लग्न पाहावे करून आणि घर पाहावे घेऊन!
नमस्कार मंडळी!!
सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
तर लेख लिहिण्यास कारण की मागचे काही महिने मी घर शोधण्याच्या मोहिमेवर होतो. या फिरंतीत बरेच अनुभव जमा झाले आणि ते मिपाकरांबरोबर शेअर करावेत असे वाटले, म्हणून हा प्रपंच. यात मीच काय तो शहाणा असा आविर्भाव वाटल्यास दुर्लक्ष करावे, ही विनंती आणि आपापले अनुभव प्रतिक्रियांतून कळवावे, ही दुसरी विनंती. तेव्हा नमनाला घडाभर तेल न घालता सुरुवात करतो.
घर घेणे आणि सेकंड होम घेणे (किंवा प्लॉट, बंगला, वीकएंड होम आपापल्या ऐपतीप्रमाणे) घेणे हा बहुधा ठरावीक वयात चावणारा किडा असावा. कोणाला तो तिशीत चावतो, कोणाला चाळिशीत, तर कोणाला फार उशिराही चावू शकतो. तसा तो मलाही चावला.
डिस्क्लेमर - मार्केट रेट काय चालू आहे हे साधारण समजावे, म्हणून जमेल तिथे किमती आणि कार्पेट एरिया सांगणार आहे.
माझे राहत्या घराचे कर्ज साधारण २०१४मध्ये उतरले होते. बराच काळ झाला होता. पण एकदा २०१७मध्ये घर शोधायला लागलो, तर कागदपत्रातील समस्येमुळे व्यवहार ठरता ठरता मोडला. मग २०१९मध्ये परत मनाने उचल खाल्ली, तर कोविडची कुणकुण लागली आणि नंतर २-३ वर्षे त्याने खाल्ली. मग मात्र बायको वैतागली आणि म्हणायला लागली, "प्रत्येक वेळेस तू उगाच उड्या मारतोस आणि आयत्या वेळी शेपूट घालतोस. तुझे आणि माझे दोघांचे श्रम वाया जातात. आता काही मी तुझ्यापायी धावपळ करणार नाही." मग मी हळूहळू घर या विषयापासून दूर गेलो आणि शेअर्स, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणुकीमध्ये लक्ष घालू लागलो. मग मुलांची शिक्षणे, फिया, काही देशी आणि परदेशी ट्रिपा, नोकरीची धावपळ अशा अनेक कारणांनी हा विषय गुलदस्त्यात राहिला. मात्र मला हळूहळू जाणवू लागले की
१. मार्केटमधील गुंतवणूक ही अखेर १०-१५ ऑपरेटर, जागतिक परिस्थिती आणि आपल्या हाती नसलेल्या बाह्य गोष्टी यांवर अवलंबून आहे. रिअल इस्टेट, सोने हे कधीही आपल्या हाती राहील.
२. वयाची पन्नाशी जवळ येईल, तशी गृहकर्ज घेण्याची क्षमता आणि फेडायची वर्षे कमी होत जातील.
३. काही वर्षांत मुले कमावू लागतील आणि आपला भार हलका करू शकतील.
४. ज्या पैशात २००९मध्ये २ बेडरूमचे घर घेतले, ते पैसे आता १ बेडरूमलाही पुरत नाहीयेत - म्हणजे ॲप्रिसिएशन चांगले आहे.
५. काही वर्षे भाड्याने फ्लॅट देऊन कर्जाचा हप्ता जुळवता येईल.
६. गृहकर्ज हे स्वस्तात मिळणारे आहे (७.५ ते ८%), तर मार्केट रिटर्न्स १०-१२% किंवा जास्त. तेव्हा कर्ज घ्यावे आणि वरचा ४-५% डिफरन्स गृहकर्ज मुदतपूर्व बंद करायला वापरता येईल.
तर जुलैच्या सुरुवातीला कामानिमित्त फिरतीवर असताना ओळखीच्या एका मॅडमचा संदेश वाचला की त्यांचा फ्लॅट विकायचा आहे. फ्लॅट घराजवळच होता. किंमत ३३ लाख. एरिया ३०० चौ.फू. आणि फारसे कर्ज न काढता घेता येण्यासारखा होता. अर्थात कागदपत्रे बॅंक तपासून घेते, त्यामुळे खबरदारी म्हणून कर्ज घेणार होतोच. तर परतल्यावर एका सकाळी फ्लॅट बघायला गेलो. पण सांगितलेला एरिया बिल्ट अप होता. कार्पेट फार तर २२०-२३० - म्हणजे वामनाची दोन पावले टाकताच हॉल संपला आणि किचन तर फारच दाटीवाटीचे. मालक स्वत: विकणार असल्याने कागदपत्रे क्लिअर होती. पण फारच छोटा वाटल्याने प्रकरण तिथेच थांबले.
या अनुभवावरून निदान १ बेडरूमचा तरी फ्लॅट बघायचा, हे ठरले. बजेट थोडे ताणावे लागेल हे मागोमाग आलेच. मग टेस्टेड आणि प्रूव्हन मेथड म्हणून वीकांताला सकाळ पेपर घ्यायला सुरुवात केली. सकाळमध्ये जाहिराती वाचून एजंट लोकांना फोन करायचे, मग त्यांच्या आणि आपल्या वेळेनुसार फ्लॅट बघायला जायचे असे दर वीकांताला सुरू झाले. एरिया बराच मोठा असल्याने, म्हणजे कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन, खूप चॉइस मिळेल असे सुरुवातीला वाटत होते. पण काही अटी म्हणजे पहिला किंवा दुसरा मजला, नाहीतर लिफ्ट हवी.. पार्किंग असले-नसले तरी चालेल.. जुना, नवा कसाही चालेल.. पण रात्री-बेरात्री रिक्षा मिळायला हवी, अशा आखूडशिंगी बहुदुधी अपेक्षा होत्या. सगळे एजंट मात्र एकच टेप वाजवायचे - "सर, एक फ्लॅट आहे. पण बजेट थोडे वाढवा." अरे, थोडे थोडे म्हणजे काय? पैसे काय झाडाला लागतात काय? रोजचे खर्च आहेत. मुलांची शिक्षणे, आजारपणे आहेत. स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर, अमेझॉन क्रेडिट कार्ड.. खर्च काय कमी आहेत? तरी फुगणाऱ्या बेडकाप्रमाणे बजेट वाढत होते. आता आमची मनाची तयारी ६५-७० लाखापर्यंत पोहोचली होती.
इतके झाल्यावर आमच्या डोक्यात आले की पूर्वी ज्यांच्याबरोबर फ्लॅट बघितले आहेत, असे काही ओळखीचे एजंट आहेत की! मग त्यांना फोन केले. पुन्हा तेच - "सर, एक मस्त फ्लॅट आहे. बजेट थोडे वाढवा." फ्लॅट कर्वेनगरमध्ये चांगल्या ठिकाणी होता. मालकाने घेतला, पण १-२ वर्षे राहायलाच आला नाही आणि आता विकतोय म्हणे. आता आम्हीसुद्धा शहाणे झाल्याने फक्त "कार्पेट किती?" एवढेच विचारू लागलो होतो. कार्पेट ६५० चौ.फू. ८१ लाख. फ्लॅट आवडला. बजेटही ताणले. कागदपत्रे दाखवा म्हटले, तर आता एजंट गावाला गेला. "आल्यावर मालकाशी बोलून सांगतो, काळजी करू नका तुम्ही." बरे बुवा. दहा दिवसांनी फोन आला. "मालक म्हणतो, त्याची परदेशातील बहीण ८२ की ८३ला घ्यायला तयार आहे." म्हटले, "अरे बाबा, २ लाखांनी काय फरक पडत नाही, पण कागदपत्रे तर दाखव न?" तर आणखी ८-१० दिवस गेले. तोवर बायकोने बिल्डिंगवर दिसलेला रेरा नंबर पाहून रेरा साइटवरून बरीच माहिती काढली होती. कागदपत्रे क्लिअर नव्हती. बिल्डिंग ६-७ वर्षे जुनी होती. काहीतरी घोळ होता. हे सगळे एजंटला सांगितले. त्यावर त्याने हो हो केले - म्हणजे तो फसवत नव्हता, पण एकूण "जे आहे ते आहे. घ्यायचे तर घ्या" असा आविर्भाव होता. त्यामुळे हे प्रकरण पुढे न्यायचे नाही असे ठरवले.
पेपरात वाचून गावातील पेठांतील २-३ फ्लॅट पाहिले. पण अर्थातच ते केवळ प्राइम भागात होते. बाकी सुविधा काही नाही. आजूबाजूला दाट वस्ती. लिफ्ट जेमतेम. खाली उतरले की लगेच वाहता रस्ता. पाय मोकळे करायला जागाच नाही. पार्किंग तर दूरच. त्यामुळे गावातले फ्लॅट बघणे बंद केले.
अवांतर - वाचकांच्या माहितीसाठी सांगतो- साधारण ३ प्रकारचे फ्लॅट मला आढळले.
१. मालकाला काही कारणाने फ्लॅट विकायचा आहे. स्वतः किंवा एजंटकडून.
२. बिल्डरने काही फ्लॅट एजंटकडे दिले आहेत. त्याला ते 'पॅकेज' म्हणतात. म्हणजे आपल्याला फक्त पूर्ण किंमत सांगतात, त्यातील एजंटला आणि बिल्डरला किती वगैरे नाही.
३. बिल्डिंग रीडेव्हलपमेंटला जाणारे फ्लॅट. मालकाला काही कारणाने विकायचे असतात. पण आज ५०० चौ.फुटांचा फ्लॅट असताना उद्या तुम्हाला ११०० चौ.फूट मिळणार, म्हणून त्याला आजच ती वाढीव किंमत हवी असते. (आणि लोक घेतातही). हा प्रकार काही मला पटला नाही. पण जे आहे ते आहे.
४. याउप्पर सरळ बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी जाऊन बिल्डरांशी बोलणी करणे हाही एक मार्ग आहेच.
तर आता दुसऱ्या एका जुन्या एजंटशी संपर्क साधला. त्याने सुरुवातीलाच २ चांगले फ्लॅट दाखवले. अंदाजे ५५० आणि ५९० कार्पेट. ते पॅकेजमध्ये होते. मात्र किंमत आता ९० लाखाला टेकू लागली होती. फ्लॅट कोथरूडमध्ये प्राइम ठिकाणी होता. ताबा ६ महिन्यांत मिळणार होता. पण रेडी रेकनरशी तुलना करता बिल्डर जवळपास दुप्पट किंमत मागत होता. ते काही मला पटेना. मात्र एजंट लोक बरेच हुशार असतात. तवा तापला आहे हे ओळखल्याने तो आणखी पर्याय दाखवू लागला. आता तिथूनच पुढे शिवतीर्थ नगरमध्ये एका निर्माणाधीन बिल्डिंगमध्ये तो आम्हाला घेऊन गेला. पुन्हा पॅकेजचे फ्लॅट, बजेट जरा वाढवा, ताबा ६ महिन्यात मिळेल वगैरे टेप झालीच. पण आता आमची नजर जरा तयार झाली होती. पहिले नकाशावर बघून, मग वास्तूनुसार पूर्व-पश्चिम असलेला, मध्यभागी (ब्रह्मस्थानी) पाणी नसलेला, शक्यतो दक्षिण-पश्चिमेला बेडरूम असलेला, हवा-उजेड असलेला अशा नियमात बसणारे फ्लॅट फक्त ३ आणि ५ नंबरचे होते. पण हाय रे दैवा! ५ नंबरच्या फ्लॅटला मागे सगळी मोठी झोपडपट्टी दिसत होती, म्हणून तो पर्याय वगळला गेला. ३ नंबरचे फ्लॅट फारच थोडे शिल्लक होते. त्यावर चर्चा सुरू झाली. पण पुन्हा किमतीच्या हिशोबाने ६८५ ते ६९० चौ.फू.ला १.१० ते १.३० कोटी देणे मला फारच महाग वाटत होते. म्हणून नंतर बघू असे सांगून विषय जरा पुढे ढकलला.
आता पेपरमध्ये बघून आणखी एका एजंटला कॉल केला. त्याच्याकडे एक फ्लॅट होता. तो बघितला. फ्लॅट सुंदर होता. आवडला. ७२० चौ.फू., किंमत १.१० ते १.२० कोटी. ह्या सगळ्या किमती फक्त जागेच्या - म्हणजे त्यावर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, लीगल चार्जेस, एजंट कमिशन वेगळे (१० ते १२ टक्के). बिल्डिंगची रीडेव्हलपमेंट झाली होती आणि फ्लॅट मूळ मालकाचा होता. तो बिल्डरांपेक्षा १०-१५ लाख कमी किमतीत विकत होता. कारण मालक पुण्याबाहेर राहत होता. मी एजंटला १.०५ची ऑफर दिली. फोन मीटिंग ठरली. मात्र मीटिंगमध्ये मालक म्हणू लागला की मला १.०८ची ऑफर आहे आणि उद्या मी डील करायला पुण्यात येत आहे. आमच्यावर बॉम्बच पडेला. मी त्यांना म्हटलेसुद्धा की "ठीक आहे. मी ती ऑफर मॅच करतो. आणि टोकनही ऑनलाईन देतो. मग माझ्याशी डील कराल का?" त्यावर मालक अडून बसले की मी त्यांना शब्द दिला आहे. मग पुढे बोलण्यातच अर्थ नव्हता. तेव्हा प्रकरण फिसकटले.
आता मात्र एजंटच्या मनाला लागले होते. पार्टी सिरीयस आहे, पण मालकाने टांग दिल्याने त्याचेही कमिशन गेले होते. तो म्हणाला, "काळजी करू नका. याच बजेटमध्ये तुम्हाला फ्लॅट मिळवून देतो." दुसऱ्याच दिवशी आमच्या घराजवळच चालू असलेल्या स्कीममध्ये पुन्हा पॅकेजमध्ये फ्लॅट बघायला गेलो. फ्लॅट कसला, खोकाच होता. लाद्या, टाइल्स काहीच बसले नव्हते. पण फ्लॅट प्रशस्त वाटत होता. ताबा मिळायला वर्षभर लागणार होते. पण ७८५ चौ.फू.साठी किंमत १.१ ते १.२ कोटी. शिवाय थोडी इथे-तिथे एक्स्ट्रा जागा होती. मात्र पाठीमागे एक नाला होता. अर्थात हायर फ्लोअर असल्याने बिघडत नव्हते. वास्तूमध्ये बसत होता. एकुणात गणित जमत होते. त्याला विचार करतो म्हणून सांगितले आणि ऑफिसला निघालो. परत गम्मत बघा. तासाभरात ऑफिसात पोहोचेपर्यंत एजंटचा फोन आला की त्या फ्लॅटचे टोकन आले आहे. पण त्याच्या वरचा सेम तसाच फ्लॅट शिल्लक आहे. पुन्हा निराशा.
आता मात्र आम्ही एजंटचा नाद सोडायचा ठरवले आणि काही ओळखी वापरून जिथे त्या मालकाचा फ्लॅट आम्ही थोडक्यात गमावला होता, त्याच बिल्डरला गाठले. आमच्या सुदैवाने त्याच फ्लॅटच्या वरचा सेम तसाच एक फ्लॅट उपलब्ध होता. आता मात्र आम्ही बरेच सरावलो होतो त्यामुळे चक्रे भराभर फिरली आणि प्रथम फोनवर बोलणी करून दुसऱ्याच दिवशी सकाळी बिल्डरच्या ऑफिसात समोरासमोर मीटिंग ठरली. मीटिंगमध्ये फ्लॅटच्या किमतीविषयी फायनल बोलणे झाले आणि अखेर आम्ही टोकन देऊनच बाहेर पडलो.
मिसळपाव
प्रतिक्रिया