Skip to main content

पुन्हा भेटू या.. नको रे बाबा...

लेखक अनामिक बोरकर यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

'ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग..'

झोपेतून जागृतावस्थेत यायला मला जरा वेळच लागला. आधीच दुपारची झोप मला प्रिय, त्यात ह्यांच्या अमेरिकावारीच्या तयारीची गेल्या आठवडाभर झालेली धावपळ, मुलांच्या गॅदरिंगच्या निमित्ताने झालेली जागरणे, सिंगापूर पाहून कालच भारतात परतलेल्या पाहुण्यांची उस्तवार या सर्वांचा आलेला प्रचंड शीण.. सगळ्यानंतर मिळालेला आजचा आराम माझ्या हक्काचा होता. त्यावर या फोनने केलेले आक्रमण मला अजिबात पसंत नव्हते. फोन कट करून, उशी कानावर घट्ट दाबून मी कूस बदलली व परत माझ्या सुखासीन निद्रासनाकडे वळणार, तोच 'ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग..' परत फोनने आपले अस्तित्व दाखवले. आता इलाजच नव्हता.

अर्धवट झोपेतून उठावे लागल्याने वैतागतच मी धसकन फोन उचलला व शक्य तितक्या रूक्ष स्वरात विचारले, "हॅलो, कोण बोलतंय?”

“तुम्ही बोरकर.. बोरकर.. बोरकर मावशी बोलताय का?”

प्रश्नापाठोपाठ पलीकडून एक जोराचा हुंदका, मुसमुसणे व अस्पष्ट रडणे यायला लागताच माझ्या डोळ्यावरची झोप खाडकन उडाली.

“हो. आपण कोण?”

“मी सोनाली. तुमच्या मैत्रिणीची.. रजनीची मुलगी मी."

“रजनी? कोण रजनी?"

“माझी आई. दोन वर्षांपूर्वी मुस्ताफात नव्हती का भेटली?”

मला इथे काल-परवाचे आठवत नाही धड, तर हे दोन वर्षांपूर्वीचे, तेही मुस्ताफासारख्या सामानाच्या प्रचंड समुद्रात? संपूर्ण ‘मुस्ताफा’ डोळ्यापुढे झर्कन सरकला, पण रजनी कोण हे काही केल्या आठवत नव्हते. त्यात पलीकडचे फोनवरचे मुसमुसणे मला निवांतपणा मिळू देईना. शेवटी मी गप्पांच्या ओघातून काही संदर्भ लागतोय का, ते बघायचे ठरवले.

”रजनी? माफ करा, रजनी? बरं, ते जाऊ दे. आपलं काम?”

“मावशी, मी किनई.. (छोटा, मध्यम व नंतर मोठ्ठा हुंदका) मला किनई.. (आणखी मोठ्ठा हुंदका)..” नंतर फक्त रडणेच रडणे. मी सटपटलेच.

“हे बघ सो...”

“सोनाली” तिकडून रडक्या आवाजात उत्तर आले.

“तर सोनाली, तुझं रडणं थांबवून मला काय ते नीट सांगशील का?”

थोडा वेळ पलीकडे झालेली शांतता लक्षात येऊन मी खूपच अस्वस्थ झाले. “अग सोनाली, काय झालं? तू आत्ता कुठे आहेस?”

“मावशी, मी ना...मी चांगी विमानतळावर पोलिसांच्या ताब्यात आहे.”

पोलीस! पोलीस म्हटल्यावर मीच काय, माझ्या हातातला फोन, तो ठेवलेले टेबल, पायाखालची जमीनही थरथरली.

“अग पोलीस? ते कशासाठी? तू काय केलंस बाई?” मला ड्र्गच्या तस्करीप्रकरणातले वाचलेले सगळे किस्से आठवायला लागले व मला या प्रकरणात विनाकारण अडकवणाऱ्या न आठवलेल्या रजनीचा राग यायला लागला.

“मावशी, मी खरंच काहीसुद्धा केलेलं नाही हो! तुमची शप्पथ! पण किनई, मी... माझा पासपोर्टच सापडत नाहीये मला.”

“अग, जरा घरात शोध. असेल इथे तिथे. तुम्ही मुली म्हणजे..” माझा लेक्चर देण्याचा मूड ओळखून घाईघाईने सोनाली म्हणाली “काकू, मी पिंट्याला घेऊन मुंबईहून आलेय व अमेरिकेला प्रथमच चाललेय माझ्या नवऱ्याकडे. इथे मी फक्त ३ तास थांबणार होते."

“हा पिंट्या कोण?” ती काही सांगणार, तोच पिंट्याने जोरात रडून आपले अस्तित्व दाखवले व मला आपोआप कळले की सोनालीबरोबर ३-४ महिन्यांचे एक बाळही आहे.

“अग बाई, हो का! मग पर्समध्ये बघ. असेल तिथेच खालीवर गेलेला. सावकाश खाली बसून शोध. सापडेल. गोंधळलीस का तू? होतं असं कधीकधी. शांतपणे शोध, विचार कोणालातरी आणि जा पुढच्या गेटकडे.” (आता माझा स्वर थोडाफार निश्चिंत झाला.)

"मावशी, पण पासपोर्ट्शिवाय?”

“खरंच की. पण पोलीस कसे आले? त्यांना कुणी बोलावलं?”

“मावशी, तुम्ही प्लीज इकडे विमानतळावर या ना..”

मला खरेच तिची दया आली. माझा नवरा सिंगापूरमध्ये नव्हता. कोणाला फोन करावा तेच कळेना. बरे, पोलिसांशी गाठ म्हटल्यावर सहजासहजी कोणी मदतीला तयारही होणार नाही, हे इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे मला कळले होते. प्रकरण अंगाबाहेर टाकावे तर सोनालीचा रडका व घायकुतीला आलेला आवाज स्वस्थ बसू देईना. शेवटी प्रत्यक्ष जाऊनच तिला भेटावे, असे ठरवून माझा पासपोर्ट, कार्ड, पैसे घेऊन निघाले.

न बघितलेल्या सोनालीच्या विचारात मी विमानतळावर पोहोचले. तिच्या नावाची पाटी ज्या त्या लेकुरवाळ्या बाईला दाखवत मी बावळटासारखी बराच वेळ फिरत होते. पायाचे तुकडे पडायची वेळ आली, तेव्हा लक्षात आले की ती पोलिसांच्या ताब्यात आहे म्हणजे तळमजल्यावर असणार. मी लिफ्टमधून बाहेर पडताच “मावशी.. मावशी.. शुक शुक.., मी इथे आहे, ही बघ.. इकडे!” असा आवाज आला व त्या दिशेला माझे पाय आपोआपच वळले. समोरच एक मुलगी तान्हुल्याला पोटाशी धरून घामाने निथळत उभी होती. कपडे अस्ताव्यस्त, केस विस्कटलेले, डोळे रडून रडून लालबुंद, नाकाचा शेंडा पुसून पुसून सुजल्यासारखा अशी जेमेतेम ५ फूट उंचीची सोनाली पाहताच रजनीवरचा राग विसरून मी पटकन पुढे झाले, तर ती जवळजवळ माझ्या मिठीतच कोसळली. कसेबसे तिला सावरून मी उभे केले व पाठीवरती थोपटत शांत केले. अजूनही तिचे हुंदके चालूच होते, म्हणून मी तिच्यासमोर उभ्या असणाऱ्या दोन पोलिसांकडे विचारणा केली. "काय झालंय? य़ा मुलीने काय केलंय? तुम्ही तिला का पुढच्या फ्लाइटला जाऊ देत नाही?”

“अहो बाई, या बाईंकडे त्यांचा पासपोर्टच नाहीये. बिना पासपोर्ट्चे आम्ही यांना पुढच्या विमानात कसे जाऊ देऊ शकू?”

आता थक्क होण्याची माझी पाळी होती. पासपोर्ट जवळ नसताना ही मुलगी इथपर्यंत आलीच कशी? तिला भारतातून कसे काय सोडले? म्हणजे ती मोठ्या तस्करी टोळीची मेंबर असेल का? की आणखी कुठल्या दहशतवादी संघटनेची? आता मलाही घाम फुटला. कुठून या प्रकरणात सापडले असे होऊन गेले. पण आता पळणे कठीण होते. मी परत सोनालीकडॆ मोर्चा वळवला.

“मावशी, मी मुंबईहून निघाले, तेव्हा माझ्याकडे पासपोर्ट होता, विमानात शिरले तेव्हाही होता, मी जागेवर बसेपर्यंतही होता. पण मी बसत असतानाच पिंटू जागा झाला व रडायला लागला. त्यानंतर मी त्याला शांत केलं. तितक्यात विमान सुटलं. इथे पोहोचल्यावर मी माझं हातातलं सामान घेऊन बाहेर पडले, पिंट्याला थोडा वेळ खेळवलं, दूध पाजलं व माझा विमानाच्या गेटकडे गेले. तिथे सिक्युरिटीत द्यायला पासपोर्ट शोधला, तर.. खरंच मावशी, मी खूप शोधला, पर्समध्ये, हातातल्या सामानात, पिंट्याच्या कपड्यात, अगदी दुपट्ट्यातही बघितला. पण पासपोर्ट मिळालाच नाही. हेच मी मघापासून यांना सांगतेय, पण यांना काही..”

आता मी मराठी असूनही सोनालीच्या रडक्या आवाजात सांगितलेले मला नीट समजत नव्हते, तिथे त्या चिनी पोलिसांना काय कळणार? मलाही त्यांची मॅंडेरिन येत नव्हती, पण त्यांना समजेल असे बोलता येत होते. मी त्यांना समजावून सांगितले काय झालेय ते व ती आलेल्या विमानात पासपोर्ट पडलाय का, ते पाहायला सांगितले. चौकशीअंती कळले की ते विमान ऑस्ट्रलियाला दोन तासांपूर्वीच रवाना झाले. पण त्यात पासपोर्ट मात्र सापडला. सोनाली सीटवर बसताना हातातला पासपोर्ट पिंट्याला सांभाळताना पर्समध्ये जाण्य़ाऐवजी बाहेर पडून सीटखाली गेला असावा. ही सगळी संगती तर नीट लागली. सोनाली बेकायदेशीरपणे प्रवास करत नव्हती, हे सिद्ध झाले, पोलिसांची समजूतही पटली. पण पुढे काय? ते माझ्याबरोबर पासपोर्टशिवाय तिला शहरात जाऊ देऊ शकत नव्हते, ना भारतात परत पाठवू शकत होते. कसा मार्ग काढायचा? कारण तो होता नेमका शनिवार, त्यामुळे भारतीय दूतावास बंद, मदत करू शकणारे भारतीय राजदूत नेमके दौऱ्यावर, त्यामुळे तात्पुरता पासपोर्ट मिळण्याची आशाही फोल ठरत होती. पिंट्याने तर रडून नुसता गोंधळ घातला होता. हे सगळे होईपर्यंत कोर्टकेस करून बाईंना ताब्यात ठेवून घेण्याची ऑर्डरही पोलिसांनी मिळवलेली होती. केस बेकायदेशीर नाही हे सिद्ध होऊनही, शनिवारचे कामकाज आटोपून वकील, न्यायाधीश वगैरे मंडळी वीकेंड साजरा करायला गेली असल्याने सोनालीची सुटका नाहीच. सोनाली तर कधीही रडायला लागेल असे वाटत होते. मी इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत अनपेक्षितपणे सापडलेली. आता जावे तरी कसे व थांबावे तरी कसे?

शेवटी चांगी पोलीस कस्टडीच्या आवारातील खोलीत सोनालीची सोय करायचे ठरले. सिंगापूरच्या पद्धतीप्रमाणे रीतसर कागदपत्रे पूर्ण करून पोलिसांच्या देखरेखीत सोनाली, पिंट्या व त्यांच्यामागे मी असे तिकडे रवाना झालो. एक मात्र चांगले होते की पोलिसांच्या उपस्थितीमुळे आमची ‘वरात’ बघायला कोणीच नव्हते. खोली चांगली होती, गरजेपुरत्या सोईही होत्या, केस बेकायदेशीर नसल्याने पोलीसही सौजन्याने वागत होते. तिच्या नवऱ्यालाही त्यांनी कळवले, पण शेवटी ती कस्टडीच ना! सोनाली मला सोडायलाच तयार नव्हती. शेवटी रात्रीपर्यंत तिला सोबत करून कशीबशी मी घरी गेले. पुढचे दोन दिवस सोनालीसाठी माझ्या कस्टडीत चकरा चालूच होत्या. पासपोर्ट ऑस्ट्रेलियाची वारी करून रविवारी परतला. पण सोमवारी कोर्ट उघडून कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत सोनालीबाईंचा मुक्काम कस्टडीतच व तिच्यासोबत दिवसभरासाठी माझाही. दोन दिवसांच्या गप्पात सोनालीच्या सर्व नातेवाइकांची, मित्रमैत्रिणींची, शेजाऱ्यापाजाऱ्यांची माहिती झाली, पिंट्याशी थोडीफार दोस्ती झाली, पोलिसांशी नको असली तरी ओळख झाली. शेवटी सोमवारी रात्रीच्या विमानाने सोनालीबाई नवऱ्याकडे रवाना होणार, हे पक्के झाले व मलाच हायसे वाटले. पण तुम्हाला म्हणून गंमत सांगू का.. सोनालीची आई म्हणजे माझी मैत्रीण रजनी कोण, हे मला आजतागायत आठवलेले नाही! तिच्यापेक्षा सोनालीच अधिक जवळची झाली, हे खरे.

पासपोर्ट मिळाल्यावर कस्टडीतून आम्हा सर्वांची सुटका झाली. तात्पुरता व्हिसा मिळवून देऊन माझ्या घराकडे आमची सुखरूप रवानगी करताना पोलिसाने सौजन्याने शेकहॅंड केला व "बाय, सी यू अगेन” म्हणाले, तेव्हा मात्र मी चक्क मराठीत म्हटले, “पुन्हा भेटू.. नको रे बाबा!”

दिवाळी अंक वर्ष

वाचने 42
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया