Skip to main content

शब्द झाले मोती

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द झाले मोती : सोनेरी फुलं
-------------------------------------
 
तसा तर हा काळ २००६-०८चा...
 
पुन्हा कोणाच्या प्रेमात पडायचं नाही, असं माझ्या मनाशी मी घट्ट ठरवलं होतं.
 
त्या काळात ऑर्कुट ही एकमेव सोशल साइट अस्तित्वात होती. ऑर्कुटवरून आपण कोणाशीच मैत्री किंवा प्रेम करायचं नाही, असंच मी मनाशी पक्कं ठरवलं होतं.
 
लिखाणामुळे मी ऑर्कुटवर आलो होतो खरं; पण नंतर स्टेज प्रोग्रॅम आणि कविता यामुळे तिथे मला असंख्य मित्र-मैत्रिणी मिळाले. मग वाटलं फक्त मैत्री करणं ठीक आहे, पण प्रेम नकोच!
 
आयुष्यात अनेक खरे मित्र असलेला मी, ऑर्कुटसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही खरे मित्र जोडण्यात यशस्वी झालो. पण कॉलेजच्या माझ्या पहिल्या प्रेमानंतर आपण पुन्हा अशा प्रेमाच्या आणि कोणत्याही मुलीच्या भावनिक फंदात पडायचं नाही, 'ये आपुनके बस की बात नही!' असं ठरवूनच माझा ऑनलाइन वावर सुरू झाला होता.
 
त्यामुळेच कदाचित त्या वेळेस असंख्य मुलींना मी हजरजबाबी, काहीही वाट्टेल ते बोलणारा आणि थोडासा खडूस असाच वाटत होतो. मात्र कदाचित याच स्वभावामुळे मला अनेक चांगल्या मैत्रिणीही मिळाल्या.
 
आणि अशातच...
 
तू माझी मैत्रीण झालीस, सुवर्णा.
 
तू आणि मी खूप वेळ बोलायचो. इतका की बस!
 
सुवर्णा, तू खूप गोड, सालस आणि सुंदर मुलगी आहेस. त्याबरोबरच तुझ्यातला मूळचा कोकणी बाणाही तितकाच ठसठशीत आहे. कवितेतून आणि लिखाणातून आपली मैत्री आणखीनच घट्ट होत गेली.
 
तू खूप गोड आणि तितकीच जास्त बोलणारी मुलगी. तू फॅशन क्षेत्रात होतीस. मी उरुळी कांचन या गावातून नुकताच पुण्यात आलो होतो. २००६मध्ये एम.सी.ए. पूर्ण करतानाच मॉड्युलर कंपनीत काम करत होतो आणि नंतर इंदिरा कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणूनही जात होतो.
 
हळूहळू माझी आणि तुझी घट्ट मैत्री झाली.
 
सुवर्णा, तू माझी पहिली ऑर्कुट फ्रेंड होतीस.
 
आपण Gmailवर असंख्य तास बोलायचो. नंतर फोनवर बोलायला लागलो.
 
माझा त्या वेळचा फोन नंबरही छान होता. तुझा आवडता नंबर चार आणि माझ्या फोन नंबरमध्ये सलग चार वेळा चार!
हाय! आता तीन सलग तीन वेळा आहेत; पण तो कोणाच्याच आवडीचा नाही. 
 
नंतर मी आणि तू भेटायचं ठरवलं.
 
मी पुण्याहून रेल्वेने कल्याणला आलो. तू तिथे आलेली होतीस. माझ्या जन्मात पहिल्यांदाच मी कल्याण-मुंबईला आलो होतो.
 
तुझ्यासाठी मी एक पुस्तक गिफ्ट घेऊन आलो होतो. ते पुस्तक तुला अजूनही आनंदाने आठवतं.
 
तू अशीच होतीस, खूप मॉडर्न, तरीही तितकीच साधी आणि मनाने खरी.
 
तिथून बोलता बोलता आपण तुझ्या डोंबिवलीच्या घरी गेलो. आणि खरं सांगायचं तर, त्या दिवशी मला तुझ्याबद्दल जरा जास्तच आपुलकी वाटली.
 
तुझ्या घरी गेल्यावर मी तुझ्यापेक्षा तुझ्या आईशीच जास्त बोललो असावं!
 
त्यानंतरही आईंशी माझं आणि माझ्याशी त्यांच अनेकदा बोलणं झालं. तुझ्या आईलाही मी खूप आवडायचो.
 
सुवर्णा, तू दिसायला तर इतकी गोड होतीस, की तू ठरवलं असतंस तर सहज मॉडेलिंगही करू शकली असतीस, असं मला तेव्हा वाटायचं.
 
तुझ्या घरी गेलो होतो, तेव्हा तुझे असंख्य फोटो तू मला दाखवले होतेस. Emailवर तू पाठवलेले त्या वेळचे फोटोही खूप सुंदर होते.
 
त्यानंतर दिवस सरत गेले... आणि हळूहळू आपली मैत्रीही बहरत गेली.
 
“मी एक छान विचारांचा मुलगा आहे” असं तुझं तेव्हाही मत होतं आणि आजही आहे.
 
नंतर मला मुंबईतील नोकरीची ऑफर आली.
 
आणि गंमत म्हणजे मला मुंबईत जॉब मिळतोय यापेक्षा, तू मुंबईत आहेस याचा मला जास्त आनंद झाला होता.
 
तू माझी खूप क्लोज फ्रेंड झाली होतीस.
 
पण मैत्री आणि प्रेमाच्या मधील त्या धूसर रेषेच्या पलीकडे मी कधीच नकळत गेलो होतो. फक्त ते स्पष्टपणे तुला सांगितलं नाही का मी कधी? मी तुझ्यावर प्रेम करत होतो सुवर्णा, खुप निस्सीम.
 
तरी एक प्रसंग अजूनही आठवतो...
 
एकदा सहजच मी तुला विचारलं होतं,
 
“माझ्याशी लग्न करशील का गं, सुवर्णा?”
 
आणि तू शांतपणे म्हणाली होतीस...
 
“बघू...”
 
काही उत्तरं होकाराची नसतात, नकाराचीही नसतात.
 
ती फक्त एखादी आठवण बनून मनात कायमची राहतात.
 
तुझ्यासाठी मी तेव्हा अशीच 'तू डोंबिवली फास्ट' ही साधी कविता लिहिली होती.
 
तू होतीसच फास्ट!
 
एकदा बोलायला लागलीस की थांबायचीच नाही. खूप सलग, गोड आणि मनापासून बोलत राहायचीस. 'ऐक ना' हा शब्द आला की समजायंच - आपण फक्त ऐकत रहायचं आहे.
 
तुझे डोळे मात्र... खूप छान होते.
 
इतके की त्या तपकिरी, गहिऱ्या डोळ्यांत असंख्य वेळा पाहतच राहावं असं वाटायचं.
 
तुझं खरं नाव ‘सुनयना’ असण्याचा अर्थही त्या सुंदर डोळ्यांनी अगदी सार्थ ठरवला होता.
 
कित्येकदा तुझ्याशी बोलल्यानंतर मला कितीतरी लिहावंसं वाटायचं. आताही तेच झालं आहे.
 
तुला बऱ्याचदा वाटायचं, मी तुझ्यावर लिहावं. निदान दोन ओळी तरी...
 
पण मी शक्यतो तुझ्यावर जास्त लिहू शकलो नाही. किंवा लिहिलं तरी ते तुला मी दिलं नाही.
 
आज देतो आहे.
 
त्या जुन्या आठवणींच्या चांदण्यात पुन्हा एकदा ती कविता सापडली आहे.
 
तुझ्यासाठी  लिहिलेली...
 
आज चंद्र, माझ्या अंगणी येऊन शहारला
रागावलेल्या त्या मिट्ट शब्दांना
चंदेरी कुशीत घे म्हणाला...
 
मनी दाटली मग नाजूक सरसर,
जरी दुराव्याचे बंध खडतर;
सरता म्हटलं तरी सरेना,
क्षणांचे हे मोहक अंतर...
 
बोललो मग चंद्रास हळुवार,
“मिठीत माझ्या स्वप्न अलवार,
नकोच काही करूस चिंता,
विणतो आहे प्रेमाचे तोरण...”
 
स्मित करून मग चंद्र बोलतो,
“तुझ्याचसाठी आलो इथवर,
अन वाटेवरती स्वप्नतारकांचे
लावले बघ कोवळे झुंबर...”
 
प्रिय सुवी,
 
तू मला तेव्हा जितकी आवडत होतीस, तितकीच आजही आवडतेस… आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तितकीच आवडत राहशील.
 
माझ्या मनात तुझ्याबद्दलचा नितांत आदर, नितळ प्रेमभावना आणि मैत्रीची निखळ साथ कायम तशीच राहील.
 
हां, तर पुढे लिहितो…
 
त्यानंतर आपण असंख्य वेळा बोलत राहिलो. माझेही अनेक मित्र-मैत्रिणी झाले होते. पण सुवी, तुझ्यासारखी माझ्यावर इतका विश्वास ठेवणारी दुसरी कुणीच नव्हती.
 
आपलं नातं अगदी कोमल गुलाबाच्या पाकळीसारखं होतं… जपावं असं, अलगद हातात धरावं असं.
 
--
 
दिवस सरत गेले… आणि एक दिवस तुझं लग्न ठरलं.
 
साखरपुड्यानंतर तू मला फोन केलेला आठवतो का गं तुला?
 
--
त्याआधी आपण निर्मल लाइफस्टाइल मॉलमध्ये भेटलो होतो, सुवर्णा.
 
त्या दिवशी तू निळ्या ड्रेसमध्ये किती मनमोहक दिसत होतीस! अगदी आजही आपण त्याबद्दल बोललो आणि तो दिवस दोघांनाही तितक्याच स्पष्टपणे आठवतोय.
 
मी तुला तेव्हा कितीतरी वेळा म्हणत होतो-
 
“सुवी, तू किती सुंदर दिसते आहेस!”
 
आज तू मला सांगितलंस, की तुला अजूनही अगदी स्पष्ट आठवतं… माझ्यासोबत माझी एक मैत्रीण होती आणि तरीही मी तिच्यासमोर, तळहात गालावर ठेवून, तुला कितीतरी वेळा “तू किती सुंदर दिसते आहेस” असं म्हणत होतो.
 
आणि माझी मैत्रीणही गालातल्या गालात हसत होती…
 
त्या क्षणी कदाचित मला जाणवतही नव्हतं, की हा क्षण पुढे इतक्या वर्षांनी पुन्हा आपल्या आठवणींच्या वहीत उघडला जाईल.
 
त्या दिवसानंतर मी लिहिलं होतं -
 
आतुर नजरेचा... कटाक्ष हलकासा...
हळुवार शिडकावा... अबोल शब्दांचा...
तरल स्वप्नांचा... उंच किनारा...
अंगावर शहारा... थरथरत्या भावनांचा...
 
मन हे बेधुंद झाले,
बावरले… हरवले…
तुझ्या नकळत,
तुझ्यातच सामावले…
 
क्षण हे गोंधळलेले,
थोडेसे बावरलेले,
हृदयाच्या अंगणात,
नभ जणू उतरलेले…
 
शब्द अडखळलेले,
ओठांवर थांबलेले,
श्वासांच्या त्या ठेक्यावर,
हृदयगीत उमटलेले…
 
काही क्षणच ते,
पण मनात खोलवर उतरले…
तू निघून गेलीस दूर,
पण ते क्षण तसेच राहिले.. फुललेले..
 
 
तू निघून गेलीस…
 
मागे राहिल्या फक्त काही हळव्या आठवणी,
काही न बोललेले शब्द
आणि मनाच्या अंगणात अलगद उमललेली
काही सोनेरी फुले…
 
त्यांच्यासोबत मी पुन्हा एकटाच राहिलो.
 
खरं तर ती आपली शेवटची भेट ठरेल, असंच मला तेव्हा वाटलं होतं.
 
त्यानंतर मी स्वतःशीच ठरवलं - आता पुन्हा कोणाच्या प्रेमात पडायचं नाही.
 
आयुष्यात त्यानंतरही अनेक मुली भेटल्या… अनेक माणसं आयुष्यात आली. पण मनापासून इतकं प्रेम मात्र पुन्हा कुणावर केलं नाही.
 
असं म्हणतात ना, प्रेम एकदाच होतं… आणि तेच खरं असतं.
 
पण सुवर्णा, तू त्या वाक्यालाच खोटं ठरवलंस. मी दुसऱ्यांदाही मनापासून खरं प्रेम केलं. 
कारण तुझ्यावर माझं खरं प्रेम होतं.
निखळ… नितळ… कोणत्याही अपेक्षेशिवाय.
 
कदाचित म्हणूनच ते आजही इतकं स्वच्छ आहे.
 
मला वाटलं होतं, ही आपली शेवटची भेट.
 
पण नियतीला कदाचित आणखी एक आठवण आपल्या वाट्याला द्यायची होती.
 
मी तुझ्या लग्नाला आलो, सुवर्णा. तुझ्या घरी राहिलोसुद्धा. 
माझ्या पहिल्या प्रेमावेळी मला हे साधता आलं नव्हतं, नव्हे, हळवा असल्याने मला बोलवलं नव्हतं.
या वेळेस मात्र आलो मी..
 
तू आजही मला तो प्रसंग आठवून सांगितलास…
 
तू बेडरूममध्ये मेकअप करत होतीस. तुझ्यासोबत ब्युटीशियन होती.
तरीही मी बेडरूम मध्ये दार उघडून आलो, 
मी तुला खुणावून सांगितलं
 
“तू छान दिसतेस, सुवर्णा…”
 
आणि तू फक्त गोड हसलीस.
 
असं हसू, जे ओठांवर दिसत होतं… पण पोहोचत होतं थेट माझ्या हृदयापर्यंत.
 
तोच माझ्या प्रेमाचा शेवटचा निःशब्द संवाद होता.
 
त्यानंतर माझ्या डोळ्यांपुढे हलकेच पाणी आलं होतं.
 
तुला कायमचं सोडावं लागणार होतं, याचं मनापासून वाईट वाटत होतं. तरीही मी फार ढासळलो नव्हतो.
 
कारण आयुष्याने याआधीही पहिल्या प्रेमावेळी, असं काहीतरी दाखवलं होतं… 
 
म्हणून स्वतःला सावरत हळूच घरी परतलो.
 
काही वर्षांनी माझी पुण्याला बदली झाली.
 
त्यानंतर मी ठरवलं होतं, सुवर्णा, की तुला मी कधी भेटणार नाही. पण तुझ्या आईंना मात्र भेटत राहीन… त्यांच्याशी बोलत राहीन.
 
आणि नंतर तू मला सांगितलंस - आई गेल्या.
 
ते ऐकून मला खूप दुःख झालं.
 
आणि आजही मनात एक अपराधीपणाची भावना आहे…
मी त्यांना पुन्हा कधीच भेटलो नाही.
कदाचित मला त्यांना भेटायला हवं होतं. तू त्यांची एकटीच मुलगी होतीस, त्यामुळे एका मुलासारखे त्यांना भेटत राहायचं, असं मला तेव्हा वाटत असे.
 
या गोष्टीसाठी मला मनापासून माफ कर.
 
त्यानंतर आपण थोडंफार वरवरचं बोललोही असू… पण त्याला खरं तर बोलणं म्हणता येणार नाही.
 
आणि आता या गोष्टीला तब्बल १८ वर्षं झाली आहेत.
 
दिवस किती जलदपणे सरत जातात ना?
तुझ्या नावाप्रमाणेच, या सरलेल्या दिवसांची असंख्य सोनेरी फुलं माझ्या हृदयात रोज साठत गेली.
 
काही आठवणी जुन्या होत नाहीत… त्या फक्त अधिक सुंदर होत जातात.
 
-
 
आणि मग…
 
१८ वर्षांनंतर मागच्या महिन्यात आपण पहिल्यांदाच इतकं भांडलो.
कारण काय तर - विषय - राजकारण ! 😊
इतकं भांडलो की तू म्हणालीस
"मी तुला गमावलं…”
आणि मी तुला म्हणालो
“मला ब्लॉक कर.”
 
हे म्हणतानाही माझ्या डोळ्यांत पाणी होतं.
 
पण खरं सांगू सुवर्णा?
 
मनाच्या एका कोपऱ्यात मला माहीत होतं…
 
तू दोन दिवसांत पुन्हा माझ्याशी बोलशील.
कारण आपल्या मैत्रीत… माझ्या प्रेमात… इतकी ताकद आहे, की आपण कितीही भांडलो, कितीही लांब गेलो, तरी शेवटी पुन्हा एकमेकांशी बोलणारच.
 
आणि खरंच…
 
दोन दिवसांत तुझा मेसेज पुन्हा आला.
 
त्या दोन दिवसांत मी तुझे डान्सचे असंख्य व्हिडिओ पाहिले, सुवर्णा.
 
त्यातला निळ्या ड्रेसमधला ‘चुत्तमल्ले’ गाण्यावरचा तुझा डान्स मला खूप आवडला.
 
तू अजूनही विशीतल्या एखाद्या नवयुवतीसारखी वाटतेस.
 
त्या गाण्यात तू ज्या सहजतेने हसतेस ना…
 
ते हसू पाहिलं की पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटावं, असंच काहीसं होतं.
 
तुझी साधेपणातली सुंदरता त्या व्हिडिओमध्ये अगदी हुबेहूब दिसते.
 
तुझ्या चेहऱ्यावरचा तो निरागसपणा, तुझं ते मनापासून हसणं…
 
आणि आज पुन्हा आपण बोलत असताना तू मला म्हणालीस -
 
“माझ्याबद्दल दोन ओळी लिहिशील का?”
 
दोन ओळी?
 
सुवर्णा, तुझ्याबद्दल दोन ओळी लिहिणं माझ्यासाठी कधीच शक्य नव्हतं.
 
कारण काही माणसं दोन ओळींत सामावत नाहीत…
 
ती एखाद्या संपूर्ण आठवणीसारखी असतात.
 
म्हणून या दोन ओळी इथेच पूर्ण करतो… 😊
 
मी मुंबईला येतो आहे, सुवर्णा.
 
तू मला भेटायला येताना प्लीज निळाच ड्रेस घालशील का?
 
त्या मॉलमधल्या दिवसाची एक छोटीशी आठवण पुन्हा जगायची आहे.
 
तुझ्याबरोबर एकदा डान्स करावासा वाटतोय…
 
तुझ्याबरोबर एक फोटो काढावासा वाटतोय…
 
आणि कदाचित काहीच बोलायचं नाही.
 
फक्त त्या १८ वर्षांच्या अंतराकडे एकदा पाहायचं आहे…
 
आणि मनाशीच म्हणायचं आहे-
 
“बघ सुवी…
 
१८ वर्षं सरली,
 
पण काही नाती अजूनही तिथेच आहेत…
 
जिथे आपण त्यांना शेवटचं सोडलं होतं.”
 
अगदी तुझ्या नावासारखी…
 
सोनेरी. ❤️
 
- गणेशा..
दिवाळी अंक वर्ष

वाचने 41
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया