Skip to main content

परदेश पाहताना, स्वदेश उमगताना

लेखक चेतना वैद्य यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

 

आम्ही मुंबईच्या एअरपोर्टवर पोहोचलो. मनात भीती, शंका, आनंद असे मिश्र भाव होते. पहिल्यांदाच विमानात बसायचं होतं. आपला देश सोडून परदेशी जायचं होतं. पोटात चलबिचल सुरू होती. मला वाटतं, जो पहिल्यांदा परदेशात जातो त्याला असंच काहीसं होत असावं.

असो. सगळ्या फॉरमॅलिटीज झाल्या. बॅगा बेल्टवरून टाटा करून गेल्या. काहीतरी तुटतंय असं वाटत होतं. सिक्युरिटीच्या वेळीही उगीचच थरथर होत होती. केबिन बॅग, पर्स, सॅक सगळं निमूटपणे तपासणीसाठी पुढे गेलं. युनिफॉर्ममधली मॅडम सर्वांगावर मशीन फिरवत होती, तेव्हा धडधड आणखी वाढली. मनात आलं, आपल्या देशात असताना किती सुरक्षित वाटतं, नाही? मग आम्ही इमिग्रेशनच्या लांबच लांब रांगेत दीड तास ताटकळत उभे राहिलो. झालं एकदाचं ते इमिग्रेशन आणि मग गेटकडे कूच! भरपूर चालावं लागलं. अप्रतिम सजवलेलं मुंबई एअरपोर्ट पाहून डोळे दिपून गेले. तो आनंद घेत गेटवर पोहोचलो. स्वच्छ, चकचकीत काचेच्या भिंतीपलीकडे प्रचंड मोठा लोहपक्षी आपले विशाल पंख पसरून आमची वाट पाहत होता. त्याच्या पोटात शिरायच्या कल्पनेनेच अंगावर काटा आला. हाच का तो हजारो किलोमीटर जाण्यासाठी हजारो फूट उंच आकाशात विहार करणार? नेईल ना नीट? किती शंका! मग स्वतःचाच राग आला आणि मन स्थिर झालं.

समोरून सुटाबुटातले, देखणे पायलट गेले. पाठोपाठ एकसारखी हेअरस्टाइल केलेल्या, युनिफॉर्ममधल्या एअर होस्टेस पेन्सिल हील्सच्या पादत्राणांत टकटक असा ताल देत विमानात शिरल्या. त्यांना हवाई सुंदरी का म्हणतात, त्याचा अर्थ कळला. भरपूर मेकअप, नाजूकशी लिपस्टिक, सजवलेली नखं... काय आणि किती बोलावं!

विमानाने रनवेवर धावायला सुरुवात केली. जबरदस्त टेन्शन आलं, पोटात खड्डा पडला, कानात दडे बसले आणि मी क्षणात आकाशात झेपावले! तो आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता. सगळंच नवं होतं. वेलकम ड्रिंक, हवे तेवढे पिक्चर्स, मनसोक्त ऐकता येणारं म्युझिक, गरम गरम जेवण, थंडगार पाणी आणि जेवणानंतर मला हवी तशी ब्लॅक कॉफी! स्वर्ग म्हणताना आपण वर का बघतो, त्याचा अर्थ जणू समजला. दमणुकीने झोपाळलेले डोळे अलगद मिटले आणि छानशी झोप लागली. असा हा वीस तासांचा प्रवास कधी संपला, ते समजलंच नाही.

आम्ही लॉस एंजलीसला पोहोचलो होतो. परदेशातलं आयुष्य सुरू झालं होतं. डोळ्यांनी पाहायचं, कानांनी ऐकायचं, मनात साठवायचं असं बरंच काही पुढे होतं.

लॉस एंजलीसमध्ये बेव्हरली हिल्स हा सेलिब्रिटींच्या निवासासाठी प्रसिद्ध असलेला परिसर पाहिला. तिथली घरं शोधण्यासाठी फार धडपड करावी लागत नाही. गाडीत ऑडिओ गाइड सुरू केला की तो आपल्याला आसपासच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या घरांविषयी माहिती सांगतो. ‘आता तुम्ही लिओनार्डो डिकॅप्रिओच्या घरासमोर आहात’, ‘तुमच्या उजव्या बाजूला मायकेल जॅक्सनचं घर आहे’ अशा सूचना ऐकत केलेली ती सफर छान वाटली.

तिथल्या घरात राहायला सुरुवात केली आणि दैनंदिन जीवनातून स्थानिक संस्कृतीही समजू लागली. मुलं आणि आईवडील यांचे संबंध बघून विस्मित व्हायला झालं. छोटंसं पाच वर्षांचं मूल छानपैकी आपलं मत मांडत होतं. आई विचारत होती, बाबाही चर्चा करत होते. तेव्हा मनात आलं, संस्कारांची हीसुद्धा एक वेगळी पद्धत असू शकते. मुलं लहान आहेत म्हणून त्यांना मत मांडूच द्यायचं नाही का? ‘तुला काय कळतं?’, ‘तू लहान आहेस’ ही दोन वाक्यं त्यांच्या कृतिशक्तीला मर्यादा घालत असावीत. तिथे मुलांना मिळणारी वागणूक मला विचार करायला प्रवृत्त करून गेली.

प्रचंड मोठी घरं असणारी कम्युनिटी. प्रत्येक घराला एक किंवा दोन गॅरेज. गाडी आली की रिमोटने गॅरेज उघडायचं, गाडी आत घ्यायची आणि पुन्हा सगळं चकाचक. खरं तर पार्किंगचा इश्यू सगळीकडेच फार मोठा असतो. पण एवढे रुंद रस्ते असूनही तिथे एकही गाडी रस्त्यावर उभी दिसत नव्हती. क्षणभर वाटलं, आपल्याकडे पार्किंगसाठी इतकी जागाच कुठे असते? रस्त्याच्या कडेला चारचाकी, दोनचाकी खचाखच उभ्या असतात. त्यामुळे रस्त्याचं सौंदर्यच हरवतं. त्यामधून जाणाऱ्या गाड्या दोन्ही बाजूंनी ॲडजस्ट करतच पुढे जातात. अमेरिकेत मोकळी जागा मुबलक आहे, हे खरं; पण तिचा योग्य उपयोग, इन्फ्रास्ट्रक्चर आणि टाउन प्लॅनिंग पाहून अवाक व्हायला होतं.

अशा साध्यासाध्या गोष्टींतही मन आपोआप तुलना करतं. गादीवर पाठ टेकली की दिवसभराचा थकवा जणू त्या गादीत लपून जातो. मानेखालची उशी मसाज देते की काय असं वाटतं. थंडीच्या दिवसांत कंफर्टर नावाची दुलई कुशीत घेते. फ्रीजमध्ये पाच लीटर दुधाचा कॅन असतो, दुधाची वाट बघावी लागत नाही. अर्थात हल्ली आपणही पिशवीतून दूध आणतोच म्हणा! दिवसाची सुरुवात पॅनकेक्स, सँडविचेस, मेयो, सॉर क्रीम अशा ब्रेकफस्टने होते. नवी चव अनुभवताना मजा येते.

घरातले लोक सकाळी उठून जिम करतात, रनिंग करतात. आपण मात्र सुट्टी म्हणून मस्त आठ वाजता उठतो. चहासोबत कुकीजचा आनंद घेतो. आठवडा जातो आणि लक्षात येतं की कपडे घट्ट व्हायला लागलेत! मग वॉकला जाणं सुरू होतं. थंडीत चालून आल्यावर पुन्हा भूक लागते. असं एक विचित्र चक्र सुरू होतं.

फिरायला बाहेर पडायचं ते बहुतेक वीकेंडलाच, कारण आठवडाभर काम करणाऱ्या यजमानांना इतर दिवशी वेळ देणं कठीण जातं. घरातली कामं मात्र अनेक उपकरणांमुळे सोपी होतात. डिशवॉशरमध्ये भांडी चकचकीत होतात, वॉशर-ड्रायरमधून कपडे वाळून येतात आणि स्टीम आयर्नने इस्त्रीही पटकन होते. सगळंच वेगळं, थोडं भूलभुलैय्यासारखं!

मग एक दिवस कळतं, आज प्रॉम नाइट आहे. टीनएज मुलं-मुली आपल्या आवडीचा पार्टनर निवडून प्रॉम नाइटची देखणी पार्टी करून घरी येतात. कदाचित थोड्याशा तरल अवस्थेतही! इथे काळजाचा ठोका चुकतो. मुंबईतल्या लोकांना कदाचित याचं फारसं आश्चर्य वाटत नसेल, पण सांगलीसारख्या ठिकाणाहून आलेल्या मनाला हे सगळं लगेच मानवत नाही. तिथे मुलांना लहानपणापासून दिसणारं जग वेगळं असतं, त्यामुळे त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. रिलेशनशिप्स, लिव्ह-इन, डिव्होर्स अशा गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो. आपण संस्कारांच्या नावाखाली घालून दिलेल्या काही मर्यादा मुलांची विचारशक्ती मर्यादित तर करत नाहीत ना, असा प्रश्न पडतो.

अर्थात तुलना करताना आपल्या संस्कृतीचं वेगळेपणही प्रकर्षाने जाणवतं. आपली किल्लेसंस्कृती अजरामर आहे. आधुनिक साधनं नसताना उभारलेली भव्य बांधकामं पाहिली की त्या कारागिरांना सलाम करावासा वाटतो. जयपूरच्या राजवाड्यांतील पाण्याची व्यवस्था, युद्धकाळात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून केलेली सोय, जाळीदार खिडक्यांतून आत येणारा झुळझुळीत वारा... हे स्थापत्यकौशल्य परदेशी लोकांनीही पाहावं, समजून घ्यावं असं वाटतं.

स्वच्छता आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टी तिथे जपलेल्या दिसतात. एक लहानसं मूल चॉकलेटचं रॅपर टाकण्यासाठी डस्टबिन शोधत जातं आणि ते तिथेच टाकून येतं. अशा छोट्या कृतींतूनही संस्कार दिसतात.

पर्यटनाच्या बाबतीतही खूप काही अनुभवण्यासारखं आहे. लास वेगस हे नाव आधीपासून ऐकलेलं. तिथला प्रत्येक कोपरा सजवलेला वाटतो. जगभरातल्या प्रसिद्ध ठिकाणांच्या प्रतिकृती पाहताना कल्पकतेचं कौतुक वाटतं. व्हेनिसचं रूप एका इमारतीच्या आत उभं केलं आहे. बाहेर कडक ऊन असतानाही आत गेल्यावर डोक्यावरचं आकाश बदलल्यासारखं भासतं. कालव्यातून गंडोला राईड घेताना वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं. संगीत, खाणं-पिणं आणि वातावरण सगळंच मन मोहून टाकतं.

पॅरिसच्या आयफेल टॉवरचीही प्रतिकृती तिथे आहे. ती फक्त लांबून पाहायची नाही; वर जाऊन झगमगणारं वेगसही पाहता येतं. कॅसिनो, एमजीएम ग्रँड, फ्लेमिंगो हॉटेल आणि बेलाजिओची कारंजी. सगळीकडे रंगीबेरंगी दिव्यांची चमकधमक. संगीताच्या तालावर नाचणाऱ्या कारंज्यांची सुरेख रांगोळी पाहताना डोळे खिळून राहतात. तरुणाईचा उत्साह आणि झगमगाट यांचं ते वेगळंच स्वप्नविश्व!

हे झालं ऐहिक सुखाचं वर्णन. पण या सगळ्यामागची प्रगती पाहताना मनात अनेक प्रश्नही येतात. अमेरिका भारताच्या १७१ वर्षं आधी, १७७६मध्ये स्वतंत्र झाली. विकासासाठी तिला अधिक काळ मिळाला आणि त्या काळाचा विविध क्षेत्रांत उपयोगही झाला. मात्र केवळ कालावधीमुळेच सगळे फरक निर्माण झाले असं म्हणता येणार नाही. नियोजन, सुविधा आणि समाजाची शिस्त यांचाही विचार करावा लागतो.

अमेरिकेतील वैद्यकीय उपचारांची गुणवत्ता उत्तम असली तरी ते खूप महाग पडू शकतात. कॅनडात सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेमुळे पात्र रहिवाशांना अनेक आवश्यक वैद्यकीय सेवा सरकारी निधीतून मिळतात. तरी सर्व औषधं किंवा सर्व उपचार प्रत्येकासाठी पूर्णपणे मोफत असतात असं नाही. दोन देशांच्या व्यवस्था पाहताना हा फरक लक्षात येतो.

खेळांच्या बाबतीतही तिथली जागरूकता जाणवते. फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, आइस स्केटिंग, बेसबॉल, सॉकर यासाठी उत्तम मैदानं आणि सुविधा दिसतात. एका पार्कमध्ये वेगवेगळ्या खेळांसाठी अनेक ग्राउंड्स असतात. उन्हात मुलांचा खेळ पाहणाऱ्या पालकांसाठी बसण्याची व्यवस्था, छत्र्या, खाण्यापिण्याच्या सोयीही असतात. काही मोठ्या विद्यापीठांची स्टेडियम तर प्रेक्षकांनी खचाखच भरू शकतील एवढी भव्य आहेत. खेळाला तिथे किती महत्त्व दिलं जातं, हे जाणवतं.

शाळेतील शिक्षणपद्धतीही वेगळी वाटली. पाहिलेल्या काही वर्गांत साधारण अठरा ते बावीस मुलं, छोटी टेबलं-खुर्च्या आणि पाच मुलांचे गट असं चित्र दिसलं. आपल्या नेहमीच्या रांगेतल्या बाकांपेक्षा ही मांडणी वेगळी होती. घोकंपट्टीपेक्षा मुलांची समज आणि त्यांना स्वतः विचार करण्याची सवय यावर भर दिसला. शाळेत खेळालाही महत्त्व होतं. कामावर जाणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी शाळेआधी ‘बिफोर केअर’ आणि शाळेनंतर ‘आफ्टर केअर’ अशा सुविधाही असतात.

खाण्यापिण्याच्या बाबतीत अनेक गोष्टी सहज उपलब्ध होतात. वेगवेगळ्या आर्थिक स्तरांतील लोकांना रोजच्या वापरातील पदार्थ मिळावेत, अशी बाजारपेठ आहे. अर्थात प्रत्येक कुटुंबाचा खर्च आणि परवड वेगवेगळीच असते.

संशोधनाच्या बाबतीत अमेरिकेचं स्थान महत्त्वाचं आहे. संशोधनासाठी निधी, क्लिनिकल ट्रायल्सचं जाळं आणि बायोटेक कंपन्यांचं काम मोठ्या प्रमाणावर चालतं. कॅन्सरवरील उपचारांत इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि जीनोमिक संशोधन यांसारख्या क्षेत्रांत सातत्याने प्रगती होत आहे. त्याच वेळी भारतही स्वतःचा मार्ग निर्माण करतोय. भारतात विकसित झालेली CAR-T उपचारपद्धती आणि NexCAR19 हे त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण. परवडणाऱ्या औषधांच्या आणि जेनेरिक औषधांच्या निर्मितीतही भारताची ताकद मोठी आहे. विज्ञानाचा कॅन्सरशी असलेला लढा एका देशाचा नसून संपूर्ण मानवजातीचा आहे.

या गंभीर विषयातून पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊ या. नायगारा धबधबा म्हणजे निसर्गाच्या सामर्थ्याचं विराट दर्शन. ईरी सरोवरातून ओंटारियो सरोवराकडे वाहणाऱ्या नायगारा नदीवर हा धबधबा आहे. प्रचंड आवाज करत खाली कोसळणारं पाणी पाहताना आपण थक्क होऊन जातो.

लिहिण्यासारखं खूप आहे. शिकागो म्हटलं की बेसबॉलची परंपरा आणि गगनचुंबी इमारती आठवतात. न्यूयॉर्कमधला टाइम्स स्क्वेअर रात्री पाहण्यासारखा आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, मॅनहॅटन आणि ११ सप्टेंबरच्या भीषण हल्ल्यात कोसळलेल्या ट्विन टॉवर्सच्या परिसरात उभं राहिलेलं वन वर्ल्ड ट्रेड सेंटर पाहताना अमेरिकेची आर्थिक ताकदच नव्हे, तर संकटातून पुन्हा उभं राहण्याची जिद्दही जाणवते.

सॅन फ्रान्सिस्कोचा गोल्डन गेट ब्रिज, लांबच लांब समुद्रकिनारे आणि पर्वतरांगा डोळे आणि मन शांतवून टाकतात. कॅलिफोर्नियातील सॅन होजे हे सिलिकॉन व्हॅलीच्या केंद्रस्थानी असलेलं महत्त्वाचं शहर. टेक कंपन्या, नवनवं संशोधन आणि विज्ञान-तंत्रज्ञानाशी जोडलेली आधुनिक जीवनशैली ही तिथली वैशिष्ट्यं. अटलांटा हे अमेरिकेच्या दक्षिण भागातील आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. इतिहास आणि आधुनिक उद्योगविश्व अशा दोन्ही बाजू या शहरात दिसतात.

मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचा जन्म अटलांटामध्येच झाला. वर्णभेदाविरुद्ध मोठं काम करणाऱ्या या नेत्यावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता, ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानास्पद आहे.

हा लेख लिहिताना एक गोष्ट नव्याने जाणवते आहे - परदेशाचं वर्णन आणि कौतुक करताना आपण भारताकडेही नव्या दृष्टीने पाहू लागतो. दुसऱ्या देशातल्या चांगल्या गोष्टी पाहून त्या आपल्याकडेही असाव्यात असं वाटतं; आणि आपल्या देशातल्या काही गोष्टींचं मोलही नव्याने कळतं. नवी मुंबईतील नव्या विमानतळावर उतरल्यावरही असंच वाटलं, इतकं देखणेपण आता आपल्याकडेही साकारत आहे!

परदेशाने डोळ्यांना नवी दृश्यं दिली आणि मनाला स्वदेशाकडे पाहण्याची नवी नजर.

दिवाळी अंक वर्ष

वाचने 26
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया