खाली ३१ सल्ले नवरेमंडळींसाठी दिले आहेत.
(महिलांनी हे सल्ले वाचू नयेत.)
(तरीही महिला हे वाचतीलच.)
(त्यामुळे महिलांनी वाचले तरी आम्ही पुरुष काय करू शकतो?)
(त्यामुळे महिलांनी सल्ले वाचले तरी हरकत नाही.)
१. बायकोचा मोबाइल चार्जिंगला लावण्याआधी स्विच बटन ऑन करा, नंतरच मोबाइल चार्जिंग ॲडाप्टरला लावा.
२. ऑफिसातून, कामावरून घरी आल्या आल्या मोबाइल हातात घेऊन रील्स बघत बसू नका, बायकोच्या संतापाच्या आहारी जाऊ नका = बासंआजान.
३. सोफ्यावर तंगड्या वर करून, रेलून मोबाइल बघू नका. मोबाइल बघायचाच असेल, तर टेबलासमोर खुर्ची घेऊन बसा. ऑफिसातले काम करत आहे असे भासवा. बासंआजान.
४. रविवारच्या दिवशी उशिरा उठला असाल, तर चहा तुमच्या हाताने बनवा. बायकोलाही, "चहा घेतेस का? अगदी पाभेच्या चहासारखा चहा करतो" असे विचारा. यासाठी अंघोळ केलीच पाहिजे असे नाही. (पाभेच्या चहाची 'पाककृती' येथे वाचायला मिळेल - https://pashanbhed.blogspot.com/2019/09/blog-post_24.html .)
५. रविवारी केस कापायला सकाळच्या दरम्यान जा आणि जाण्याआधी बाहेरच मित्रांबरोबर मिसळ, वडा वगैरे दणकून हाणा. यासाठी अंघोळ केलीच पाहिजे असे नाही. (अंघोळ एक कंटाळवाणी क्रिया आहे, हे तुम्ही मिपा दिवाळी अंक २०१९पासून जाणताच. https://www.misalpav.com/diwali/45484) घरी उशिरा येण्यास दुकानातल्या गर्दीचे कारण सांगा. बासंआजान.
६. रविवारच्या दिवशी कटिंगचा प्रोग्राम नसेल, तर घरातील रद्दी, भंगार विकायला काढा. यासाठी अंघोळ केलीच पाहिजे असे नाही. रद्दी, भंगार विकलेल्या पैशात मित्राला बोलावून घेऊन बाहेरच्या बाहेरच मिसळ, वडा रस्सा हाणा.
७. रविवारच्या दिवशी आपल्या लहान पोराचे केस...(सल्ला क्र. ५ पहावा). आपले केस व मुलाचे केस वेगवेगळ्या रविवारी कापावेत. आपल्याला उंडारायला एक रविवार जास्तीचा मिळतो.
८. रविवारच्या दिवशी केस कपणे, रद्दी, भंगार विकणे असले काहीच काम नसल्यास गाडीची सर्विस करणे हे काम राखून ठेवावे. क्रॅंक शाफ्ट, सायलेन्सर, कार्बोरेटर, डायनॉमो, स्टेटर मोटर, स्पीडोमीटर, फ्युअल गेज, टेकोमीटर असल्या भारदस्त भागांची नावे घ्यावीत व त्याचे दुरुस्तीचे काम करायचे आहे असे सांगावे. मडगार्ड म्हणू नये, त्याऐवजी फ्रंट फेंडर, रिअर फेंडर असे म्हणावे. ब्रेक, हेडलाइट, हॅंडल अशी माहितीतली चिंगळी नावे घेवू नये.
९. रविवारी दुपारच्या जेवणात आपल्या आहारानुसार शाकाहारी, मांसाहारी जेवण बनवण्यास घरी आगाऊ फोन करून सांगणे. बरोबर काळी पिशवी वगैरे असू द्यावी. खायचे पान, घरच्यांसाठीचे मसाला पान वगैरे आधीच घेऊन ठेवावे.
१०. रविवारी दुपारचे जेवण हादडल्यावर लगेचच झोपू नये. संध्याकाळी बाहेर फिरायला जायचे का, हे घरात विचारा. शॉपिंग, एखादे प्रदर्शन वगैरे असे प्रस्ताव समोरून आले, तर लगेचच तुमचे एखादे काम काढून तो प्रस्ताव धुडकावून लावावा. नपेक्षा, तुझ्या बहिणीला बोलावून घे, किंवा तुम्ही दोघी शॉपिंगला जा, असा सल्ला द्यावा. तिची बहीण तिच्यापेक्षा मोठी असेल, तरी तुम्ही त्यांच्याबरोबर जायची (फक्त) तयारी दाखवा, लहान बहीण असेल तरी तशीच बरोबर जाण्याची तयारी दाखवा व होकारा आला तर जरूर जा. या तयारीनंतरच रविवारच्या दुपारच्या तंगड्या पसरायला जा.
११. मुले मोठी झालेली असतील, तर रविवारच्या दिवशी संध्याकाळी बायकोला त्यांच्या हवाली करून आपण मस्त उंडारायला जावे. दरवाजाची दुसरी किल्ली आपल्या खिशात आधीच टाकून ठेवण्यास विसरू नये. विशेषतः मुलगी मोठी असेल, तर तिच्या शॉपिंगच्या चांगल्या निवडीचे कौतुक करा. एखाद्या शॉपिंग मॉलचे नावही येथे सांगावे व तेथेच मनसोक्त शॉपिंग करा असे सांगावे. असे करण्याने तुमच्या पाकिटाला, क्रेडिट कार्डाला झळ लागू शकते हा एकच धोका आहे. पण इतर फायद्यांचा विचार केल्यास ही झळ कमीच आहे.
आपण स्व:त एकटे उंडारायला गेल्यानंतरच तिकडूनच, "मला उशीर होईल आणि जेवणाची वाट पाहू नको" असा फोन करावा. बासंआजा नये यासाठी वरील वाक्य, आधीच, घरीच असताना बोलू नये. अन्यथा मित्रांबरोबर 'आनंद वाटप कार्यक्रमाचा' विस्कोट होऊ शकतो.
१२. रविवारचा 'आनंद वाटप कार्यक्रम' झाला की मस्तपैकी एखादा सिनेमा टाकावा. यात सगळ्या मित्रांनी टीटीएमएम करावे असे आधीच सांगावे. नाहीतर तुम्हाला स्पॉन्सरशिप करावी लागू शकते.
१३. रविवारी धिंगाणा घालून झाला असल्यास किंवा रात्री घरी लवकर आल्यास (पिक्चर कॅन्सल झाल्यास) घरी येऊन घरच्यांनी केलेल्या शॉपिंगचे कौतुक करावे. साडी, ड्रेस घेतले असतील तर जास्त कौतुक करावे. साडीचा पोत, त्यातील पदरावरचा नाचरा मोर, पदरात बसलेला पोपट, (नाचरा मोर अन पोपट हे गाण्यात लिहिणार्यांना हाणले पाहिजे एकदा.) पोपटी रंग, हळदी पिवळा रंग, हिरवागार रंग, लाल भडक रंग, कुयरीचे डिझाइन, साडीचे नाव, साडीच्या पिक्चरचे नाव, कापडाचा प्रकार, साडी भारतातील कोणत्या प्रांतातील आहे तो प्रांत, रंग, काठ, पदर, ब्लाउजपीस याबाबत तुम्ही तुमचे चांगले मत द्यावे.
तुम्ही राणी कलर, गुलाबी रंग आणि लाल इत्यादी रंगातील फरक ओळखू शकत नसल्यास 'चांगला इंग्लिश कलर' आहे असे धडकून द्यावे. किंवा अल्ट्रा कलर आहे असे म्हणावे. 'अल्ट्रा कलर' सगळ्या कलरमध्ये सामावू शकतो किंवा अल्ट्रा कलरमध्ये सगळे कलर सामावू शकतात. तो तसे सामावून घेतो हे दाखवून देण्याची जबाबदारी मात्र तुमची आहे, हे लक्षात घ्या. अल्ट्राबरोबरचे आणखी दोन शब्द म्हणजे मॉडर्न आणि रिच. अल्ट्रा, रिच, अल्ट्रा + रिच, रिच + अल्ट्रा, मॉडर्न अल्ट्रा, मॉडर्न रिच, मॉडर्न अल्ट्रा रिच, अल्ट्रा मॉडर्न, रिच मॉडर्न, मॉडर्न रिच, अल्ट्रा रिच मॉडर्न, अल्ट्रा मॉडर्न रिच, अल्ट्रा मॉडर्न रिच मॉडर्न अशा अनेक शब्दांवर तुमची हुकमत हवी. आतापासूनच या शब्दांचा सराव करा, म्हणजे पुढच्या दिवाळीत कपडे घ्यायला पारंगत व्हाल.
१४. ऑफिसातून येताना भाज्या आणल्यास त्या शिळ्या, महागाच्या, छोटी गड्डी असलेल्या, फळे आणल्यास कच्ची, जास्त पिकलेली, डाग असलेली अशी सुरुवातीला सुरुवातीला आणावी. नंतर नंतर तुम्हाला भाज्या, फळे आणायला सांगणार नाही. "या माणसाला काहीच आणता येत नाही" अशी शाब्बासकी मिळते.
१५. दळण दळून आणायचे असल्यास, धान्य पाखडलेले नसताना उगाचच घाई करावी. "तुम्ही नका आणू दळून, मीच मरते सगळीकडे" असे आपल्याला प्रोत्साहन मिळते. अशा वेळी, "गिरणीवाले दादा, काय बघता वळून, पाथर्डीला जायचे मला, द्यावं दळून" या गाण्याचे दळण दळावे. तरीदेखील एखादेवेळी दळून आणायचेच असल्यास, नेमक्या कोणत्या पदार्थासाठी पीठ हवे आहे ते विचारून तसे गिरणीवाल्यास सांगावे. पुढील ओरडा टाळता येतो.
१६. घराजवळील चौकात, गल्लीतले न चालणारे गॅरेज, एखादा टेलर, धंदा नसणारे किराणा दुकान, केशकर्तनालय यांच्याशी घसट राहू द्यावी. घरात भांडण, तंटा, कटकट, वाद, धुसफुस, रुसवा, फुगवा, नाराजी, ओढाताण, हेकेखोरपणा झाल्यास, तिच्या माहेरचे पाहुणे घरी आल्यास, घरी आपल्यासाठी स्वयंपाक केला नसल्यास इत्यादी कारणांमुळे घरातून बाहेर पडून या दुकानदारांकडे वेळ घालवता येतो. त्यांच्याकडून दुनियादारी शिकायला मिळते, हा फायदाच असतो.
१७. बायकोच्या साड्या, ड्रेस, कुर्ती, ब्लाउज इत्यादी इस्त्री करणे ही कुशल कामगाराची कामे घरात तुम्हालाच करावी लागत असल्यास, अशा साड्या, ड्रेस, कुर्ती इत्यादी दुकानातून घेताना आवर्जून आपण सोबतीला जावे. (९०% ब्लाउजचे कापड साडीबरोबरच येतात, हे लक्षात असू द्या. अर्थात माप जर ७० सेंटिमीटरच्या वरचे असेल तर मात्र ब्लाउजपीस वेगळा घ्यावा लागतो.) वेगळा ब्लाउजपीस घ्यावा लागत असेल, तर ब्लाउजपीसचे वेगळे दुकान, वेगळी पसंती, अधिकचा वेगळा वेळ लागू शकतो, हा हिशोब मनात असू द्या.
तर कापडाच्या दुकानात आपल्याला इस्त्री करताना सोईचे, पटकन होईल अशाच कापडांच्या साड्या, कुर्ती, ड्रेस मटेरिअल घेण्याचा आग्रह धरावा. आपला अंत:स्थ हेतू सांगू नये. "तुला असेच कापड आणि फिटिंगमधला ड्रेस सूट (सूट म्हणजे चांगला दिसणे या अर्थी आहे) होतो" असे ठासावे अन ठसवावे. मोठ्या घेराचे ड्रेस इस्त्री करताना आपली उगीचच दमछाक होते, हे ध्यानात असू द्यावे. अतिशय सुळसुळीत, झुळझुळीत, मिळमिळीत, गिळगिळीत, चमचमीत, भरभरीत कापडाच्या साड्या, ड्रेस घेऊ नयेत. काचा, टिकल्या, लेस, कुंदन इत्यादी शोभेचे जिन्नस लावलेल्या साड्या घेण्यास सांगूच नये. "तू सोबर कपड्यांत छान दिसतेस" असा रट्टा लावून धरावा. ('तू साधीच छान दिसते' हे वाक्य वापरू नये.) असे सिल्कचे, शिफॉनचे कपडे इस्त्री जास्त तापून जळण्याचा व कुटुंबाचा जाळ होऊन आपला धूर होण्याचा धोका असतो. "कॉटनच बेस्ट, शरीराला सूट होते" हे म्हणणे लावून धरावे. ब्लाउज टाकायला लेडीज महिला टेलरकडे जरूर जावे. मार्केटमध्ये ब्लाउजची, ड्रेसची सध्या काय फॅशन सुरू आहे याविषयी आपले ज्ञान अद्ययावत होते. गोल, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी गळे, कटोरी, डबल कटोरी, डीप कट, लो कट, शोल्डर कट, लांब बाह्या, फुगीर बाह्या, स्लीवलेस, बॉलिवूड कट, मद्रास कट, प्रिन्सेस कट, ट्क्स ब्लाऊज, पट्टी, लेस लावलेले, बोट कट ब्लाउज, साधे, चोळी कट, कॉलर, व्ही नेक, बॅकलेस ब्लाउज, वेडिंग ब्लाउज अशा प्रकारात ब्लाउज असतात, हे ज्ञान मी अशाच टेलर भेटींतून संपादिलेले आहे.
साडीच्या आतला पेटीकोट आपण एकट्याने आपले हातरुमाल आणतेवेळी आणले तरी चालतात. मुख्य ठळक रंगातच - लाल, पिवळा, निळा, हिरवा, पांढरा अन काळा - ते उपलब्ध असल्याने ते पसंत न पडल्यास पुन्हा बदलून आणण्याची आपली डबल चक्कर वाचत असते. बाकीच्या कापडचोपडाची खरेदी आपल्या मनाजोगती, आवडीची आणि श्री. व सौ. दोघे एकत्र असताना करावी. ओळखले तुम्ही, लब्बाड.
१८. कमीत कमी चहा बनवता आलाच पाहिजे. ओरडा पडल्यास, भांडण इत्यादी घटना घडल्यास आपण आपला चहा बनवू शकतो. हाच चहा बायकोच्या मनधरणीसाठी उपयोगात येतो आणि बाहेरचे तेलकट पदार्थ मागवणे टाळले जाउ शकते.
हाच सल्ला कपडे धुण्याच्या बाबतीत, वॉशिंग मशीन लावणे, लादी पुसणे इत्यादी बाबतीत लागू होउ शकतो.
१९. भांडी घासणे अगदीच टाळता येत नसेल, तर "कमीत कमी भांडी विसळायला मदत कर" असे आवाहन समोरील पार्टीला करता येऊ शकते. फक्त बोलण्यात मार्दव हवे, मर्दव्य नव्हे.
२०. चारचाकी गाडीत कुटुंबाबरोबर जाताना आपल्या ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला आपला मुलगा, मुलगी, बायको यांना उतरत्या क्रमवारीत बसवावे. (बायकोला उतरून द्यावे असा याचा अर्थ काढू नका.)
२१. बाहेर जेवण करायचे असल्यास काय पदार्थ मागवायचे ते कुटुंबालाच ठरवू द्या. असेही तुमच्या आवडीचे पदार्थ कुणी मागवत नाही अन मागवले तर चव, क्वांटिटी यावरून तुम्हालाच बोलणी बसू शकतात. असेही रविवारी, सुट्टीच्या दिवशी तुम्ही याची वैयक्तिकरीत्या भरपाई करूच शकता.
२२. ऑफिसातून घरी परत आल्यानंतर पॅंन्टच्या खिशातल्या चीजवस्तू ऑफिसात घेऊन जाण्याच्या बॅगेत लगेच ठेवून द्याव्यात.
२३. दसरा, दिवाळी इत्यादी उत्सवांची घराची सफाई कामाची तयारी सावधगिरी बाळगून करावी. काम झाल्यानंतर बाहेरूनच खाणे मागवावे, वाद टाळले जातात.
२४. सौ.बरोबर दागिने खरेदीला तुम्ही गेलेच पाहिजे, अन्यथा मोठी आर्थिक झळ बसू शकते.
२५. कामावरून घरी येताना काही खाल्ल्यास घरी येऊन "मी बाहेर खाल्ले आहे" किंवा "आज मला भूक नाही" असे सांगू नका. त्याऐवजी, "आज मला थोडे अजीर्ण झाले आहे, थोडेच खाणार आहे" असे सांगा.
२६. सोशल मीडियाबद्दल - बायकोचे टीव्हीवरील सिरिअल्स, तसेच मोबाइलमधले रील्स बघणे याबद्दल भाष्य करू नये. बायकोच्या माहेरकडच्या व्हॉटसअॅप ग्रूपमध्ये सामील होऊ नये. बायकोच्या फेसबुक, इन्स्टा किंवा तत्सम अकांउंट्समध्ये फ्रेंड्स बनू नये.
२७. नावडता स्वयंपाक किंवा नावडती भाजी घरात झाली झाली असल्यास "मला भूक नाही", "तोंडी लावायला पापडाची चटणी कर", "लोणचे आण" असे सांगावे अन त्यालाच मुख्य पदार्थ समजून ताव मारावा.
२८. नावडती भाजी घरात जर तयार करूच द्यायची नसेल, तर आपल्या आवडीच्या भाज्या कामावरून घरी येताना आधीच आणून ठेवाव्यात. "बाजारात काय भाज्या महाग आहेत!" किंवा "आज बाजारात अजिबात भाज्या नव्हत्या" असे सांगावे.
२९. दसरा, दिवाळीची घरात साफसफाई सुरू असल्यास अन त्याच दरम्यान आपल्याला सुटी असल्याने घरीच असल्यास अगदी पहाटेच ताप आल्याचे किंवा जुलाब झाल्याचे सांगून अंथरूण धरून रहावे. दुपारच्या वेळी "तू आज जास्त दमली असशील" असे म्हणून ऑनलाइन फूड ऑर्डर करावे. या वेळी शक्यतो घरातील मंडळींच्याच आवडीची भाजी, अन्न मागवावे. आपल्या आवडनिवडीला या वेळी थोडी मुरड घालावी.
३०. "घरात काडीचेही काम करत नाही हा माणूस" हे वाक्य कानावर आल्यास, "मग बॅंका, गाड्यांची कामे, घरातील नळ दुरुस्ती इत्यादी कामे तूच बघत जा" असे उलटवाक्य फेकावे.
३१. वरील सल्ले नवरेमंडळींनी आपापल्या जबाबदारीवर, मगदुरानुसार अंमलात आणावेत. कारण हे सल्ले केवळ पुरुषांनीच वाचावे हे वरती जरी लिहिले असले, तरी महिलांनीदेखील हा लेख वाचलेला आहे हे ध्यानात ठेवावे. या लेखातील हा सल्लाच आहे, हेदेखील ध्यानात ठेवावे.
मिसळपाव
प्रतिक्रिया