Skip to main content

सांदीकोपरे

लेखक अरविंद लिमये यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

स्वच्छता फक्त घराची, परिसराचीच नाही, तर मनाचीही करायची असते. त्याची मुळाक्षरं मी गिरवली ती आयुष्याचं अर्धशतक उलटून गेल्यानंतर. निमित्त ठरलं मी आवर्जून सहभागी झालो होतो ते एक व्यक्तिमत्त्व विकास शिबिर! त्या शिबिराने दिलेलं जगण्याचं नेमकं भान माझं नंतरचं जगणं तर समृद्ध करीत आहेच, पण त्या शिबिरात, जगून झालेल्या आयुष्यातले भलेबुरे क्षण पिंजून काढताना मनाच्या सांदीकोपऱ्यात साठून राहिलेली धूळ, कोळिष्टकं जेव्हा झडझडून काढली गेली, तेव्हा अतिशय स्वच्छ झालेल्या मनाने घेतलेला मोकळा श्वास तोवरची कधीच न जाणवलेली घुसमट विरून गेल्याचा आनंद देणारा होता. तो ठेवा आज वीस वर्षं उलटल्यानंतरही सरलेला नाहीय.

मनाचे सांदीकोपरे साफ करण्याचा तो अनुभव अलौकिक होताच आणि त्या संदर्भातल्या अतिशय मौल्यवान अनुभवांपैकी ही कथा आहे मृणालिनीची! 

आमच्या शिबिरातील ज्या गुरू होत्या, त्यांना आम्ही माॅं म्हणायचो. त्या दिवशीचा अध्यापनाचा विषय होता.. 'क्षण कसा स्वीकारायचा?' येणारा क्षण आपण नाइलाज म्हणून स्वीकारतो की मनापासून, हे महत्त्वाचं. कोणताही क्षण, कोणतीही घटना - ती आनंद देणारी असो वा दु:ख, समाधान देणारी असो वा क्लेश, ती एखादी संधी घेऊन आलेली असो वा संकट, असा कोणताही क्षण स्थितप्रज्ञतेनेच का व कसा स्वीकारायचा, याचा तो वस्तुपाठ होता. व्यवहारातली साधी, सोपी उदाहरणं घेऊन अचानक उभ्या ठाकलेल्या क्षणांवर आपल्या मनात उमटणाऱ्या तत्काळ प्रतिक्रियाच तो क्षण अलगद सांभाळण्या-फुलवण्याऐवजी कसा विस्कटून टाकतात आणि त्यातून असमाधान कसं निर्माण होतं, याचं माॅंनी केलेलं विवेचन ऐकताना त्या दिवशीचे चार तास कधी संपले, समजलंच नव्हतं. रोज शिकलेलं गिरवायला हवंच. त्यासाठी होमवर्कही दिलं जायचं. त्या दिवशी दिलेला विषय होता..  'आजवरच्या आयुष्यातले बालपणापासून आत्तापर्यंतचे असमाधानाचे दहा प्रसंग आठवून नेमकं काय घडलं आणि आज त्याकडे पाहताना काय वाटतं याचं विश्लेषण' असा होता. होमवर्कमधला त्या दहापैकी एखादा प्रसंग माॅं सांगतील त्याप्रमाणे प्रत्येकाने सर्वांसमोर येऊन वाचून दाखवायचा. तो भूतकाळाचा धांडोळा, ते क्लेश देऊन गेलेले प्रसंग लिहिणं आणि सर्वांसमक्ष वाचून दाखवणं हे तेच क्षण पुन्हा नव्याने जगणंच होतं आम्हा सर्वांसाठी! आणि ते ते क्षण स्वीकारताना त्या वेळी झालेल्या चुकाही न सांगता आम्हाला समजल्याही होत्या. मृणालिनीच्या होमवर्कमधील प्रसंग माझ्या आजही जसाच्या तसा लक्षात आहे!

"आता मृणालिनीने लिहिलेला प्रसंग आणि त्याचं विश्लेषण ती वाचून दाखवेल. मृणालिनी, ये." माॅं म्हणाल्या.

मृणालिनी दचकली. बावचळली. एकदम गंभीर झाली.

"नाही.. नाही माॅं.. प्लीज नको." काहीशा अस्वस्थ नजरेने शेजारीच बसलेल्या तिच्या नवऱ्याकडे - ॐकारकडे पाहात ती म्हणाली.   

मृणालिनीचं हे रूप सर्वांनाच अनोळखी होतं. खरं तर ती आणि ॐकार दोघेही आनंदी, उत्साही, सर्वांशी मिळून मिसळून वागणारे, परस्परांना समजून घेणारे.. आणि तरीही..?

"ॐकार, अरे सांग, समजव बरं तिला. ती तुलाच घाबरतीय बहुतेक." माॅं हसत हसत बोलल्या, तरी ती गंभीरच. ॐकारने तिच्याकडे हसून पहात हलक्या हाताने तिला थोपटल्यासारखं केलं. ती सगळा धीर गोळा करत कशीबशी उठली. माॅंनी पुढे केलेला कागद घेऊन सर्वांसमोर उभी राहिली. तिचं नेहमीचं हसरं, उत्साही रूप नाहीसंच झालं होतं. ही समोर उभी राहिलेली मृणालिनी जशीकाही दुसरीच कुणीतरी होती! त्यामुळेच कदाचित ती काय वाचतेय ते ऐकण्यास सर्वच जण उत्सुक होते. मृणालिनी भूतकाळात हरवली...

 .."ॐकारशी लग्न होऊन दहा वर्षं उलटून गेलीयत. आमचं सहजीवन समाधानकारक आहे का? अर्थातच हो. पण..  तरीही..  आमच्या समाधानी वाटणाऱ्या सहजीवनातला 'तो' प्रसंग मात्र एखाद्या टोकदार काट्यासारखा माझ्या मनात सलत राहिलाय!

सुखवस्तू , प्रेमळ आई-बाबांची मी मुलगी. त्यांच्या सश्रद्ध विचारांच्या संस्कारात वाढलेली. माहेरी कर्मकांडांचं प्रस्थ नव्हतं, तरी रोजची देवपूजा, कुलाचार, सणवार हौसेने साजरे व्हायचे. सासरी आले. तिथेही सुख स्वागताला प्रसन्न चेहऱ्याने उभं होतं जसं कांही! दादा - माझे सासरे स्वत: इंजिनिअर. त्यांनी स्वत:चं वर्कशाॅप सुरू करून ते कष्टाने नावारूपाला आणलेलं. ॐकार इंजिनिअर होताच वाढलेल्या व्यापाची सर्व सूत्रं हळूहळू त्याच्याकडे सोपवत सासरे स्वत: अलगद बाजूला झाले होते. ॐकारनेही दादांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला होता. त्याचे कामांचे व्याप प्रचंड प्रमाणात वाढत असतानाच आमचं लग्न झालं आणि माझी माझ्या आवडीची नोकरी अर्थातच मला सोडावी लागली. थोडं जड गेलं मला नोकरी सोडताना, पण सासरघरची गरज म्हणून तो निर्णय मी मनापासून घेतला आणि पूर्णवेळचं गृहिणीपद स्वीकारलं, तेही स्वखुशीने. अगदी मनापासून! सुरुवातीच्या मोरपंखी तरंगत्या दिवसात ॐकार मला सतत नजरेसमोर असावा असं वाटायचं. मीही त्याच्या वर्कशाॅपमध्ये इन्व्हाॅल्व झाले, तरच ते शक्य होतं.

"ॐकार, ऑफिसमधल्या कांही कामांची जबाबदारी माझ्यावर सोपव ना. मला आवडेल अरे करायला."

"छे गं. तू तिथं येऊन काय करणारायस?" तो ह‌सत हसतच बोलला, पण मी हिरमुसले. थोडी दुखावलेसुद्धा. पण न रुचणारी कुठलीच गोष्ट घट्ट धरून ठेवायला मलाच आवडायचं नाही. त्यामुळे मी ते प्रयत्नपूर्वक हळूहळू विसरलेही. सासरी आई-दादा दोघेही नास्तिक. त्यामुळे त्यांचाच (आणि अर्थात ॐकारचाही) हट्ट म्हणून आमचं लग्न रजिस्टर पद्धतीनेच झालेलं. नवीन विचारांचा आदर म्हणून माझ्या आई-बाबांनीही ते मान्य केलं. पण माझ्या हौशी स्वभावाला मुरड घालायला लागल्याची खंत विसरणं मला खूप जड गेलं. बाकी काही नाही, तरी नव्या घरची ही टोकाची नास्तिकता पचवताना मला खूप त्रास झाला. घरी रोजची देवपूजा नसणंच नव्हे, तर देवाचा एखादा फोटोही नसणं माझ्या पचनीच पडायचं नाही. अंघोळ करूनही पारोसंच वाटायचं.

"आपण एक देव्हारा आणू या का रे छानसा?" मी ॐकारला एकदा सहज म्हटलं.

"भलतंच काय गं? आई-दादांना आवडणार नाही हं. आणि मला तर नाहीच नाही." मी कुणीतरी थप्पड मारावी तशी गप्प बसले होते! मला ऑफिसकामात सामावून घ्यायला ॐकारने दिलेला नकार आणि हा नकार हे चुरचुरणारे ओरखडेच होते माझ्यासाठी. पण मला त्यांचा फार बाऊ वाटला नव्हता. मी ते विसरू शकले नाही, तरी स्वीकारले एवढं खरं.

आई-दादा दोघेही अलीकडे थोडे थकले होते. त्यांचं पथ्यपाणी, औषधांच्या वेळा सांभाळणं, मोलकरणींच्या घरच्या कुरबुरी, त्यांची रोजची रडगाणी ऐकून त्यांना धीर देण्यासाठी खास वेळ राखून ठेवणं हीच मी माझी देवपूजा मानली. बंगल्याभोवतालची बाग मी स्वत: डिझाइनिंग करून आकाराला आणली. छान फुलवली. त्या बागेतल्या झोपाळ्यावर घटकाभर शांत बसले की देवळात जाऊन आल्याचं समाधान वाटायचं. आमचा छोटा सौरभ तर या बागेत हुंदडतच लहानाचा मोठा झालाय.

घर, संसार म्हणजे तडजोडी आल्याच. त्या मलाही चुकल्या नाहीत. पण मी त्या सकारात्मक विचाराने करत गेले. चिडले, भांडले असते, आदळआपट केली असती, तर ना देवपूजेचं समाधान मिळालं असतं, ना माणसं जपली गेली असती. पण.. पण गेल्या वर्षीचा तो प्रसंग घडला आणि या तडजोडी करीत मी मिळवलेलं सुख तरी निर्लेप कुठे आहे? हा प्रश्न मनाला डंख मारत राहिला. पराकोटीचं वैफल्य, अस्वस्थता आणि अपमानाच्या डागण्या देणारा तो प्रसंग!

सौरभ जन्माला आला, तेव्हापासून एक हौस आणि संस्कार म्हणून त्याच्या मुंजीचं स्वप्न मी मनाशी निगुतीने जपलं होतं. त्याला सातवं पूर्ण झालं. आई मला म्हणाली, ''त्याला आठवं लागलंय तोवर त्याच्या मुंजीचं ठरवून टाका लगेच. म्हणजे लाभतेय का वगैरे बघत बसायला नको.''

"हो. आई. मी घरी आजच बोलते. पण तू महिनाभर आधीपासून माझ्या मदतीला यायचंयस, हे विसरू नकोस."

"येईन तर काय?" आईने हसत प्रतिसाद दिला. फोनवरच्या या मिनिटभराच्या संवादाने जणू काही माझ्या सर्वांगावर उत्साहाचं अत्तरच शिंपडलं. त्याच उत्साहाच्या भरात मी आई-दादांसमोर हा विषय काढला. आईंनी चमकून दादांकडे पाहिलं आणि दादा आढ्याकडे पाहात बसले. त्यांची ही नि:शब्द, कोरडी प्रतिक्रिया मला अनपेक्षित होती. मी काहीशा नाराजीने बाहेर जाऊ लागले, तसं आईंनी हाक मारून मला थांबवलं.

"तू ॐकारशी बोललीयस का? त्याच्याशी बोल आणि दोघं ठरवा काय ते. आम्ही काय गं, आमचे दहा गेले न् पाच उरले अशी अवस्था. आता आमची मतं आमच्याबरोबर.."

"काहीतरीच काय बोलताय आई? मी आणि ॐकार तुम्हाला सांगून, विचारूनच ठरवणार आहोत ना सगळं? आमच्या लग्नानंतरचं पहिलं शुभकार्य आहे या घरातलं. मी सगळं व्यवस्थित करीन. तुम्ही खरंच नका काळजी करू." मी त्यांना दिलासा दिला. त्या दोघांनी निर्विकारपणे माझ्याकडे पाहिलं. ते का, याचं उत्तर मी हाच विषय रात्री ॐकारकडे काढला, तेव्हा मला परस्परच मिळालं.

एरवी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेणारा ॐकार सौरभच्या मुंजीचा माझा प्रस्ताव आणि मुख्य म्हणजे त्या बाबतीला माझा उत्साह पाहून उखडलाच. "मुंजीचं खूळ डोक्यातून काढून टाक" म्हणाला. "त्याची काहीएक आवश्यकता नाहीs" असं ठामपणे बजावलंन. आणखीही बरंच जाही बोलत राहिला कितीतरी वेळ. आई-दादांनाही हा प्रस्ताव आवडलाच नव्हता तर! त्यांनी तसं उघड न बोलता तो नाकारला आणि ॐकारने अशी आदळआपट करीत, एवढाच काय तो फरक.

मला खूप वाईट तर वाटलंच, पण कधी नव्हे तो रागही आला. मन असमाधानानेच नव्हे, तर दु:खातिरेकाने भरून गेलं. त्या रात्री टिपं गाळीत मी अख्खी रात्र जागून काढली. चिडून माझ्याकडे पाठ फिरवून डोक्यावर पांघरूण घेऊन झोपून गेलेल्या ॐकारपर्यंत माझ्या मनातली गदगद पोहोचलीच नव्हती.

आज या घटनेला एक वर्ष उलटून गेलंय आणि या होमवर्कच्या निमित्ताने याच प्रसंगाकडे तटस्थपणे पाहताना मला जाणवतंय की ती रात्रच नव्हे, तर पुढे कितीतरी दिवसही मी अस्वस्थच होते. कुणीतरी आपलं हक्काचं असं कांहीतरी हिसकावून घेतलंय ही भावना दिवसेंदिवस मनात प्रबळ होत राहिलीय. एरवी अप्रिय, कटू असं सगळं प्रयत्नपूर्वक विसरायचा माझा स्वभाव. पण हे मात्र मी विसरू शकलेले नाहीये. त्या परिस्थितीकडे मी आज तिऱ्हाईत नजरेने पाहते, तेव्हा मला जाणवतं की माझ्या असमाधानाला, दु:खाला, अस्वस्थतेला फक्त ॐकारच नाही, तर त्याच्यापेक्षा  कणभर का होईना, पण मी स्वतःच जास्त जबाबदार आहे. आजवर ॐकारने सांगायचं आणि मी 'हो' म्हणायचं, ही सवय मीच त्याला लावली होती. मलाही मन आहे, माझेही काही विचार, काही मतं आहेत, असू शकतात हे मला तरी इतकं तीव्रतेने जाणवलं कुठं होतं? मग ते ॐकारला जाणवावं ही अपेक्षा व्यर्थच नव्हे का? आज हेही जाणवतंय की सौरभच्या मुंजीला ॐकारने नकार दिला यापेक्षा तो ज्या पद्धतीने दिला, ती पद्धत मला अधिक बोचली होती. माझा स्वाभिमान डिवचला गेला होता. मी हे सगळं नंतर योग्य वेळ पाहून ॐकारजवळ व्यक्त करायला हवं होतं. मी ते केलं नव्हतं. माझा अहंकार आड आला होता. तो प्रसंग आत्ता लिहितानासुद्धा ॐकार 'नेमकं' काय बोलला हे न लिहिता मी फक्त 'तो पुढं बरंच काही बोलत राहिला' एवढंच लिहून मोकळी झाले. ते 'बरंच कांही' व्यक्त न होता मनाच्या सांदीकोपऱ्यात धुळीसारखं साठून राहिलंय. ते व्यक्त केल्याशिवाय मनातला सल नाहीसा होणार नाहीय, हे या विश्लेषणादरम्यान मला उत्कटतेनं जाणवलंय. हे सगळं मी खरं तर ॐकारशी बोलायला हवं. पण मी ते बोलू शकेन? भावनेच्या भरात नेमके शब्दच हरवले, तर? तसं नको व्हायला. हो ना ॐकार? म्हणूनच तुझ्याशी बोलल्यासारखं या विश्लेषणाच्या निमित्ताने स्वत:शीच बोलतेय मी. मनातली जळमटं काढून टाकतेय..

ॐकार, खरंच तुझ्या सोबतीत किती असोशीने जगत होते मी. खूप काही दिलंयस तू मला. पण ते देत असताना त्या बदल्यात माझं स्वत्व, माझा अधिकार तू स्वत:कडे कसा न् कधी गहाण ठेवून घेतलास, ते समजलंच नाही मला. सुखाच्या वर्षावात, आनंदाच्या कैफात कधी जाणवलंच नाही. पण त्या रात्री तुझ्या अनपेक्षित अशा प्रत्येक शब्दाच्या फटकाऱ्यांनी मला जागं केलं आणि मग सगळं स्वच्छ दिसलं. जाणवलं.. जे या क्षणापर्यंत खुपत राहिलंय!

आपल्या घरात देव नव्हते, म्हणून देव्हाराही नव्हताच. आई-दादांनी तुला दिलेला त्यांच्या नास्तिकतेचा हा वारसा. आस्तिक असूनही मी तो वारसाही माझा मानला. माझ्या आस्तिकतेचे देव्हारे मी कधीच मिरवले नाहीत. माझे देव मी मनोमन पूजत राहिले. पण तुमच्या लेखी या सगळ्याला किंमत होतीच कुठे? नव्हे, मी केलेलं, मनापासून केलेलं हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलंच नव्हतं.

माझी एकच इच्छा होती, अगदी उत्कट इच्छा होती - सौरभची मुंज करायची. योग्य ते संस्कार योग्य वेळीच करायचे. त्याच्या जन्मापासून मनात घट्ट धरून ठेवलेली एक अगदी साधी इच्छा! एकुलत्या एका मुलाच्या मुंजीतल्या मातृभोजनाची उत्कट असोशी! तू खूप कांही दिलंयस रे मला, पण ही एवढी साधी गोष्ट नाही देऊ शकलास. मला जवळ घेऊन समजावलं असतंस, चुचकारलं असतंस, तर नेहमीसारखी मनाला मुरड घालून मी स्वीकारलंच असतं ना रे तेही? सगळं बिनबोभाट स्वीकारलं असतं. पण तू? तू समजावलं नाहीस रे मला.. तू मला झिडकारलंस. आठवतंय ना तुला? तू झिडकारलं होतंस मलाss. "असल्या थोतांडावर माझा विश्वास नाही" म्हणाला होतास. मग माझ्या विश्वासाचं काय रे? "तो माझा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याच्या बाबतीत मी म्हणेन तसंच होणार".. एखाद्या हुकूमशहासारखं बजावून सांगितलं होतंस मला. मग सौरभ, माझा कोण होता रे? माझाही तो एकुलता एक मुलगाच होता ना? पण तू त्याच्या संदर्भातला माझ्यातल्या आईचा हा एवढा साधा अधिकारही नाकारलास. झिडकारून टाकलास. तुझं ते झिडकारणं बोचतंय मला. एखाद्या तीक्ष्ण काट्यासारखं रुतलंय ते माझ्या मनात, हे तुला नाही तर दुसऱ्या कुणाला सांगू रे मी? ॐकार, खरं तर हे सगळं तुला मी न सांगताच समजायला हवं होतं ना रे? ..पण..."

आवाज भरून आला, तशी मृणालिनी अडखळली. बोलायची थांबली. तिचे शब्द संपले. संवाद तुटला. पण आवेग थोपवेनाच. ती थरथरत तशीच उभी राहिली क्षणभर. तिच्या डोळ्यातून झरझर वाहणारे अश्रू थांबेचनात. ते पाहून माॅं स्वत: झरकन् जागेवरून उठल्या आणि तिला आधार द्यायला पुढे झेपावल्या. पण... पण त्यापूर्वीच कधी कुणास ठाऊक, पण ॐकार पुढे धावला होता. त्याचेही डोळे भरून आले होते. ते अश्रूच जणू मृणालिनीचं सांत्वन करत होते! 

मनातल्या सांदीकोपऱ्यातली धूळ आणि जळमटं क्षणार्धात नाहीशी झाल्यासारखं मृणालिनीला ते स्वप्नवतच वाटत असल्यासारखी ती अविश्वासाने ॐकारकडे पाहात राहिली होती!

 

लेखक - अरविंद लिमये, सांगली

E mail - arvind.limaye@gmail.com

दिवाळी अंक वर्ष

वाचने 37
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया