कारंज्यात बंड्याइतकं सगळं माहीत असणारा माणूस दुसरा नाही, आणि बंड्याइतकं काहीच न करणारा तर नाहीच नाही.
रात्री आठ वाजले की कारंज्याचा बाजार आळोखेपिळोखे देतो. दुकानांचे शटर एकामागून एक खाली येतात, मारुतीच्या देवळात शेवटची घंटा वाजते आणि पानाच्या टपरीवरच्या बल्बभोवती पतंग फेऱ्या मारतात. पावसाळ्यात कंदिलाचा प्रकाश चिखलात पडून चंदेरी पट्टा होतो आणि त्या पट्ट्यातून कुणीतरी चपला हातात धरून चाललेला असतो. आणि त्याच देवळाशेजारी, दहा बाय दहाच्या टपरीत एक दिवा अजून जळत असतो. पाटी आहे, 'मारोती इस्त्री सेंटर'.
टपरी आतून तितकीच दहा बाय दहाची. भिंतींना कधीकाळी हिरवा-निळा रंग दिला होता, आता तो फक्त धुराचा हात पोहोचला नाही तिथेच शिल्लक आहे. मधोमध लाकडी टेबल, त्यावर जुन्या चादरीची घडी आणि त्या चादरीवर इतक्या वर्षांच्या चटक्यांच्या खुणा की त्यावर कारंज्याचा नकाशा काढता येईल. टेबलाच्या एका कोपऱ्यात पत्र्याचं पातेलं आणि त्यात पाणी. डावीकडे कपड्यांचे ढीग, रंगवार लावलेले. वर पांढरे शर्ट, मध्ये धोतरं आणि सगळ्यात खाली पाटलांचा कोट, कारण तो कुणाला हात लावू द्यायचा नसतो. मागच्या भिंतीला एक हिरवं लोखंडी कपाट, त्याचा एक दरवाजा कधी नीट बंद होत नाही आणि आत इस्त्री झालेले कपडे चिठ्ठ्या लावून टांगलेले. टेबलाखाली कोळशाची पोती आणि पोत्यांच्या मागे एक काळंभोर काहीतरी. मांजर आहे की आणखी एक पोतं, हे आजवर कुणाला कळलं नाही.
मारोती सदतीस वर्षांचा. बारीक, काटक, कायम घामाने भिजलेला. पहाटे पाच वाजता उठतो, देवळाच्या नळावर आंघोळ करतो आणि नारळाच्या करवंटीने कोळसा पेटवतो. दिवसाला साठ शर्ट इस्त्री करतो आणि एकावरही सुरकुती ठेवत नाही.
"सुरकुत्या कपड्यावर ठेवायच्या नाहीत," तो म्हणतो, "त्या माणसासाठी असतात." कॉलर तर तो अशी करतो की कारंज्यातली निम्मी लग्नं त्याच्या कॉलरमुळे जमली, असं म्हणतात. अंगात पांढरी बनियन, दाट मिशी आणि डोळे कायम थोडे आश्चर्यचकित, जणू काय त्याला रोज वाटतं की आजसुद्धा कपडे संपले नाहीत.
इस्त्री सुरू करण्याआधी मारोतीची एक पद्धत ठरलेली आहे. इस्त्रीच्या पोटात तो निखारे भरतो, ती हवेत तीनदा गोल फिरवतो आणि निखाऱ्यांवर फुंकर मारतो. मग पातेल्यात बोटं बुडवून इस्त्रीवर पाण्याचा शिडकावा करतो. पाणी चर्रकन उडालं की इस्त्री तयार आणि काम सुरू. पाणी नुसतं थरथरत बसलं तर पुन्हा निखारे आणि पुन्हा फुंकर. तापमान मोजायला त्याला थर्मामीटर लागत नाही, पातेलं आणि बोट पुरतं. बंड्या म्हणतो, "ही सगळी विज्ञानाची गोष्ट आहे." विज्ञान काय ते मात्र कधी सांगत नाही.
फुंकताना मारोतीचे गाल असे फुगतात की आम्ही पोरं लहानपणी त्याची नक्कल करायचो. एकमेकांशी बोलतानासुद्धा गाल फुगवून. "तू... फूं... कुठे चाललास... फूं..." दुरून मारोती बघायचा, हसायचा आणि फुंकर मात्र थांबवायचा नाही. ते डोक्यात इतकं कोरलं गेलंय की आजही कुणाचे गाल फुगलेले दिसले की मला कोळशाचा वास येतो. बंड्या मात्र कधी गाल फुगवायचा नाही. फुंकण्याचं काम दादाचं होतं.
टपरीच्या दारात एक प्लास्टिकची खुर्ची आहे आणि त्या खुर्चीवर बंड्या. मारोतीचा धाकटा भाऊ, तेहतीस वर्षांचा, गोलमटोल, केसांना नारळाचं तेल चोपडलेलं आणि अंगावर कायम पांढरा शर्ट. कारंज्यातला सगळ्यात कडक इस्त्रीचा शर्ट बंड्याचा आहे आणि तो त्याने आयुष्यात कधी इस्त्री केलेला नाही. आठवीत गणितात नापास झाला आणि त्यानंतर त्याने शाळेकडे बघितलं नाही, पण दादाच्या खर्चाचा हिशोब मात्र त्याला कधी चुकला नाही.
बंड्या म्हणजे अख्ख्या कारंज्याचा चालता-बोलता नमुना. त्याला सगळं माहीत असतं. पाऊस कधी येईल हे तो सांगतो आणि पाऊस येत नाही. भाव कधी वाढतील हे तो सांगतो आणि ते वाढतात, पण ते सगळ्यांनाच दिसत असतं. क्रिकेटमध्ये फलंदाजाने तो चेंडू कसा खेळायला हवा होता, हेही तो सांगतो. सामना त्याने रेडिओवर ऐकलेला असतो. स्वतःचं प्रत्येक मत त्याला खरं वाटतं, आणि ते कुणी ऐकतच नसल्यामुळे कुणाला खोटंही वाटत नाही.
बंड्या सकाळी दहा वाजता खुर्ची मांडतो आणि रात्री दिवा जाईपर्यंत उठत नाही. मधल्या वेळात तो दोनच गोष्टी करतो - चहा पितो आणि सल्ला देतो. चहा उधार, सल्ला फुकट. दोन्हींचा हिशोब कुणी ठेवत नाही. आणि खुर्चीवर बसला की एक तर काडीने दात कोरतो, नाहीतर किल्लीने कान. कान कोरताना त्याचे डोळे अर्धे मिटतात आणि तो इतका सुखी दिसतो की बघणाऱ्यालाच कान खाजवावासा वाटतो.
बैलबाजारात बैलाच्या दातावरून वय ओळखतात. बंड्या शर्टाच्या कॉलरवरून माणूस ओळखतो. "कॉलर जास्त कडक असेल तर घर मवाळ असतं," तो सांगतो. "सकाळी सकाळी पांढरा शर्ट घेऊन आला की माणूस स्थळ बघायला निघालाय." यातला एकही सिद्धान्त कधी खरा ठरला नाही, पण बंड्याने तो कधी मागे घेतला नाही. "चुकलं असेल," तो म्हणतो, "पण मी बोललो तेव्हा बरोबर होतो."
टपरीत आलेलं गिऱ्हाइक मारोतीशी बोलतं आणि बंड्याला ऐकून घेतं.
"मारोती, शर्ट कधी मिळेल?"
"उद्या." "बंड्या, तू करून दे ना."
"मला इस्त्रीचा हात नाही."
"कुठे आहे?"
"तो दादाला दिला."
मारोती यावर काही बोलत नाही. फक्त त्याची मान जरा खाली जाते आणि इस्त्री जरा जोरात चालते.
मारोतीच्या डाव्या मनगटावर एक काळा डाग आहे. तो इस्त्रीचा. वडील गेले तेव्हा मारोती चौदा वर्षांचा होता आणि बंड्या अकरा. वडिलांची इस्त्री कोपऱ्यात तशीच पडली होती. मारोतीने ती उचलली आणि पहिल्याच दिवशी मनगट भाजून घेतलं. बंड्या रडायला लागला. मारोती दात दाबून म्हणाला, "तू बस रे. तू नको धरू. मी आहे." तेव्हापासून बंड्या बसला. खुर्ची नंतर आली, पण बसायचं ठरलं ते त्या दिवशी.
पुढची वर्षं अशीच गेली. बंड्या आठवीत नापास झाला, तेव्हा मारोतीने मास्तरांच्या शर्टाला तीन महिने फुकट इस्त्री केली आणि बंड्या नववीत ढकलला गेला. तो नववीत गेला याचं दुःख सगळ्यात जास्त मास्तरांना झालं. बंड्याच्या फीला पैसे मारोती द्यायचा, पिक्चरच्या तिकिटालाही मारोती द्यायचा,आणि पिक्चर बघून आल्यावर बंड्या मारोतीला पूर्ण गोष्ट सांगायचा. मारोतीने तो पिक्चर कधी बघितलाच नव्हता, पण शेवट त्याला पाठ होता.
मारोतीचं लग्न झालं. वहिनी शेजारच्या गावाहून आल्या. दिसायला साध्या, पण नजर कारकुनासारखी. पहिल्याच दिवशी त्यांनी टपरीची मोजदाद केली. एक भट्टी, एक टेबल, एक नवरा आणि एक खुर्ची. खुर्चीवर बसलेल्या बंड्याकडे बघून म्हणाल्या, "खुर्ची चांगली आहे बंड्या. फक्त तिच्यावर बसणाऱ्याचा खर्च जरा जास्त दिसतोय." मारोती हसला, पण बंड्याला कळलं की हे हसू आधीसारखं नाही. काही महिन्यांतच मारोती वेगळं राहायला गेला. जाताना म्हणाला, "बंड्या, आता मला बायकोकडे बघावं लागेल. तू तुझं काहीतरी बघ." पहिल्या महिन्यात त्याने पैसे दिले. दुसऱ्या महिन्यात थोडे. तिसऱ्या महिन्यात काहीच नाही आणि बंड्याला त्या दिवशी पहिल्यांदा खुर्ची टोचली.
खरं सांगायचं तर बंड्याला एकच गोष्ट येत नव्हती. बायकांशी कसं बोलायचं. एकदा बाजारात एका मुलीने विचारलं, "दादा, पोस्ट ऑफिस कुठे आहे?" बंड्याने चार मिनिटं माहिती दिली. पोस्टाचा इतिहास, पोस्टमनाचा पगार आणि तारा बंद का झाल्या. फक्त पत्ता सांगितला नाही. मुलगी हळूच निघून गेली आणि बंड्या समाधानाने म्हणाला, "बघा, मदत केली." वहिनींशी बोलतानासुद्धा त्याचा आवाज कीर्तनकाराचा व्हायचा. पण हे त्याने कधी कुणाला कळू दिलं नाही. कारंज्यात आपल्याला काय येत नाही हे सांगण्यापेक्षा आपल्याला काय येतं हे ठोकून सांगणं जास्त चालतं.
तीन दिवस तो खुर्चीवर बसून विचार करत राहिला. अकरा चहा प्यायला, कान चार वेळा कोरला, दात आठ वेळा, आणि एकदा तर दोन्ही एकाच वेळी. चौथ्या दिवशी सकाळी तो उठला, कापडाच्या दुकानात गेला आणि पाच मीटर पडदा उधार घेऊन आला. निळा, फुलांचा, कारण दुकानदाराकडे दुसरा नव्हता. त्याने तो टपरीच्या मध्यभागी लावला आणि दहा बाय दहाची टपरी दहा बाय पाचची झाली.
मारोती आला. "हे काय?"
"प्रायव्हसी."
"इस्त्रीला कसली प्रायव्हसी?"
"शर्टाला नसते दादा. माणसाला असते."
मारोतीला प्रश्न कळला नव्हता आणि उत्तर तर त्याहून कळलं नाही. तो भट्टीकडे वळला आणि कोळशावर नेहमीपेक्षा जोरात फुंकर मारली. बंड्याने काही केलं की दादा नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहायचा. त्या दिवशी पहिल्यांदा तो फक्त उभा राहिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाटी लागली. 'डॉ. बंडोपंत. लैंगिक समस्या जाणकार. वेळ - रात्री आठ ते दहा. येताना इस्त्रीचे कपडे आणावेत.'
मारोतीचे डोळे फिरले. "लैंगिक... या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का तुला?"
"दादा, शब्दाला अर्थ लागतो, पदवीला नाही."
"पदवी?"
"नाही."
"मग?"
"अनुभव." "
कसला?"
"वीस वर्षं खुर्चीवर बसून कान कोरण्याचा." मारोतीने कपाळाला हात लावला. बंड्या म्हणाला, "तू कपड्यांच्या सुरकुत्या काढ दादा. मी माणसांच्या काढतो."
पहिल्या रात्री कुणी आलं नाही. दुसऱ्या रात्री पाटलांचा गडी आला, हातात शर्ट. "इस्त्रीला."
मारोतीने शर्ट घेतला आणि गडी पडद्यामागे गेला. तिसऱ्या रात्री गडी नाही, स्वतः पाटील. चौथ्या रात्री गणपतशेठ. आणि पाचव्या रात्री कारंज्यातले अर्धे पुरुष हातात शर्ट घेऊन मारुतीच्या देवळाशेजारी घुटमळताना दिसले. नाव कुणालाच नको होतं, पण शर्ट सगळ्यांच्या हातात होता. कारंज्याने नवा रस्ता शोधला होता. इस्त्रीचा शर्ट घ्यायचा आणि पडद्यामागे घुसायचं.
बंड्याचं दवाखान्याचं सगळं काम इस्त्रीच्या नियमाने चालायचं. गिऱ्हाइकाचं नाव कुणाला कळू नये म्हणून तो प्रत्येकाला शर्टाचा नंबर द्यायचा. पाटील नंबर एक, कारण त्यांच्याकडे शर्ट जास्त. गणपतशेठ नंबर दोन.
शेठ म्हणाले, "मी दोन का?"
बंड्या म्हणाला, "गावाचा क्रम आहे शेठ. एक पाटील, दोन तुम्ही."
शेठ गप्प बसले, कारण तो क्रम कारंज्यात खरंच होता.
पडद्यामागे जाणाऱ्या शर्टाच्या इस्त्रीचा भाव मारोतीने पाच रुपये ठरवला. बाहेरच्या शर्टाचा एक रुपया. कुणी विचारलं तर तो म्हणायचा, "हा शर्ट जड असतो." आणि ते खरंही होतं, कारण त्यात माणसाचं ओझं असायचं.
बंड्याकडे स्टेथोस्कोप नव्हता, म्हणून तो स्टीलचा ग्लास माणसाच्या छातीला लावायचा आणि दुसरी बाजू कानाला. "ऐकू येतंय," तो गंभीरपणे म्हणायचा. काय ऐकू येतंय ते मात्र कधी सांगायचा नाही. आणि सगळ्यांना तो एकच प्रश्न विचारायचा, "हा शर्ट तुमचाच आहे ना?"
पण कारंज्यातली माणसं स्वतःचा त्रास स्वतःच्या तोंडाने सांगायला तयार नव्हती. प्रत्येकाला एक मित्र निघायचा.
"डॉक्टर, माझ्या एका मित्राला..."
"तुमचा मित्र आलाय का?"
"नाही, तो लाजतो."
"मग त्याचा शर्ट आणलाय का?"
"हा माझाच शर्ट आहे."
"ठीक आहे. शर्टाच्या मित्राला सांगा."
आणि माणूस शर्टाकडे बघत सगळं सांगायचा. त्या वर्षी कारंज्यात मित्रांची साथ आली. प्रत्येकाला एक मित्र होता आणि प्रत्येक मित्राला कुठला ना कुठला त्रास.
पाटीवर 'तज्ञ'ऐवजी 'जाणकार' का लिहिलंय, याचीही गोष्ट आहे. आधी बंड्याने 'तज्ञ' लिहिलं होतं, पण त्याचा अर्थ त्याला माहीत नव्हता, म्हणून रात्री त्यानं शब्दकोश उघडला. शब्दकोशात लिहिलं होतं, 'जाणकार'. बंड्या समाधानाने म्हणाला, "म्हणजे हरकत नाही. जाणकार मी आहेच. आणि हा शब्द कारंज्याला समजेल."
दुसऱ्याच दिवशी त्याने पाटीवरचं 'तज्ञ' खोडून जाणकार केलं. मग त्याने 'लैंगिक' शब्द शोधला. तो वाचून पाच मिनिटं गप्प बसला आणि शब्दकोश बंद करून म्हणाला, "हा विषय प्रॅक्टिकलमध्येच शिकायचा असतो." त्यानंतर तो शब्दकोश उघडायच्या फंदात पडला नाही.
मारोतीचा धंदा तिप्पट झाला, आणि त्याला सगळं माहीत होतं. पाटी त्याने, रोज सकाळी पुसून ठेवली होती. पण एक अडचण होती. पडद्यामागे जाणारा प्रत्येक माणूस शर्ट मारोतीकडे ठेवून जायचा आणि सकाळी तो कडक होऊन हातात आला नाही तर घरी बायको प्रश्न विचारणार, म्हणून मारोती रोज रात्री दुकान बंद झाल्यावर दीडशे शर्ट इस्त्री करायचा आणि सकाळी शर्ट हातात देताना म्हणायचा, "आज घरी जाताना कॉलर ताठ ठेवा. बायकोला शंका येता कामा नये."
त्या महिन्यात कारंज्यातले नवरे आयुष्यात पहिल्यांदा कडक शर्ट घालून घरी गेले आणि बायकांना वाटलं की नवरे सुधारले.
"बंड्या, कारंजा सुधारतोय रे," मारोती म्हणायचा. "हो दादा, मी रोज बघतो," बंड्या म्हणायचा. दोघंही एकमेकांकडे बघत नव्हते.
वहिनींना मात्र मारोतीने वेगळंच कारण सांगितलं होतं. "यंदा कारंज्यात लग्नं फार निघालीत."
"रोज?" वहिनींनी विचारलं.
"हो, यंदा लोकांना घाई झालीय." मारोतीने कोळसा आणखी पेटवला. वहिनी खूश झाल्या आणि मारोतीला सोन्याची अंगठी घ्यायला पाठवलं. अंगठी बोटात आल्यावर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला नाही.
त्या वर्षी मी बारा-तेरा वर्षांचा होतो. एकदा रात्री आईने वडिलांचा शर्ट आणायला पाठवलं. बंड्याने मला बाहेरच्या बाकावर बसवलं. "थांब, आत एक रुग्ण आहे." पडद्याच्या पलीकडे गणपतशेठ होते. बाहेर बेडकांचा आवाज, आत कंदिलाची वात फडफडत होती आणि पडदा पातळ असल्यामुळे सगळं स्पष्ट ऐकू येत होतं.
"डॉक्टर, घरी गेलं की बायको बोलत नाही." बंड्याने कान कोरला आणि गंभीर आवाजात म्हणाला, "शेठ, या आजाराचं नाव आहे हिशोबी बधिरता. शहरात फार वाढलाय." "किती दिवसांपासून?"
"दहा वर्षं."
"तुम्ही बोलता?"
"मी हिशोब सांगतो."
"कुठला?"
"पाच टक्क्यांचा."
"घरी?"
"घरीसुद्धा."
"शेठ, एक काम करा. जिऱ्याची पूड आणि गुळाचा खडा, रोज रात्री. आणि अर्धा तास बायकोशी बोला. पैशाबद्दल नाही."
"मग काय बोलू?" "तिचं नाव आठवा आणि हाक मारा."
शेठ थांबले. "डॉक्टर, ते मीच विसरलो." "मग तीच पहिली गोळी." शेठ बाहेर आले तेव्हा हलके दिसत होते. आणि बाहेर बसलेल्या मला असं वाटलं की त्यांच्या खिशातला हिशोब पडद्यामागे राहिलाय.
पंधरा दिवसांनी गावात बातमी पसरली की गणपतशेठ बायकोसाठी जिलबी घेऊन गेले. ती सावकारीच्या पैशातून आली नव्हती, अशी चर्चा बाजारात दहा दिवस चालली.
पाटील आले ते दुसऱ्या रात्री आणि मोठ्या रुबाबात. "बंडोपंत, त्रास असा काही नाही. पाटलीण फक्त बोलत नाही."
"तुम्ही ऐकता का?"
"मी ऐकतो. ती दहा वर्षं रोज एकच विचारते, जेवण झालं का? मी म्हणतो, हुं."
बंड्याने डोळे मिटले. "पाटील, आज तिला विचारा, जेवलीस का?"
"मी?"
"तुम्ही."
"असं कसं?"
"असं." आणि बंड्याने तो प्रश्न इतक्या सहज आणि इतक्या ऊबदार आवाजात विचारला की पडद्याच्या बाहेर बसलेला मी ऐकत राहिलो. जणू काही त्याने तो हजारदा विचारला असेल.
पाटील घरी गेले आणि चार दिवस कुणाशी बोलले नाहीत. पाचव्या दिवशी म्हणाले, "बंडोपंत, तिने उत्तर दिलं. हो, जेवले. मग मला पुढे काय बोलायचं ते सुचलंच नाही."
बंड्या गंभीरपणे म्हणाला, "ते पुढचं सत्र आहे."
एका रात्री वहिनी जेवणाचा डबा घेऊन टपरीवर आल्या. बाहेर रांग. पाटील, शेठ आणि इतर बारा-पंधरा माणसं, सगळ्यांच्या हातात शर्ट. वहिनी थांबल्या. "एवढे शर्ट?"
पाटील म्हणाले, "इस्त्रीला."
"रात्री दहा वाजता?"
"कारंजा वाढतोय वहिनी." वहिनींनी पडदा ओढला.
आत बंड्या खुर्चीवर बसला होता, कानात किल्ली आणि समोर बसलेला एक गडी पाठ फिरवून घाईघाईने शर्टाची घडी करत होता. वहिनींनी बंड्याकडे बघितलं, मग बाहेरच्या पाटीकडे. डॉ. बंडोपंत. लैंगिक समस्या जाणकार. त्यांनी पाटी दोनदा वाचली आणि हातातला डबा खाली ठेवला. तेवढ्यात मारोती धावत आला, चेहरा लाल. राग नव्हता, भीती होती. बायकोला त्याने कारण सांगितलं होतं, यंदा लग्नं फार निघालीत.
"वहिनी, यंदा लग्नं फार निघालीत," तो म्हणाला. वहिनींनी पाटीकडे बोट दाखवलं. "या पाटीवर लग्नाचं काही नाही. हे लग्नानंतरचं आहे."
मारोती गप्प. वहिनींनी आपल्या बोटातल्या सोन्याच्या अंगठीकडे बघितलं. "आणि ही?" "ती... बंड्याच्या सल्ल्याची," मारोती हळू म्हणाला.
"लाज वाटायचं कारण नाही मारोती," शेठ म्हणाले. "माझी बायको आठ दिवसांत तीनदा हसली."
पाटील म्हणाले, "मी काही बोलणार नाही, पण पाटलीण बोलते आहे, हेच महत्त्वाचं."
वहिनी शांत उभ्या होत्या. मग म्हणाल्या, "काल पाटलीणबाई मला भेटल्या. म्हणाल्या, तुमच्या दिरामुळे हल्ली ह्यांनी विचारलं, जेवलीस का."
त्यांनी मारोतीकडे बघितलं. "तुम्ही मला कधी विचारलं होतं?"
मारोती काहीच बोलला नाही. रोज भट्टीसमोर उभा राहून कोळसा फुंकणारा माणूस आज पहिल्यांदा श्वास रोखून उभा होता. पाटील, शेठ आणि बाकीची माणसं शर्ट छातीशी धरून गप्प झाली. बाजारात कुठेतरी कुत्रं भुंकलं आणि मारुतीच्या देवळातली घंटा वाऱ्याने हलली. मग मारोती हळू आवाजात म्हणाला, "जेवलीस का?"
वहिनी काही बोलल्या नाहीत. गळ्यात आवाज अडकला असावा.
रांगेतून पाटलांनी पहिली टाळी वाजवली, मग शेठनी, मग सगळ्यांनी. वहिनींनी तोंड फिरवलं, पण पदराआडून त्यांच्या गालावरचं हसू रांगेला दिसलंच.
दुसऱ्या रात्री साडेआठ वाजता, पडद्याबाहेरची रांग संपल्यावर, मारोती हातात एक शर्ट घेऊन आत आला. शर्ट मुद्दाम जुना निवडला होता, कॉलर विटलेली, खांद्याला शिवण उसवलेली. रात्रभर दीडशे शर्ट इस्त्री करणाऱ्या माणसाचे डोळे लाल होते आणि तो खुर्चीजवळ उभा राहून बराच वेळ टेबलाच्या कडेवर बोटाने काहीतरी गिरवत राहिला.
बंड्याने कान कोरत डोळे उघडले. "दादा? शर्ट बाहेर ठेव ना, नंबर लावतो."
"शर्ट नाही रे," मारोती म्हणाला. "माझ्या एका मित्राने काल बायकोला विचारलं, जेवलीस का. ती हो म्हणाली. आता त्याला पुढे काय बोलायचं ते सुचत नाही."
बंड्यानं गंभीर चेहरा केला. "तुमचा मित्र आलाय का?"
"नाही. तो लाजतो."
"मग त्याचा शर्ट आणलाय का?"
मारोतीने हातातल्या शर्टाकडे बघितलं.
"हा माझाच शर्ट आहे."
"मग शर्टाच्या मित्राला सांगा," बंड्या म्हणाला, "उद्या तिला विचारायचं, आज काय केलंस? आणि ती सांगायला लागली की मध्ये बोलायचं नाही."
"किती वेळ?"
"ती थांबेपर्यंत."
"ती थांबतच नाही."
"तेच तर औषध आहे दादा."
मारोतीने भुवया उचलल्या. "तुला हे कसं माहीत? तू कधी बायकोशी बोललायस?"
बंड्या सहज म्हणाला, "दादा, डॉक्टरला रुग्णाचा आजार व्हायची गरज नसते. शास्त्र आहे हे."
मारोतीला हसायचं होतं, पण हसू अर्ध्यातच थांबलं. दोघं भाऊ बराच वेळ एकमेकांकडे बघत राहिले.
"बंड्या," तो हळू म्हणाला, "मला खरंच काही सुचत नाही." बंड्या खुर्चीवरून उठला. आयुष्यात पहिल्यांदा. त्याने दादाचे खांदे धरले आणि त्याला खुर्चीत बसवलं. "तू बस रे दादा," तो म्हणाला. "आता मी आहे."
मारोतीने आपल्या मनगटावरचा काळा डाग बघितला. तेवीस वर्षं ज्या हाताने तो भावाला बसवत राहिला, त्याच हाताने आज त्याला कुणीतरी बसवलं होतं. त्याने खुर्चीच्या हातावर हात ठेवला आणि डोळे मिटून घेतले. डोळ्यांच्या कडेने पाणी आलं.
"कोळशाचा धूर आहे."
"कोळसा तर बाहेर आहे दादा,"
"तरी धूर आहे."
थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले. "फी किती?"
"पाच रुपये." बंड्या म्हणाला, "पण दादाला सवलत. एक रुपया." मारोतीने खिशातून रुपया काढून बंड्याच्या हातात ठेवला. बंड्याने तो कपाळाला लावला आणि सवयीने पडद्याबाहेर ओरडला, "पुढचा नंबर!"
त्या रात्री सगळे गेले. पडद्यामागे फक्त कंदिल, कोळशाचा वास, आणि बंड्या. तो खुर्चीकडे बघत राहिला. मग हळूच, जणू कुणी ऐकत नाहीये अशा आवाजात, रिकाम्या खुर्चीला म्हणाला, "जेवलीस का?" खुर्ची काही बोलली नाही. त्याने पुन्हा विचारलं, या वेळी आवाज जरा थरथरला. जो प्रश्न तो दिवसभर दुसऱ्यांना विचारायला शिकवत होता, तो त्याने आजपर्यंत कुणाला विचारलेला नव्हता, आणि त्याला कुणी विचारलंही नव्हतं.
पडदा हलला. वहिनी उभ्या होत्या, हातात डबा. "बंड्या, तू जेवलास का?"
बंड्या काही बोलला नाही. अख्ख्या कारंज्याला सल्ला देणाऱ्या माणसाला त्या एका प्रश्नाचं उत्तर सुचेना. त्याने डोळे मोठे केले, मग लहान केले आणि शेवटी म्हणाला, "वहिनी, हे निदान आहे का?"
"हो," वहिनी म्हणाल्या.
"आणि उपचारसुद्धा."
त्यांनी डबा त्याच्या हातात दिला. बंड्याने तो दोन्ही हातांनी धरला, जणू एखादी पदवीच मिळालीय.
दुसऱ्या दिवशी बंड्याने पहिल्यांदा इस्त्री धरली. पहिलाच शर्ट पाटलांचा होता. बंड्याने निखारे भरले, इस्त्री हवेत तीनदा फिरवली, जशी मारोती फिरवतो आणि पाणी मारून बघायचं सोडून सरळ शर्टावर ठेवली. मारोती मागून "थांब!" ओरडणार होता, पण त्याने तोंडावर हात ठेवला. तेवीस वर्षं त्याने भावाच्या हातातली प्रत्येक गोष्ट आधी स्वतःच्या हातात घेतली होती. आज पहिल्यांदा त्याने ती भावाच्या हातात राहू दिली, भोक पडलं तरी. चर्रकन आवाज झाला, शर्टाच्या पाठीतून पातळ धूर निघाला आणि बंड्याने इस्त्री उचलली, तेव्हा बरोबर मध्यभागी तळहाताएवढं भोक पडलं होतं.
पाटलांनी शर्ट उचलून उजेडात धरला. "बंडोपंत, भोक तर अगदी मधोमध पाडलंस." बंड्या गंभीरपणे म्हणाला, "पाटील, हे कौशल्य आहे. सगळ्यांना जमत नाही." पाटील हसले आणि तो शर्ट तसाच घालून गेले.
आज मी कारंज्यात राहत नाही. इथे कॅनडात बर्फ पडत असताना, खिडकीबाहेर सगळं पांढरं झालेलं असताना, कधी शर्टाला इस्त्री करताना हात भाजला की मला मारोतीचं मनगट आठवतं. मग गाल फुगवून निखाऱ्यावर फुंकर मारणारा तो माणूस आठवतो. आणि त्याच्या शेजारच्या खुर्चीवर कान कोरत बसलेला बंड्या. लहानपणी मला वाटायचं की बंड्या आळशी आहे. आता कळतं की तो आळशी नव्हता. त्याला बसता यावं म्हणून एका माणसाने आयुष्यभर उभं राहायचं ठरवलं होतं. आणि त्या माणसाला कधी कुणी विचारलं नाही, तू थकला नाहीस का?
सांगणाऱ्यांनी मला सांगितलं की टपरीबाहेरची पाटी आता बदलली आहे. 'मारोती इस्त्री सेंटर. सकाळी इस्त्री, रात्री सल्ला.' आणि खाली लहान अक्षरांत, 'जेवलीस का, हेच पहिलं औषध.' पडदा अजून तोच आहे, निळा, फुलांचा, आता थोडा विटलेला, जणू इतकी वर्षं तोसुद्धा कुणाचं तरी ऐकत उभा आहे. आत दोन खुर्च्या आहेत. एकीवर बंड्या आणि एकीवर मारोती, कारण इतकी वर्षं उभं राहिल्यावर मारोतीलाही बसायची सवय लागली आहे. संध्याकाळी दोघं शेजारी बसतात, फारसं बोलत नाहीत. बंड्या कान कोरतो आणि मारोती कधीकधी हळूच त्याचा हात धरतो, जणू तो अजून अकरा वर्षांचा आहे. इस्त्री करायला एक गडी ठेवलाय. तो उभा असतो. कुणीतरी उभं राहिल्याशिवाय कुणी बसत नाही, हे कारंज्याला जुनं माहीत आहे.
बंड्याचं औषध मी लहानपणी पडद्याबाहेर बसून ऐकलं होतं आणि ते कधी विसरलो नाही. आज मी बायकोला रोज विचारतो, "जेवलीस का?" आमच्या कारंज्यात प्रेम आहे असं म्हणायची सवय नव्हती. आम्ही विचारायचो, जेवलीस का? ती सांगायला लागते, मी मध्ये बोलत नाही. ती थांबतच नाही. तेच तर औषध आहे. आणि कधीकधी, बर्फ पडत असताना, ती बोलत राहते, मी ऐकत राहतो आणि मग इथून हजारो मैल लांबून, कानांनी नाही, आतून, मारुतीच्या देवळाची शेवटची घंटा वाजते. त्या क्षणी मी कारंज्यात असतो.
मिसळपाव
प्रतिक्रिया