Skip to main content

तो ‘हातोडा लाडू’ आता झाला मऊ! -

लेखक Piya Lanjekar यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

लहानपणीची दिवाळी म्हणजे मौजमजा, नवीन कपडे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात दरवळणारा फराळाचा खमंग सुवास! आई फराळ करायला बसली की आमचं काम फक्त तिच्या बाजूला बसून तिची कटकट करणं आणि लाडूचा रवा किंवा चिवडा खाणं असायचं. पण एकदा दिवाळीत एक भलतंच कांड झालं, जे आज आठवलं तरी हसू अनावर होतं.

झालं असं की, आईने त्या वर्षी काहीतरी प्रयोग म्हणून 'रवा-बेसनाचे लाडू' बनवण्याचं ठरवलं. बिचारी आई उत्साहात होती. तिने साहित्य मोजून घेतलं आणि लाडू वळून बाजूला ठेवले. लाडू दिसायला अतिशय देखणे आणि गोलगोल झाले होते. पण... जेव्हा संध्याकाळी बाबांनी चहाबरोबर खाण्यासाठी लाडू घेतला, तेव्हा तो हातातच येईना! तो लाडू इतका कडक झाला होता की, साधी सुरी किंवा चमचाही त्याच्यावर चालत नव्हता.

शेवटी काय, तर आमच्या बाबांना चक्क घरचा छोटा हातोडा आणावा लागला! बाबांनी तो लाडू फोडण्यासाठी चक्क हातोडा आणि छत्रीचा दांडा किंवा वरवंटा वापरला, तेव्हा कुठे त्याचा एक तुकडा बाहेर आला. ते दृश्य बघून आई स्वतः हसत हसत लोटपोट झाली होती आणि आम्ही मुलं तर पोट धरून हसलो होतो. त्या दिवसापासून आमच्या घरात त्या लाडूचं नाव 'हातोडा लाडू' पडलं!

पण आई हार मानणारी थोडीच होती! तिने दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने विचार केला, कुठे चूक झाली ते शोधलं. रवा आणि बेसन यांचं योग्य प्रमाण काय असावं, रवा किती भाजायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाकाचा अंदाज कसा घ्यायचा, याचा गाढा अभ्यास केला. आणि त्यानंतर तिने जे रवा-बेसनाचे लाडू बनवले, ते अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि अप्रतिम झाले!

आजही जेव्हा मी दिवाळीत हे लाडू बनवते, तेव्हा आईची ती रेसिपी आणि बाबांचा तो हातोडा आवर्जून आठवतो. तुम्हीही हा अनुभव घेतला असेलच.

चला तर मग, बघू या आईने नंतर सुधारलेली तीच आपली रवा-बेसन लाडूची परफेक्ट रेसिपी!

कुरकुरीत आणि तोंडात विरघळणारे रवा-बेसन लाडू.

रवा-बेसनाचे तोंडात विरघळणारे लाडू


साहित्य :

- रवा – २ वाट्या

- बेसन – १ ते १½ वाटी

- साजूक तूप – पाऊण वाटी

- दूध – २ ते ३ छोटे चमचे

- पिठीसाखर – १ ते १½ वाटी किंवा आवश्यकतेनुसार

- वेलची पूड – चवीनुसार

- ड्रायफ्रूट्स – आवडीनुसार


कृती :

सर्वप्रथम कढईत थोडंसं तूप घालून त्यात रवा मंद आचेवर चांगला भाजून घ्यावा. रव्याचा रंग छान बदलून त्याला खमंग सुगंध येईपर्यंत तो सावकाश भाजावा. रवा भाजून झाल्यावर तो एका परातीत किंवा भांड्यात काढून ठेवावा.

त्याच कढईत बेसन घालून ते चांगलं परतावं. बेसनाला खमंग सुगंध यायला लागला की त्यात थोडं तूप घालावं आणि मंद आचेवर पुन्हा चांगलं परतून घ्यावं.

आता भाजलेला रवा बेसनात घालून दोन्ही मिश्रण एकत्र करावं. रवा आणि बेसन एकजीव होईपर्यंत ते चांगलं परतावं.

मिश्रणाला खमंग सुगंध येऊ लागला की त्यात २ ते ३ छोटे चमचे दूध घालावं. दूध घातल्यावर मिश्रण छान फुलतं आणि रवा-बेसन एकजीव होण्यास मदत होते. हे मिश्रण आणखी थोडं परतून घ्यावं.

त्यानंतर उरलेलं तूप घालून मिश्रण पुन्हा चांगले परतावं.

आता त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घालावी. साखर व्यवस्थित मिसळेपर्यंत मिश्रण परतावं. मिश्रणातून थोडं तूप सुटू लागलं की गॅस बंद करावा.

शेवटी त्यात आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून मिश्रण थोडं कोमट असतानाच लाडू वळून घ्यावेत.

अशा प्रकारे तयार होतील खमंग, मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे रवा-बेसनाचे लाडू!

धन्यवाद !

प्रिया गजानना लांजेकर 
बालाजी वॉर्ड, चंद्रपूर

दिवाळी अंक वर्ष

वाचने 36
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया