सन १९६५मध्ये देवानंदचा एक चित्रपट आला होता, *'गाईड*. तेव्हा मी सातवी-आठवीत असेन. पोरसंवदा वय! गाईडमधली गाणी खूपच लोकप्रिय ठरली. निव्वळ गाण्यांसाठी म्हणून मी तो सिनेमा पाहिला. 'गाता रहे मेरा दिल..' आणि 'आज फिर जीनेकी तमन्ना है..' ही गाणी खूप गाजली. त्या वेळच्या बिनाका गीतमालामध्ये ही गाणी अव्वल नंबरवर असायची. असा हा सिनेमा रोमँटिक असावा, हीच माझी धारणा. पण इंटरव्हलनंतर मला चळमुंग्या सुटल्या. कारण सिनेमा वेगळ्याच धाटणीचा निघाला. चॉकलेट हिरो देवानंद साधू काय बनतो, तो जेलमध्ये काय जातो.. सगळे कसे विचित्रच! सगळे कसे अनाकलनीय! कारण सिनेमाचे कथानक माझ्या पचनी पडेल असे माझे ते वय नव्हते.
पुढे मॅट्रिकला असताना गाईड पुनःप्रदर्शित झाला. या वेळी मात्र मी तो गाण्यांसाठी नव्हे, तर त्यातील कथानकासाठी पाहिला आणि त्यातील कथानकाचे मर्म जाणून घेतले. पहिल्या खेपेस डोक्यावरून गेलेला सिनेमा या वेळी डोक्याला झिणझिण्या देऊन गेला. शृंगारिक कथानकाने होणारी सुरुवात शेवटी हळूहळू अध्यात्मlकडे कशी घेऊन जाते, हे अकल्पितच ठरते. प्रवाशांना ऐतहासिक स्थळांचे दर्शन घडवणारा राजू गाईड, मौलिक विचारांनी आध्यात्मिक धडा शिकवणारा मार्गदर्शक (गाईड) बनून जगाचा निरोप घेतो.
रोझी (वहिदा रहमान) एक नर्तकी. नवरा (किशोर साहू ) एक हेरिटेज वास्तूंचा संशोधन अभ्यासक! पण पत्नीविषयी विरक्त. रोझीला वेळ देण्यास, तिच्या भावना समजून घेण्यास त्याला सवडच नसते, नपेक्षा त्याला तिच्याविषयीं प्रेम, आकर्षण या बाबी कामापेक्षा महत्त्वाच्या नसतात. या दोघांच्या मध्ये तिसरे पात्रसुद्धा असते, ते म्हणजे राजू गाईड (देवानंद). राजू गाईड हा किशोर साहूचा गाईड असतो. तो दोघांच्या संबंधातील मनमुटाव जाणून असतो. रोझीला एकटेपणा खायला धावतो. पण राजू तिच्यातील नैराश्य दूर करून नव्याने जगण्याविषयीं ऊमेद जागवतो. 'आज फिर जीनेकी तमन्ना है..' अशातच राजूला रोझीच्या अंगी असलेल्या नृत्यगुणांची ओळख होते. दोघांची मैत्री होते व पुढे प्रेमात रूपांतर होते.
राजू प्रेयसी रोझीला घरी घेऊन येतो. आईचा विरोध पत्करून तो रोझीला जवळ करतो. रोझीतील नृत्यगुणांना चालना देतो, तिला चांगली नृत्यांगना बनवतो. तिच्या प्रसिद्धीसाठी झटतो. या वेळेपर्यंत राजू निःस्वार्थी भावनेने तिचे स्टेज शो अरेंज करतो. तिला पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवतो. त्यामुळे ती फार व्यग्र होते व या कारणास्तव राजूला थोडीफार दुरावते. त्याचे तिलासुद्धा दुःख असते. तिची प्रसिद्धी पाहून तिचा पूर्वाश्रमीचा पती तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. ते राजूला आवडत नाही व त्याला भीती वाटते की रोझीने आपल्याला सोडून न जावे. अशातच राजूकडून चूकवजा गुन्हा घडतो. तो एका धनादेशावर रोझीची सही करतो आणि फसतो. चोरी करून पेसे लाटणे असा त्याचा उद्देश नसून रोझीला स्वतःपासून दूर जाण्यापासून वाचवणे असा असतो. पण रोझी हे समजू शकत नाही व राजूला जेल होते. 'क्यासे क्या हो गये बेवफा तेरे प्यारमे..'
राजूची शिक्षा पूर्ण होऊन, नियोजित तारखेपूर्वी जेलमधून त्याची सुटका होते. तो विरक्त भावनेने, निर्विकार मनाने वाट फुटेल तिकडे चालता होतो. सचिनदांच्या आर्त स्वरात बॅकग्राउंड गीत सुरू असते - 'वहा कौन है तेरा मुसाफिर, जायेगा कहा..' तो निघून गेल्यावर सुटकेच्या नियोजित वेळी राजूची आई व रोझी त्याला जेलमधून घ्यायला येतात, पण व्यर्थ! राजू आधीच निघून गेलेला असतो. त्याला मागील सर्व प्रसंग, जुन्या कटू आठवणी आठवतात व तो त्यापासून दूर, खूप दूर निघून जातो. दाढी वाढलेली, केस विस्कटलेले अशा अवतारात तो भटकतो, मिळेल तेथे मुक्काम करतो, मंदिराच्या ओट्यावर झोपतो. त्याला थंडीने कुडकुडताना पाहून एक साधू आपले भगव्या रंगाचे उपरणे त्याच्या अंगावर टाकतो. आणि येथूनच काय ती त्याच्या जीवनाची दिशाच पालटून जाते. लोक त्याला सिद्धपुरुष, साधू समजायला लागतात.
राजू गावाबाहेरील एका शिवमंदिराला आपले आश्रयस्थान बनवतो. गावातील भोळे लोक त्याला सिद्धपुरुष समजून त्याची मनोभावे सेवा करतात. गावात बऱ्याच वर्षांत पाऊस न आल्याने भयंकर दुष्काळ पडलेला असतो. भोळी जनता साधूला या दुष्काळातून मार्ग काढण्यासाठी गळ घालते. बारा दिवसांच्या उपवासाने देव प्रसन्न होऊन पाऊस येईल, ही भाबडी संकल्पना ते साधूजवळ बोलून दाखवतात. राजू त्यांना समजावून सांगतो की तो एक साधारण पुरुष आहे, साधू किंवा सिद्धपुरुष अजिबात नाही, त्यामुळे त्याच्या उपवासाने असे काही घडणार नाही. पण भोळ्याभाबड्या जनतेसमोर तो हतबल होतो व बारा दिवसांच्या उपवासास बसतो. ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वदूर पसरते. या सिद्धयोग्यास बघायला गावोगावीची जनता येते. तेथे जणू यात्रेचे स्वरूपच निर्माण होते. वृत्तपत्रातून साधूच्या फोटोसह बातम्या झळकतात आणि यातूनच राजूची आई व प्रेयसी रोझी दोघींना राजूची माहिती मिळते.
दोघी आळीपाळीने राजूला शोधत राजूपर्यंत येऊन पोहोचतात. अन्नपाण्यावाचून उपवासी मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या राजूला पाहून त्यांचे मन विदीर्ण होते. त्या राजूला परत चलण्याविषयीं मनवतात. परंतु राजूला भाबड्या लोकांचा विश्वास तोडायचा नसतो व तो माघारी फिरण्यास नकार देतो. दिवसांमागून दिवस उलटतात, राजूची तब्येत अतिशय खालावते. त्याच्या मनात द्वंद्व सुरू होते. एक मन म्हणते, 'अरे, सुख तुझ्या दारी आले, आई आली, प्रेयसी आली, परत जा.' तर दुसरे मन त्याला तसे करण्यापासून परावृत्त करते. कारण त्याला लोकांचा विश्वास, श्रद्धा आत्मिक आनंदाची अनुभूती देत असतात. शेवटी बारावा दिवस उजाडतो, इकडे पाऊस पडायला लागतो आणि राजू साधू अनंतात विलीन होतो. नश्वर देहावर आत्म्याने विजय मिळवलेला असतो.
गहन अर्थ दडलेल्या या कथानकात राजू गाईडचे व्यक्तिमत्त्व बरेच काही सांगून जाते. विश्वासाच्या आणि श्रद्धेच्या जोरावर माणूस परमात्म्यालाही नमवू शकतो, हाच धडा, हीच मार्गदर्शक शिकवण यातून मिळते.
मिसळपाव
प्रतिक्रिया