Skip to main content

माणसं हरवलेली घरं

लेखक किशोर सोमण यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

एक होता काऊ आणि एक होती चिऊ, चिऊचं घर होतं मेणाचं आणि काऊचं घर होतं शेणाचं! एकदा काय झालं, मोठ्ठा पाऊस आला आणि काऊचं घर गेलं वाहून…!
गोष्टीत पुढे काय होतं, ते तुमच्या-आमच्या आजीने सांगितलं आहेच. अशी ही घराची गोष्ट! काऊच्या घराची, पण या गोष्टीत इतर तपशिलापेक्षा 'काऊला घर होतं' हेच मला आताशा महत्त्वाचं वाटतं. मोठ्या पावसाने वाहून जाणारं का होईना, घर होतं. घर चिमणीने बांधलं होतं. चिमण्या चोचीत काडी काडी गोळा करून सजवलं होतं. त्यात तिच्या पिल्लांना आसरा दिला होता, मायेची ऊब दिली होती. त्या चिमण्या घरच्या छोट्याशा खिडक्यांतून, ह्या जगात वागायचे धडे दिले होते. ऊबदार, सुरक्षित आसरा होता तो. पंख फुटायच्या आधी, झेप घेताना पाय टेकण्यासाठी, थकल्यावर क्लांत जिवाला विसावण्यासाठी!
 

आज आपली धडपड सुरू आहे घरासाठी! काय असतं या घरात? फक्त भिंती, भिंतीवरचे शो-पीसेस, त्यातले केवळ रंग, घराच्या खिडक्या आणि त्यावरचे पडदे! हो, हे सगळं असतंच असतं, पण तरीही ते घर नसतं. त्या घरात माणसांच्या शब्दांना महत्त्व असतं, चालणाऱ्या पावलांचे ठसे गडदपणे उमटायला हवे असतात आणि दुडुदुडु धावणाऱ्या पावलांचे आवाज हवे असतात. पडद्यांना काळजीचा हात फिरायला हवा असतो, भिंतींना आधार म्हणून धरत, पुढे चालणाऱ्या आजीचा हात हवा असतो - हे सगळं असतं, तेव्हा ते घर होतं. माणसांचं घर! पूर्ण घर! खोल मनात रुजलेली आपली घराची कल्पना अशी साकारायला हवी असते. मग असं घर मोठ्या पावसाने वाहून जातं नाही. ते टिकतं. त्यातली चिमणी आपल्या येणाऱ्या बाळाचे मोजे विणत राहते. लुकलुकते डोळे आजोबांचा शोध घेत भिरभिरत राहतात. म्हातारी माय वेळेवर येणाऱ्या लेकराची वाट बघत राहते. घड्याळ शाळेत गेलेल्या पाखरांची वाट पाहत पायरीवर थबकतं.
 

पण अशीही घरं असतात की ज्यांनी माणसंच हरवलेली असतात, 'माणसं हरवलेली घरं!" कशी असतील ती? तिथल्या संध्याकाळी किती उदास असतील? भिंतींचे रंग किती उडालेले असतील! डोळ्यातील आशेची पाखरं, टांगता जीव डोळ्यात भरून घरापासून रस्त्यापर्यंत पसरलेली असतील?
 

का हरवतात माणसं? जातात कुठे? परतत का नाही?.. की परतण्यासाठी त्यांना वाटच नसते? असलेल्या पायवाटा बुजून जातात की वळणावर संपलेला रस्ता त्यांच्यासाठी पुढेच गेलेला नसतो?.. मला उत्सुकता आहे त्या माणसांशी बोलण्याची. ज्यांना ठाऊक आहे आपण स्वतःहोऊनच हरवलो आहोत, त्यांचं काय?

टोले देणाऱ्या घड्याळाच्या भीषण शांततेत, झोपेचं खोबरं झालेली घरातील माणसं येत नसतील त्यांच्या डोळ्यांसमोर? मला तर या सगळ्या प्रश्नांनी कोडी घातली आहेत. कोड्यांनाच कोडं घालणारे प्रश्न माझ्याभोवती पिंगा घालतात. कारण - हरवून टाकणारे रस्ते मलाही खुणावू लागलेत.
 

मलाही परतायच्या वाटेच्या खुणा पुसत, वाट हरवलेल्या माणसांना भेटण्यासाठी, नाव नसलेल्या त्या गावाची वाट शोधायची आहे. घरं हरवलेली माणसं शोधता शोधता मला माणसं हरवलेली घरंच दिसू लागली आहेत. असं करता करता मला ठाऊक आहे की मीही माझं घर हरवणार आहे. माणूस हरवलेलं आणखी एक घर!
 

हे अज्ञात रस्त्या, पृथ्वी जरी गोल असली, तरी हरवलेल्या माणसांसाठी, हे शास्त्रीय सत्य खोटंच ठरलं आहे हे तूही प्रामाणिकपणे कबूल कर. मी ते कुणालाही सांगणार नाही. मी आजीचीच गोष्ट सांगणार आहे - एक होता काऊ, एक होती चिऊ.. एकदा काय झालं…!
   

किशोर सोमण.

 

दिवाळी अंक वर्ष

वाचने 47
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया