Skip to main content

सौमित्र ह्यांच्या कवितेतील स्त्री

लेखक Kiran Dongardive यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

सौमित्र ह्यांच्या कवितेतील स्त्री म्हणजे आल्हाददायक गारवा                     

आवगड गनीत जगन्याचं ह्ये सोपंss करीत जाय

कंप्युटरशी माझ्या मायचं द्येनंss घ्येनंss न्हाय

जाड्याभरड्या जीनसारकी माज्या मायची स्कीन

जगन्यानं लई वापरलं पार यू नो व्हाट आय मीन

आधुनिक काळामध्ये कॉम्पुटर आणि तत्सम गोष्टींना फार महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यातही शहरी जीवनाचा तो एक अविभाज्य घटक बनला आहे. अशाच एका शहरी वातावरणामध्ये जगणार्‍या मुलाकडे त्याची खेड्यातून आलेली आई राहते.. तिला मात्र कम्प्युटरशी काहीही घेणे-देणे नसते. आईचे जीवनविषयक विचार आणि मुलाचे शहरी जीवन ह्यातून आईची मुलावरील जिवापाड माया, त्यात तिने खाल्लेल्या खस्ता दर्शविणारे 'जगण्याने लई वापरलं...' असे अंगावर येणारे वाक्य ह्या सर्वांमुळे किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांची 'आई आणि जीन्स' ही कविता विलक्षण वेगळी आणि शहरी जीवन व ग्रामीण जीवन यांचा समन्वय साधत आईचा जिव्हाळा व्यक्त करणारी महत्त्वाची कविता ठरते.

जुनं त्ये त्ये सोनं म्हन्नं जुनीच तिची खोड

पैसा आडका आलाय तरी एकच पातळजोड।

पैसा-अडका आला, तरी ही आई स्वतःची जीवनशैली बदलत नाही. मुलगा नोकरीला लागला किंवा चांगला कमावता झाला, म्हणून व्यर्थ पैसा खर्च करणे तिला जमतच नाही. जुनं ते सोनं म्हणत काटकसर करायची, ते करत असतानाही पुन्हा,                                 

पोरगं शिकून म्होट्टा व्हईल येवडच तिचं सपान

त्येच्यापाई तुडवत आली काट्यावरलं रान

'मुलाचे भविष्य सुखकारक होईल एवढेच स्वप्न मनामध्ये जपत काट्याकुट्याचा हा रस्ता तिने पार केला आहे' या शब्दात त्यांनी आईची त्यागमूर्ती रेखाटली आहे.

किशोर भानुदास कदम उर्फ सौमित्र यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९६७ रोजी  झाला. हे मराठीतील महत्त्वाचे कवी व अभिनेते आहेत. 'गारवा' हा त्यांचा गीतसंग्रह अतिशय लोकप्रिय आहे, त्याचबरोबर अलीकडे 'बाउल' हा लक्षवेधी कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. अभिनय आणि कविता अशा दोन्ही माध्यमांत त्यांनी आपल्या कामाची छाप टाकली आहे, अभिनेते म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांमधून काम केले आहे. जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांतील कामांबद्दल उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. 

आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत,

पण कुठलं ओझं घेउन परततो हा रोज रात्री?

आईला वाटत असेल कुणास ठाऊक काय करतो, कुठे असतो दिवसभर?

अतिशय अस्वस्थ वातावरणामध्ये संपूर्ण मानवजात कालक्रमण करीत आहे. अशा वेळी अस्वस्थपणे जगणाऱ्या आपल्या मुलाबद्दल काळजी व्यक्त करणारी आई सौमित्र यांच्या वरील कवितेमधून आपल्याला भेटते. काळजी करत असतानाच मुलाच्या वर्तमान जीवनशैलीने कंटाळून ती रागवते आणि म्हणते,

'आईने हातात पट्टी घेतली, आई माझी ओरडली

सांग सांग, तुझी जागा तू कुठं जाऊन फेकलीस?

अशी कशी भिंगरी बाळा पायी लावून घेतली?

आईबद्दल बोलताना सौमित्र यांचा काव्यस्वर कातर झालेला दिसतो. त्यांच्या आईविषयक वेगवेगळ्या कवितांमधून त्याची प्रचिती येत राहते. मातृत्व हे स्त्रीला लाभलेले एक वरदान आहे, हे वरदान सांभाळत असताना,

गरोदर असताना आईला दोन हृदय असतात.

एक छातीत.. एक पोटात.

पोटातलं हृदय धडकायला केव्हा लागतं?

आईच्या पोटात आपले हात-पाय साकळताना?

की नाळ तोडल्यावर?

या शब्दांमधून आईचे हृदय पूर्णपणे आपल्या बाळाच्या जीवनाबरोबर कार्यान्वित असते, असेच सांगण्याचा कवीचा हेतू आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. स्त्रियांचे दुःख सांगत असताना कवी आईच्या दुःखातून ते मांडण्याचा प्रयत्न करतो.

पारा उडून गेलेल्या आरशात पाहून

आजही माझी आई,

कुंकवाच्या चंद्राची पौर्णिमा कशी करू शकते साजरी,

हे माझ्या वडिलांनाच विचारायला हवे...

'टिकल्या' या प्रतीकात्मक कवितेमध्ये जीवनसंघर्षामध्ये स्वतःचे प्रतिबिंब, चेहरा-मोहरा विसरला, तरी सौभाग्य सौभाग्य म्हणत कपाळावरील कुंकू आणि टिकली यांना अनन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या, त्यातच स्वतःचे सुख शोधणाऱ्या स्त्रियांची मनोवृत्ती कवीने शब्दांकित केली आहे. याच कवितेमध्ये, 

ललाटीचा घाव लपवण्याची ही टिकलीएवढी धडपड...

कितीतरी आरसे पाहत आलेत कधीपासून...

असे जेव्हा कवी म्हणतात, तेव्हा स्त्रियांचे हे दुःख काल-आजचे नसून फार पूर्वीपासून चालत आलेले आहे, असे स्पष्ट होते. याच जाणिवेतून स्त्री आई या सर्वोच्च रूपात असले, तरी तिचे स्त्री-जीवनाचे भोग तिला भोगावेच लागतात, असेच जणू कवीला सांगायचे आहे.

तुझ्या पुढ्यात मला आलेली जाग...

तुझ्या स्तनांना पाहून जाणवलेले काही...

झोपेचे सोंग घेऊन मी तुझ्या स्तनांशी नेलेला हात...

ह्या अतिशय भयाण स्त्री-वास्तवाचा चेहरा दर्शवीत पुरुषाचा किळसवाणा चेहरा दर्शवीत आईकडेसुद्धा पुरुष एखादे वेळी लिबलिबित वासनांध नजरेने पाहतो, हे विदारक सत्य सौमित्र ह्यांनी आपल्या कवितेतून स्पष्ट केले आहे. आईच्या आठव जाणिवेतून कवी एखादे वेळी पुरुष आई आई ओरडत जागा झाल्यावर प्रियेच्या छातीला बिलगतो, आसुसल्या ओठांनी तिचे स्तन ओढतो, पण त्यातून दूध येत नाही, म्हणजेच आईची माया पाझरत नाही... मग पुरुषी भावना चेकाळते आणि.... असे स्त्री-पुरुष संबंधाने 'सुमित्राच्या कविता' ह्या स्त्री-पुरुषांच्या खूप भावनिक कल्लोळातील विवेचनातून स्त्री-पुरुष ह्यांच्या मानसिकतेचा शोध कवी घेताना दिसतात. सुमित्राबरोबरचा विलोभनीय संवाद म्हणजे एक परिपूर्ण स्त्री पर्व आहे, असे आवर्जून नमूद करावेसे वाटते.

तुझा चेहरा फुल्लेला

माझा चेहरा अजूनही तुझ्यामध्येच भुल्लेला

तू भिजलं फूल दिसतेस पावसात उठली हूल दिसते

कुठेही घेऊन चल असं कडेवरलं मूल दिसते।

वेटर सगळे आपल्याकडेच पाहात करतात गिल्ला

कुणीतरी खवचट ओरडतो, 'कौए के हाँथ रसगुल्ला'

तू तत्काळ तशीच थांबतेस, झट्कन् मागे वळून बघतेस

माझा हात घट्ट धरून पुन्हा तडक रूम गाठतेस।

सौमित्र यांच्या कवितेतील स्त्री बिनधास्त आहे, परखड आहे, प्रसंगी कुणाचाही मुलाहिजा न ठेवणारी आहे. तिचा करारीपणा, तिच्यासोबत काळा आणि दिसण्यास सामान्य असलेला माणूस पाहून लोक जेव्हा चिडवतात, तेव्हा सर्वासमक्ष आपल्या मित्राचा हात हातात धरून ती त्याला रूमवर घेऊन येते, यातूनच स्त्रीच्या प्रेम करते तेव्हा रंगरूप, जात-पात इत्यादी बाबी तिच्यासाठी दुय्यम असतात, निव्वळ प्रेम हे एकच भावना तेथे शिल्लक असते. आता हे प्रेम आजच्या काळात विभिन्न पातळ्यांवर वेगवेगळ्या रूपात भेटते. असाच एक पुरुष आपल्या गत आयुष्याच्या प्रेयसीशी संवाद साधत बोलतो,

हिच्या मिठीत तुझी ऊब शोधणं नाही बरं, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं

तुझी आठवण येते आहे हिला आधी कळतं, माझ्या आधी डोळ्यांमधून हिच्या पाणी गळतं,

ओठ ठेवते गालांवर, समजून घेते खूप, भळभळणाऱ्या जखमेवरच हे असं साजूक तूप,

जगण्यासाठी आता मला एवढाच सुख पुरं, मी तुला विसरत चाललोय एवढ मात्र खरं...

या ठिकाणी खरे तर त्याला समजून घेत त्याच्यासोबत संसार करणारे स्त्रीच्या समंजसपणाचे कौतुक करायचे आहे. मात्र एखादेवेळी हीच परिस्थिती थोडी उलट असती, तर त्या पुरुषाने आपल्या बायकोचा मित्र ही संकल्पना कितपत सहन केली असती? असा प्रश्न मला सातत्याने पडत राहतो. आणि मग 'मुसळधार पावसामध्ये एखाद्या स्त्रीला आपल्या प्रियकराची आठवण येऊ शकते' अशी कल्पना करून सौमित्र लिहितात,

मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा, बघ माझी आठवण येते का?

ह्या आठवणीत तिचे ओलेचिंब होणे आणि अशामध्ये तिच्या नवऱ्याचे येणे आणि मनातील सर्व भावनिक कल्लोळ विसरून संसारमग्न होणाऱ्या स्त्रीला कवी पुढे म्हणतात,

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल

त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल

तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतंयं,

या ठिकाणी घर  गळतय की मन गळतंय, याचा विचार ज्याने त्याने आपल्या पद्धतीने करावा. त्यापुढे जाऊन कवी म्हणतात,

मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस

मग तूही तसचं म्हण

विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल

तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ.. बघ माझी आठवण येते का?

पतीच्या पाठमोऱ्या शरीराकडे पाहात आपल्या गतआयुष्यातील मित्राच्या आठवणीत किती विरहिणी मनातल्या मनात झुरत असतील, याची कल्पना कविता वरील ओळींमधून येते आणि अंगावर सरसरून काटा उभा राहतो. याला कवितेच जगण्याशी भिडत जाणे असे म्हणतात.

जगातल्या प्रत्येक आईने जर मुलं लहानाची मोठी होताना

सांगितलं असतं आपापल्या मुलांना, की ज़रा लक्ष द्या तर...

आज हे जग असं नसतं

आई हा प्रत्येक माणसाचा पहिला गुरू असतो, असे म्हणतात. मग ह्याच आईने जर आपली संस्कारपेरणी नीट केली, तर समाजातील अनागोंदी नष्ट होईल, असे कवीला वाटते. त्याच वेळी,

प्रत्येक आईत देव असतो म्हणतात

मग जगातल्या प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक देवात

असलीच पाहिजे आई

त्या आईच्या पोटी जन्मल्या चिल्ल्यापिल्ल्यांनाच मारून

हे कुठलं पुत्रकर्तव्य पार पाडता आहात तुम्ही?

असं विचार त्यांना.. हे देवात असलेल्या माते!

प्रत्येक दंगल आणि हिंसा करणाऱ्या माणसाने आई ह्या एकाच देवतेचे संस्कार आठवले, तर अगदी दगडालाही पाझर फुटून अनेक ठिकाणी होणारा हिंसाचार, अन्याय थांबेल, अशी आशा कवी व्यक्त करतात, त्या वेळी आईचे महत्त्व आपोआपच अधोरेखित होत जाते.

किती धडपड चाल्लिये तिची

बाहेर पडण्याची.. दिशा-दिशांत प्रयत्न करते

पुन्हा पुन्हा भिंतींवर आपटते.. पडते जायबंदी होते, उठते वारंवार उडते

फिरून धडकते.. जख्मी होऊन विव्हळते.. आर्तं होते

पुरुषप्रधान संस्कृतीच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी स्त्री सातत्याने प्रयत्न करत असते. वारंवार प्रयत्न करून ती जखमी होते, आक्रोश करते, विव्हळते, अनेकदा जायबंदी होते, पण पुन्हा नव्याने स्वतःचे अस्तित्व शोधण्यासाठी प्रयत्न करते. आता ही स्त्री आहे की कविता आहे, याबाबत विचार न करता जर आपण व्यवस्थित समजून घेतले, तर सौमित्र यांची कविता आणि स्त्री एकमेकात पूर्णपणे सामावलेली आहे, हे आपल्या लक्षात येते. आपल्या जीवनातील स्त्रीशी संवाद साधताना कवी प्रत्येक पातळीवर व्यक्त होतो, त्यातूनच त्यांच्या संपर्कातील, त्यांच्या पाहण्यातील आणि त्यांच्या कवितेतील स्त्री कशी आहे, हे वाचकांना उलगडत जाते.

तुला थांबवून बाहेर एकटाच जाऊन आलो होतो मशिदीत

नंतर दोघे चर्च, गुरुद्वारा करत

संध्याकाळची आरती घेतली होती आपण एकाच दिवशी महालक्ष्मीला,

कुठल्या मंदिरात जातेस तू आता

कुठल्या देवासाठी करतेस उपवास ठाउक नाही

मी मात्र थांबवलंय सगळंच

कवी स्वतः धर्मनिरपेक्ष असल्यामुळे मशीद, गुरुद्वारा या ठिकाणी जातात, मात्र आपल्यासोबतच्या स्त्रीने आपल्या सोबत आलेच पाहिजे, असा त्याचा अट्टाहास नाही; मात्र नंतर दोघे समन्वयाने एकत्र प्रार्थनास्थळी जातात. पुढे पुरुष हे सर्व देवधर्म बंद करतो, स्त्री मात्र कदाचित अजूनही उपवास करत असेल किंवा कुणा एखाद्या देवाचा साकडे घालत असेल, असे त्याला वाटत राहते.

तुझाही असेल संसार मुलंबाळं नातीगोती

ज्यांच्यात खात्री आहे तुलाही

होत असेल गुदमरल्यासारखं

उगाच

आता कुठलं गुदमरणं म्हणतोय मी

तुला कळत असेलच, कारण

'आपले पूर्वायुष्यातील प्रेम आठवून आजच्या समाजातील पापभीरू स्त्रीला गुदमरल्यासारखे वाटत असेल' असे कवी जेव्हा म्हणतो, तेव्हा या वाक्यातील मेख कवितेच्या शेवटी,

आपलं प्रेम शारीरिक नव्हतं

फक्त वैचारिकही...

या ओळींमधून आपल्या लक्षात येते. खरे तर शारीरिक संबंध स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये परस्पर संमतीने झालेले असले, तरीही नैतिकतेच्या नावाखाली स्त्रीवर एक प्रकारे लांच्छनास्पद कृत्य आहे अशा रितीने दोषारोपण केले जाते, तर कधी ती स्वतः आपण काहीतरी पाप केले आहे अशा जाणिवेतून स्वतः गुदमरुन जाते. हा पुरुषी वर्चस्ववादी समाजव्यवस्थेचा दोष आहे, असे आवर्जून नमूद करावे वाटते. अगदी हेच गुदमरलेपण 'आजी' या खूप आगळ्यावेगळ्या कवितेमध्येसुद्धा दिसून येते. नातवाला गोष्ट सांगत असताना थांबून राहिलेल्या गोष्टीपाशी रडणारी आजी विरून जाते, परंतु तिच्या मनाचा थांग लागत नाही. खरे तर संपूर्ण स्त्री जातीची ही व्यथा आहे. नेमकेपणाने स्त्रियांना व्यक्तसुद्धा होता येत नाही, इतक्या बंधनांमध्ये त्या आहेत हेच 'आजी'सारख्या कवितेमधून सौमित्र यांनी दर्शविले आहे. 'सुमित्राच्या कविता' या विलक्षण विलोभनीय कवितांमध्ये स्त्रीच्या भावनिक स्पंदनांना जोडत जाणारा संवाद साधत स्पंदने आणि भावना टिपण्याचे काम कवीने केले आहे.

तुझ्या डोळ्याखाली गडद होत चाललेली काळी वर्तुळे...

तुझ्या काळ्याशार मऊ केसातून

मला चिडवणारा चांदीचा केस...

अशी शब्दरचना जेव्हा वाचायला मिळते, तेव्हा खरे तर कधी माणसाला स्त्रीकडून नेमक्या सौंदर्याच्या कोणत्या अपेक्षा असतात तेच सांगत असतात, हे प्रातिनिधिक असलेले सत्याच्या कसोटीवर पारखलेले वाक्य आहे, असे मला वाटते.

लग्नानंतर पहिल्यांदा घरी आल्या आल्या

तू मला केलेला तो फोन?

तुझ्या प्रेग्नसीबद्दल एकही शब्द न बोलता

सासरच्या बंटी कुत्र्याबद्दलच बोलण्यात

घालवलेले ते तीन तास...

यासारख्या माहेरवाशीण म्हणून आलेल्या आणि आपल्या मित्राला - अगदी शहरी भाषेत बोलायचे, तर बॉयफ्रेंडला फोनवर बोलताना नेमका विषय टाळून वेगळ्याच विषयावर बोलणारी स्त्री समोर येते, तेव्हा कवी अगदी सहजतेने म्हणतात,

तुझं घर तूझ अंगण... तुझं हसणं तुझं दिसणं

तुझं मूल तुझं करिअर... तुझा स्वभाव तुझा पती।

या साऱ्या जबाबदाऱ्या

तू अगदी सहज मॅनेज करत असशील...

खरे तर ह्या सर्व जबाबदाऱ्या स्त्रीला पार पाडायलाच लागतात, इच्छा असो किंवा नसो, याची जाणीवसुद्धा कवीला आहेच. आता हे स्त्रीपणाचे जोखड कसे उतरेल यावर सौमित्र यांनी फार खोलवर विचार केला आहे. त्यासाठी स्त्री-पुरुष यातील लैंगिक असमानता आणि समान जाणिवा याबाबत एक विज्ञानविषयक दृष्टीकोन समोर ठेवून अगदी अवाक करणारी कविता त्यांनी मराठी भाषेला दिली आहे. पुरुषाचे स्त्री होणे आणि स्त्रीने पुरुष जाणिवेतून वर्चस्व प्रस्थापित करणे या अनुषंगाने अत्यंत विलक्षण वैज्ञानिक दृष्टीकोनातून भावनिक स्तरावर नेऊन पोहोचवणाऱ्या या कवितेमध्ये कवी म्हणतात,

जोवर तू माझ्यातल्या स्त्रीला भेटत नाहीस

अन् मी तुझ्यातल्या पुरुषाला

तोवर।

आपली कहाणी सुफळ संपूर्ण होईल असं वाटत नाही।

जोपर्यंत लैंगिक असमानता दूर होत नाही, तोपर्यंत स्त्री-पुरुषांची दरीसुद्धा दूर होणार नाही, असे सांगून कवी पुढे म्हणतात,

या वैज्ञानिक सत्यापर्यंतच जर.. आपण पोहोचणार होतो तर।

कसा काय आवडला होता.. तुला माझा रांगडेपणा।

मला तुझं कोवळेपण।

स्त्री-पुरुषाच्या जाणिवांचे वैज्ञानिक सत्य जर हेच असेल, तर पुरुषाला स्त्रीच्या शरीराचे आणि स्त्रीला पुरुषाच्या शरीराचे आकर्षण वाटण्याची आवश्यकता नाही, किंबहुना ती का वाटली? असा प्रश्नही कवीने केलेला आहे.

अखंड पुरुषज़ातीच्या वाट्याला आलेली

ही बेचैनी तुझ्यातल्या पुरुषाला येवो

अवघ्या स्त्रीजातीच्या पदरात पडलेली

ती निर्मम शांतता माझ्यातल्या स्त्रीला येवो

या अतिशय महत्त्वाच्या ओळींमधून पुरुषाच्या वाट्याला कायम बेचैनी, तर स्त्रीच्या पदरामध्ये निर्मल शांतता असते, ही एक वेगळी जाणीव कवीने करून दिली आहे.

माझ्यातली ती

आणि तुझ्यातला तो

एकमेकांना भेटल्याशिवाय

खरच आपला शोध संपणार नाही

तुझा घरी

माझा बाहेर.

पुरुषाला जर खऱ्या अर्थाने स्त्री समजून घ्यायची असेल, तर त्याने पूर्णपणे स्त्रीच्या मानसिकतेतून तिचे सुखदुःख समजून घेतले पाहिजे. त्याच वेळी स्त्रीनेसुद्धा पुरुषी मानसिकतेतून पुरुषाचे पुरुषपण समजून घेतले पाहिजे. जेव्हा हा भूमिका बदल होऊन स्त्री-पुरुष एकमेकांना भेटतील, तेव्हा खऱ्या अर्थाने एकमेकांचे अस्तित्व शोधण्याचा शोध संपलेला असेल. एकंदरच किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांच्या कवितेतील स्त्री कष्टकरी, सुखदुःखाचा संघर्ष समर्थपणे पेलणारी, नवऱ्याला प्रसंगी दुसर्‍या स्त्रीचे आकर्षण असू शकते याच्याही जाणिवेतून सामंजस्याने समजून घेणारी, स्वतःच्या अस्तित्व शोधण्यासाठी धडपडणारी, प्रसंगी सौमित्रच्या गारवा ह्या गीतलहरीप्रमाणे अलवार अल्लड अल्हाददायक, कोमल तर कधी पुरुषी व्यवस्थेमध्ये स्वतःचे अस्तित्व उद्ध्वस्त झाल्यामुळे बेचैन, कधी स्वतः पुरुषी होऊन पूर्ण ताकदीने अस्तित्वाची जोपासना करणारी ही स्त्री आहे.

किरण शिवहर डोंगरदिवे,

समता नगर, वॉर्ड न 7, मेहकर

ता मेहकर जि बुलढाणा पिन 443301

मोबा 7588565576

दिवाळी अंक वर्ष

वाचने 23
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया