोय होती. पण बस साडेपाच वाजता हजर होत असे आणि बरोबर पाच चाळीसला निघत असे. एवढ्या थंडीत पहाटेची पंधरा-वीस मिनिटे झोपेची फार मूल्यवान असत. मी माझी स्कूटर रेल्वेत टाकून नेलेली होती, त्यामुळे या छोट्याशा झोपेचा आस्वाद घेता येत असे.

तेथून सात वाजता परत येऊन स्नान, नाश्ता उरकून परेडसाठीचा गणवेश घालून आठ ते दहा परेड ग्राउंडवर 'एक दो एक दो' करत परेड करणे, बंदूक चालवणे, बंदुकीची सफाई करण्यापासून बंदूक घेऊन परेड करण्याचा सराव, लष्करी अधिकारी किंवा पोलीस हातात काठी घेऊन चालतात, ती काठी घेऊन त्याच्यासकट सॅल्यूट करणे, परेड करणे इ. सर्व समारंभाच्या परेडचा सराव इ. सर्व चालत असे.

हे झाल्यावर १० वाजता परत येऊन गणवेश बदलून चहा पिऊन १०.३०  ते १ वर उल्लेख केलेल्या विविध विषयांवर त्या त्या विषयातील तज्ज्ञांची व्याख्याने होत असत. एक वाजता परत येऊन जेवण असे. २ ते ४ परत अशीच व्याख्याने असत, जेव्हा भयानक झोप येत असे. चार वाजता परत येऊन चहा पिऊन पाच  ते सहा खेळासाठी जात असू. अर्थात यात आपल्या आवडीच्या कोणत्याही खेळात भाग घेता येत असे. साडेसहा वाजेपर्यंत परत येऊन सात वाजता मेसमध्ये सर्व जमत असू. तेव्हा बार उघडत असे, त्यामुळे सर्व जण श्रमपरिहार करण्यासाठी आपआपले ग्लास घेऊन बाहेरच्या हिरवळीवर बसत असू. आठ-साडेआठवाजेपर्यंत जेवणे उरकून सगळे नऊपर्यंत निद्रेच्या अधीन होत असत.

या सर्व अभ्यासक्रमात एक कर्नल जोहरी म्हणून अत्यंत खडूस चेहऱ्याचा इन्स्ट्रक्टर होता. मंगेश पाडगावकरांच्या भाषेत 'तिकडे' जावे लागणार म्हणून हातात तांब्या धरून तिष्ठत उभा असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर जसा त्रासिक भाव असतो, तसा या माणसाच्या चेहऱ्यावर भाव होता. पूर्ण कोर्समध्ये या माणसाला मी कधी हसताना पाहिले नव्हते.

एक दिवस सकाळी आठ वाजता परेडला आल्यावर मला एक चिठ्ठी आली की आपल्याला कर्नल जोहरी यांच्या कार्यालयात दहा वाजता बोलावले आहे. मी बराच वेळ विचार करत होतो की अशी 'पेशगी' होण्यासाठी मी काही गडबड केल्याचे मला आठवत नव्हते. दोन तास विचार करून डोक्याचा भुगा झाला. शेवटी 'आलिया भोगासी असावे सादर' या न्यायाने मी तयार झालो आणि नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी मी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर हजर झालो.

हे कार्यालय लखनौच्या ए एम सी सेंटरच्या कमांडंटच्या कार्यालयाला लागूनच होते.  लष्करात बहुसंख्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेर सहा फुटी आरसा लावलेला असतो. कमांड हॉस्पिटल पुणे येथे त्या आरशाखाली लिहिलेले होते - AM I LOOKING SMART? यामुळे काय होते की घराबाहेर पडताना आपला गणवेश व्यवस्थित आहे ना, हे पाहण्याची सवय लागते. ती सवय आजतागायत आहे.

असो. मी आपल्या नौदलाच्या पांढऱ्यास्वच्छ गणवेशात टोपी घालून उभा होतो. वय चोवीस, पाच फूट साडेदहा इंच उंची, वजन ५५ किलो, गोरा वर्ण, सडपातळ बांधा.

आजूबाजूच्या हिरव्या आणि खाकी गणवेशात नौदलाचा पांढराशुभ्र गणवेश नेहमीच उठून दिसत असे. आम्ही वायुदलाच्या आणि भूदलाच्या वर्गमित्र ऑफिसर्सना चिडवत असू. "To look smart" officers have to make efforts and some simply join Indian navy."

असो. आत्मप्रौढी बाजूला ठेवू.

ठीक दहा वाजता मी दार ठोठावून आत येण्याची परवानगी मागितली. आणि काय आश्चर्य! कर्नल जोहरी यांनी अगदी या कानापासून त्या कानापर्यंत हसत माझे स्वागत केले मला समोर बसण्यासाठी सांगितले. मला समजेना की हा माणूस हसू शकतो?

त्यांनी "चहा घेणार का?" विचारले. मी अर्थात चहा घेऊनच आलो होतो, त्यामुळे मी नकार दिला.

पाच मिनिटे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. कोर्स कसा चालू आहे, मेसमध्ये सोयी व्यवस्थित आहेत ना अशी जुजबी चौकशी झाली.

मग  त्यांनी माझी चौकशी सुरू केली.

कर्नल - तू कुठला आहेस?

मी - मुंबईचा!

कर्नल - वडील कुठले आहेत?

मी - मुंबईचे!

कर्नल - आजोबा मूळचे कुठले आहेत?

मी - आमच्या आजोबांनी १९२५ साली मुंबइतून मॅट्रिकची परीक्षा पास केली होती.

काहीतरी चूक होते आहे, असे समजून त्यांनी परत विचारले, "तू उत्तर प्रदेशचा नाहीस?"

मी - नाही सर. आमचा उत्तर प्रदेशाशी काहीच संबंध नाही.

कर्नल - तू उत्तर प्रदेशचा कायस्थ नाहीस?

मी - नाही सर, मी मुंबईत स्थायिक असून महाराष्ट्रीयन आहे. आमचे मूळ गाव कोकणात आहे, रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात गुहागर म्हणून, पण तेथे आमचे कुणीच नाही. आणि मी कायस्थ नसून कोकणस्थ ब्राह्मण आहे.

हे ऐकल्यावर त्यांनी "अच्छा, ठीक आहे, या आता" म्हणून माझी बोळवण केली.

मला समजेना त्यांना नक्की काय हवे होते?

मी बाहेर आलो, तर बाहेर कॅप्टन शिशिर खरे नावाचा आमचा कोर्समेंट तेथे माझी वाट पाहत होता. त्याने आत काय झाले याचे साद्यन्त वर्णन अगदी खोदून खोदून विचारले. मी त्याला इत्थंभूत माहिती सांगितली आणि म्हणालो, "कशाला फुकटचे बोलावले होते, ते समजले नाही."

त्यावर शिशिर खरेने सांगितले की एका ब्रिगेडियर जोहरी (उत्तर प्रदेशचा कायस्थ) नावाच्या अधिकाऱ्याची मुलगी लग्नाची होती. त्यासाठी हे वरसंशोधन चालू होते. येथे आलेले सर्वच अधिकारी लष्करात डॉक्टर म्हणून रुजू झालेले होते. करियर नक्की होते. लग्न झालेले सोडून सर्वच 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' या श्रेणीतील होते. फक्त कायस्थ समाजातील मुले शोधणे (आडनावामुळे हे अगदीच सोपे होते), म्हणून आमच्या १०४ जणांच्या कोर्समध्ये लष्करात कॅप्टन हुद्द्यावर असलेल्या डॉक्टर मुलांमधील सक्सेना, जोहरी, खरे, माथुर, श्रीवास्तव, कुलश्रेष्ठ इ. समस्त कायस्थ लोकांमध्ये चौकशी चालू होती. त्यातील पात्र / लायक असणाऱ्या मुलांच्या आईवडिलांशी नंतर संपर्क साधायचा, अशी ही योजना होती. आमच्या कोर्समध्ये दोन सक्सेना, एक जोहरी, दोन श्रीवास्तव, एक खरे (शिशिर खरे), एक माथुर आणि एक कुलश्रेष्ठ इतके 'कायस्थ' मोस्ट एलिजिबल बॅचलर' श्रेणीतील होते.

शिशिर खरेला या प्रकरणाचा 'वास' लागल्यामुळे त्याने 'कॅप्टन एस. (शिशिर) खरे'च्या जागी 'सर्जन लेफ्टनंट एस. (सुबोध) खरे'चे नाव घुसडले होते.

ते ऐकून मी कपाळाला हात लावला आणि शिशिरला शिव्याही दिल्या. त्याच्या या चावटपणापायी दोन तास माझ्या डोक्याचा भुगा झाला होता.

पुढे तीन वर्षांनी मी एमडी करायला एएफएमसीला गेलो, तोसुद्धा तेथे सर्जरीत एमएस करायला आलेला होता आणि याची आठवण काढून आम्ही परत एकदा हसलो.

दिवाळी अंक वर्ष

वाचने 39
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया