जिंजर बग तयार झाल्यावर त्याला कामाला न लावता फक्त साखर आणि आलं देत पोसत राहायचं, म्हणजे त्याच्या गुणवत्तेवर अन्यायच! त्यामुळे बाजारात छान लाल/काळी द्राक्षं दिसताच जिंजर बगला कामाला लावून फसफसणारा ग्रेप सोडा करायचा बेत पक्का झाला. तसंही रेड वाइनचा रक्तवर्णी पोत मला नेहमीच भुरळ पाडत आलाय. त्या रंगछटेचं फसफसणारं पेय घराच्या घरी बनवायच्या स्वप्नपूर्तीचा योग जुळून येणार, हे त्या द्राक्षांच्या रंगावरूनच माझ्या लक्षात येत होतं.
बाजारातल्या ग्रेप सोडाचा रंग कधी कधी इतका कृत्रिम जांभळा असतो की तो द्राक्षांपेक्षा चित्रकाराच्या रंगपेटीतून आला असावा, अशी शंका येते. म्हणून घरच्याघरी द्राक्षांचा खरा नैसर्गिक लाल रंग, चव आणि जिंजर बगची फसफस एकत्र करून हा प्रयोग करण्याचं ठरवलं होतं.
द्राक्षाचा रस, थोडासा लिंबाचा रस आणि जिंजर बग, एवढ्या साध्या मिश्रणातून तयार झालेल्या ह्या अवीट चवीच्या आणि अद्भुत रंगछटेच्या, फसफसणाऱ्या सोड्याची अनुभूती म्हणजे कोणत्याही ऋतूत, एका थंडगार ग्लासाने जिवाची तगमग शांत करण्याचा एक छोटासा उत्सवच! 🙂
साहित्य:
| जिन्नस | माप |
|---|---|
| द्राक्षं | ३ किलो |
| पाणी | ३ कप (एक कप प्रति किलो) |
| साखर (Optional) | द्राक्षांच्या चवीनुसार गरज वाटल्यास (एक कप) |
| लिंबाचा रस | २ टेबल स्पून |
| जिंजर बग | ३/४ कप (१/४ कप प्रतिलीटर ज्यूस) |
| 1 गॅलन कारबॉय | १ |
| 1 लीटर Air-tight glass bottle | ३ |
कृती:
सर्वप्रथम द्राक्षं स्वच्छ धुऊन देठं काढून घ्या. द्राक्षं पाहून आधीच थोडी चाखून बघा; कारण द्राक्षं गोड असली, तर साखर जपून वापरायची. नाहीतर सोडा पिण्याऐवजी मिठाईचा रस प्यायल्यासारखं होईल!
एका पातेल्यात द्राक्षं आणि पाणी घालून मध्यम आचेवर उकळायला ठेवून एक उकळी येऊ द्या. द्राक्षांची साल फुटून रंग पाण्यात उतरू लागली की बटाटा स्मॅशरने ती हलकेच दाबून (स्मॅश करून) घ्या. स्वयंपाकघरात त्या वेळी पसरणारा द्राक्षांचा सुगंध अगदी मस्त असतो.
थंड झालेला अर्क गाळणीने गाळून घ्या. उरलेला चोथा शक्य तितका दाबून त्यातला रस बाहेर काढा. मग त्यात लिंबाचा रस घाला. हा लिंबाचा रस जिंजर बगसाठी पोषक वातावरण तयार करतो - म्हणजे त्यातल्या वाइल्ड यीस्टला खऱ्या अर्थाने वाइल्ड करतो - म्हणजे मोकाट सुटायला मदत करतो. त्यानंतर, गरज असल्यास आता साखर घालून साखर पूर्ण विरघळेपर्यंत मिश्रण ढवळून घ्या.
आता ह्या द्राक्षांच्या रसात आपला उत्साही बारटेंडर, जिंजर बग घाला. हलकेच ढवळून घ्या आणि स्वच्छ कारबॉयमध्ये भरा. हा कारबॉय म्हणजे घरगुती फर्मेंटेशन करता वापरली जाणारी काचेची भलीमोठी बरणी. ह्या कारबॉयमध्ये वर मोकळी जागा ठेवायची; ही जागा फसफस तयार होण्यासाठी लागते. तसंही, प्रत्येकाला थोडी breathing space लागतेच! 🙂
बाटली घट्ट बंद करून थेट सूर्यप्रकाश नसलेल्या जागी ठेवा. हवामानातल्या उष्णतेनुसार १ ते ३ दिवसांत बाटलीत बुडबुडे तयार होऊ लागतील. हे झालं प्राथमिक फरमेंटेशन, ह्यात लॅक्टिक ॲसिड आणि CO2 तयार होतात. भारतातल्या उष्णतेने हे प्राथमिक फरमेंटेशन १ ते २ दिवसांतही होऊ शकतं. जास्त बुडबुडे येऊन खूपच फेसमय तवंग मिश्रणावर झाला, तर प्राथमिक फरमेंटेशन होऊन मिश्रण आता द्वितीय फरमेंटेशनसाठी तयार झालं आहे, ह्याचा तो संकेत आहे, असं समजून घ्या. आणि, कारबॉयमधलं मिश्रण एयर-टाईट बाटलीत द्वितीय फरमेंटेशनसाठी ओतून घ्या.
ह्या द्वितीय फरमेंटेशन पायरीमध्ये फसफस पुष्ट होते. बाटली हवाबंद असल्यामुळे तयार होणारा CO2 बाटलीत प्रेशरखाली राहून फसफस (कार्बोनेशन) पुष्ट होते. १-२ दिवसांत हे द्वितीय फरमेंटेशन पूर्ण होतं. दोन दिवसांनी बाटली फ्रीजमध्ये ठेवून थंड करा. फ्रीजमध्ये फरमेंटेशन मंद होऊन CO2 तयार होण्याचं प्रमाण कमी होईल.
आता, थंड झालेला हा ग्रेप सोडा ग्लासमध्ये अलगद ओता. वर येणारा नैसर्गिक गुलाबी फेस आणि त्याखाली दिसणारा गुलाबी-जांभळा रंग इतका चित्ताकर्षक आहे की हा सोडा ना पिता त्याच्या मनमोहक रंगाकडे बघतच बसावंसं वाटेल. पण तसं न करता, लगेच चियर्स करून, त्याच्या तितक्याच खास आणि 'आऊट-ऑफ-द-वर्ल्ड' मधुर आणि लज्जतदार चवीचा आस्वाद घ्या!
काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या,
प्राशन करिता रंग जगाचे कणोकणी ते बदलू द्या!
काही टिप्स -
- द्राक्षांचा अर्क पूर्ण थंड झाल्याशिवाय जिंजर बग घालू नका.
- द्वितीय फरमेंटेशनमधे बाटलीत कार्बन डायऑक्साइड तयार होत असल्याने रोज एकदा बाटली अत्यंत हलकेच उघडून वायू बाहेर सोडा. विशेषतः उष्ण हवामानात हा सोडा फारच उत्साहाने कामाला लागतो!
- फसफस अपेक्षेपेक्षा कमी वाटली, तर बाटलीला आणखी एक दिवस बाहेर ठेवा.
महत्त्वाची सूचना -
- फरमेंटेशन करताना स्वच्छ बाटल्या आणि स्वच्छ चमचे वापरणं अत्यावश्यक आहे. मिश्रणावर बुरशी दिसली, त्याचा रंग संशयास्पद झाला किंवा कुबट/कुजका वास येऊ लागला, तर ते वापरू नका.
- फरमेंटेशनमुळे अगदी नगण्य प्रमाणात अल्कोहोल तयार होऊ शकतं, हे ध्यानात ठेवावं. आणि बाटलीतील दाब कधीही हलक्यात घेऊ नका, नाहीतर कॉकटेल लाउंजऐवजी स्वयंपाकघरात फटाकेबाजीचा कार्यक्रम होऊ शकतो!
मिसळपाव
















प्रतिक्रिया