वीस वर्षं झाली आपल्या मिसळपावला ! आहात कुठे? व्हेअर आर यू..!!
तसं म्हटलं तर कुठल्याही माणसाच्या आयुष्यात वीस वर्षं हा काही फार मोठा काळ वगैरे नाही. शंभरएक वर्षांची तर आपल्या टीव्ही सीरियलमधली "बा" देखील असते.
पण मराठी आंतरजालावरच्या एखाद्या संस्थळाच्या, त्यात देखील मराठी लेखनासाठी मोकळं व्यासपीठ असलेल्या मिपाच्या आयुष्यात मात्र वीस वर्षं जिवंत राहणं म्हणजे भलताच चमत्कार. इन्स्टा, व्हॉट्सॲप आणि इतरही खूप कोणत्या कोणत्या सोशल मिडियांच्या गर्दीत मराठमोळा वेबसाइटरूपातला फोरम टिकून राहणं हे खरंच आश्चर्य आहे.
इथं माणसं येतात, लिहितात, वाचतात, वाद घालतात, भांडतात, कधी रुसून निघून जातात आणि काही काळानंतर पुन्हा कुठल्यातरी धाग्यावर अचानक उगवतात, हे पाहिलं की या प्रकाराला नक्की काय म्हणावं असा प्रश्न पडतो. अनेक आयडी अचानक प्रकट होतात, कधी काहीतरी सकारात्मक देतात तर कधी ट्रोलिंग करून धारातीर्थी पडतात. कधी गळ टाकून कोणी बिचारा आयडी बळी पडतो का याची वाट पाहतात. पण एकूण धमाल असते.
प्रश्न विचारायचे, त्यावर चर्चा करायची, चर्चेवरून वाद घालायचा आणि शेवटी मूळ प्रश्न काय होता हेच विसरून जायचं, या बाबतीत मात्र आपण बऱ्यापैकी सातत्य राखलं आहे.
तर मुद्दा काय होता? हं, दिवाळी अंक !
गेल्या वर्षी याच संपादकीयातून मिपावरच्या ललित लेखनाच्या घटका भरत आल्यात की काय आणि राजकारण वगळता इतर लेखकांचा वावर रोडावत चाललाय की काय, याबद्दल थोडी काळजी व्यक्त केली गेली होती. ही भावना व्यक्त करण्यामागे काही फार मोठा सिद्धांत नव्हता. वर्षानुवर्षं ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं उत्तम लेखन वाचायला मिळालं, नवनवे लेखक भेटले, अनेकांच्या लेखनाचा प्रवास आपल्या डोळ्यांसमोर घडला, त्या आपल्या मिपा परिवाराबद्दल वाटणारी ती एक चिंता होती. या वर्षी दिवाळी अंकासाठी लेखनाचं जे आवाहन केलं होतं त्याला आलेला लेखकांचा प्रतिसाद बघून तरी ही चिंता तूर्त तरी नाहीशी झाली आहे हे नक्की.
मुळात दिवाळी अंक हा वर्षातून एकदा येणारा मिपाचा असा एक उपक्रम आहे की ज्याच्या निमित्ताने एरवी एकमेकांच्या मतांची, आणि एकमेकांचीही यथेच्छ शाब्दिक चिरफाड करणारी मंडळी(सुद्धा) थोडा वेळ सर्व मारपीट बाजूला ठेवून कथा, कविता, आठवणी, प्रवासवर्णनं वगैरे वाचताना दिसतात. काही जण स्वतः लिहितातही. अर्थात, साहित्यावरूनही भांडता येतंच .. त्यात अगदी दणका होत नसला तरी.. आणि तेही आपण यथाशक्ती करतच असतो ! जिवंत आणि खऱ्याखुऱ्या "पब्लिक"समोर आपलं लेखन ठेवून जो काही खराखुरा प्रतिसाद मिळेल तो घेण्याची ताकद मिसळपावसारख्या व्यासपीठावरच कमवता येते. एरवी छापील पुस्तकं आणि अभ्यासपूर्ण लेख विशिष्ट वर्तुळात वितरित करून , वन वे ट्रॅफिकमधे स्वतःबद्दल धन्य वाटून घेणं सहज शक्य असतं. इथे गाठ थेट वाचकाशी. आणि त्यामुळे इथे मिळणारं कौतुक असो किंवा टीका.. ती शंभर टक्के खरी असते.
यंदाच्या अंकाची जुळवाजुळव सुरू झाली तेव्हा पुन्हा एकदा नेहमीचीच धावपळ सुरू झाली. साहित्य संपादक लोकांपैकी सर्वजण जागेवर आहेत ना? कोणी सोडून तर गेलं नाही ना? हे आधी बघणं. ते जागीच घट्ट असलेले बघून जीव भांड्यात पडणं.
मग पुढचे व्याप. कुणाला लेखनासाठी (किती) विनंती करायची, कुणाला वेळ पडल्यास जुन्या ओळखीची आठवण करून द्यायची, कुणाकडे आधी दिलेल्या वचनांची चौकशी करायची, आणि कुणाला अगदी शेवटच्या क्षणी लेख पाठवण्याची आठवण करून द्यायची.. !! संपादक मंडळाचा बहुतांश वेळ याच उद्योगात जातो तसा यंदाही गेला.
"लेख पाठवतो" या दोन शब्दांवर किती दिवस विश्वास ठेवायचा, याचा फॉर्म्युला मात्र आजवर कुठल्याही संपादकाला जमलेला नाही.
यंदाच्या अंकात काहीसं वेगळं असं घडलं आहे की अनेक मान्यवर व्यक्तींनी पाहुणे लेखक म्हणून खास आपल्यासाठी लेखन केलं आहे. हे आज जरी मानाचे पाहुणे असले तरी ते उद्या मिपाचे सदस्य आणि घरातले मेंबर्स बनून आणखीही लिहीत राहतील अशी बऱ्यापैकी खातरी आहे.
लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासातलं अत्यंत महत्त्वाचं नाव असलेल्या आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेल्या तारा भवाळकर. त्यांनी आपल्यासाठी लिहून दिलेलं सुंदर काव्यमय पान त्यांच्याच हस्ताक्षरात थेट प्रकाशित केलं आहे.
शेकडो लोकप्रिय पुस्तकांचे अनुवाद करणाऱ्या आणि लेखिका म्हणून घराघरात पोचलेल्या ज्येष्ठ अनुवादिका लीना सोहोनी. होय. जगातल्या दिग्गज इंग्रजी लेखकांची ७५ हून अधिक पुस्तकं मराठी माणसापर्यंत आणणाऱ्या त्याच त्या लीना सोहोनी. मास्टर स्टोरीटेलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेफ्री आर्चर यांच्याशी प्रत्यक्ष भेटीचा योग त्यांना एकाहून अधिक वेळेला आला. त्या भेटींचं हृद्य वर्णन त्यांनी लिहिलं आहे आपल्या दिवाळी अंकासाठी खास.
महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांचं लेखन देखील यंदाच्या अंकात आपल्याला वाचायला मिळणार आहे. पारसनीस यांनी १९९२-९३ च्या मुंबई दंगलींच्या काळात प्रत्यक्ष पोलीस अधिकारी म्हणून अनुभवलेल्या अत्यंत थरारक आणि जीवघेण्या प्रसंगांचं केलेलं वर्णन, ते थेट अनुभव कथन, आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. ज्या घटनांबद्दल आपण केवळ टीव्ही किंवा पेपरमध्ये बघतो, वाचतो, त्या घटनांच्या अगदी मध्यभागी उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या नजरेतून त्या समजून घेण्याची ही संधी आहे.
प्रसिद्ध कवी, लेखक आणि आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या दीर्घ कारकीर्दीत अनेक उत्कृष्ट कार्यक्रमांची निर्मिती करणारे डॉ. महेश केळुसकर यांनीही एक वेगळ्याच प्रकारची काव्यरचना आपल्या दिवाळी अंकासाठी केली आहे.
नामांकित लेखक आणि नाटककार अरविंद लिमये यांनी एक उत्कृष्ट कथा या अंकात लिहिली आहे.
या आणि इतर सर्व मान्यवरांनी आपल्या दिवाळी अंकासाठी वेळ काढून लेखन दिलं, याचा खूपच आनंद आहे.
याचा अर्थ इतर सर्व लेखक मान्यवर नाहीत का? असं कोण म्हणतोय तो? उगीच आगी लावू नका. सर्व लेखक मिळूनच हा अंक उभा करतात. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसताना मनापासून, वेळ खर्च करून कष्टाने, नेटाने लिहितात. ते नसतील तर कसले मिपा आणि कसला दिवाळी अंक. मिसळपाव हे व्यासपीठ कोणत्याही जाहिराती किंवा आर्थिक कमाई करणाऱ्या मार्गांचा वापर न करता उभं आहे. त्यामुळे या सर्व लेखकांनी दिलेला आधार अमूल्य आहे. सर्वांचे खूप आभार.
मिसळपावचं खरं वैशिष्ट्य नेहमीच इथल्या सामान्य माणसाच्या असामान्य अनुभवांत राहिलं आहे. कुणी लेखक म्हणून आधीच प्रसिद्ध आहे म्हणून त्याचं लेखन इथं महत्त्वाचं ठरत नाही आणि कुणी आयुष्यात पहिल्यांदाच लिहिलं आहे म्हणून त्याच्या लेखनाचं मोल कमी होत नाही. चांगला अनुभव, तो सांगण्याची असोशी आणि तो ऐकून घेणारा वाचक इतकेच घटक पुरेसे असतात आणि ते इथे आहेत.
यंदाही अशाच वेगवेगळ्या वाटांनी आलेलं लेखन अंकात आहे. कुठे आठवणींच्या खिडक्या उघडतात, कुठे माणसांनी गजबजलेली आणि कुठे माणसांविना ओस पडलेली घरं भेटतात, कुठे गावाकडच्या जगण्यातले अनुभव समोर येतात, तर कुठे आयुष्याच्या अगदी वेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींच्या आठवणी वाचायला मिळतात. विनोद आहे, संवेदनशीलता आहे, विचार आहेत.. लेखकांची धडधड करणारी हृदयं आहेत.
आणि हेच तर हवं असतं दिवाळी अंकात !
हल्ली लेखनाच्या संदर्भात आणखी एका विषयाला बऱ्यापैकी महत्त्व आलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही गोष्ट आता आपल्यापैकी अनेकांच्या दैनंदिन आयुष्यात खोलवर शिरली आहे. हे कोणी फारसं टाळू शकत नाही. तिच्या मदतीने अनेक कामं अधिक सोपी झाली आहेत. पण माणसाने स्वतः अनुभवलेलं, स्वतःला जाणवलेलं आणि स्वतःच्या भाषेतून व्यक्त केलेलं जिवंत लेखन ही काही एखाद्या अल्गोरिदम मधून आलेली केवळ शब्दांची आगगाडी नसते. त्यात लेखकाचं आयुष्य, त्याचा बरावाईट स्वभाव, भाषेचा आणि विचारांचाही लहेजा आणि कधी कधी त्याच्या चुका, घोडचुकासुद्धा आलेल्या असतात. त्या सगळ्यांसकट ते लेखन त्याचं स्वतःचं असतं.
म्हणूनच आपल्या दिवाळी अंकात माणसाचं स्वतःचं लेखन आणि त्याचा स्वतंत्र आवाज जपला जावा, हा आग्रह यापुढेही राहील. तंत्रज्ञानाला विरोध नाहीये. लेखनासाठी चपखल चित्रं बनवून घेण्याचं काम आपण एआय वापरून करतोच आहोत. आणि त्या बाबतीत पारदर्शक आहोत. जबाबदार देखील.
पण.. पण .. पण..
लेखनाच्या मागे असलेल्या माणसाचं महत्त्व टिकून राहावं म्हणून आपले शब्द आपलेच असतील. कृत्रिम प्रज्ञेचे नाहीत.
आता अंक तयार करताना पडद्यामागे राबलेल्या मंडळींबद्दल. औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन काही लिहीतो.
लेखन मिळवणं हा एक भाग झाला. त्यानंतर ते तपासणं, शुद्धलेखन पाहणं आणि मुख्य म्हणजे ते सुधारणं.. हे काम सुधांशू नूलकर एकहाती करत असतात. त्या बाबतीत त्यांचा अगदी धारवाडी काटा असतो. त्यामुळे मुद्रितशोधन त्यांच्या हाती अगदी चोख होत असतं. त्याखेरीज मांडणी, जोडणी आणि अखेर अंक प्रकाशित होईपर्यंतचे असंख्य छोटे मोठे उद्योग यात अनेकांचा हातभार आहे. यातील बऱ्याच कामांची वाचकाला कल्पनाही येणार नाही. किंबहुना येऊ नये, इतकं ते काम सहजपणे पार पडलेलं असावं, हेच या मंडळींचं यश. तांत्रिक कामाबद्दल नीलकांत आणि प्रशांत यांचे आभार आहेतच. पण संपादकांच्या सततच्या मागण्या आणि कटकट सहन करत जमेल तसा लवकर तांत्रिक सपोर्ट ते देत असतात हे मुख्य.
या कामात मिपा संपादक मंडळ आणि व्यवस्थापन सतत काम करत होतं. पण अनेक मिपाकर सदस्यांनी खूप मदत केली.
आजी या मिपावर हलकं फुलकं लेखन करणाऱ्या आयडीने अनेक प्रसिद्ध लोकांचं लेखन मिळण्यासाठी संदर्भ देऊन खूप मदत केली. प्रा. डॉ. बिरुटेसर, गणपा, प्रचेतस, पैजारबुवा, चांदणेसंदीप, टर्मिनेटर हे नेहमीचे कार्यरत मंडळ सदस्य म्हणजे तर गृहीतच धरलेली आपलीच माणसं..
पडद्यामागे मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार. आणि कोणाचं नाव राहून गेलं असेल तर माफीसह आभार..
आणि.. आभार अर्थातच वाचकांचेही.
.. आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर..!! या चालीवर.
कारण लेखक लिहितो तो कुणीतरी वाचेल म्हणूनच. आपलं लिहिलेलं कुणापर्यंत तरी पोहोचलं, त्याला ते आवडलं, नाही आवडलं, कधी वाचणाऱ्याने स्वतःची एखादी आठवण सांगितली, तर कधी अगदी दोन शब्दांची दाद दिली, तरी या सगळ्यातून पुढच्या लेखनाची उमेद जिवंत राहत असते. मिपावर हे सगळं आजही घडतं आहे. हॉटेलात गर्दी आहे. दंगा, वर्दळ चालू आहे.. समाधान आहे..
वाचकहो.. शेवटी तुम्ही आहात, म्हणून मिपा जिवंत आहे.
चला तर मग. अंक तुमच्या हाती देतो.
नेहमीप्रमाणे त्यातल्या चांगल्या गोष्टींचं श्रेय लेखकांचं आणि काही कमी जास्त राहिलं असेल तर त्याची जबाबदारी अंक संपादक मंडळाची. अर्थात, हा नियम अंक संपादकांनीच बनवलेला असल्यामुळे येत्या काळात काही घटनादुरुस्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही !
सर्वांना हॅपी हॅपी दिवाळी... !!!
मिसळपाव
प्रतिक्रिया