Skip to main content

नावात काय आहे ?

लेखक नवनाथ गायकर यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

नावात काय आहे?

 

- लेखक नवनाथ अर्जुन पा गायकर

 

आलं एकदाच गाव. मी हाश्श हुश्श करत एकदाच खाली उतरलो. बाप रे, काय ही ह्या लालपरीत कोंबलेली माणसांची गर्दी. खरंच गावाची रांगडी माणसं. या गर्दीत मी तर पार चेंगरायचाच बाकी राहिलो होतो.

समोर पिंपळगाव नावाची पाटी बघून गाव तेच असल्याची खातरी करून घेतली.

खिशातून चिठ्ठी काढली. ज्यांच्याकडे जायचं, त्यांचं नाव वाचलं.

'पांडुरंग पाटील.'

तिकडून एक मध्यमवयीन माणूस बुलेटचा फाडफाड आवाज करीत आला. बुलेटला पाच-सहा दुधाच्या किटल्या लटकावलेल्या होत्या. अर्थात या गाड्या खेड्यात चिक्कार आढळतात. इथल्या इथेच मला चार-पाच बुलेट आढळल्या होत्या.

मी बस अड्ड्यावर उभा राहिलो होतो, तिथे जवळच एक चहाचं हॉटेल दिसत होतं. जय बजरंग बली टी स्टॉल अशी पाटी त्या हॉटेलवर झळकत होती.

त्या बुलेटवाल्याने माझ्याजवळच बुलेट आणून लावली. बहुधा हॉटेलमध्ये काहीबाही घेण्यासाठी तो इसम जाणार असेल.

पाडुरंग पाटलाचं घर कुठे आहे हे यांना विचारायला हरकत नाही. मी मनोमन विचार केला. संभाषण कसं सुरू करावं हे कळत नव्हतं घडीभर. आम्ही शहरातील माणसं आता गावाकडे गेल्यावर कसं वागायचं, याबाबत थोडं गोंधळूनच जातो.

"राम राम पाव्हणं."

गावात आपण पाहुणे असलो, तरीही अनोळखी गाववाल्याशी बोलताना पाव्हणे म्हणूनच संबोधलं जातं किंवा जावं, अशी एक रूढ पद्धत आहे.

अर्थात या गावाकडे येताना आमच्या 'हि'ने मला दिलेल्या हजार सूचनांतील ही एक सूचना होती.

शहरात राहणारा मी.. छान सुटाबुटात वावरणारा. पॉश आँफिसात काम करणारा मी.. महिन्याला पंधरा-वीस हजार रुपये कमावणारा मी..

आणि तरीही बायकोला बावळटच वाटतो मी? मोठ्ठं आश्चर्य आहे हे. बाहेर लोक आपल्याला हुशार समजतात, पण बायकोपुढे मात्र कितीही हुशारी दाखवा, ती बावळटच समजणार. 

ही बायकाचीं जात म्हंणजे धड सहनही न होणारं आणि सांगताही न येणारं दुखणंच आहे म्हणायचं.

"राम राम."

गाववाल्याचा आवाज खणखणीत होता. गडीही चांगला उभा-आडवा, पैलवानच होता. 

माझ्या 'राम राम'मुळे हॉटेलकडे जाण्याचा बेत रद्द करून ते माझ्याजवळ आले आणि आमचं संभाषण सुरू झालं.

"कंणच्या गावचे पाव्हणे म्हणायचे?”

मला चांगलं खाली वर न्याहाळत त्यांनी विचारलं.

"नाशिकहून आलोय."

"आनं इथं कुणाकं जायाचं हाये?”

बरं झालं, मी विचारायच्या आधीच बुलेटवाल्यानेच मला विचारलं. आता खातरीशीर घराचा पत्ता मिळून मी दोन मिनिटात पांडुरंग पाटलाच्या घरी असेन.

तिथलं काम आटोपून लवकर नाशिकला पळायला हवं. बिनपगारी सुट्टी टाकलीय. थोडी मौजमस्ती करू आज. मी दिवास्वप्नात थोडा वेळ मग्न झालो. शेवटी मध्यमवर्गीय मानसिकता ती.

"मला ना, इथल्या पांडुरंग पाटलाकडे जायचं आहे."

"कोण पांडुरंग पाटील?”

मी थोडा चकित झालो. म्हटलं, पांडुरंग पाटील नाव सांगितलं की कुणीही आपल्याला त्यांच्या घरी नेऊन सोडेल. अगदी चड्डी सांभाळता न येणारं शेंबड पोरगंही. फुलप्रूफ पत्ता सांगायला शहर थोडंच आहे हे?

गावात शहरासारखं नसतं. शहरातलं काम वेगळं. तिथे प्रथम रस्ता, मग ते नगर, मग ती वसाहत, मग अपार्टमेंट, मग तो प्लॉट जे काय असेल त्याचा नंबर, अमुक धमुक अशा बारा भानगडी असतात. खेड्यात काय? नाव सांगितलं की त्याच्या दारावर नेऊन सोडायला दहा जण सरसावतात, ही माझी धारणा होती.

मी जरा गोंधळलोच. आता पांडुरंग पाटील कोण म्हणून काय सांगावं?

"पाडुरंग पाटील.."

मी थोडा चाचरलोच.

त्यावर तो बुलेटवालाच बोलला.

"अहो, इडं लय पांडुरंग हायीत. अगदी दर घराआड एक म्हणला तरी चालंल. आपल्या मराठी धर्मात हे नाव लय फेमस. प्रत्येक जण ह्योच नाव ठेवतय पोराला. निदान तसं नाय, तर आसं तरी देवाचं नावं येतं त्वाँडांत. काय?”

वाक्य संपल्यावर शेवटच्या मुद्दयावर तो खळखळून हसला आणि हसता हसता मला टाळीही मागितली.

मीही दिली. आणि बळेच हसलोही. मी तरी दुसरं कायं करणार?

"राग येणारं नसंल तं येक इच्चारू?”

"काय वो?”

"नाय, म्हंणजी पाटील म्हणल्यावं मराठाच असणार, पर आपली शंका फेडून घेतल्याली बरी."

माझ्या लक्षात त्यांचा मुद्दा आला. त्यांना माझी जात विचारायची होती. म्हणजे मग कोणत्या जातीचा पांडुरंग ते सांगता येणार होतं.

"हं, हो. मराठा. मराठा जातीचा पांडुरंग."

मी म्हणालो.

"न्हाय, म्हंणजी कसं हायं, गाव म्हणलं की इकडं बारा बलुतेदार आले. आता पांडुरंग हे नाव समदीकं कॉमन हाये ना, म्हणून पयली जात इच्चारून घेतली."

त्याने खुलासा केला खरा. पण परत प्रश्नार्थक चेहरा करून मला विचारलं.

"पण मग आता पांडुरंग पाटील कंचा म्हणायचा? धा-पंधरा तरी पांडुरंग पाटील हाये इकडं."

आता पांडुरंग पाटील कोण सांगायचा? मी थोडा गोंधळलो खरा. पण चटकन आठवलं. 

अरे हो, आडनाव सांगायचं विसरलोच की यांना.

 मी विजयी मुद्रेने म्हटलं,

"पांडुरंग पाटील काळे. काळे आडनाव आहे बघा त्यांचं."

"अहो, इडं समदेच काळे आहेत. हे गावच काळ्यांचं हाये. चिक्कार पांडुरंग काळे हायेत. काळ्यांचाच भरणा लय हाये इडं. पुरं नाव सांगा. बापाचं नावं सांगा तेच्या."

तोच नेमका वांधा होता. बापाचं नाव मला माहीत नव्हतं. आता काय करावं? मोठा बिकट प्रश्न होता.

मी डोक्याला थोडा ताण दिला. म्हटलं, मला काय अन्य खाणाखुणा आठवतात की नाही...

"हं बघा, त्यांचा ना, दुधाचा धंदा आहे. म्हंणजे दूधवाले आहेत ते."

"इडं परतेकाच्या दारात जितराब आसतंच आसतं. आनं दुधाचा धंदा इडं दर घरी हाये. आवं, ज्याच्याकं जितराब न्हाय, त्यो काय कुणबी म्हणावा व्हयं? अंगणात प्वॉर अन गोठ्यात ढ्वॉर पायजेलच. तरच त्या घराला शोभा."

त्याने त्याचं गावठी तत्त्वज्ञान झोडून घेतलं.

"त्यांच्याकडे बुलट आहे बघा."

मी डोक्याला आणखी ताण देत नव्या खाणाखुणा सांगायला सुरुवात केली. पण तो आपला जणू बॅट घेऊन सिक्सर मारायला तयारच होता.

"आवो, खेड्यात बुलट, राजदुत याच दणकाट गाड्यांचं काम. तुमच्या लुचुपुचु गाड्या इडल्या रस्त्यावं टिकती बी नायं आनं दुधाच्या कॅनी, गवताचं भारं, कडबा, ढेपीचं वझं वाहती पण नायी. इडं तुम्हाला बुलेटच दिसणारं. ह्या अश्या."

बुलेटवाल्याने हे मला सांगताना आपल्या बुलेटला प्रेमाने कुरवाळलं.

आता तर मी ठार वेडाच होईन बहुधा, असं वाटू लागलं होतं.

बायको खरंच मला बावळट का समजते, त्याचंही उत्तर आता मला मिळालं होतं. ती निघताना चांगली मला बोलली होती, "अहो, चांगला व्यवस्थित नाव-पत्ता वगैरे माहिती घ्या. उगाच अर्धवट माहिती घ्याल आणि मग नाहीच सापडले तर हेलपाटा व्हायचा."

पण मी अतिशहाणा. मी उलट तिलाच मूर्ख ठरवत म्हणालो होतो, "अगं, ते शहर थोडंच आहे का, सगळं इत्थंभूत माहिती करायला. खेडयावर कुणालाही विचारलं की कुणीही कुणाचं घर पटकन दाखवतात. नुसतं दाखवत नाही, तर एक सोडून दहा जण तुम्हाला थेट संबंधिताच्या घरी नेऊन सोडतात. नको काळजी करू."

पण आता मला या अतिशहाणपणाचा पश्चात्ताप होत होता. नाव-पत्ता खरंच व्यवस्थित विचारून घ्यायला हवा होता.

आता काय खाणाखुणा सांगाव्यात यांना, म्हणजे मला हवे ते पाडुरंग पाटील सापडतील यावर मी विचारमंथन करू लागलो होतो.

"पर पाव्हणं, काम तं काय म्हणायचं या पांडुरंग्याकं तुमचं?”

या प्रश्नाने मला खुणेची आणखी एक तार सापडली. मी हर्षभरित होऊन म्हणालो,

"त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे बघा."

"च्यॉक च्यॉक."

तोंडाने आवाज काढत त्यांनी नकारार्थी मान हलवली. म्हणजे ही खूणही त्यांना काही पटली नव्हती.

प्रकट स्वरूपाने ते मुखावाटे बोलले,

"आवं पाव्हणं, इंदिराबायनं आणिबाणीच्या काळात माणसं धरू धरू नसबंद्या केल्या, तवापासून समदीकं 'हम दो हमारे दो'चाच नारा बुलंद हाय की. तिसरं प्वॉर आपलं तुरळाक गेलच एखुंदयाचं आपरिशन फेल तं येतंय की जल्माला."

बुलेटवाल्याने चावट डोळा मारत मोठाच विनोद केल्याचा आविर्भाव आणत पुन्हा एकदा माझ्याकडून टाळी घेतली. निदान पंधरा मिनिटांपासून आम्ही बोलतोय, तेव्हा एवढी जवळीक नक्कीच झाली होती सतत टाळ्या घेण्याइतपत.

मी तर आता चक्रावलोच होतो जणू. मला रामायण, महाभारत मालिकेतील ते युद्धप्रसंगच आठवायला लागले जणू. इकडून एकाने बाण मारला की दुसऱ्याने तो तोडायचा. मी इकडून एखादी खूण सांगितली की हा बुलेटवाला तिकडून लगेच ती खोडण्यासाठी तत्पर होत होता.

आता हा पांडुरंग पाटील शोधावा तरी कसा आणि कुठे?

बरं, ही घटना जुनी आहे, जेव्हा मोबाइल, लँडलाइन वगैरे गोष्टी फारशा कॉमन नव्हत्या तेव्हाची. नाहीतर वाचक म्हणायचे की काय बावळटपणा आहे हा. सारांशमध्येच हा खुलासा केला आहे.

"काम नाय सांगितलं तुम्ही?”

"काय?”

"आवो, पांडुरंग्याकं काय काम हाये त्ये न्हायं सांगितलं तुम्ही?”

"अं हो, ते ना. ते सोयरिकीचं काम होतं जरा त्यांच्याकडे."

खरं तर आता माझा मूड निघून गेला होता. कारण मी आज ऑफिसला दांडी मारून खास इकडे आलो होतो. हा पांडुरंग पाटील न सापडल्याने माझी ती चक्कर वाया गेली होती. शिवाय भाड्याचे पैसे वाया जाऊन आज पडलेला आर्थिक भुर्दंडही मला बोचत होता.

पुन्हा काहीतरी आठवल्यासारखं मी उसळलो.

"अहो, त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे बघा."

मला वाटलं, आता तरी..?

पण बुलेटवाले खो खो हसू लागले, तेव्हाच मी मूर्ख असल्याची जाणीव अधिकच तीव्र झाली.

"आवो, पूर्वी टँक्टर गावात आला तं आजुबाजुच्या धा-पाच गावचे लोक यायचे जतराला आल्यासारखे. उपाशीतापाशी बिनभाकरीचे. आन आता एखुंदयाचा टँक्टर पलटी झाला तं काळं कुतरं बी ढुकुन पहात नाय तिकडं. उलटं म्हणत्यात, मरू द्या, पलटू द्या. डायवरं पेल आसंल. द्या टाळी."

बुलेटवाल्याचं पहाडी हसणं आणि सतत टाळी मागणंच आता माझ्या कपाळी आलं होतं. कपाळावर हात मारणं तेवढं बाकी होतं आता.

"परत जाण्यासाठी एस.टी. किती वाजता आहे?”

मला आता परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

"पोराला स्थळ आणलं व्हतं काय? पांडुरंग्याच्या?”

"अं, हो."

माझा आता बोलण्याचा मूड निघून गेला होता.

"कुडलं स्थळ आणलं व्हतं म्हणायचं?”

"माझ्या भाचीचं स्थळ आहे."

"कुडली भाची?”

"घोटीची."

"कंणची घोटी? बाजार घोटी? खुर्द का बुद्रुक?”

"घोटी?”

मी गोंधळलो. घोटीसुद्धा एवढ्या आहेत? नुसतं अर्धंमुर्धं नाव माहीत असून काही उपयोग नाही. पूर्ण माहिती असेल, तरच आता तपास करावा. पूर्वीचा जमाना गेला, हे खरंच.

"फोकणे पाटील..!"

"मग आपली घोटी खुर्द."

बुलेटवाल्याने नाव घेताच ताबडतोबीने गाव ओळखलं. मला आश्चर्य वाटलं.

"मधी कोण हाये?”

"मधी?”

मला काही समजलं नाही. माझा चेहरा बावळटासारखा झाला.

"आवं, मध्यस्थी? मांगणं दावणारा कोण आहे?”

"ते होय? नांदुरचा पाव्हणा आहे मध्यस्थी."

"कणचं नांदुर?”

"म्हंणजे नांदुरसुद्धा चार-पाच आहे का?”

"हाये का म्हंणजी काय? हायेच आलरेडी. नांदुर वैदय हाये, शिंगोटे हाये, मानुर हाये. नांदुर मधमेश्वर हाये, आजुन..."

"बस्स.. बस्स.. बस्स."

नावागावाची ताकद मला आज, आता कळली होती. नावात काय आहे? असं तो कोणी शेक्सपिअर बोलला होता म्हणे, त्याला आता ओरडून सांगावंस वाटू लागलं होतं मला. म्हणावं, नावात खूप काही आहे बाबा. नावातच खरी ओळख आहे. नाव नसलं की अशी फजिती होते बघ, म्हणावं.

"आवो, आता आमच्याच गावाचं बघा ना. नुसतं पिपळगाव सांगून उपेग नाही. कारण पिपळगाव म्हणलं लोकं लगेच इच्चारत्यात - कणंच पिपळगाव? कारण मोराचं पिपळगाव हाये, खांबाचं हाये, बसवंत पिपळगाव हाये. पुरं ठावं नसलं का कधीकधी भलत्याच पिपळगावला जाणारा माणूस भलत्याच पिपळगावला जाऊन पोहचतो."

बुलेटवाल्याचं पुन्हा एकदा हसणं आणि पुन्हा एकदा टाळी पडली. या वेळी माझा हात पुढेच होता. कारण या वाक्यावर तो टाळी मागणारच हे आधीच लक्षात आलं होतं माझ्या.

"कणचं नांदुर म्हणले मंग तुम्ही?”

"ते काही सांगता येणार नाही बुवा. एवढी खोलात जाऊन नाही माहिती घेतली मी."

काय बावळट आहे हा असा भाव चेहऱ्यावर झळकला होता त्या बुलेटवाल्याच्या. अगदी बायकोप्रमाणेच.

"पाव्हण्याचं नावं काय म्हणला?”

"सुरेश पाटील."

"आडनाव?”

आता परत माझी अडचण झाली. मला माझा स्वत:चाच राग यायला लागला होता. आपणही नावा-गावाला फारसं महत्त्व दिलं नाही कधी. आता पाहिलं ना कसा गोंधळ उडतोय ते.

"आडनाव काही आठवेना आता. पण असंच ळ..ळे असं काहीतरी आहे शेवटला."

"आवो, काजळे किवा मुसळे आहे का?"

"हा, हा, आठवलं. मुसळे, मुसळे आडनाव आहे बघा त्याचं."

"आवो मगं ते नांदुरवैदय."

"बरं, ते जाऊ दया. आता एस टी किती वाजता आहे?”

"वापिस जाताय का?”

"मग आता काय करणार? परत जाऊन योग्य ते नाव, गाव व माहिती घेऊनच यावं लागेल."

"चला, चहा घेऊ थोडा थोडा."

बुलेटवाल्याने आग्रह केला.

"नाही, नको."

खरं तर मलासुद्धा आता चहाची तलफ आलीच होती, पण रीतभात म्हणून प्रथम आढेवेढे घ्यायचेच असतात.

"चला वो. च्याला नाय म्हणू नका. आमच्या गावात पाव्हणं हायं तुम्ही."

मला बरं वाटलं. बाकी काही असो-नसो, गावात माणुसकी मात्र नक्कीच टिकून आहे अजून, याचं समाधान वाटलं.

आम्ही दोघंही समोरच्याच जय बजरंग बली टी स्टॉल नावाच्या हॉटेलमध्ये घुसलो. बाकड्यावर बसलो, तशी त्यांनी चहाची ऑर्डर दिली.

बोलता बोलता आमची गाडी सोयरिकीच्या मुद्द्यावर आली.

"माझं बी पोरगं हाये लग्नाचं. आमचं बी जमवाजमवीचं काम चालू हाये."

त्याने मला माहिती द्यायला सुरुवात केली. खरं तर यात मला आता काही स्वारस्य नव्हतं. पण आता चहा पिता पिता थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा होणारच.

"पिपरीचे पाव्हणे येणार हायं आमच्याकडे बी, पोरासाठी. मला वाटलं ते तुम्हीच हाय का काय?”

"पिंप्रीचे?”

मी ताडकन उडालोच.

"व्हयं. का वो, काय झालं?”

"अहो, मग मी पिंप्रीचाच आहे की. माझं मूळ गाव पिंप्रीच. पण मी नोकरीला असल्यामुळे वीसेक वर्षांपासून नाशिकलाच असतो."

"काय सांगता?”

"हो."

"आमच्या गणेशगावच्या मेव्हण्यानं मला सांगितलं व्हतं पिपरीचे पाव्हणे धाडतो म्हणून."

"रमेश बोचरे का?”

"व्हय."

"अहो, मग नांदुरच्या सुरेश मुसळेचे व्याही आहेत ते. आणि मुसळेनीच मला हे स्थळ सुचवलं होतं मग. म्हटलं, स्वतः जाऊन पाहून या म्हणून."

"या असं व्हतं बघा. काखंत कळसा नं गावाला वळसा. द्या टाळी."

या वेळी मीही त्यांच्या हसण्याला मनापासून दाद देत मनसोक्त टाळी दिली.

"मग तुमचंपण नावं पांडुरंग पाटीलच आहे का?”

"व्हयं."

"काय राव हे मग?”

माझी मुद्रा आता विजयी झाली होती. दडपण सगळं दूर सारलं गेलं होतं.

"दुधाचा धंदा करतात का तुम्ही?”

आता आम्ही दोघंही खेळकर मूडमध्ये आलो होतो.

"तुमच्या समुरच हायं की दुधाच्या किटल्या. आनं बुलट बी हाय, बरं का?”

"दोन मुलं?”

"दोनच हायं की. हम दो, हमारे दो."

"आणि ट्रॅक्टर?”

"तो बी हाय की दारात उभा."

आणि आम्ही दोघंही आता खदखदून हसत एकमेकाला टाळ्यांवर टाळ्या देऊ लागलो होतो.

---------------- समाप्त ---------

दिवाळी अंक वर्ष

वाचने 36
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया